> बेरक्याला माहिती देण्यासाठी ई - मेल करा - berkya2011@gmail.com

गुरुवार, ३१ ऑक्टोबर, २०१३

सुकृत खांडेकर यांनी केली मिड - डे च्या बातमीची कॉपी...

पुणे - इंग्रजी वृत्तपत्रात आलेली बातमी मराठीत भाषांतरीत करून,स्वत:च्या नावावर बायनेम देण्याचा प्रकार मराठी वृत्तपत्र सृष्टीत नवा नाही.मात्र सुकृत खांडेकर सारख्या ज्येष्ठ पत्रकारांनीही असा प्रकार करावा,हे नवल आणि आश्चर्यच म्हणावे लागेल.
राज्याचे दुग्धविकास मंत्री मधुकर देवराव चव्हाण यांना, दररोज पाच लिटर दुध मोफत दिले जाते आणि त्यासाठी आरे डेअरीचा 15 हजार रूपये पगार असलेला नोकर राबत असल्याची मोठी बातमी मिड - डे मध्ये दि.28 ऑक्टोबर रोजी पान 8 वर प्रसिध्द झालेली आहे.त्याची लिंक MId Day आम्ही या ठिकाणी देत आहोत.विनोदकुमार मेमन यांच्या नावावर प्रसिध्द झालेली ही बातमी केसरीचे कार्यकारी संपादक सुकृत खांडेकर यांनी स्वत:च्या नावावर बायनेम दिली आहे.सदर बातमी केसरीमध्ये दि.30 ऑक्टोबर रोजी पान 1 वर सहा कॉलमध्ये बॅनर करण्यात आली आहे.
सुकृत खांडेकर यांनी मिड - डे च्या बातमीचे केवळ भाषांतर करून,स्वत:च्या नावाने प्रसिध्द केली आहे.याबाबत मराठी वृत्तपत्र सृष्टीत सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.सुकृत खांडेकर हे एक ज्येष्ठ पत्रकार आहेत.त्यांनी महाराष्ट्र टाइम्स,लोकसत्ता आणि लोकमत अशा प्रतिष्ठित वृत्तपत्रांत काम केलेले आहे.सेवानिवृत्तीचे वय झालेले असताना,पत्रकारितेची त्यांची हौस अजून संपलेली नाही.मात्र शेवटच्या टप्यात त्यांनी मिड - डेची बातमी स्वत:च्या नावावर प्रसिध्द करून स्वत:चेच हसू करून घेतले आहे.आता आपण याला काय म्हणाल ? केसरीचे मालक दीपक टिळक आता खांडेकर यांना कोणते बक्षिस देणार ?

तनिष्का व्यासपीठाच्या सदस्य नोंदणीमुळे त्रस्त जिल्हा बातमीदार काकडेंनी दिला राजीनामा

नागपूर : उदय भविष्यपत्राकडून महाराष्ट्रातून अनेक विकासाच्या बाबतीत अपेक्षा आहेत. मात्र, बातमीदारांना एनजीओचे वर्कर म्हणून काम करण्यास जुंपण्यात आले आहे. महाराष्ट्राचा विकासाची दवंडी पिटनार्या  या वृत्तपत्रात आता बातम्या कमी आणि तनिष्काच जास्त असल्याने वाचकांची सकाळ हिरमुसली आहे.याच त्रासाला कंटाळून वाशिम येथील जिल्हा बातमीदार सुनील काकडे यांनी राजीनामा दिला आहे.
विदर्भातील आणखी काही जिल्हा बातमीदार आणि त्यांचे सहकारी त्रासातून मुक्त होण्यासाठी नव्या संधीच्या शोधात आहेत
 उदय भविष्यपत्राच्या डोकेबाजांचे ड्रीम आणि प्रोजेक्ट सांभाळताना आता कर्मचा-यांच्या नाकी नऊ आले आहे. तनिष्का महिला नावाचा व्यासपीठ प्रकार कर्मचा-यांच्या मानगुटीवर बसविण्यात आला आहे. याच त्रासाला कंटाळून आता कर्मचारी भविष्यपत्राची नोकरी सोडून दुस-या वर्तमानपत्रात संधीच्या शोधात आहेत .
मार्च महिन्यात सुरू करण्यात आलेला तनिष्का व्यासपीठाची पहिली बैठक मुंबईत झाली. महिलांकडून सातशे रुपये जमा करून तनिष्का सदस्य तयार करण्यात आले. पण, त्याला प्रतिसाद न मिळाल्याने स्पॉन्सर शोधण्यासाठी व्यवस्थापनाकडून बातमीदारांवर दबाव टाकण्यात आला. अनेकजण करियरमध्ये फायदा होईल, अशी अपेक्षा ठेवून मोठ्या प्रमाणात सदस्य नोंदणी केली. मात्र, यंदा पगारवाढ देखील देण्यात आली नाही. जी देण्यात आली, ती केवळ एक हजार रुपये होती. त्यामुळे मानसिकरित्या डोकेदुखी ठरलेल्या भविष्यपत्राला रामराम ठोकण्याचा इरादा ठेवून असलेल्या बातमीदारांवर आता आता प्रत्येक जिल्हा परिषद सर्कलमध्ये चार तनिष्का सदस्य सातशे रुपये घेऊन करण्यासाठी सूचना देण्यात आल्या आहेत. यासाठी प्रायोजक शोधण्याची तंबी देण्यात आली आहे. सोबतच प्रत्येक बूथवर तनिष्का भगिनी तयार करण्यासाठी कर्मचर्याना अक्षरशः धमकाविणे सुरू आहे. या भगिनींची निवडणूक घेऊन घेऊन समांत्तर शासन उभे करण्याचा मानस पुण्यात बसलेल्या उदय भविष्यपत्रांच्या डोकेबाजांचा आहे.

रविवार, २७ ऑक्टोबर, २०१३

ज्येष्ठ पत्रकार आणि दैनिक प्रभातचे माजी संपादक माधवराव खंडकर यांचे निधन


पुणे  - प्रभातचे माजी संपादक आणि समाजवादी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते माधवराव गंगाधर खंडकर यांचे आज सकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. मृत्यूसमयी ते 79 वर्षांचे होते. खंडकर यांच्यामागे पत्नी, एक भाऊ, पुतण्या असा परिवार आहे.
कोकणातून येथे आलेल्या खंडकर यांनी अतिशय बिकट परिस्थितीतून शिक्षण घेतले. अगदी तरुण वयातच त्यांनी दैनिक प्रभातमध्ये शिपाई म्हणून नोकरी करत शिक्षण पूर्ण केले. दैनिक प्रभातचे संस्थापक वा. रा. कोठारी यांनी त्यांची चिकाटी आणि सामाजिक तळमळ पाहून पुढे प्रभातमध्ये त्यांची संपादक म्हणून नियुक्ती केली. आयुष्याची तब्बल 55 वर्षे प्रभातच्या सेवेत असताना तब्बल 35 वर्षे त्यांनी संपादकपदाची धुरा सांभाळली.
सामाजिक कार्याशी आपल्या पत्रकारीतेची नाळ पक्की जोडणारा संपादक म्हणून ते ख्यातकिर्त होते. अनेक सामाजिक उपक्रमांमध्ये आणि चळवळींमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील समस्या आणि गावकर्‍यांचे प्रश्‍न समजून घेण्यासाठी त्यांनी तब्बल चारशे गावांना भेटी देऊन गावकर्‍यांशी थेट संपर्क साधला होता. आठवड्यातून एकदा किमान पाच ते सहा गावांना भेट देऊन ते गावकर्‍यांशी पारावर बसून संवाद साधत असत. त्यांचे प्रश्‍न समजून घेतानाच एक गाव एक पाणवठा, एक गाव एक स्मशान ही चळवळ त्यांनी गावोगाव रूजवली होती. त्यांचे वैशिष्ट्य म्हणजे संपादकपदावर कार्यरत असताना कार्यालयीन कामकाजात एकहंी दिवस सुट्टी घेतली नव्हती. त्यांची रंगतरंग आणि चौकातली चर्चा ही सदरे अनेक वर्षे दैनंदिन स्वरूपात प्रसिद्ध होत असत. अत्यंत सौम्य आणि समजुतीच्या भाषेत परंतु प्रभावीपणे सामाजिक समस्या या सदरातून ते मांडत, त्याचा स्थानिक प्रशासनावर खूप प्रभाव पडत असे. केवळ माधवरावांनी आपल्या सदरात एखाद्या समस्येचा उल्लेख केला तरी महापालिका किंवा सरकारी यंत्रणा त्याची दखल घेत असे याची अनेक उदाहरणे अनेकांना माहिती आहेत. 

मागील काही दिवसांपासून आजारी असलेल्या खंडकर यांची आज सकाळी प्राणज्योत मालवली. दुपारी त्यांच्या पार्थिवावर वैकुंठ स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रसंगी महापौर चंचला कोद्रे, उपमहापौर बंडू गायकवाड, शिवसेनेचे संपर्कनेते गजानन किर्तीकर, आमदार डॉ. नीलम गोर्‍हे, रमेश बागवे, काँग्रेसचे शहर अध्यक्ष अभय छाजेड,  शिवसेनेचे शहरप्रमुख श्याम देशपांडे, रिपाइंचे शहर अध्यक्ष महेंद्र कांबळे, रिपाइं मातंग आघाडीचे प्रदेश अध्यक्ष हनुमंत साठे, मनसेचे नगरसेवक रविंद्र धंगेकर, शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष नरेंद्र व्यवहारे, राष्ट्रभाषा प्रसार सभेचे ज. गं फगरे, शिक्षण मंडळ सदस्य लक्ष्मीकांत खाबिया, बाळासाहेब जानराव, नुरूद्दीन सोमजी, आज का आनंदचे संपादक शाम आगरवाल, आनंद आगरवाल, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुभाष वारे, साहित्य परिषदेचे सुनिल महाजन, ललित रुणवाल, नितीन पवार, आनंद सराफ, विकास देशपांडे, ज्येष्ठ पत्रकार एकनाथ बागुल, अरुण खोरे, सुकृत खांडेकर, संजीव शाळगांवकर, नंदकुमार काकिर्डे, पत्रकार प्रतिष्ठानचे अध्यक्ष उमेश धोंगडे, राजेंद्र नाईक यांच्यासह विविध राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच अनेक पत्रकार उपस्थित होते.
 

श्रद्धांजली सभा 30 ऑक्टोबरला
ज्येष्ठ पत्रकार माधवराव खंडकर यांना श्रद्धांजली वाहाण्यासाठी 30 ऑक्टोबर रोजी श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले आहे. श्रमिक पत्रकार संघाच्या हॉलमध्ये सकाळी 11 वाजता ही श्रद्धांजली सभा होईल.


पत्रकारांनी साजरी केली दिवाळी आधीच दिवाळी ! प्रेस क्लबतर्फे दिवाळी फराळाचा कार्यक्रम

अहमदनगर : दिवाळीचा खमंग फराळ, सोबतीला आपले कुटुंबिय आणि मित्र परिवार, आकाशकंदील आणि रांगोळ्यांमुळे निर्माण झालेल्या प्रसन्न वातावरणात आज पत्रकार आणि त्यांचे कुटुंबिय रंगून गेले होते. दिवाळी आधीच पत्रकारांनी सामुदायिक पद्धतीने दिवाळी साजरी केली. प्रेस क्लबतर्फे आज दिवाळी फराळ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पत्रकार आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी हा कार्यक्रम होता. प्रमुख पाहूणे म्हणून पोलिस अधीक्षक रावसाहेब शिंदे, महापालिका आयुक्त विजय कुलकर्णी, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विलास कांबळे, उपमहापौर गितांजली काळे, जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष सुभाष गुंदेचा, ज्येष्ठ पत्रकार मीनाताई मुनोत, इलेक्ट्रॉनिक्स मिडिया संघटनेचे अध्यक्ष सचिन अग्रवाल, समाजसेवक राजाराम भापकर गुरुजी आदी यावेळी उपस्िथत होते. प्रेस क्लबचे प्र. अध्यक्ष मन्सूर शेख यांनी सर्वांचे स्वागत केले. विजयसिंह होलम यांनी प्रास्ताविक केले. मनीषा इंगळे यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व पत्रकारांनी परिश्रम घेतले. शहरातील पत्रकारांनी मोठ्या संख्येने सहकुटुंब उपस्थित राहून फराळाचा आस्वाद घेतला. अशा प्रकारचा आगळावेगळा कार्यक्रम प्रथमच होत असल्याचे मनोगत पाहुण्यांनी व्यक्त केले. प्रेस क्लबतर्फे पत्रकारांच्या कुटुंबियांना सुगंधी दिवाळीचे कीट भेट देण्यात आले.

शनिवार, २६ ऑक्टोबर, २०१३

दिवाळीनंतर आयबीएन-लोकमतमध्ये बॉम्ब फुटणार

मीडियात गेल्या एक महिन्यापासून शांतता आहे. कोणत्याही वृत्तपत्रांत आणि चॅनलमध्ये सध्या कसल्याच घडामोडी नाहीत.त्यामुळे आमची इच्छा असूनही वाचकांना नवनविन बातम्या गेल्या काही दिवसांत देवू शकलो नाही.क्षमस्व.
* न्यूज एक्स्प्रेसच्या स्टुडिओचे काम सुरू आहे.किमान 15 दिवस तरी काम पुर्ण होण्यास लागतील.त्यानंतर मुंबईतील भरती सुरू होणार आहे.त्यामुळे परिस्थिती जैसे थे आहे.
* दिवाळीचा सण तोंडावर आलेला आहे.एकाही चॅनल आणि वृत्तपत्रांनी आपल्या कर्मचाऱ्यांना दिवाळीचा बोनस दिलेला नाही.किमान पगार तरी 30 तारखेच्या आत झाला तर नशिब.
* जय महाराष्ट्रमध्ये रवी आंबेकर यांची जागा शैलेश लांबे घेणार आहेत.बहुतेक 1 नोव्हेंबरला ते जॉईन होतील.
* दिवाळीनंतर आयबीएन-लोकमतमध्ये बॉम्ब फुटणार असल्याची माहिती मिळाली आहे.तेथील अनेकजण सध्या वैतागले असून,ते नव्या संधीच्या शोधात आहेत.बहुतेकजण मी मराठीच्या वाटेवर आहेत.
* मी मराठीमध्येही 15 दिवसांनंतर भरती सुरू आहे.श्रीरंग खरे मी मराठीमध्ये जॉईन झाले आहेत,तर एबीपी रौनक कुकडे लवकरच जॉईन होणार आहेत.
- बस्स,सध्या तरी ऐवढेच...पुन्हा भेटू...

शुक्रवार, २५ ऑक्टोबर, २०१३

सच्चा कार्यकर्त्याचा सत्कार

अमर हबीब आणि माझ्या मैत्रीबद्दल नव्यानं काही लिहावं असं इथं प्रयोजन नाही. मात्र अमरला नुकत्याच प्रदान करण्यात आलेल्या पुरस्काराच्या निमित्तानं काही गोष्टी आठवल्या. आजपर्यंत अनेकांनी अमरला त्यांच्या संस्थेच्या पुरस्काराबद्दल विचारलेलं आहे. अनेकदा मी साक्षीदार आहे. प्रत्येक वेळी त्याने पुरस्कार स्वीकारण्यास नम्रपणे नकार दिला. माझ्यापेक्षा अनेकजण योग्य आहेत, असंच तो सांगायचा. ज्यांनी त्याच्या गळी उतरवण्याचा प्रयत्न केला त्यांना अमरने सुनावले...‘तुम्ही कोण लागुन गेलात मला पुरस्कार देणारे? अनेकजण पुरस्काराच्या प्रतिक्षेत आहेत, त्यांना द्या.’  अमर एक सामाजिक कार्यकर्ता व पत्रकार म्हणून समाजात वावरत असल्याने, गल्लीबोळात दिल्या जाणा-या व राज्यव्यापी म्हणवल्या जाणा-या पुरस्कारांचं स्वरूप त्याला माहित आहे. असे पुरस्कार देणा-यांची भूमिकाही तो जाणून आहे. त्यामुळेच आजपर्यंत त्याने कुठलाही पुरस्कार स्वीकारला नव्हता. पुरस्काराबाबत त्याची पाटी कोरी होती. याचा त्याला अभिमानही वाटायचा.
अमरावतीच्या ‘आम्ही सारे फाउंडेशन’  ने त्यांच्या ‘आम्ही सारे कार्यकर्ता’  या पुरस्कारासाठी अमरची निवड करण्याचा निर्णय केला तेव्हा त्याने हा पुरस्कार स्वीकारण्याला संमती दिली. त्याचे कारण हा पुरस्कार कुठल्या भ्रष्ट पुढा-यातर्फे अथवा कथित सामाजिक संघटनेतर्फे दिला जाणारा पुरस्कार नाही. सरकारी खिरापतीतून वाटला जाणाराही हा पुरस्कार नव्हता. या पुरस्काराचे मोल खूप अधिक आहे.त्यासाठी या पुरस्काराची जन्मकथाही जाणून घेणे आवश्यक आहे. संघर्ष वाहिनी, शेतकरी संघटनेचे आघाडीचे कार्यकर्ते व सुप्रसिद्ध लेखक चंद्रकांत वानखडे यांचा उल्लेख त्यांचे मित्र ‘फाटका कार्यकर्ता’  असा करतात. विदर्भाच्या ११ जिल्ह्यातील वानखडे यांच्या मित्रांनी, कार्यकत्र्यांनी त्यांच्यासाठी ११ लाख रुपयांचा निधी संकलित करुन त्यांचा भव्य असा सत्कार केला. या सत्कारात वानखडे यांना ११ लाखाची थैली अर्पण करण्यात आली. आपल्या या फाटक्या मित्राला आर्थिक मदत व्हावी हा या मागचा त्यांचा प्रामाणिक हेतू होता. मात्र या फाटक्या कार्यकत्र्याने या ११ लाखातून स्वतःसाठी एक पैसाही घेतला नाही. हा सर्व निधी त्यांनी ‘आम्ही सारे फाउंडेशन’  कडे सुपूर्द केला. या संघटनेची कल्पनाही वानखडे यांचीच. या फाउंडेशनमार्फत दरवर्षी एका सच्चा कार्यकत्र्याला एक लाख रुपयांचा पुरस्कार देऊन गौरविण्याचा निर्णय घेण्यात आला. २०१२ पासून या उपक्रमाची सुरूवात झाली. २०१२ चा पहिला पुरस्कार विदर्भातीलच शेतकरी संघटनेचे बिनीचे कार्यकर्ते विजय विल्हेकर यांना देण्यात आला. २०१३ च्या या दुस-या पुरस्कारासाठी अमर हबीब यांची निवड करण्यात आली. या पुरस्कारा मागची भावना व त्याचे मोल लक्षात घेऊनच अमरने तो स्वीकारण्याचा निर्णय घेतला. त्याच्या खात्यावर जमा झालेला हा पहिला पुरस्कार कोणालाही अभिमान वाटावा असाच आहे.

२० ऑक्टोबरला अमरावतीतील ज्ञानेश्वर सभागृहातील या भव्य पुरस्कार सोहळ्याला मीही साक्षीदार होतो. अमरच कर्तृत्व त्याचे सगळे मित्र जाणून असल्यामुळे त्याच्या सत्कारासाठी तोलामोलाचेच पाहुणे निवडण्यात आले होते. राजस्थानचे जलपुरुष म्हणून ओळखले जाणारे, मॅगासेसे पुरस्कार विजेते राजेंद्रसिंह राणा, सामाजिक जाण असलेले व निःस्पृह अधिकारी अशी ओळख असलेले अमरावतीचे आयुक्त श्रीयुत डी.आर. बनसोड, अमरचे स्नेही चंद्रकांत वानखडे, आ.बच्चु कडू, हे या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते. चाहत्यांनी तुडूंब भरलेल्या सभागृहात अमर हबीब व आशा वाघमारे यांचा डोळ्याचे पारणे फेडणारा हृदयस्पर्शी असा सत्कार समारंभ पार पडला. या सत्काराच्या वेळी संपूर्ण सभागृहातील अमरच्या चाहत्यांनी उभे राहून त्याच्याविषयीचा आपला आदरभाव व्यक्त केला. या वेळी अमरला एक लाख  रुपयांचा चेकही देण्यात आला.
प्रारंभी अमर हबीब यांच्या जीवनावरील एक डाक्युमेंटरी उपस्थितांना दाखविण्यात आली. यात लातूरचे पत्रकार दिपरत्न निलंगेकर व महारूद्र मंगनाळे यांचा महत्वाचा सहभाग असल्याचे संयोजकानी आवर्जून सांगितले. यावेळी बोलतांना आयुक्त डी.आर.बनसोड यांनी अंबाजोगाईतील आपल्या पहिल्या नियुक्तीच्या वेळच्या आठवणी सांगून अमर सारख्या प्रामाणिक कार्यकत्र्याच्या सत्कार समारंभात सहभागी होता आल्याबद्दल आनंद व्यक्त केला. चंद्रकांत वानखडे यांनी संघर्ष वाहिनीच्या काळातील आठवणी जिवंत करुन अमरचे कार्यकर्तेपण विशद केले. आ.बच्चु कडू यांनी अमरला मिळालेल्या या पुरस्कारामुळे पुरस्काराचे मोल वाढल्याचे सांगितले. पाणीवाले बाबा म्हणून ओळखल्या जाणा-या राजेंद्रसिंह राणा यांनी आपल्या हस्ते अमर हबीब यांचा सत्कार होतोय ही आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट असल्याचे सांगितले. संघर्ष वाहिनीत अमर नेता होता तेव्हा आपण कार्यकर्ते होतो हेही त्यांनी आवर्जून सांगितले.

सत्काराला उत्तर देताना अमर हबीब म्हणाले, ‘मी आणि आशा वाघमारे यांनी प्रेमविवाह केला. मी मुस्लिम घरात जन्मलो. ती ख्रिश्चन. दोघांनीही धर्म बदलला नाही. प्रेम कोणातही होऊ शकते. ती एक भावना आहे. आज जर दोन भिन्न धर्मियांना लग्न करायचे असेल तर धार्मिक पद्धतीने तत्काळ करता येते. मात्र दोघापैकी एकाला आपला धर्म बदलावा लागतो. धर्म बदलला की, मंदीरात, मस्जिदमध्ये किंवा चर्चमध्ये लग्न करता येते. पण स्पेशल मॅरेज अ‍ॅक्टमध्ये लग्न करताना दोघापैकी कोणालाही धर्म बदलण्याची गरज नाही. मात्र या लग्नासाठी एक महिन्याची नोटीस द्यावी लागते. हा एक महिना घरच्या मंडळींना दबाव आणण्यासाठी, लग्न मोडण्यासाठी सोयीचा ठरतो. त्यामुळे एक महिन्याची नोटीस देण्याची पद्धत चुकीची आहे. ती रद्द व्हायला हवी.’
भारतातील शिक्षणाच्या धार्मिकतेवर प्रकाश टाकताना अमर म्हणाला, ‘मला पहिली मुलगी झाली तिचे नाव तरंग. मी तिला बालवाडीत टाकायचे ठरवले. तिची आई आशाची भाषा मराठी. आम्ही दिल्लीकडचे असल्याने आमच्या घरात उर्दू बोलली जात असे. माझी मातृभाषा ही उर्दूच. पण मी ठरवले, घरात आईचीच भाषा चालली पाहिजे. आम्ही घरात मुद्दाम मराठीत बोलायचो. यामुळे मुलगी तरंग आणि मुलगा सारंग यांना मराठी शाळेत घालायचे ठरवले. एका ख्यातनाम शाळेत गेलो. समोरच सरस्वतीदेवीचा पुतळा होता. मला मुख्याध्यापक म्हणाले, आम्ही रोज सरस्वतीची प्रार्थना घेतो. मी ही शाळा नाकारली. दुस-या शाळेत गेलो. तिथे तर तीन हिंदू देवदेवतांच्या प्रार्थना घेतल्या जात होत्या. शेवटी नाईलाजाने घराजवळच्या एका शाळेत त्यांना टाकले. माझी साडेचार वर्षाची तरंग एक दिवस शाळेतून आली आणि घडाघडा गायत्रीमंत्र म्हणू लागली. मी हबकून गेलो. आता माझ्या नातवाला शाळेत घालतानाही हाच प्रश्न निर्माण झाला. नातवाच्या आईची मातृभाषा उर्दू असल्याने नातवाला उर्दू शाळेत घालायचे ठरवले. तिथे तर इस्लाम व कलमाच शिकवल्या जातात. सरकारी अनुदानावर चालणा-या शाळांत आपला धर्म मुलांवर का लादला जातो? मला माझ्या मुलांना १४ वर्षांची होईपर्यंत धर्म शिकवायचा नव्हता. १४ वर्षानंतर त्यांना हवा तो धर्म स्वीकारावा किंवा धर्माशिवाय राहावे असे माझे मत होते. परंतु मला हे करता आले नाही. कारण माणूस म्हणून शिक्षण देणारी एकही शाळा या देशात नाही. आज ४० वर्षांनंतरही या परिस्थितीत काहीही बदल झालेला नाही.’
समाजातील सर्वात दुर्बल घटक कोण? हे सांगताना अमर म्हणाला, ‘ज्यांना आपला मुलगा किंवा मुलगी आपल्यासारखे होऊ नयेत असे वाटते ते सगळ्यात दुबळे. डॉक्टरांना आपला मुलगा डॉक्टर व्हावा वाटतो. वकीलांना त्याचा मुलगा वकील व्हावा वाटतो. पुढारी तर आपल्या मुलांना पुढारीच बनवतात. त्यासाठी वाट्टेल तेवढा खर्च करतात. मात्र कुठल्याही शेतक-याला आपला मुलगा शेतीत यावा असे वाटत नाही. आपल्या मुलाला शिपायाची नोकरी लागली तरी त्यासाठी वाटेल ते करायची त्याची तयारी असते. दुस-या बाजुला कुठल्याही स्त्रीला आपल्याला मुलगी होऊ नये असे वाटते.आपण आयुष्यभर एक स्त्री म्हणून जे दुःख भोगलं तसं दुःख भोगणारं अपत्य जन्मू नये असं तिला वाटतं. याचाच अर्थ सध्या शेतकरी आणि स्त्री हे दोन घटक सर्वात अडचणीत आहेत. त्यामुळे त्यांच्यासाठी काम करण्याची खरी गरज आहे.’
आपल्या मुस्लिम असल्याबद्दलचा समाजाचा दृष्टिकोन विशद करताना अमर म्हणाले,‘मला सगळे विचारतात की तू मुस्लिमांसाठी काय केलंस? का? हा प्रश्न लोक मला का विचारतात याचे मला आणखीही कोडे सुटले नाही. ही मंडळी चंद्रकांत वानखडेना विचारत नाहीत की तू मराठ्यांसाठी काय केलेस? शेखर सोनाळकरला विचारत नाहीत की तू सीकेपीसाठी काय केलेस? मग मलाच हा प्रश्न का विचारला जातो.’
आपण आज जे काही आहोत ते समाजामुळेच. समाजामुळेच आपण घडलो. अखेरपर्यंत आपल्याला कार्यकर्ता म्हणून राहणे आवडेल असे सांगून हा पुरस्कार दिल्याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.
या सत्कार सोहळ्याला अमर हबीब यांचे संघर्ष वाहिनीतील सहकारी, शेतकरी संघटनेतील सहकारी कार्यकर्ते, विविध पत्रकार मित्र, राज्याच्या विविध भागातील त्यांचे चाहते उपस्थित होते. पुण्यनगरीचे संपादक अविनाश दुधे यांनी या कार्यक्रमासाठी पडद्याआड राहून मेहनत घेतली. ते व्यासपीठावर गेले नाहीत याचे अनेकांनी कौतूक केले.

महारूद्र मंगनाळे
मुक्तरंग प्रकाशन,लातूर
मो. ९४२२४६९३३९,९०९६१३९६६६

रविवार, २० ऑक्टोबर, २०१३

बेळगाव येथे पत्रकार विकास ट्रस्टचा १५ वा वर्धापन दिन उत्साहात


रविवारी बेळगाव येथे पत्रकार विकास ट्रस्टचा १५ वा वर्धापन दिन, पुरस्कार वितरण आणि जेष्ठ पत्रकारांचा सत्कार कार्यक्रम उत्साहात पार पडला. या कार्यक्रमासाठी माजी न्यायाधीश बी. जी. कोळसे-पाटील, आमदार संध्याताई कुपेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. अध्यक्षस्थानी आमदार संभाजी पाटील होते. यावेळी कै. बाबुराव ठाकूर पुरस्कार मनीषा सुभेदार, युवा पत्रकार पुरस्कार मधुकर पाटील यांना देण्यात आला. तसेच जेष्ठ पत्रकारांचा सत्कार आणि दर्पण या विशेषांकाचे प्रकाशनही यावेळी करण्यात आले. कार्यक्रमास मराठी पत्रकार व मराठी भाषिक उपस्थित होते. मात्र यावेळी युवा पत्रकार पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले पत्रकार मधुकर पाटील यांचे सध्याचे वय ४० असून ते गेली १४ वर्षे या क्षेत्रात असल्याने त्यांना हा युवा पत्रकार पुरस्कार कसाकाय देण्यात आला? याची कुजबूज समारंभस्थळी सुरु होती. ट्रस्ट्चे अध्यक्ष सुभाष धुमे यानी या कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले.

शुक्रवार, ११ ऑक्टोबर, २०१३

मैत्रीचा खळाळता प्रवाह

अमरावती येथील आम्ही सारे फाउंडेशनने यावर्षीचा ‘कार्यकर्ता पुरस्कार ’  अंबाजोगाई येथील पत्रकार, लेखक व सामाजिक कार्यकर्ते अमर हबीब यांना घोषित केला आहे. एक लाख रूपये व स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. २० ऑक्टोबरला अमरावती येथे मॅगसेसे पुरस्कार विजेते राजेंद्रसिंह राणा, आ.बच्चू कडू, प्रसिद्ध लेखक चंद्रकांत वानखेडे व विभागीय आयुक्त डी. आर. बनसोड यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार त्यांना प्रदान केला जाणार आहे. या पुरस्काराच्या निमित्ताने हा लेख.


दै.लोकमनची माझी पत्रकारिता सुरू झाल्यानंतर अमर हबीब हे नाव सतत कानावर येऊ लागले. तसं यापुर्वीच प्रा. निशीकांत देशपांडे यांच्यासोबत अमरला मी अंबाजोगाईला जाऊन भेटलो होतो. त्याची प्रिंटींग प्रेस पाहून त्याच्याशी चर्चाही केली होती. परंतु आमची खरी ओळख झाली ती, अमर लातुरला दै.मराठवाडाचा संपादक झाल्यानंतर. अगदी दीड-दोन वर्र्षांचा नित्याचा सहवास घनिष्ठ मैत्रीत रूपांतरीत झाला. या काळातील किस्स्यांवरच एक वेगळा लेख होईल. प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात वेगवेगळ्या टप्प्यांवर मित्र बनतात. त्या-त्या कालावधीपुरते ते मित्र राहतात. पुढे आपण मित्र होतो एवढेच दोघांना कधीतरी आठवत राहाते. परिस्थितीच्या रेट्यापुढे मैत्री टिकत नाही. मात्र अमरच्या व माझ्या मैत्रीचे वैशिष्ट्य असे की, सलग पंचवीस वर्षांपासून या मैत्रीत कसलाच खंड पडलेला नाही. कसले मतभेद नाहीत की दुरावा. खळाळत्या प्रवाहाप्रमाणे ही मैत्री टिकून आहे.
मी ‘लोकमन’  मधून मुक्त झाल्यानंतर माझ्या स्वातंत्र्याची व्याप्ती अधिक वाढली. ९५-९६ च्या सुमारास किल्लारी भूकंप पुनर्वसनावर आधारीत डॉक्युमेंटेशनचे काम केले. सगळा मजूकर तयार झाला तेव्हा संपादनासाठी मला अमरचीच आठवण झाली. त्याने हे काम आनंदाने केले. याआधी  डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातून मी एम.एम.सी.जे.ची (मास्टर ऑफ मास कम्युनिकेशन अ‍ॅन्ड जरनॅलिझम) पदवी संपादन केली. या कामात अमरची मला खूप मदत झाली. शोधनिबंधासाठी चळवळीची पत्रकारिता हा विषय मी त्याच्याच सल्ल्याने निवडला. अधिकृतरित्या तो माझा गाईड नसला तरी ख-या अर्थाने तोच माझा मार्गदर्शक होता. शेतकरी संघटनेचे मुखपत्र ‘शेतकरी संघटक’  हा विषय मी अभ्यासासाठी निवडला. तेव्हा संघटकचे अंक आणण्यासाठी व संपादक सुरेशचंद्र म्हात्रे यांच्याशी चर्चा करण्यासाठी माझ्यासोबत आंबेठाणला तो आला होता. माझा प्रबंध अधिकाधिक दर्जेदार व्हावा यासाठी त्याने केलेले प्रयत्न आजही माझ्या स्मरणात आहेत. १९९८ मध्ये मी सा.‘बातमी मागची बातमी’ ची सुरूवात केली. त्यावेळीही मी त्याच्याशी प्रदिर्घ चर्चा केली होेती. या साप्ताहिकात सुरुवातीपासून त्याचा सक्रीय सहभाग होता. तो आजपर्यंत कायम आहे. ‘बातमी’ त त्याने अनेक विषयांवर स्तंभलेखन केले. याच काळात प्रकाशन व्यवसायाची सुरुवात करण्याचे माझ्या मनात घोळत होते. ‘लोकमन’ मधील माझ्या निवडक अग्रलेखांचा संग्रह काढावा, अशी अनेक दिवसांपासूनची इच्छा होती. परंतु अग्रलेखांची निवड करणे मला जमत नव्हते. शेवटी अमरच्या कानावर मी हे घातले.तेव्हा त्याने संपादनाची जबाबदारी स्वीकारली. अग्रलेखांची निवड करुन त्यामागचे नेमके प्रयोजनही त्याने लिहीले. प्राचार्य डोळे यांनी प्रस्तावना लिहीली. प्रा.शशिकांत डोंगरे या मित्राने समर्पक मुखपृष्ठ तयार केले आणि ‘माती आणि नाती’  हे माझं पहिलं पुस्तक माझ्याच ‘मुक्तरंग प्रकाशन’ तर्फे प्रकाशित झालं. या पुस्तकाचं संपादन एवढं प्रभावी ठरलं की,सर्व थरातून त्याचं स्वागत झालं. दोन महिन्यातच पहिली आवृत्ती संपली. नुकतीच या पुस्तकाची आठवी आवृत्ती प्रकाशित झाली आहे. यात अमरचा मोठा वाटा आहे. अमरचे पहिले पुस्तक काढण्याची संधीही मलाच मिळाली. त्याने दुष्काळावर लिहीलेले लेख ‘दुष्काळदेशी’  या नावाने ‘मुक्तरंग’ ने प्रकाशित केले.
नवे प्रयोग करण्यात अमरचा नेहमीच पुढाकार असतो. मी, अमर हबीब, अच्यूत गंगणे, प्रा. विकास सुकाळे अशा चौघांनी मिळून १९९९ साली बारावीच्या विद्याथ्र्यांसाठी ‘लातूरचा कानमंत्र’  या नावाने पुस्तक प्रकाशित केले. या पुस्तकाची आम्ही चांगली जाहीरातबाजी केली होती. त्यामुळे हे पुस्तक हीट ठरेल असा आमचा अंदाज होता. परंतु तो चुकला. आम्ही यात बुडालो. हे पुस्तक घेऊन आम्ही महाराष्ट्रभर फिरलो. व्यवहार तोट्याचा झाला. मात्र हा अनुभव मला ‘मुक्तरंग’ च्या पुढील वाट-चालीसाठी उपयुक्त ठरला. या आर्थिक नुकसानीचा आमच्या संबंधावर काहीही परिणाम झालेला नाही. त्यानंतर काही काळ अमर दिल्लीला गेला. तिथे त्याने पत्रकारिता केली. मी पुण्याला ‘मुक्तरंग’ चे ऑफिस थाटले. याकाळात आमच्या गाठीभेटी कमी झाल्या तरी संपर्क कायम होता. संबंधातील ओलावा तसाच होता. २००३ मध्ये ‘मॅप मिडीया लिंक’  या माझ्या संस्थेला नांदेड जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रसिद्धीचे काम मिळाले. सर्वेक्षण करणे, कामासंबंधी पोष्टर्स बनविणे, डॉक्युमेंट्री फिल्म व ऑडियो कॅसेट बनवणे असे कामाचे स्वरूप होते. डॉक्युमेंटरीचा मला व अमरलाही अनुभव नव्हता. तरीही आम्ही मिळून हे काम केले.दीपरत्न निलंगेकर या दुस-या मित्राने चित्रीकरण व संपादन केले. ही अध्र्या तासाची डॉक्युमेंटरी सर्वांच्या पसंदीला उतरली. ऑडियो कॅसेटसाठी मी, अमर व नाईक मुंबईला गेलो. रेकॉर्डींग स्टुडिओजवळ बसूनच आम्ही स्क्रीप्ट तयार केली. यात एक खेडूत व प्रशिक्षक यांचा संवाद आहे. त्या भूमिका अमर व मी वठवल्या. अशी ‘नंदीग्रामची यशोगाथा’  नावाची ऑडियो कॅसेटही आमच्या नावावर आहे.
‘मुक्तरंग’  प्रकाशनच्या कामातील अमरच्या सहभागावर कितीही लिहीले तरी ते कमीच होईल. ‘मुक्तरंग’  हे माझ्या कार्यालयाचे व प्रकाशनाचे नाव. तेही अमरनेच सुचवलेले आहे. माझ्या बहुतेक पुस्तकांची नावे त्याच्याशी चर्चा करुनच ठरतात. मुखपृष्ठ फायनल करतानाही त्याचा सल्ला मोलाचा ठरतो. कुठं थोडंसं अडलं की लगेच त्याला फोन करतो. अडचण दूर होते. खरं सांगायचं तर ‘मुक्तरंग आणि अमर’  यांना वेगळे करता येत नाही. तो या परिवाराचा एक घटक आहे. शेतक-यांच्या प्रश्नांना व्यासपीठ मिळवून देण्याच्या हेतूने अमरने ‘बळीराज्य मराठवाडा’  या पाक्षिकाची सुरुवात केली.यात अमरसोबत मी आणि अच्यूत गंगणे होतो. अतिशय तुटपूंज्या साधन-संपत्तीच्या बळावर जवळपास दीड वर्षे हे पाक्षिक चालले. मात्र अमरने या कामासाठी घेतलेली मेहनत अजोड होती. त्याने या कामाला अक्षरशः वाहून घेतले होते. या काळातही त्याचा मला भरपूर सहवास लाभला. ‘अ‍ॅग्रोसेल’  हाही आम्ही मिळून केलेला प्रयोग. अमरची ही कल्पना मूर्त स्वरुपात उतरवण्यासाठी मीही थोडासा हातभार लावू शकलो. शेतक-यांनी त्यांचा माल थेट ग्राहकांना विकावा ही यामागची अमरची कल्पना. खरे तर शेतकरी संघटनेने या प्रयोगाच्या पाठीशी पूर्ण पाठबळ उभे करायला हवे होते. परंतु ते घडले नाही. अमरची स्वतंत्र विचारसरणी बहुतेकांना खटकत असावी. अमरने हा प्रयोग यशस्वी करण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली. कधी जीपने तर कधी मोटरसायकलवर जाऊन गावोगाव सभा, बैठका घेतल्या. संघटनेच्या निवडक कार्यकत्र्यांनी या कामात आम्हाला साथ दिली आणि कोणाही नामवंताचे, प्रस्थापितांचे पाठबळ व सहकार्य नसतानाही ‘अ‍ॅग्रोसेल’ चा प्रयोग यशस्वी झाला. अनेक शेतकरी त्यात सहभागी झाले. शेतक-यांचा माल हातोहात संपला. लाखो रूपयांची उलाढाल झाली. अ‍ॅग्रोसेल ख-या अर्थाने यशस्वी झाले. त्यावेळी शेतकरी संघटनेने असे प्रयोग महाराष्ट्रभर केले असते तर आजही शेतकरी संघटनेची तीच ताकद टिकून राहीली असती.
एक वक्ता म्हणूनही अमर हबीब मला खूपच भावतो. त्याचं बोलणं तर्कशुद्ध तर असतंच शिवाय ते व्यवहार्यही असतं. तो नेहमीच जमिनीवरचं बोलतो. त्यामुळे माझ्या अनेक पुस्तक प्रकाशनासाठीचा तो प्रमुख पाहुणा राहिलेला आहे. अमर आहे म्हटलं की, श्रोते जमवण्याची चिंता राहात नाही. अमरसोबतचं माझं मैत्रीचं आयुष्य हा एखाद्या कादंबरीचा विषय होईल. त्याच्यासोबतची अनेक वेळा केलेली अंबाजोगाईतील डोंगरभ्रमंती, विविध ठिकाणी केलेले प्रवास, तासन तास मारलेल्या गप्पा, आयुष्यातील सर्वात मोठा अमूल्य खजिना आहे. त्याच्याशी प्रत्येक वेळी नव्या विषयावर चर्चा होते. नवा दृष्टिकोन समोर येतो. कार्यकर्ता, संघटक, बंडखोर, विचारवंत, पत्रकार, प्रकाशक, लेखक, वक्ता अशा अनेक रूपात मी अमरला पाहिले आहे. मात्र यातील ‘मित्र अमर’  हे रूप मला खूप हवेहवेसे वाटणारे आहे. प्रसंग कितीही दुःखाचा असो की आनंदाचा, त्याची साथ तेवढीच मनापासूनची असते. तो आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा असतो. समोर कितीही कठीण परिस्थिती येवो, अमर आपल्यासोबत आहे ही एकच भावना मला निश्चिंत बनवते. मी कुठेही असलो तरी तो सतत सोबत असल्याची जाणिव राहाते. ही जाणिव एवढी प्रभावी आहे की,आता सतत फोन करण्याची गरजही भासत नाही.त्याच्या जवळ राहणा-या सर्वांनांच त्याचे मोठेपण कळते असे नाही. मी मात्र त्याच्या मोठेपणाचा पावलोपावली अनुभव घेतोय. सतत नवे नवे अनुभव घेत जगणं हेच खरं जगणं असं तो मानतो. आणि त्याप्रमाणे जगण्याचा प्रयत्न करतो. हे जगणं सोपं नाही मात्र याचासारखा आनंद दुस-या कशातही नाही. हे अमरकडे पाहिल्यानंतर पटतं.  असा मित्र लाभणं यासारखी आयुष्यात दुसरी कुठलीही भाग्याची गोष्ट नाही, असं मला वाटतं. माझ्यासाठी तरी अमर माझा ‘आयडॉल’ च आहे.
 
- महारूद्र मंगनाळे
मुक्तरंग प्रकाशन,लातूर
मो. ९४२२४६९३३९,९०९६१३९६६६

अखेर विश्व सह्याद्री बंद पडला

पुण्याहून तीन महिन्यापुर्वी निघालेला विश्व सह्याद्री अखेर बंद पडला आहे.त्यामुळे जवळपास 100 लोक बेकार झाले आहेत.विश्व सह्याद्रीचा व्हिजन वार्ता होणार,हे संकेत आम्हाला त्याचवेळी मिळाले होते,त्यामुळेच आम्ही लोकांना सावध केले होते.अखेर घडलेही तसेच.केवळ तीन महिन्यात हा पेपर बंद पडला आहे.
विश्वसह्याद्रीच्या मालकाने शुक्रवारी मिटींग घेवून सांगितले की,तीन महिन्यात माझे सव्वा दोन कोटी रूपये गेले आहेत,पुढे पैसे घालविण्याची माझी इच्छा नाही.मला माफ करा.मालकाचा निर्णय ऐकूण बिचारे कर्मचारी रडकुंडीला आले.त्यांना केवळ एकच महिन्याचा पगार मिळाला.दोन महिन्याचा पगार बुडाला.बाबाही गेल्या आणि दशम्याही गेल्या,अशी त्यांची अवस्था झाली.
संजीव शाळगावकर या दैनिकाचे निवासी संपादक होते.अखेर शाळगावकरांची शाळा बंद पडली आहे.आता शाळगावकर भोकरेंच्या जनप्रवासमध्ये नव्याने प्रवास करणार आहेत.पुढारीतून हाकलून लावल्यानंतर,पुण्यनगरी,नंतर विश्व सह्याद्री आणि आता जनप्रवासमध्ये प्रवास सुरू होत आहे.केवळ मोठ्या गप्पा मारल्यानंतर पेपर चालत नसतो,हे शाळगावकरांना कोण समजावून सांगणार ?

खांडेकरांकडून अकोला, अमरावतीची झाडाझडती

दिव्य मराठीचे निवासी संपादक प्रेमदास राठोड यांचे कारनामे सतत कानावर येऊ लागल्याने स्टेट एडिटर अभिलाष खांडेकर अचानक अकोला, अमरावतीच्या दौ-यावर आले आहेत. दिव्यच्या टीम मध्ये फूट पाडण्याचे प्रयत्न राठोड सतत करीत आहेत. त्यांच्या या राजकारणाला कंटाळून अकोल्यातील काहींनी थेट खांडेकरांना रिपोर्टिंग केले. त्यामुळे संभाव्य डिजास्टर मेनेजमेंटसाठीच खांडेकरांना यावे लागल्याची चर्चा आहे. तुम्हाला कुणापासून त्रास असेल तर कोणताही मुलाहीजा न बाळगता थेट सांगा, असेच खांडेकरांनी आवाहन केले.
अमरावतीत चापोरकर, भट यांचा बळी घेतल्यानंतर राठोडांचा अकोल्यात धुडघूस सुरु आहे. दोन देशपांडेंना त्यांनी आपसात टक्करीसाठी जुंपवून दिले आहे. अकोल्यात रिपोर्टरचे दोन परस्पर विरोधी गट तयार झाले आहेत. त्यांच्या कारवायांना राठोड हवा देत आहेत. हे सर्व जाणून घेण्यासाठीच खांडेकर कालपासून अमरावतीत तळ ठोकून होते. तेथे राठोडांना नो एन्ट्री होती. आता खांडेकर अकोल्यात तळ ठोकून आहेत. अनेकांनी अकोल्यातील गचाळ राजकारणाचा पाढा त्यांच्यापुढे वाचला. काही तर रजेवर गेले व आपली नाराजी दाखवून दिली. अमरावतीत खांडेकरांनी त्यांच्या विश्वासपात्रांशी होटेलात भल्या पहाटॆ चर्चाही केल्याचे कळले. बेरक्याने बातमी दिल्यानंतर राठोडांनी रिपोर्टर्सकडून पार्ट्या खाणे बंद केले. आपली बिलेही ते आता खिशातूनच देत आहेत. पण त्याला उशिर झालाय. ही बाबही खांडेकरांना खटकली आहे. सिनीयर क्रम डावलून राठोडांनी काही ठिकाणी केलेला उपद्व्यापही लवकरच सरळ होणार आहे. खांडेकरांना साधा रिपोर्टर निवडताना ईतके परखता. संपादकाची निवड कशी चुकली. अकोला, अमरावती, यवतमाळ, बुलडाणा, नागपूरचे सगळे संपादक नको असा अप्रत्यक्ष संदेश देत असताना आपण काय आणखी चांगले लोक सोडून जाण्याची प्रतीक्षा करीत आहात का?

अमरावतीच्या ‘आम्ही सारे’ फाउंडेशनचा ‘आम्ही सारे कार्यकर्ता’ पुरस्कार अमर हबीब यांना जाहीर

अमरावतीच्या ‘आम्ही सारे’ फाउंडेशनचा 2013 चा ‘आम्ही सारे कार्यकर्ता’ पुरस्कार अंबाजोगाई येथील सामाजिक कार्यकर्ते, लेखक व पत्रकार अमर हबीब यांना जाहीर करण्यात आल्याची माहिती फाउंडेशनने एका पत्रकाद्वारे दिली आहे.एक लाख रूपये व स्मृतिचिन्ह असे या पुरस्कारांचे स्वरूप  आहे.
अमर हबीब यांचे संघर्षवाहीनी, आणिबाणीविरोध, नामांतर आंदोलन, शेतकरी संघटनेतील योगदान व पत्रकारितेतील कार्य लक्षात घेऊन हा पुरस्कार जाहीर केला आहे.
जयप्रकाश नारायण यांनी स्थापन केलेल्या संघर्षवाहीनीचे राष्ट्रीय संयोजक म्हणून अमर हबीब यांनी महत्वाची भूमिका बजावली आहे. आणिबाणीत 19 महिने ते तुरुंगात होते. मराठवाडा विद्यापीठ नामांतर आंदोलनात त्यांनी पोलिसांच्या लाठ्या खाल्ल्या होत्या. शेतकरी संघटनेतील त्यांचे योगदान संपूर्ण महाराष्ट्राला परिचित आहे.
राज्यातील विविध वृत्तपत्रांतून सामाजिक व राजकीय विषयांवर त्यांनी स्तंभलेखन केले आहे. एक वक्ता म्हणून महाराष्ट्रभर त्यांची व्याख्याने होतात. त्यांनी 8 पुस्तके लिहीली असून नाते, कलमा, आकलन या पुस्तकांना वाचकांचा मोठा प्रतिसाद लाभला आहे. ‘परिसर’ प्रकाशनच्या माध्यमातून अनेक नव्या लेखकांना घडवण्याचे कार्य त्यांनी केले आहे. ‘आम्ही सारे’ फाउंडेशनने त्यांच्या या सर्व कामाची दखल घेऊनच या पुरस्कारासाठी निवड केली आहे.
 20 ऑक्टोबर रोजी अमरावती येथील संत ज्ञानेश्र्वर सांस्कृतिक भवनात हा पुरस्कार अमर हबीब यांना प्रदान केला जाणार आहे. दुपारी 4.00 वाजता होणाऱ्या या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून मॅगसेसे पुरस्कार विजेते राजेंद्रसिंह राणा, विधानसभा सदस्य बच्चू कडू, सुप्रसिद्ध लेखक व शेतकरी आंदोलक चंद्रकांत वानखेडे व विभागीय आयुक्त डी.आर.बनसोड यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन आम्ही सारे फाउंडेशनने केले आहे.

बुधवार, ९ ऑक्टोबर, २०१३

लातूरचे बाबूजी 'लोकमत' सोडून 'पुण्यनगरी'त...

लातूर ''पुण्य नगरी''त वरिष्ठ वृत्त संपादक म्हणून ज्येष्ठ  पत्रकार जयप्रकाश दगडे (9850304289 ) यांनी निवासी संपादक सुशिल कुलकर्णी व सरव्यव्स्थापक आर. टी.कुलकर्णी,वृत्तसंपादक महादेव कुंभार  यांच्या उपस्थितीत सूत्रं स्वीकारली...
ज्येष्ठ पत्रकार जयप्रकाश दगडे यांनी १९८४ पासून वार्ताहर ते जिल्हा प्रतिनिधी , मुख्य उपसंपादक, विशेष प्रतिनिधि म्हणून उल्लेखनीय कामगिरी बजावलेली आहे. दगडे व लोकमत हे समीकरण ३० वर्षानंतर अचानकपणे संपुष्टात आले.लोकमतमध्ये तीस वर्षे काम केल्यानंतर,सेवानिवृत्त झाल्यानंतर जयप्रकाश दगडे पुण्यनगरीत वरिष्ठ वृत्तसंपादक म्हणून जॉईन झाले आहे...
''पुण्य नगरी''तील प्रवेशाने दगडेना नव संजीवनी मिळाली तर सगळे हिशेब चुकते होण्याचे भीतीने लातूर जिल्हयातील दगडे विरोधकांत अस्वस्थता पसरली आहे .  ''लोकमत'' आता कोणती भूमिका घेणार? याकडे  लातूर जिल्हातील पत्रकारांचे लक्ष वेधले आहे ...
लातूरच्या बाबूजींच्या शुभेच्छा...

सोमवार, ७ ऑक्टोबर, २०१३

पत्रकारविरोधी फलकाचा चंद्रपुरात निषेध

चंद्रपूर - गेल्या चार दिवसांपूर्वी चंद्रपूर शहातील विविध चौकात पत्रकारांची सामूहिक बदनामी करणारे फलक लावण्यात आले. खंडणीखोर पत्रकारांचे नाव सांगा आणि दहा हजार रुपये मिळवा या आशयाचे फलक होते. या फलकामुळे कोण्या एका पत्रकाराची नव्हे, तर सर्व पत्रकारांची मान शरमेने मान खाली गेली आहे. हे फलक लावण्यासाठी महानगरपालिकेची रितसर परवानगी घेण्यात आली होती. त्यावर एका प्रकाशकाचे नावही लिहले होते. असे फलक लावून पत्रकार आणि वृत्तपत्रसृष्टीच्या स्वातंत्र्यावर घाला घालण्याचा प्रयत्न पत्रकार संघ खपवून घेणार नाही, असेही पत्रकात म्हटले आहे.
दोन ऑक्टोबर रोजी शहरातील वरोरा नाका, गांधी चौक, जटपुरा गेट, गिरणार चौक या परिसरात पत्रकारविरोधी फलक लावण्यात आले. त्यावरील मजकूर आक्षेपार्ह आणि पत्रकारांना सामूहिक बदनाम करणारा होता. बदनामीकारक फलक लावणा-या आणि त्याला परवानगी देणा-या महानगरपालिकेचा चंद्रपूर-गडचिरोली श्रमिक पत्रकार संघाने जारी केलेल्या पत्रकातून निषेध करण्यात आला आहे. पोलिसांनी हे फलक लावणा-या व्यक्तीचा शोध घेऊन कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. 
वृत्तपत्रात व्यवसाय प्रणाली आली आहे. जाहिरात हा प्राण आहे. त्यामुळे टार्गेट पूर्ण करणे अपेक्षित असते. अशावेळी मोठी जाहिरात मिळविण्यासाठी एखाद्याला फोन करावा लागतो.  त्याला खंडणी म्हणणे चुकीचे आहे.

नागपुरात वृत्तपत्र बंद पडण्याचा ट्रेंड

नागपूर टाईम्स/पत्रिका हे दोन इंग्रजी व मराठी वृत्तपत्र बंद पडल्यानंतरनागपुरात वृत्तपत्र बंद पडण्याचा एक ट्रेंड सुरू झाला होता. वृत्तपत्रचालू करणे व मनाला वाटेल तेव्हा बंद करण्याचा प्रघातच पडला होता.नागपूरटाइम्स/पत्रिकेचे मालक नरेश गद्रे यांचे सारवाडीजवळ एका अपघातात निधन झाल्यानंतर त्यांचे मित्र असलेले शरद पवार यांनी या वृत्तपत्रांना आधार देण्यासाठी स्वत:च्या ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला होता. परंतु विदर्भातील ज्ञानयोगी मधात कलमडले व त्यांनी शरद पवारांऐवजी स्वत: या वृत्तपत्रांची मालकी स्वत:कडे घेतली. ज्ञानयोगी श्रीकांत जिचकार यांच्या माध्यमातून त्यांच्या कार्यकर्त्यांचाही या वृत्तपत्रांमध्ये मुक्त संचार झाला. त्यांनी आपले सासरे सपकाळ यांना व्यवस्थापक म्हणून आणून बसविले. या कंपुमध्ये जे आधी जिचकारांचे प्रसिद्धीपत्रक वृत्तपत्रांमध्ये घेऊन जायचे व पत्रकारांसमोर दीनवाणे उभे राहायचे अशा कार्यकर्त्यांना तर मग जोरच चढला. ते पत्रकारांना मग सालदारासारखे वागवायला लागले. ‘झिरो बजेट’मुळे प्रसिद्धीस आलेले श्रीकांत जिचकार यांनी आधी अनेकांच्या आयुष्याचे बजेट झिरो केल्याचा इतिहास असतानाही ते ज्ञानयोगी असल्याने नागपूर पत्रिका/टाईम्सला भरभराटीस नेतील, अशी सर्वांना अपेक्षा होती.
त्यामुळे इतर वृत्तपत्रातील अनेक वरिष्ठ पत्रकारांनी नागपूर पत्रिकेत धाव घेतली. यात जनवादमधून पांडुरंग कोल्हे, तरुण भारतातून विनोद देशमुख, प्रकाश देशमुख व मिलिंद ठेंगडी यांनी प्रवेश घेतला. ज्ञानयोग्याच्या
सान्निध्यात आपले भाग्य फळफळेल अशी त्यांना अपेक्षा होती. तसेच तिथे असलेल्या कर्मचाºयांनाही आता सुखाचे समाधानाचे दिवस येतील, अशी आशा वाटत होती. रामदासपेठेतील आज जिथे ‘तुली इम्पिरीयल’ हे पंचतारांकित हॉटल उभे आहे तिथे नागपूर टाइम्स/पत्रिकेची प्रेस होती. स्वातंत्र्य संग्राम सैनिक
अनंत गोपाळ शेवडे यांनी लावलेल्या या रोपट्याचा विस्तार होत ‘गगणावरी वेलू’ जाईल, अशी सर्वांना अपेक्षा होती. असे झाले असते तर आज ‘तुली इम्पिरियल’ असलेल्या ठिकाणी नागपूर टाइम्स भवन ही १४ मजली इमारत उभी असती. तशी जिचकारांचीही योजना होती. परंतु नियतीला मात्र हे मान्य नव्हते. या ज्ञानयोग्याच्या मागे उभे असलेल्या ‘विषाणू’ंची लागण टाइम्स/पत्रिकेला झाली. हा व्हायरस मग इतरही वृत्तपत्रात पसरत गेला. जिचकारांच्या समर्थकांचा धुडगूस वृत्तपत्रात सुरू झाला. कोरडेसारखी मंडळी जिचकारांच्या सासºयांच्या खांद्यावर बंदूक ठेवून पत्रकारांना अपमानास्पद वागणूक द्यायला लागली. याची माहिती जिचकारांपर्यंत पोहोचतच नव्हती. त्यांची सातत्याने दिशाभूल करण्यात आली. त्यामुळे त्यांनी एकदा संपादकीय विभागात बोलताना संतापून म्हटले होते, ‘मी मासळीसारखा यातून बाहेर पडेन’. वृत्तपत्र बंद केल्याने माझ्यावर काही फरक पडणार नाही. परंतु........... कोरडे कंपूच्या जाचामुळे हरफनमौला पत्रकार व सहायक संपादकपदावर असलेले शरद देशमुख यांचे हृदयविकाराने निधन झाले. महात्मेही यांच्या मनमानीमुळे पत्रिकेबाहेर पडले. तर मुख्य संपादक असलेले प्रभाकर पुराणिक मात्र अपमान
सहन करीत तिथे टिकून राहिले. कालांतराने त्यांनाही बाहेरचा रस्ता दाखविण्यात आला. शेवटी नागपूर टाइम्सचे संपादक बाबासाहेब नंदनपवार यांच्याकडे मराठी वृत्तपत्राचीही जबाबदारी सोपविण्यात आली होती.
पत्रकारांना मानसिक दिल्यानंतर या कंपूने नंतर प्रिटिंग प्रेस देशी दारुच्या दुकानाजवळ नेण्याचा प्रयत्न सुरू केला. यानंतर मग आंदोलनाला सुरुवात झाली. यावेळीही कोरडे कंपूने आपल्या पद्धतीने आंदोलन हाताळले.
जिचकारांना यातले काहीच माहित नव्हते. हा सर्व प्रकार त्यांच्या समर्थक व जवळच्या नातेवाईकांचा होता.

रविवार, ६ ऑक्टोबर, २०१३

बातमीदाराने मागितली नक्षलवाद्यांच्या नावावर खंडणी

गडचिरोली- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचे गडचिरोली जिल्हा कार्यकारी अध्यक्ष जमीर ऊर्फ बबलू हकीम यांना १0 लाख रूपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी अहेरी पोलिसांनी सात तोतया नक्षलवाद्यांना अटक केली आहे. यामध्ये एका मोठय़ा दैनिकाचा बामणी येथील बातमीदार तिरूपती चिट्टयालासह एका शिक्षकाचाही समावेश आहे. 
या प्रकरणातील मुख्य आरोपी पोचम कोटा हा पोलिसांच्या तावडीतून रात्री पळून गेला. पोचम कोटा व बंडू लक्का गावडे या दोघांनी हे कारस्थान रचले, असे पोलीस तपासात उघड झाले आहे. तसेच बातमीदार असलेल्या तिरूपती चिट्टयाला माओवाद्यांचे लेटरपॅड छापण्यास सांगितले. त्याने रवी कारसपल्ली याच्याशी संधान साधून १५ ते २0 लेटरपॅड छापून घेतले. कारसपल्ली हा बामणी येथील मानवदयाल शाळेचा शिक्षक असून गावात त्याचा फोटो स्टुडिओ आहे. हकीम यांना पाठविलेल्या पत्राचा मजकूर याच लेटरपॅडवर लाल अक्षरात कोटा पोचम व बंडू गावडे यांनी लिहिला. या सर्व आठही आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बुधवार, २ ऑक्टोबर, २०१३

पत्रकारांच्या आरोग्य कल्याण निधीत वाढ

मुंबई  : पत्रकारांना दुर्धर आजार , अपघात किंवा आकस्मिक मृत्यू आल्यास त्यांना किंवा त्यांच्या कुटुंबियांना मदत करण्यासाठी स्थापन केलेल्या ' शंकरराव चव्हाण सुवर्ण महोत्सवी पत्रकार कल्याण निधी ' त वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. हार्ट ऑपरेशनसाठी सध्या या कल्याण निधीतून ५० हजार रुपयांची मदत मिळत होती ,ती आता एक लाख करण्यात आली आहे. तसेच किडनी ,कर्करोग या आजारावरील ऑपरेशनसाठी मदतीच्या रक्कमेतही दुप्पट वाढ केली आहे. 

या आजारांच्या मदतीत वाढ 

बायपास सर्जरी - ५० हजारांवरून एक लाख रुपये

अॅन्जीओप्लास्टी - ५० हजार रुपयांवरून ७५ हजार रुपये

रक्ताचा कर्करोग - ५० हजार रुपयांवरून एक लाख रुपये

किडनी किंवा अन्य अवयवांचे प्रत्यारोपण - ५० हजार रुपयांवरून एक लाख रुपये या

आजारांनाही मदत 

- अपघातात एक हात वा पाय गमावलेल्या पत्रकारांच्या उपचारासाठी ७५ हजार रुपये

- दुर्धर आजारामुळे आकस्मिक निधन झाले वा मृत्यू आल्यास कुटुंबियांना एक लाख

रुपयांची मदत 

- ब्रेन ट्युमरच्या उपचारासाठी ५० हजार रुपये

- गंभीर मानसिक आजारांसाठी ५० हजार रुपये

- डोळ्यांचे आजारांसाठी ५० हजार रुपये
या आजारांचा नव्याने समावेश 

गुडघा प्रत्यारोपण , मेंदुतील रक्तवाहिन्याचे विकार , डायलिसिस , पोटाचे आजार , हर्निया , कानावरील ऑपरेशन या आजाराचा आजवर योजनेत समावेश नव्हता. मात्र यापुढे या आजारांसाठीही आर्थिक मदत मिळेल.
......................................


अधिस्वीकृती म्हणजे पत्रकारितेचा पासपोर्ट नाही
शंकरराव चव्हाण पत्रकार कल्याण निधीचा लाभ
अधिस्वीकृती नसलेल्या पत्रकारांनाही दिला पाहिजे


महाराष्ट्र सरकारच्या कै. शंकरराव चव्हाण पत्रकार कल्याण निधी योजनेतून आजारी किंवा अपघातात जखमी झालेल्या पत्रकारांसाठी दिल्या जाणाऱ्या रक्कमेत दुप्पट वाढ करण्यात आली आहे.वरकरणी सरकारचा हा निर्णय स्वागतार्ह वाटत असला तरी यामागची मेख लक्षात घेतली पाहिजे.पत्रकार कल्याण निधीच्या माध्यमातून केवळ अधिस्वीकृतीधारक पत्रकारांनाच मदत दिली जाते.महाराष्ट्रात एकूण पत्रकारांच्या दहा टक्के पत्रकार देखील अधिस्वीकृतीधारक नाहीत. बहुसंख्य पत्रकार या योजनेच्या लाभापासून दूर आहेत.त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर  रक्कम दुप्पट केली म्हणून सरकार जी टिमकी वाजवत आहे ती केवळ पत्रकारंाच्या डोळ्यात धुळफेक आहे.
आपली मागणी अशी आहे की,प्रसंग केवळ अधिस्वीकृतीधारक पत्रकारांवरच येतात असं नाही.त्यामुळे ज्यांच्याकडे अधिस्वीकृती नाही अशा पत्रकारांनाही या योजनेचा लाभ मिळाला पाहिजे.ज्यांनी पत्रकार म्हणून पाच किंवा त्यापेक्षा जास्त काळ काम केले आहे पण ज्यांच्याकडे अधिस्वीकृती नाही अशा पत्रकारांनी आपण पत्रकार असल्याचे पुरावे सादर केले तर अशा पत्रकारांनाही आरोग्य विषयक योजनेचा लाभ मिळाला पाहिजे.कारण अधिस्वीकृती नसलेल्या नव्वद टक्के पत्रकारांना या लाभापासून वंचित ठेवण्याचा अधिकार सरकारला नाही.
पत्रकार पेन्शनची आपण मागणी करीत आहोत.ही योजनाही केवळ अधिस्वीकृतीधारक पत्रकारांनाच दिली जावी असा एक विचार आहे.तो दद्दन चुकीचा आहे.याचं कारण राज्यात साठी ओलांडलेल्या आणि पेन्शनसाठी पात्र ठरू शकतील अशा अधिस्वीकृतीधारक पत्रकारांची संख्या अवघी 175च्या आसपास आहे.म्हणजे उद्या पेन्शन योजना सुरू झाली तर केवळ 175 पत्रकारांना पेन्शन देऊन सरकार पत्रकारांसाठी आम्ही फार काही करीत आहोत असे दाखविण्याचा प्रयत्न करणार आहे.याला आमचा विरोध आहे.याचं कारण म्हणजे अधिस्वीकृती म्हणजे काही पत्रकारितेचा पासपोर्ट नाही.अनेक पत्रकारांनी आयुष्यभर पत्रकारिता केल्यानंतरही अधिस्वीकृतीसाठी अर्जही केलेला नाही.मग हे सारे पत्रकार पत्रकार नाहीत काय हा सवाल आहे.त्यामुळे सरकारने शंकरराव चव्हाण पत्रकार कल्याण निधीचे नियम बदलून या योजनेत अधिस्वीकृतीधारक नसलेल्या पत्रकारांनाही सामावून घेतले पाहिजे अशी मराठी पत्रकार परिषद तसेच पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीची मागणी आहे.
अधिस्वीकृती समिती नाही
पत्रकारांना अधिस्वीकृती पत्रिका देण्यासाठी सरकार पत्रकार सदस्य असलेली अधिस्वीकृती समिती नेमते.मात्र गंमत अशी की,गेली चार वर्षे ही अधिस्वीकृती समितीच अस्तित्वात नाही.अधिस्वीकृती देण्याचे काम सध्या माहिती आणि जनसंपर्क विभागाचे अधिकारीच करतात.या समितीवर विविध पत्रकार संघटनांचे प्रतिनिधी जसे असतात तसेच सरकार नियुक्त नऊ पत्रकारही समितीवर असतात.या समितीची चार वर्षांपूर्वी मुदत संपल्यावर लगेच ही समिती गठीत करणे अपेक्षित होते पण तसे झाले नाही.समिती गठित करावी यामागणीसाठी आम्ही वारंवार मुख्यमंत्र्यांना भेटलो पण समितीत सदस्य होऊ इच्छिणाऱ्या पत्रकारांचा मोठा दबाव आपल्यावर असल्याने ही समिती गठित करायला उशीर होत असल्याचे मुख्यमंत्री गेली तीन वर्षे आम्हाला सांगतात.,समिती नसल्याने सारा कारभार सरकारी अधिकाऱ्यांच्या ताब्यात आहे.सरकारी अधिकाऱ्यांच्या कारभाराच्या तऱ्हा आपणास माहिती असल्याने त्यावर वेगळे भाष्य कऱण्याची गरज नाही.

एस.एम.देशमुख

भद्रावतीच्या सहायक पोलिस निरीक्षकाची अरेरावी

चंद्रपूर - दैनिक सकाळ कार्यालयातील कर्मचारी भारती टोंगे यांचे पती अमोल मालेकर (वय ३२) यांचे भद्रावतीजवळ अपघातात निधन झाले. या घटनेची माहिती जाणून घेण्यासाठी गेलेल्या पत्रकारांच्या शिस्टमंडळासोबत भद्रावतीच्या सहायक पोलिस निरीक्षकाने अरेरावी करीत गैरवर्तुणूक केली. यावेळी शांतता समिती तथा महिला सुरक्षा समितीच्या महिला सदस्य माजी नगरसेविका रत्नमाला बावणे यांच्याशी हुज्जत घालून सहायक पोलिस निरीक्षक आव्हाड याने हाकलुन लावले. 
शिस्टमंडळाने आपला परिचय दिल्यानंतरही म्हणणे एकूण घेण्यासाठी हे महाशय तयार नव्हते. दरम्यान, या प्रकरणी महिला सुरक्षा समितीच्या महिला सदस्य माजी नगरसेविका रत्नमाला बावणे यांनी सहायक पोलिस निरीक्षक आव्हाड यांच्या विरुद्ध त्याच पोलिस ठाण्यात तक्रार देऊन निलंबित करण्याची मागणी केली आहे. मंगळवारी रात्रीच्या सुमारास दुचाकीने भद्रावती येथून चंद्रपूरकडे येत असताना मागून आलेल्या मेटाडोर क्र. एमपी -०१ वाय ६६१७ ने जोरदार धडक दिली. यात अमोल मालेकर (वय ३२) च्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने जागीच मृत्यू झाला. आरोपी चालकाने गुन्हा मान्य करीत पोलिसांच्या स्वाधीन झाला. या प्रकरणी भद्रावती पोलिसांनी गुन्हा दाखल केला. मृत हा दैनिक सकाळ कार्यालयातील कर्मचारी भारती टोंगे यांचे पती असल्याने घटनेची माहिती जाणून घेण्यासाठी पत्रकारांचे शिस्टमंडळ गेले होते. यावेळी त्यांनी घटना कशी घडली, कुठे घडली, मेटाडोर चालक, मालक , वाहन क्र. आदी माहितीची विचारणा करायची होती. मात्र, ठाण्यात सेवेत असलेल्या सहायक पोलिस निरीक्षक आव्हाड याने सर्वाना हाकलुन लावले. यावेळी शांतता समिती तथा महिला सुरक्षा समितीच्या महिला सदस्य माजी नगरसेविका रत्नमाला बावणे या देखील उपस्थित होत्या. त्यांनी आपला परिचय दिल्यानंतरहि यांच्याशी हुज्जत घालून बाहेर निघण्यास सांगिलते. या प्रकारामुळे पत्रकारांच्या शिस्टमंडळासोबत गैरवर्तुणूक, शांतता समितीच्या महिला सदस्याचा अवमान झाला आहे. या प्रकरणी महिला सुरक्षा समितीच्या महिला सदस्य माजी नगरसेविका रत्नमाला बावणे यांनी सहायक पोलिस निरीक्षक आव्हाड यांच्या विरुद्ध त्याच पोलिस ठाण्यात तक्रार दिलि. सहायक पोलिस निरीक्षकाने प्रकरण दाबण्यासाठी वाहन मालकासोबत सेटिंग केली असावी. त्यामुळेच पत्रकारांना माहिती देण्यास टाळाटाळ करून गैरवर्तुणूक केली, असा आरोप रत्नमाला बावणे यांनी केला असून निलंबित करण्याची मागणी केली आहे.

16 नोव्हेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात काळा दिवस

विलास बडे व अन्य पत्रकारांवर झालेल्या पत्रकारांवरील हल्ल्याच्या निषेधार्थ पुण्यात एस.एम.देशमुख यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढून निदर्शने करण्यात आली.
विलास बडे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी पुण्यात आंबेडकर पुतळा ते गांधी चौक पर्यंत मोर्चा काढण्यात आला.या मोर्चात 200 हून अधिक पत्रकार सहभागी झाले होते.मोर्चाचे नेतृत्व एस.एम.देशमुख यांनी केले.
यावेळी असे ठरले की,राष्ट्रीय पत्रकार दिनादिवशी म्हणजे 16 नोव्हेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात काळा दिवस पाळण्यात येईल तसेच जिल्हा आणि तालुका ठिकाणी रास्ता रोको करण्यात येईल आणि सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात येईल.
याबाबतचा अधिक तपशिल एस.एम.देशमुख लवकरच जाहीर करणार आहेत.

फेसबुक वर शेअर करा

Facebook