'विलासी' पत्रकारीतेला अ'विनाशी' लगाम?

अमरावतीच्या दैनिक 'हिंदुस्थान'चे प्रबंध संपादक विलास मराठे यांची बदनामी करणारे 'ई-मेल्स' पाठविण्याच्या आरोपावरून 'लोकमत' चे माजी जिल्हा प्रतिनिधी अविनाश दुधे यांना पोलीसांनी काल-परवा अटक केली. विलास मराठे इंडिया बुल्सचे दलाल असून दैनिक हिंदुस्थान आणि अंबा फेस्टिवलसाठी त्यांनी पैसा घेतला, असा प्रमुख आरोप सदर 'ई-मेल्स' मध्ये करण्यात आला आहे. 'मराठेंच्या परंपरेला जप' असा सल्लाही त्या वादग्रस्त 'ई-मेल्स' मध्ये देण्यात आला आहे.
पत्रकारांना खरंच प्रतिष्ठा, इज्जत, इभ्रत असते? अशा सामाजिक साशंकतेच्या पार्श्वभूमीवर विलास मराठे यांनी या साशंकतेलाच आव्हान दिल्याबद्दल आम्ही प्रथमत: त्याचे आभार मानून अभिनंदन करतो. विलास मराठे यांचेवर करण्यात आलेले गंभीर आरोप खरे की खोटे? याचा निर्णय न्यायालयात लागणार असला तरी एका पत्रकाराने दुसऱ्या पत्रकारावर असा 'वार' करण्याचे मुळ कशात असावे? विलास मराठे विरूध्द अविनाश दुधे असं वरकरणी दिसणारं हे 'वॉर' दोन पत्रकारांच्या वैयक्तिक भांडणापुरतेच मर्यादित आहे ? की आजच्या युगातील 'विलासी' पत्रकारीतेला अ'विनाशी' लगाम घालण्याचा हा प्रयत्न म्हणावा? असे प्रश्न या निमित्याने दत्त म्हण्ाून आहेत. अविनाश दुधे यांनी विलास मराठेंवर केलेले किती आरोप खरे किती खोटे? याचा निवाडा न्यायालय करेलच परंतू 'मराठेंच्या परंपरेला जप' असा सल्ला देतांना अविनाश दुधे मात्र साफ विसरलेत की मराठेंच्या काही परंपरा आजही हिंदुस्थानने जपल्या आहेत. अमरावतीचे पत्रमहर्षी बाळासाहेब मराठे यांच्या काळात हिंदुस्थान मट्नयांचे आकडे छापत होता. त्यानंतर डॉ. अरूण मराठेंच्या काळातही हिंदुस्थान मटक्याचे आकडे छापत होता आणि आजही हिंदुस्थानने ती परंपरा जपलेली आहे.
 पत्रकारीता हे सतीचं वाण असतं, असं आपण नेहमी ऐकतो. हे सतीचं वाण काय असतं? कशाशी खायचं असतं? कशा बरोबर खायचं असतं? या प्रश्नांची उत्तरं शोधण्याआधी ते नेमकं काय असतं? पूर्वी सती प्रथा होती. पती निधनानंतर पतीव्रतेने स्वत:ला जिवंत जाळून मरण पत्करण्याची ती अघोरी प्रथा होती. सती जाणारी स्त्री सती जाण्यापूर्वी सुवासिनींना वाण द्यायची. ज्यांनी ज्यांनी ते वाण घेतलेलं असायचं त्यांना नंतर सती जावं लागायचं. आता सती प्रथा बंद झालीय आता सतीचं वाण जर एखादी महिला देत असेल तर प्रथम तिला अटक होईल आणि दुसरी अटक ते वाण घेणाऱ्या महिलेला होईल. या प्रथेतील ते 'वाण' देणं घेणं आता कालबाह्य, नियमबाह्य आणि कायद्याचा भंग ठरलं आहे. असं असलं तरी सतीच्या त्या 'वाणा'चा अर्थ त्या शब्दाची, त्या कृतीची बांधिलकी इमानाशी, 'घेतला वसा न उतता न मातता' खाली न टाकण्याशी संबंधीत होता. सती प्रथा बेकायदेशीर ठरल्यानंतर सतीचं वाणही बेकायदेशीरच ठरतं तथापी त्यामागची जी भावना होती त्या भावनेला वेगळा अर्थ होता. त्यातूनच पत्रकारीतेला सतीचं वाण म्हटल्या जात असे. ही परिस्थिती आता राहिली का?
बदलल्या काळात पत्रकारीता बदलली. पत्रकार बदलले. तत्व बदलले. समग्र परिवर्तन झाले. अत्याधुनिकतेसह व्यावसायिकता आली, व्यवसायीकता धंदा पांघरून वावरती झाली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लोकमान्य टिळक यांच्या डाव्या-उजव्या विचारांच्या पायावरील गर्भश्रीमंत वैचारिक पत्रकारीता कधीच लुप्त झाली. बाजार बसव्यांचे थवे पत्रकारीतेच्या आसमंतात 'साखळी' करून आपआपल्या डोळ्यात मावेल तेव्हढे आकाश आपल्या नावे करते झाले. बापजन्मात बापालाही 'पत्र' न लिहीणारे 'पत्रकार' झाले. 'पत्रावळी'साठी 'पोट' पत्रकारीता करणाऱ्या 'पत्रावळी'कारांच्या पिलावळी निर्माण झाल्या. भांडवलाच्या भरवशावर पत्रकारीतेचे इमले चढू लागले. लिहीणाऱ्यांच्या लेखण्या सोन्याच्या तराजूत तोलल्या जाऊ लागल्या. लिहीणाऱ्याच्या थप्प्या भांडवलदाराच्या भांडारात विसावू लागल्या. पत्रकारीता विकावू झाली 'शेटजी आणि भटजी' च्या विश्वात 'शेटजी' श्रेष्ठ ठरला 'भटजी' 'शेटजी'च्या ओसरीपुरता मर्यादित झाला. पत्रकारीता समुळ संपुर्ण बदलली. दोन चार तुकडे टाकले की लिहीणाऱ्यांचा 'प्रबंध' होतो. पाच दहा तुकडे टाकले की लिहीलेलं खपविणाऱ्यांचा 'प्रबंध' होतो. दहा वीस तुकडे टाकले की, खपलेलं प्रतिष्ठीत होतं. या प्रबंधा प्रबंधातूनच प्रबंध संपादक नावाची संकल्पना अस्तित्वात आली. वृत्तपत्रास जे जे हवं त्याचा प्रबंध करणारी प्रबंध संपादकाची नवीन जात तयार झाली. लिहीणारे, लिहीलेलं खपविणारे दुय्यम ठरले. दोन दिडकीवर आयुष्य खेचण्याची हतबलता डो्नयावर लादून जगणारे दुसरं काय करणार? भांडवलदाराचे भांडवल, कामगारांच्या श्रमापुढे फिके पडते याला कशाला हवाय पुरावा? पत्रकारीतेचे असे हसे झाल्यावर मग कशाचं तत्व अन कुठलं सत्व?
   'पत्रकार' म्हणजे आपल्या लेखणीच्या आणि ज्यांना लिहीता येत नाही अशांनी आपल्या भाडोत्री लेखणीकांकडून आपल्या वृत्तपत्राच्या जोरावर कुणालाही बदनाम करण्याची सुपारी घेतलेला तथाकथीत प्रतिष्ठीत इसम असा सर्वसाधारण समज समाजात नांदत आहे त्याला जबाबदार पत्रकारच होत. पत्रकार स्वत:ला सर्वेसर्वा समजतात. कधी ते वकीलाची भूमिका पार पाडतात तर कधी न्यायाधीश बनतात. आमच्याशिवाय कुणाला काही कळतच नाही. हा पत्रकारांचा आवडता सिध्दांत. सर्वज्ञ असल्यासारखे वागत असतांना आपली स्वार्थ सिध्दी होण्याची संधी दिसताच अचानक पलटी मारणे तर पत्रकारांची खास लकब. डंख मारल्यानंतर साप जसा त्वरेने पलटतो तसा हा चवथा स्तंभ कधी कधी काल काय लिहीलं हे विसरून वागतो आणि त्यामुळेच आज पत्रकारांची प्रतिष्ठा लोप पावत आहे. पोलीसांच्या अवैध धंद्यावर आसुड ओढणाऱ्या बातमीच्या बाजुलाच मट्नयाचे आकडे छापण्याचे 'पुण्य'कर्म आज महाराष्ट्नात किती वृत्तपत्र करीत आहेत? वाचक वर्ग वाढावा म्हण्ाून मट्नयाचे आकडे छापण्याची 'प्रतिष्ठीत' सवय वाचकांना लावणाऱ्या जिल्हा वृत्तपत्राचे जाऊ द्या परंतू खाऊन पिऊन सुखी असलेल्या जाधवांच्या 'पुढारी'ने आजही मट्नयाचा आकडा छापावा ही पत्रकारीतेची अधोगती नव्हे का? हे सर्व झालं पत्रकारीतेच्या एकूण स्वरूपाबाबत. सर्वच पत्र आणि पत्रकार असे पत्रकारीतेला न जाणणारे आहेत. असं मुळीच नाही. अनेक संस्कारीत वृत्तपत्र आणि पत्रकार याला अपवाद आहेत. म्हण्ाूनच अमरावतीत जे घडलं ते का घडलं? त्यांच मूळ काय? याचा मागोवा घेत असतांना एकूणच पत्रकारीता ज्या विलासीतेकडे वळत आहे त्या वळणावर तर आपण जात नाही ना? याचा पत्रकारांनी प्रकर्षाने विचार करण्याची गरज आहे असे म्हटल्यास काही वावगे ठरेल का?
 विलास मराठे प्रतिष्ठीत प्रबंध संपादक आणि अविनाश दुधे, प्रथितयश पत्रकार आहेत. यात 'वाद'च नाही असं असतांना अचानक हा 'वाद' का? इंडिया बुल्सने दैनिक हिंदुस्थान व अंबा फेस्टिवलला पैसा दिला असा अविनाश दुधेंचा आरोप आहे. इंडिया बुल्सने अंबा फेस्टिवलला 10 लाख रूपये दिल्याची कबुली सुध्दा दिली आहे. याचाच अर्थ या दोन पत्रकारांमधील या वादाचे मूळ इंडिया बुल्स असून त्याचा केंद्रबिंदू नांदगाव पेठ येथे होवू घातलेला वीज प्रकल्प आहे. इंडिया बुल्स आपल्या देशातील प्रमुख उद्योजक असून उद्योगाच्या माध्यमातून स्वत:चा अन् झालाच तर देशाचा विकास करणे, स्वार्थासह जमल्यास परमार्थ असा त्यांचा अजेंडा आहे. इंडिया बुल्सने नांदगाव पेठ परिसरात सहा हजार कोटीचा वीज प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेताच त्याला परिसरातील सर्वसामान्यांनी जबरदस्त विरोध केल्याचे सर्वश्रृत आहेच. काही महामानवांनी प्रथम जिवाच्या आकांताने वीज प्रकल्पास विरोध केला मात्र नंतर त्यांचा विरोध मावळला. प्रथम विरोध करणे आणि नंतर शेपुट घालणे या 'अर्थ' पुर्ण कृतीचा अर्थ न समजण्या एव्हढी आता जनताही दुधखुळी राहीलेली नाही. इंडिया बुल्स उद्योजक आहेत. साधू संन्यासी नव्हेत. भांडवल गंुंतवून त्यावर नफा कमावणे हा मूळ उद्देश उराशी बाळग्ाुनच कोणताही उद्योजक मैदानात उतरत असतो. इंडिया बुल्सने 'साम आणि दाम' याचा वापर करून आपल्या प्रकल्पाचा पहिला टप्पा पुर्ण केला आहे. उद्योग उभारणे त्याचा ह्नकच आहे. त्यांच्या उद्योगामुळे या परिसराचा विकास होणार आहे, हे काही अंशी खरे असले तरी सिंचनाचं हजारो हे्नटर जमीनीचं पाणी पळवून छटाकभर केलेला विकास स्विकारणे मतीमंदाच्या शाळेत प्रवेशासाठी अर्ज करण्यासारखे नव्हे का? येथे इंडिया बुल्सला दोष देता येणारच नाही. त्यांचा तो व्यवसायच आहे. परंतू शेतीचं पाणी पळविणाऱ्या इंडिया बुल्स विरूध्द आधी आगपाखड करणारे नेते अचानक तोंडात मुगाची शेतं कोंबतात तेव्हा त्यांच्या श्रीमुखातील मुगाला इंडिया बुल्सने सोन्याचा मुलामा दिल्याचे स्पष्ट होते. हे नाकारून काही अर्थ आहे का? ज्या लोक प्रतिनिधींना इंडिया बुल्सने सोन्याचे जोडे हाणले ते मुकाट बसले. हे खरे नाही का? जर शेतीचे पाणी, अमरावतीचे पिण्याचे पाणी या प्रकल्पामुळे कमी होणार असेल तर आमचा त्याला विरोध राहील अशी 'जर, तरं'ची 'जरतरी' भाषा वापरून इंडिया बुल्सला मदत करणारे आमदार, खासदार आज इंडिया बुल्सच्या पगारपत्रकावरील कामगारापेक्षा जास्त किमतीचे नाहीत अशी जनभावना आहे.
 अमरावतीच्या सर्वपक्षीय नेत्यांनी इंडिया बुल्सचा वीज प्रकल्प स्विकारून आपली बांधिलकी जनतेशी नसून इंडिया बुल्सशी असल्याचं सिध्द केलं आहे. आजमितीस सारे नेते मुकाट आहेत आणि जेथे नेते मौन राखतात तेथे वृत्तपत्रानीच भोकाड पसरायचे असते. हिंदुस्थान येथे चुकला का? कोणत्याही चळवळीत वृत्तपत्रांची भूूमिका महत्वाची ठरते. जेथे नेते पैसा खावून गप्पगार होतात तेथे वृत्तपत्रांनी रान पेटवणं अपेक्षित असतं जेथे नेते षंढ ठरतात तेथे वृत्तपत्रांनी मर्दानगी दाखवायची असते. परंतू अमरावतीत दुदैवाने तसे घडले नाही काही मोजकी वृत्तपत्रं वगळता इंडिया बुल्सच्या पठाणी वीज प्रकल्पा विरूध्द कुणी लिहीत नाही, बोलत नाही. साऱ्यांच्या लेखण्या थिजल्या आहेत. लिहीण्यांन काही होणार नाही. कुणी आंदोलनच करत नाही मग लिहीणार काय अन् कसं? असा प्रश्न पडला असेल अनेकांना मग छापा इंडिया बुल्सने वाटलेल्या सौर कंदीलाची बातमी अन त्यांनी घेतलेल्या आरोग्य शिबीराची छायाचित्र. वृत्तपत्रांची ही 'बोटचेपी' भूमिका नेत्यांच्या 'चुप्पी'लाही लाजवणारी ठरावी. अविनाश दुधेंनी साऱ्यांचा राग हिंदुस्थानवर काढला का? संयु्नत महाराष्ट्नाच्या चळवळीत दिड वर्ष तुरूंगवास भोगलेल्या बाळासाहेब मराठेंचा हाच काय तो हिंदुस्थान? अशी तर अविनाश दुधेंच्या संतप्त इ-मेल्सची प्रतिक्रिया नव्हती ना?
खरं म्हणजे सर्वच वृत्तपत्र या बोटचेपेपणाबद्दल निश्चितपणे जबाबदार आहेत. पत्रकार म्हणजे केवळ पत्रपपरिषदेच्या बातम्या छापणारा हमाल नसतोच. नेतृत्व जेव्हा 'खुजे' होते तेव्हा पत्रकारांना 'खोजे' होण्याचा अधिकार नसतो. हिंदुस्थान एक प्रतिष्ठीत दैनिक आहे. सर्व वृत्तपत्रांचे नेतृत्व करणारा वरिष्ठ हिंदुस्थान स्वातंत्र्यपूर्व काळापासून अपप्रवृतीशी लढत आला आहे. विलास मराठे एक उत्साही, खेळकर सदा हसतमुख पत्रकार या वृत्तपत्राचा एक घटक आहे. केंद्रीय ह्कश्राव्य विभागात मानाचं पद त्यांच्याकडे आहे, अंबा फेस्टिवलचे ते कोषाध्यक्ष आहेत आणि म्हण्ाून त्यांच्याकडून निर्भिड, निपक्ष, निर्भीकतेसह सर्वांना सोबत घेऊन अन्याया विरूध्द लढण्याची अपेक्षाही आहेत. त्या अपेक्षाभंगातून झालेले आरोप एव्हढे मनाला लावून घ्यायचे असतात का? आपली प्रतिष्ठा तोलण्याचे काम माणसाने किमान कायद्याच्या सुपूर्द करावयाचे नसते. आपणच आपले मोजमाप करावयास हवे. अविनाश दुधेचेही चुकलेच की स्वत:च्या नावाने मेल करून सुचवायचे होते ना सारे काही ...! असो विलासभाऊ उद्यापासून मट्नयाचा आकडा न छापण्याचा 'प्रबंध' करता ना...? बरं दिसत नाही ते हिंदुस्थानच्या प्रतिष्ठेला.
- दिलीप एडतकर
अमरावती.  मो. 9422855493

Post a Comment

0 Comments