साईप्रसाद मीडिया सुरू करणार मराठी वृत्तवाहिनी आणि साप्ताहिक



बड्या माध्यमसमूहांच्या प्रतिथयश साप्ताहिकांच्या भाऊगर्दीत आक्रमक, बिनधास्त-बेधडक असे ‘हमवतन' साप्ताहिक प्रकाशित करणारा उत्तरेतील साईप्रसाद मीडिया लवकरच मराठी वृत्तवाहिनी आणि साप्ताहिक सुरू करणार आहे. ‘हमवतन'ने यंदाचा सर्वोत्कृष्ट वृत्तसप्ताहिकाचा पुरस्कार प्राप्त झाला आहे. साईप्रसाद मीडिया समूहातर्फे ‘हमवतन' साप्ताहिकाव्यतिरिक्त न्यूज एक्स्प्रेस ही  वृत्तवाहिनीही चालविली जाते. हिंदीत स्थान पक्के केल्यनंतर साईप्रसाद मीडिया समूहाने मराठी वृत्तवाहिनी आणि साप्ताहिक या माध्यमातून भाषिक विस्ताराच्या कार्यक्रमाची योजना आखली आहे. नुकतेच साधना न्यूजमधून समूह संपादकपदाचा राजीनामा दिलेले वरिष्ठ पत्रकार एसएन विनोद 22 मे रोजी साईप्रसाद मीडिया समूहात रुजू होत आहेत. त्यांच्याकडे मराठी वृत्तवाहिनी आणि साप्ताहिक तसेच भाषिक विस्ताराची जबाबदारी देण्यात आली आहे. येत्यादोन महिन्यात मराठी वृत्तवाहिनीचे प्रक्षेपण सुरू व्हावे, अशी कंपनीची योजना आहे.

 

साईप्रसाद मीडिया समूह माध्यमाव्यतिरित वीजनिर्मिती, अन्न-प्रक्रिया उद्योग, सॉफ्टड्रींक्स उत्पादन, पायाभूत सुविधा, वित्तव्यवहार, रिअल इस्टेट अशा अनेक क्षेत्रात गेल्या दहा वर्षांपासून भक्कम पाय रोवून आहे. देशातील वृत्तवाहिन्यांच्या गर्दीत न्यूज एक्स्प्रेस ही वृत्तवाहिनी सुरू करताना देशातील पहिले हायडेफिनेशन टेलिकास्टिंग सुरू करण्याचा मान या समूहाने मिळविला. नेहमीच्या प्रक्षेपणापेक्षा अशा प्रक्षेपणाला चारपट अधिक गुंतवणूक करावी लागते. साईप्रसाद मीडिया समूहाने टीव्ही पत्रकारितेचे प्रशिक्षण देणारी न्यूज एक्स्प्रेस मीडिया अकादमी ही संस्थाही सुरू केली आहे.

वरिष्ठ पत्रकार एसएन विनोद हे महाराष्ट्राला परिचित आहेत ते ‘देशोन्नती'चेसमूह संपादक म्हणून. त्यांनीच ‘देशोन्नती'चे हिंदी दैनिक ‘राष्ट्रप्रकाश' लॉंंंच केले होते. ‘प्रभात खबर' या नावाजलेल्या हिंदी दैनिकाचे संस्थापक-संपादक ही त्यांची खरी ओळख. याशिवाय नवभारत आणि ‘इंडिया न्यूज'सह अनेक माध्यमसमूहात वरिष्ठ पदांवर विनोद यांनी काम केले आहे.