पत्रकार मोहितेंवरील गुन्हा मागे घेण्याची मागणी

नांदेड - नांदेड येथील पत्रकार सतीश मोहिते यांच्यावर ता. 20 मार्च रोजी नांदेड ग्रामीण पोलिस ठाण्यात विविध कलमांखाली गुन्हा दाखल झाला आहे. सिडको भागातील डॉ. सूर्यकांत पेद्दावाड यांनी दिलेल्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आलेला असून, तो चुकीच्या पद्धतीने आणि खोटा असल्यामुळे तो मागे घेण्यात यावा, अशी मागणी पत्रकारांनी पोलिस अधीक्षकांकडे केली आहे.

डॉ. पेद्दावाड यांनी केलेल्या चुकीच्या उपचारांमुळे त्यांच्या रुग्णालयात तान्ह्या मुलाचा मृत्यू झाला. त्याची बातमी सतीश मोहिते यांनी दिल्यामुळे चिडून डॉ. पेद्दावाड यांनी त्यांच्याविरुद्ध खोटी तक्रार दिल्यानंतर हा गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनीही आकसातून खोटा असा गुन्हा दाखल केला आहे, मोहिते यांनी यापूर्वी पोलिसांविरुद्ध दिलेल्या विविध बातम्यांचा राग धरून सिडको पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे, असे पत्रकारांच्या शिष्टमंडळाने पोलिस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

गुन्हा घडला त्यावेळी सतीश मोहिते शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषदेस उपस्थित होते. डॉ. पेद्दावाड आणि पोलिसांच्या संगनमतातून पत्रकार सतीश मोहिते यांच्याविरुद्ध हा खोटा गुन्हा दाखल झाला आहे. वृत्तसंकलनाचे आपले काम करताना पत्रकारावर अशाप्रकारे खोटा गुन्हा दाखल करणे म्हणजे माध्यम स्वातंत्र्यावर घाला घालण्याचा प्रकार आहे. या निंदनीय प्रकाराचा तीव्र शब्दांत आम्ही निषेध करत आहोत. तसेच सतीश मोहिते यांच्यावर दाखल झालेल्या खोट्या स्वरूपाचा गुन्हा तत्काळ मागे घेण्यात यावा, अशी आमची मागणी आहे. केशव घोणसे, गोवर्धन बियाणी, प्रल्हाद कांबळे, पंढरीनाथ बोकारे, डॉ. हकीमखान आदी पत्रकारांचा शिष्टमंडळात समावेश होता.

Post a Comment

0 Comments