शैलेंद्र चव्हाण इस्त्राईलच्या अभ्यास दौरयावर रवाना

मुंबई :  मुक्त कृषी पत्रकार शैलेंद्र चव्हाण हे नुकतेच इस्त्राईलच्या कृषी अभ्यास दौरयावर रवाना झाले आहेत. दहा दिवसांच्या या दौरयात ते तेल अवीव येथील तीन वर्षांनी होणारया आंतरराष्ट्रीय कृषी व्यापार प्रदर्शनास भेट देतील. अल्मोग भागातील चीबूत आदिवासी जमातीकडून होणारया सामूहिक शेतीचाही ते अभ्यास करतील. चीबूत जमात सहजीवनाने रहाते व प्रत्येकाला आवडीचे काम करण्याचे स्वातंत्र्य असते. त्यातून त्यांनी खडकाळ माळरानांवर हरित क्रांती घडवून आणली आहे. सामूहिक शेतीतून दर्जेदार खजूर, कलिंगड, टोमाटो आणि केळीचे पीक घेण्यात चीबूत तरबेज मानले जातात. याशिवाय इस्त्राईलमधील जैविक प्रकल्प आणि रोबोटिक डेअरी फार्मिंग प्रकल्पांना भेट देवून त्यांची माहितीही घेतली जाणार आहे.  जलसिंचन, सूक्ष्म पाणीवापर आणि पाण्याचे पुनर्प्रक्रिया याचाही अभ्यास या दौरयात केला जाईल. शैलेंद्र चव्हाण यांनी पुण्याच्या रानडे इनस्टीट्यूटमधून पत्रकारितेची पदवी घेतली आहे. गेली आठ वर्षे ते सकाळ समूहाच्या एग्रोवन दैनिकात खानदेश प्रतिनिधी म्हणून काम पाहत होते. अलीकडेच त्यांनी नोकरीचा राजीनामा दिला असून आता त्यांनी म्हसावद (जि. जळगाव) येथील स्वत:च्या १०० एकर शेतीत आधुनिक पीकपद्धतीचे प्रयोग सुरू केले आहेत. कृषी पत्रकारितेच्या क्षेत्रातील भरीव कार्याबद्दल चव्हाण यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत. केळी, कापूस तसेच सूक्ष्मसिंचन, प्रगतीशील शेती यात त्यांचा विशेष अभ्यास आहे.