> बेरक्याला माहिती देण्यासाठी ई - मेल करा - berkya2011@gmail.com

शुक्रवार, ३१ जानेवारी, २०१४

मुंबई सुपर फास्ट …

१) हिंदी दैनिक 'दबंग दुनिया' आता लवकरच मराठीत.. २० फेब्रुवारी पासून मराठी आवृत्ती सुरु करण्याचे संकेत 
२) नंदकुमार टेनी यांच्या राजीनाम्या नंतर नवशक्तीच्या संपादकपदी तुषार नानल यांचे नाव पुन्हा चर्चेत  
३) पुण्यनगरीचे उपसंपादक दीपक पवार सामनात 
४) प्रहारच्या संध्या धुरी साप्ताहिक चित्रलेखात
५) लोकमतला ओनलीन आवृत्तीसाठी उपसंपादक नेमने आहे, जाहिरात वाचण्यासाठी खालील लिंक वर क्लीक करा.
 ६) ठाण्यातील प्रवीण सोनावणे महाराष्ट्र टाइम्स मध्ये

मंत्रालय वार्ताहर संघाच्या अध्यक्षपदी प्रविण पुरो;उपाध्यक्ष पदी प्रमोद डोईफोडेमुंबई : मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाच्या वार्षिक निवडणूकीत अध्यक्षपदी प्रविण पुरो तर उपाध्यक्षपदी प्रमोद डोईफोडे, कार्यवाह म्हणून मंदार पारकर विजयी झाले. तर कार्यकारीणी सदस्य म्हणून श्यामसुंदर सोन्नर, डॉ.नितीन तोरस्कर, प्रफुल्ल साळुंखे, झहीर सिद्दीकी, प्रविण राऊत विजयी झालेत.
मंत्रालय वार्ताहर संघाच्या अध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणूकीत प्रविण पुरो यांना (३०), उदय तानपाठक (२९), सदानंद शिंदे  (२८) राजेंद्र थोरात (१६) तर सदानंद खोपकर (१२) मते मिळाली. विद्यमान अध्यक्ष थोरात यांना चौथ्या क्रमांकावर जात दारुण पराभव पत्करावा लागला.
उपाध्यक्षपदासाठी झालेल्या निकराच्या लढाईत प्रमोद डोईफोडे यांना (४१), खंडुराज गायकवाड (३९), दिलीप जाधव (३२) मते मिळाली. वर्षानुर्षे वार्ताहर संघाच्या निवडणूकीत विजयी होणारे खंडुराज गायकवाड यांचा पराभव झाला हे यावेळचे विशेष. कार्यवाह पदासाठी झालेल्या दुहेरी लढतीत विद्यमान कार्यवाह मंदार पारकर (८८) मते मिळवून विजयी झाले. त्यांच्या विरोधात लढत देणारे संजीवन ढेरे यांना (२२) मतांवर समाधान मानावे लागले. 
कोषाध्यक्षपदासाठी झालेल्या लढाईत विद्यमान कोषाध्यक्ष महेश पवार (५९) मते मिळवून विजयी झाले. तर पुरुषोत्तम आवारे-पाटील यांना (५१) मते मिळवत पराभव पत्करावा लागला. कार्यकारणी सदस्य पदासाठी झालेल्या पाच जागांसाठी झहीर सिद्धीकी (६५), शामसुंदर सोन्नर (५७), प्रफुल्ल साळुंखे (६५) प्रविण राऊत (५८) तर डॉ. नितीन तोरस्कर (५३) मते मिळवून विजयी झाले. 
सर्व विजयी उमेदवारांचे बेरक्या कडून अभिनंदन

निखिल वागळे यांच्या विरोधात ५० कोटी रुपयांचा अब्रुनुकसानीचा दावा

‘आयबीएन लोकमत’चे संपादक निखिल वागळे आणि त्यांच्या वृत्तवाहिनीविरोधात नितेश राणे यांनी शुक्रवारी ५० कोटी रुपयांचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला. 
मुंबई- उद्योगमंत्री नारायण राणे आणि त्यांच्या कुटुंबीयांवर गुंडगिरीचा आरोप करून त्यांच्या मुलांचा म्हणजेच ‘स्वाभिमान’चे संस्थापक अध्यक्ष नितेश राणे आणि खासदार डॉ. निलेश राणे यांचा उल्लेख ‘गुंडाची दुसरी पिढी’म्हणून करणारे ‘आयबीएन लोकमत’चे संपादक निखिल वागळे आणि त्यांच्या वृत्तवाहिनीविरोधात नितेश राणे यांनी शुक्रवारी ५० कोटी रुपयांचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला. वांद्रे न्यायालयाने ही याचिका दाखल करून घेतली असून पुढील सुनावणी २४ फेब्रुवारीला होणार आहे.
आयबीएन वृत्तवाहिनीवर पाच डिसेंबर २०१३ रोजी ‘आजचा सवाल’ या कार्यक्रमात निखिल वागळे यांनी संपूर्ण राणे कुटुंबीयांवर गुंडगिरीचा आरोप करतानाच नितेश राणे यांच्या गुंडगिरीकडे पोलिस कानाडोळा करत असल्याचे म्हटले होते. या कार्यक्रमात शिवसेनेचे वैभव नाईक, आमदार दीपक केसरकर, सतीश कामत, निवृत्त न्यायाधीश कोळसे पाटील, गोपाळ तिवारी आदी सहभागी झाले होते. या कार्यक्रमात निखिल वागळे यांनी ‘महाराष्ट्र पोलिस झोपलेले आहेत. काँग्रेसमध्ये राणे यांच्यासारखे गुंड प्रवृत्तीचे लोक आहेत’. ‘पैशात माजलेली ही मुले आहेत, हा पैसा बापाने कमावलेला नाही. कुठून आणला हा पैसा.’‘हे काय गुंडाराज आहे काय. संपूर्ण राणे कुटुंबाला गुंड म्हणावे काय?’, असा सवाल करत या कुटुंबावर १०० पेक्षाही अधिक गुन्हे दाखल असल्याचा आरोप केला होता.
आयबीएन लोकमतवरील या कार्यक्रमाची चित्रफीत ‘युटय़ूब’वरही टाकण्यात आली असून या माध्यमातून नारायण राणे, नितेश राणे, खासदार डॉ. निलेश राणे यांची प्रतिमा मलिन करण्याचे कुटिर कारस्थान निखिल वागळे आणि त्यांच्या वृत्तवाहिनीच्या माध्यमातून सुरू आहे. केवळ राजकीय सुडबुद्धीतूनच हा टॉक-शो घडवून आणला होता. त्यामुळेच वागळे यांनी केलेल्या बदनामीच्याविरोधात नितेश राणे यांनी केलेली याचिका न्यायालयाने दाखल करून घेतली असल्याची माहिती नितेश राणे यांचे वकील ‘एमझेडएम’ लीगलचे अ‍ॅड. दिनेश कदम यांनी दिली आहे.
http://prahaar.in/mahamumbai/180252

बुधवार, २९ जानेवारी, २०१४

नाशिकमध्ये 'निर्भिड जनमत'ला हवाय संपादक!

नाशिकमध्ये सध्या नव्या वृत्तपत्रांचे वारे वाहत आहेत. सर्वाधिक उत्सुकता "पुढारी" यावेळी तरी खरोखरच नाशकात येणार का ही असतानाच 'लोकमत' व 'दिव्य मराठी'मध्ये झळकलेल्या जाहिरातींनी धमाल उडवून दिली. 'लोकमत'मध्ये "निर्भीड जनमत"ची जाहिरात प्रसिद्ध झाली होती. हे दैनिक लवकरच सुरू होतेय व शिकावू पत्रकार, फोटोग्राफर, वार्ताहर, उपसंपादक, भाषांतरकार, डीटीपी, आर्टिस्ट, डिझायनर अशा अनेक पोस्ट ते भरत आहेत. याशिवाय नाशिकमधील "सीटू'ची सूत्रे हलविणारा एक बडा कम्युनिस्ट नेताही लवकरच पेपर सुरू करीत आहे. कम्युनिस्ट नेत्याची जाहिरात 'दिव्य मराठी'मध्ये प्रसिद्ध झाली होती. "पुढारी"ने जाहिरात छापली नव्हती; थेट लोकांना बोलाविले. गेल्याच आठवड्यात पुण्याचे संपादक संजय आवटे आणि मालक योगेश जाधव नाशकात येवून मुलाखतीही घेवून गेले. 'पुढारी'चे नाशिकमधील संपादक म्हणून 'गांवकरी'चे कार्यकारी संपादक शैलेंद्र तनपुरे यांचे नाव आघाडीवर असल्याचे 'पुढारी'च्या नाशिक कार्यालयातीलच मंडळी सागत आहे.

नाशिकमधून कर सल्लागार असलेले;  तसेच जमिनी; रिअल इस्टेटमध्ये मोठी गुंतवणूक असलेले परशुराम जाधव हे "निर्भिड जनमत" नावाचे दैनिक सुरू करीत आहेत. याप्रोजेक्टमध्ये नाशिक/सिन्नर; तसेच संगमनेरच्या काही बड्या नेत्यांची; उद्योजकांची गुंतवणूक असल्याचीही चर्चा आहे.  दैनिकाची तयारी चांगली आहे. त्यांनी नवे प्रिंटींग मशीन; शिवाय सीटीपीही खरेदी केले आहे; मोठी गुंतवणूक करताहेत. फक्त निवडणुकीपुरते चालेल; असा काही प्रकार दिसत नाही. पुढे त्यांना विस्तारही करायचाय. पुण्यात 'सकाळ'मध्ये सहस्त्रबुद्धे आणि नंतर नाशिकमध्ये द्वारकानाथ लेले यांचे सहाय्यक राहिलेले बाबा जाधव (संगमनेर) हे या दैनिकात महाव्यवस्थापक आहेत. सध्या संपादकाचा शोध सुरू आहे. इतर विभागातील भरती पूर्ण झाली आहे. एकदा संपादकाची नियुक्ती झाली की, फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात संपादकीय भरती पूर्ण करण्याची तयारी सुरू आहे. इच्छुकांनी  महाव्यवस्थापक बाबा जाधव (9604721467) यांच्याशी थेट संपर्क करावा. 12 किंवा 16 पानी रंगीत दैनिक त्यांना सुरू करायचेय. नाव असलेला, दैनिकाचा चेहरा बनू शकेल असा संपादक हवाय.

सध्याचा कार्यालयाचा पत्ता : निर्भिड जनमत, सदनिका क्रमांक १०३, पहिलामजला, साबरमती अपार्टमेंट, एक्स्प्रेस इन हॉटेलच्या अलीकडे, किनारा हॉटेलच्या पुढे, फ्लायओव्हरखाली, पाथर्डी फाटा, नाशिक.
कार्यालयाचा फोन क्रमांक : 7745017117


जळगावातही दैनिकाची धामधूम!
जळगावातही निवडणुकीच्या तोंडावर नव्या दैनिकांची धामधूम सुरू आहे. 'नि:पक्ष, निर्भीड'चे नव्याचे नऊ दिवस संपले आहेत. सध्या खपात 'पुण्यनगरी'नंतर चौथ्या स्थानी असलेल्या 'इव्हेंटपत्रा'पेक्षाही नव्या दैनिकाची जाहिरात उत्पनाची स्थिती 'दिव्य' आहे. अंकातच दम नाही तर जाहिराती आणणार कुठून, असा सवाल मार्केटिंग विभागाकडून केला जातोय. या विभागाचे राज्य प्रमुख एका 'नाजूक प्रकरणात' गुंतले असून सध्या त्यांचे 'इव्हेंट' जोरात सुरू असल्याचे इंग्रजी ई -मेल्स मुख्यालयातीलच काही मंडळी 'मकबरा'च्या साक्षीने राज्यभर पाठवून 'भडास' काढण्याचा प्रयत्न करीत आहेत. या 'नि:पक्ष, निर्भीड'ची अशी धास्ती आहे, की त्यांच्या पार्किंगमधून चोरटे मोटारसायकली पळवून नेत आहेत; डिक्कीतून दीड लाख रुपये चोरीला जातायेत! घरकुलाचा पाठपुरावा करून भल्या-भल्यांची दाणादाण उडविलेल्या या  दैनिकाचा पोलिसातला, क्राईममधला दरारा पार संपला आहे. तुम्ही 'पटविले' जावू शकता; हे एकदा का मार्केटने पाणी जोखले की किंमत संपलीच! आता 'इव्हेंटपत्रा'तून एक 'विशाल' सहकारी आणून म्हणे 'क्राईम' पुन्हा तगडे करणार आहेत!

जळगावात 'स्मार्ट मित्र'चीही अवस्था अतिशय दयनीय, शोचनीय आहे! ३५-४० हजारात (हाही दावाच!) पाच महिने काढल्यानंतर आता ३१ जानेवारीला बुकिंग  संपायला आले तरी हजारभर ग्राहकही पुन्हा जुळलेले नाहीत. 'ग्लोबलायझेशन ते लोकलायझेशन'चे स्वप्न दाखविले गेले; पण 'लोकलायझेशन' म्हणजे काही 'लोकल रेल्वे' नाही! मुंबईत 'लोकल'च्या बातम्या विकल्या जातात, वाचल्या जातात. जळगावात मात्र उठसूठ रेल्वेच्या फुटकळ बातम्या नावानिशी आणि पान १ वर पाहून वाचकांना (जे काही आहेत त्यांना!) आता वीट आलाय. हे म्हणजे एखादा बसने ये-जा करणारा गावचा वार्ताहर जसा रोज 'नारोशंकराची घंटा'मध्ये तेच-ते रटाळ बसचे किस्से पाठवायचा तसे अजीर्ण झालेय. (
'नारोशंकराची घंटा' म्हणजे काय हे गझलकार, पत्रकार नाशिकरांना विचारा, त्यांच्या नावात नाशिक जिल्ह्यातील एक तालुकाही आहे!) रेल्वे नाहीतर महापालिका यापलीकडे जळगावचे विश्व कधी 'स्मार्ट'पणे बघणार आहेत की नाही ही मंडळी? त्यात 'उत्तर महाराष्ट्राची खबरबात' घेणारयांना जळगावची खबर घेण्याचा अधिकारही ठेवलेला नसल्याने आनंदीआनंद अजूनच गहिरा झाला आहे. बरे 'महा' म्हणजे मोठे 'बळ' फक्त नावापुरतेच! प्रत्यक्षात सारा 'अर्ध्या हळकुंडात पिवळा' असा लिंबू-टीम्बू पोरांचा खेळ सुरू आहे. 'नाव मोठे लक्षण खोटे' असा हा 'धरले तर चावते आणि सोडले तर पळते' प्रकार झालाय. चार महिने अर्धवेळ मंडळींना मानधन नव्हते; फोटोग्राफरला अजून एक पैशाचे मानधन नाही! एक मुलगी राजीनामा देवून निघून गेलीय. ज्यांना काही कळत नाही ते 'उपरे' स्थानिक राजकारणावर असे गूढ-रम्य लिहितात, की (चुकून संपादक झालेले) 'पुस्तकलिखे' राजकीय/चीप वार्ताहरही त्यापुढे फिके पडावे! लोकांना आता हसण्यातही रस उरलेला नाही. सध्या तरी (काही शेकडा) जळगावकरांची सकाळ 'मनोरंजन टाईम्स'मुळे पार खराब होत आहे! त्यापेक्षा हेमंत पाटील यांचा 'बातमीदार' तरी सरस निघतोय! बोरीबंदरातल्या संपादकांनु, तुम्ही ग्लोबलच बरे आहात हो; ही जागोजागची लोकल 'लोकनाट्य तमाशा मंडळे' बंद करा! ग्रामीण महाराष्ट्राच्या मनोरंजनासाठी खानविलकरांच्या अमृताची 'एक्स्प्रेस' आणि 'कपिलच्या रात्री' आहेत, त्या पुरे की!

या सर्वात जळगावात या घडीला तरी पुन्हा 'मानबिंदू'चाच मान (आणि शानही!) नंबर एक आहे! अशात आता कॉंग्रेसनेते विवेक ठाकरे हे कृषि एक्स्प्रेस आणि प्रहार एक्स्प्रेस घेवून आले आहेत. ज्येष्ठ पत्रकार मुकुंद एडके हे पुन्हा स्वत:चे सायंदैनिक काढण्याच्या तयारीला लागले आहेत. 'माझे जळगाव'ही बाजारात येवू घाताले आहे. या सर्वांना 'बेरक्या'च्या शुभेच्छा!

'देशोन्न्ती'त एकच बातमी दोनदा!

'देशोन्न्ती'त २८ जानेवारीच्या अंकात "महसूल विभागाकडून ८० कोटींचा प्रस्ताव" ही बातमी पान ७ वर आणि पान ८  वर रिपीट झाली आहे. तर पान १ वर अपघाताच्या बातमीमध्ये तालुका मेहकरऐवजी चक्क संग्रामपूर केला.  खरेतर दोन्ही गावातील तब्बल १०० ते १२० कि. मी चे अंतर आहे.


सूचना/विनंती/आवाहन:
"उपसंपादकाच्या
डुलक्या" हे एकेकाळी 'गांवकरी'च्या 'अमृत' या डायजेस्टमधील लोकप्रिय व वाचनीय सदर होते. 'बेरक्या'ही अशा गमती-जमाती, चुकांना स्थान देईल. मात्र, अशा बातम्या पाठविताना फक्त वस्तुस्थिती मांडावी; टीका-टीप्पणी करू नये अथवा कुणावर 'नेम' धरून बदनामीचा प्रयत्न करू नये. 'बेरक्या' अशा प्रयत्नांना साथ देणार नाही. हा फक्त उपसंपादकांना सजग करण्याचा प्रयत्न आहे. वृत्तपत्राच्या घाई-गर्दीत अशा चुका होतच असतात!

आपण मजकूर berkya2011@gmail.com या ई-मेल आयडीवर पाठवू शकता. नाव नेहमीप्रमाणेच गुप्त राखले जा
ल.

शनिवार, २५ जानेवारी, २०१४

'ईटीव्ही'च्या विक्रीची प्रक्रिया पूर्ण; नेटवर्क 18, 'रिलायन्स'ने मोजले 2053 कोटी !

नेटवर्क18 समूह आणि 'रिलायन्स'ने तब्बल 2053 कोटी रुपये मोजून 2012मध्ये जाहीर केलेली 'ईटीव्ही' माध्यमसमूहाच्या खरेदीची प्रक्रिया पूर्ण केली आहे. शुक्रवारी बॉम्बे स्टोक एक्स्चेंजला प्रक्रिया पूर्ण झाल्याची माहिती सादर केली गेली. आता 'ईटीव्ही' उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, बिहार आणि 'ईटीव्ही' उर्दू या हिंदी प्रादेशिक वृत्त वाहिन्यांची 100 टक्के मालकी आता नेटवर्क18 समूहाकडे आली आहे. 'ईटीव्ही' मराठी, कन्नडा, बांगला, गुजराती आणि 'ईटीव्ही' ओडिया या मनोरंजन वाहिन्यातील प्रत्येकी 50 टक्के मालकी नेटवर्क18 समूह आणि 'रिलायन्स'कडे राहील. करारानुसार, या वाहिन्यांच्या संचालनाची संपूर्ण मालकी नेटवर्क18 समूहाकडे असेल. मात्र, कंटेंटवर; तसेच प्रसारण हक्क, वितरण हक्क आणि वितरण मालमत्ता यावर 'रिलायन्स'ची मालकी असेल. 'ईटीव्ही'ने तेलगु आणि तेलगु न्यूज या दोन वाहिन्यातील 75.5 टक्के मालकी स्वत:कडे राखली व 24.5 टक्के मालकी नेटवर्क18 समूहाला हस्तांतरित केली आहे.

'ईटीव्ही'च्या 5 वाहिन्यांतील 100 टक्के, अन्य आणखी पाच विभागीय वाहिन्यांमधील 50 टक्के व्याज तसेच इटीव्ही तेलुगु आणि इटीव्ही तेलुगु न्यूजमधील 24.50 टक्के व्याजाच्या अधिग्रहणासाठी रिलायन्स इंडस्ट्रीज संचालक मंडळाने 21 अब्जांच्या खर्चाला मंजुरी दिली आहे. 'रिलायन्स'च्याच इन्फोटेल ब्रॉडबॅँड सर्व्हिसेस लिमिटेड या कंपनीच्या 4-जी अत्याधुनिक  ब्रॉडबॅँड वायरलेस सेवेसाठी विशेष कंटेंट मिळण्याच्या दृष्टीने व्यवहाराचा एक भाग म्हणून टीव्ही 18 ब्रॉडकास्टच्या संस्थापकांनी आणलेल्या हक्क भागासाठी निधीचा पुरवठा करण्याची तयारी 'रिलायन्स'ने दाखवली आहे. रिलायन्स त्यासाठी एक ‘ट्रस्ट’ स्थापन करणार आहे. नेटवर्क 18 आणि टीव्ही 18 या दोन्ही कंपन्यांनी जाहीर केलेल्या 27 अब्जांच्या हक्कभाग विक्रीसाठी कंपन्यांच्या संस्थापकांना या ‘ट्रस्ट’च्या माध्यमातून  निधीचा पुरवठा करण्यात येणार आहे. रिलायन्स निधीचा पुरवठा नेमका किती प्रमाणात करणार हे स्पष्ट झालेले नसले तरी नेटवर्क 18 आणि टीव्ही 18 या दोन्ही कंपन्यांनी  संयुक्तपणे या हक्कभाग विक्रीनंतर कर्ज मुक्त होतील. इटीव्ही या वाहिनीमध्ये 'रिलायन्स'ने 26 अब्ज रुपयांची गुंतवणूक केली होती.

ही बातमी सविस्तर इथे वाचा

'कृषिवल'चे संपादक प्रसाद केरकर यांचा लेख : कर लो मीडिया मुठ्ठी में...

गुरुवार, २३ जानेवारी, २०१४

'आज तक'वर आली माफी मागण्याची पाळी !

इंडियन रेल्वे कैटरिंग एंड टूरिजम कार्पोरेशन (आयआरसीटीसी) ने न्यूज ब्रॉडकास्टर्स स्टैंडर्ड्स अथॉरिटी (एनबीएसए)कडे दाखल केलेल्या एका तक्रारीनंतर 'आज तक' वाहिनीवर माफी मागण्याची वेळ आली आहे. १३ ते १७ जानेवारी या कालावधीत ही जाहीर माफी मागितली गेली. ज्या व्यक्ती, संस्था, पक्षावर आरोप केले गेले आहेत, तिची बाजू न मांडता बदनामी केल्याबद्दल ; तथ्य जाणून न घेता, एकांगी वृत्त प्रसारित करण्याबद्दल 'एनबीएसए'ने 'आज तक'ला दोषी धरून हा निकाल जाहीर केला होता.

'आज तक'ने २४/०३/२०१३ रोजी 'दलाल जंक्शन' या शीर्षकांतर्गत "आयआरसीटीसीकी वेबसाईट पर गडबडझाला" हे वृत्त प्रसारित केले होते. त्यात 'आयआरसीटीसी'वर नाहक आरोप केल्याचे याचिकाकर्त्यानी पटवून दिले. 'टीव्ही टुडे'चे लीगल हेड पुनीत जैन व एडिटर दीपक शर्मा यांना हे आरोप योग्य असल्याचे सिद्ध करता आले नाही. त्यामुळे १३ ते १७ जानेवारी असे सलग पाच दिवस जाहीर माफीनामा प्रदर्शित करण्याची वेळ त्यांच्यावर आली. संबंधित बातमीचा व्हिडीओही 'आज तक'ला वेबसाइटवरून काढावा लागला. वाहिन्यांच्या मनमानी कारभाराला दिलेली ही एक सणसणीत चपराक मानली जात आहे.

(एनबीएसए)चा निकाल इथे पाहा.


बुधवार, २२ जानेवारी, २०१४

कृषी विषयक लिखाण ‘मुरली’चे, शेतीनिष्ठ पुरस्कार साहेबांना

अहमदनगर- रायटर बदलल्याने घोळात सापडलेल्या सकाळच्या येथील साहेबाने हाताखाली काम करणार्‍या ‘मुरली’चे शेती विषयक लेख, बातम्या स्वत:च्या असल्याची फाईल तयार केली आणि राज्य शासनाच्या कृषी विभागाकडे पुरस्कारासाठी सादर केली. या खात्याशी संबंधित मंत्र्याच्या घरचा गडी असल्याचे अनेक वर्षांपासून वागत असलेल्या ‘बाळू’ची फाईल समोर येताच इतक्या वर्षांची सेवेची बक्षिसी म्हणून बाळूला पुरस्कार जाहीर झाला. 
वास्तविक पुरस्कारासाठी सादर करण्यात आलेल्या बातम्या, लेख हे ‘मुरली’चे असल्याची माहिती माहिती अधिकारात पुढे आली आहे. ‘राम’ गेल्यानंतर ‘विठ्ठल’ आणि ‘कैलास’वर भिस्त राहिलेल्या ‘बाळू’ने आता पुरस्कारासाठी ‘मुरली’ची फाईल पाठवायचे सोडून ‘मुरली’चे लिखाण आपलेच असल्याचे भासवले. आवृत्ती प्रमुख या नात्याने कनिष्ठांना श्रेय द्यायचे सोडून आपल्याला श्रेय घेणार्‍या ’साहेबा’ची ही जुनीच वृत्ती असल्याची चर्चा आता झडू लागली आहे. ‘मुरली’च्या ज्या बातम्यांमुळे पुरस्कार मिळाला ती फाईलच आता पुण्यात अभिजित पवारांना सोपविण्यासाठी आतापर्यंत अन्याय झालेल्या सकाळमधील काही ग्रामीण वार्ताहरांनी पुढाकार घेतलाय! अभिजित पवार आणि सकाळ व्यवस्थापन याची कितपत दखल घेते हे पाहणे जास्त महत्वाचे ठरले आहे. ‘नाच करे बंदर और माल खाये मदारी’ या हिंदी वाकप्रचाराचे विडंबन आता जिल्ह्याच्या पत्रकारीतेत ‘नाच करे मदारी और माल खाये बंदर’ असे गमतीने केले जाऊ लागले असून यातील मदारी आणि बंदर कोण याची चर्चा नगर शहरातील पत्रकार चौकाजवळील टपरीवर जास्तच रंगली आहे.

पत्रकारितेतील 'सुधाकर' गेला...

मराठवाड्यातील नांदेड येथील ज्येष्ठ पत्रकार सुधाकरराव डोईफोडे यांचे आज (बुधवार, दि.२२) सकाळी हैद्राबाद येथे १०.३५ च्या दरम्यान निधन झाले.
डोईफोडे गेल्या काही दिवसापासून आजारी होते. त्यांच्यावर हैदराबाद इथ खाजगी रूग्णालयात उपचार सुरू होते. उपचारा दरम्यान डोईफोडे यांनी आज सकाळी साडेदहाच्या सुमारास शेवटचा श्वास घेतला. डोईफोडे यांचा मराठवाडा मुक्ती संग्रामात सहभाग होता. स्थानिक दैनीक प्रजावाणीचे ते संपादक होते. मराठवाडा जनता विकास परीषदेच्या माध्यमातुन त्यांनी अनेक आंदोलने उभारली. त्यांना विविध क्षेत्रातील दांडगा अभ्यास होता. मराठवाड्याच्या रेल्वेप्रश्नी तर ते कायम आग्रही असायचे. त्यांना नांदेडभूषणसह अनेक प्रतीष्ठीत पुरस्कारांनी सन्मानीत करण्यात आले होते.
डोईफोडे यांना बेरक्याची भावपुर्ण श्रध्दांजली...!

मंगळवार, २१ जानेवारी, २०१४

रँकिंगमध्ये लोकमतच्या हॅलो पुरवणीचे अनेक हेड उघडे पडले

नागपूर - नागपूर,अकोला,नाशिक,जळगाव,औरंगाबाद,पुणे,मुंबई,कोल्हापूर,सोलापूर,नगरसह संपूर्ण राज्यात लोकमत पोहचला आहे.राज्यातील सर्व जिल्ह्यात तसेच महानगरात लोकमतची हॅलो पुरवणी निघते.या हॅलो पुरवणीचे जे हेड आहेत,त्यांचे सध्या रँकिंग (क्रमवारी)ठरविण्याचे काम सध्या सुरू आहे.त्यात मालकांची चापलुसी करणारे अनेक हेड उघडे पडले आहेत.
आयपीएस किंवा आयएस अधिका-यांच्या तीन वर्षाला नियमाप्रमाणे बदल्या केल्या जातात,तोच निकष लोकमतने गतवर्षीप्रमाणे सुरू केला आहे.कोणत्याही जिल्हा प्रतिनिधींला एकच ठिकाणी तीन वर्षापेक्षा जास्त काळ काम करता येणार नाही.त्यांच्या बदल्या केल्या जात आहेत.येत्या मार्च किंवा एप्रिलमध्ये अनेकांच्या बदल्या होणार आहेत.
आता या जिल्हा प्रतिनिधी आणि महानगरातील हॅलो हेडचे रँकिंग काढण्यात येत आहे.हॅलो पुरवणीचे लेआऊट कसे आहे,बातम्या कोणत्या दर्जाच्या आहेत,किती बातम्या अन्य वृत्तपत्रांपेच्या नविन आहेत,संबंधित हेडची कार्यालयीन उपस्थिती किती आहे,अन्य सहका-यांशी संबंध कसे आहेत,जनसंपर्क कसा आहेत,लोकांशी संबंध कसे आहेत,या सर्व बाबी तपासल्या जात आहेत.
अनेक जिल्हा प्रतिनिधी केवळ पाट्या टाकण्याचे काम करतात,तसेच एका दिवसाची कार्यालयीन सुट्टी असताना आदल्या दिवशीच्या दुपारपासून गायब असतात,ते सुट्टीच्या दुस-या दिवशी दुपारी येतात,अनेक जिल्हा प्रतिनिधी दुस-या ठिकाणी राहून ये - जा करतात,तसेच पत्रकावरून बातम्या देत असतात,तसेच त्यांचे अन्य सहका-याशी संबंध चांगले नाहीत.तसेच लोकांशी वागताना तुसडेपणाने वागतात,असे जिल्हा प्रतिनिधी उघडे पडत आहेत.
काही जिल्हा प्रतिनिधी केवळ मालकांबरोबर चापलुसी करण्यातच आपला वेळ निभावून नेतात.असे सर्व जिल्हा प्रतिनिधी उघडे पडत आहेत.काही जिल्हा प्रतिनिधी ज्युनिअर रिपोर्टरच्या बातम्या स्वत:च्या नावे बॉयनेम छापत असल्याच्या तक्रारीही प्राप्त झाल्या आहेत.
रँकिंगमुळे सर्व जिल्हा प्रतिधिनी तसेच महानगरातील हॅलो हेड प्रमुख हादरले आहेत.कामचुकार आणि केवळ चापलुसी करणाऱ्यांवर कारवाई होणार असल्यामुळे अनेकांचा चेहरा पडला आहे.मिळालेल्या माहितीनुसार विदर्भातील अमरावती,यवतमाळ, मराठवाड्यातील जालना,बीड तसेच कोल्हापूर महानगर हॅलोचे हेडचे रँकिंग कमी आले आहे.आता अशा हेडवर लोकमत प्रशासन काय कारवाई करणार,याकडे लक्ष वेधले आहे.
येत्या एप्रिल आणि मे मध्ये अनेक जिल्हा प्रतिनिधींच्या बदल्या होणार आहेत.त्याची यादी बेरक्याकडे उपलब्ध होणार आहे.

शुक्रवार, १७ जानेवारी, २०१४

कुमार केतकर यांचा दिव्य मराठीचा राजीनामा

मुंबई - दिव्य मराठीचे मुख्य संपादक कुमार यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.केतकर यांचा राजीनामा मंजूर झाल्याचेही वृत्त आहे.केतकरांनंतर दिव्य मराठीचा मुख्य संपादक कोण होणार,याबाबत मीडियाचे लक्ष वेधले आहे.
दिव्य मराठीची पहिली आवृत्ती औरंगाबादहून चार वर्षापुर्वी सुरू झाली.तेव्हापासून ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर मुख्य संपादक होते.मार्च १३ मध्ये त्यांचा तीन वर्षाचा करार संपला होता,पण पुन्हा एक वर्षाचा करार वाढविण्यात आला होता.त्यांचा नविन एक वर्षाचा करार मार्च २०१४ मध्ये संपणार होता,परंतु दोन महिने अगोदरच केतकर यांनी राजीनामा दिला आहे.त्यांचा राजीनामा व्यवस्थापनाने मंजूरही केल्याचे वृत्त आहे.
दिव्य मराठीचा राजीनामा दिल्यानंतर केतकर आता अन्य वृत्तपत्रांत जाणार की,काँग्रेस पक्षात अधिकृत प्रवेश करणार,याकडे लक्ष वेधले आहे.कुमार केतकर पुन्हा लोकमतमध्ये जाणार असल्याचीही चर्चा जोरदार सुरू आहे.

दिव्य मराठीचे मुख्य संपादक कोण ?
केतकर यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या दिव्य मराठीच्या  मुख्य संपादकपदी प्रशांत दीक्षित किंवा भारतकुमार राऊत यांची निवड होवू शकते.
दीक्षित हे ऑलरेडी गेल्या एक वर्षापासून संपादक म्हणून दिव्य मराठीत कार्यरत आहेत,तर भारतकुमार राऊत यांची जानेवारीअखेर खासदारकीची मुदत संपत असल्याने त्यानंतर ते पत्रकारितेत पुन्हा सक्रिय होणार आहेत.

सोमवार, १३ जानेवारी, २०१४

औरंगाबाद शहरात दलबदलू लोकांची चलती

औरंगाबाद - औंरगाबाद शहरात गेल्या काही दिवसांपासून चार दैनिकांत ऐकमेकांचे माणसे फोडण्याची स्पर्धा लागली आहे.त्यात एकाच वर्षात तीन दैनिके बदलणा-यांचा भाव चांगलाच वधारला आहे.काही जण मला तिकडीची ऑफर आहे,पगार वाढवून दिला तर राहतो अन्यथा तिकडे जातो म्हणून आपल्या दैनिकांच्या व्यवस्थापकांना ब्लॅकमेल करीत आहेत.अशा दलबदलू लोकांची औरंगाबादेत सध्या चलती सुरू आहे.

काही दिवसांपुर्वी लोकमतचे तिघेजण सकाळमध्ये गेले.त्यानंतर सीएनएक्स पुरवणीचा राहूल जगदाळे हा दिव्य मराठीच्या डी.बी.स्टारला गेला आहे.आता लोकमतमध्ये तीन ते चार जागा भरावयाच्या असून,सकाळचा एक माथाडी कामगार तसेच म.टा.चे दोघे लोकमतच्या वाटेवर आहेत.सकाळमध्ये देऊळ बांधणारा एकजण म.टा.मध्ये दुप्पट पगारावर गेला होता पण तिथे चांगलाच बदनाम झाल्यानंतर आता लोकमतच्या वाटेवर असून किमान पाच हजार वाढवून मागत आहे.म.टा.मधील आणखी एक शिवाजी लोकमतच्या वाटेवर आहे.अशा दलबदलू लोकांची सध्या चलती आली आहे.जे निष्ठेने काम करतात,त्याच्या हातात बाबाजी का ठुल्लू तर दल बदलणा-यांना एका वर्षात दुप्पट पगार मिळत आहे.
सकाळमध्ये पुर्वी चिफ रिपोर्टर असलेला एकजण व्यवस्थापनाला असाच ब्लॅकमेल करीत होता.लोकमतला संजीवनी देणारा एक कार्यकारी संपादक त्यास सतत गोंजारत होता.मात्र पगार आणि पदावरून त्याचे घोडे अडले होते.आता तो लोकमतमध्ये कोणत्याही पदावर येण्यास तयार असला तरी लोकमतमधील शांती भंग पावेल म्हणून त्यास एक लाल विरोध करीत आहे आणि त्याचा विजय व्हावा म्हणून दुसरा सदैव साथ देत आहे.पाहु या,या फोडाफोडीत कोण जिंकणार आणि कोण हारणार ?

'दिव्य मराठी'त कूपनच्या नावाखाली लूटमार; महाघोटाळा उघड!

'दिव्य मराठी'मध्ये कूपनच्या नावाखाली लूटमारीचा महाघोटाळा उघडकीस आला आहे. त्यानंतर नाशिकमधील वितरण व्यवस्थापक जितेंद्र निकम यांना तडकाफडकी बडतर्फ करण्यात आले आहे. त्यांच्यावर कायदेशीर कारवाईही सुरू करण्यात आली आहे. आश्चर्य म्हणजे थेट वृत्तपत्रातूनच या कारवाईची माहिती जाहीर करण्यात आली आहे. 'दिव्य मराठी'च्या नाशिक आवृत्तीत 12 जानेवारी रोजीच्या अंकात 'दिव्य सिटी' पान 1 वर घडीच्या वर ठळकपणे ही 'जाहीर सूचना' प्रसिद्ध करण्यात आली आहे. एखादा कर्मचारी बडतर्फ करणे आणि त्यातही त्याची माहिती थेट अशा पद्धतीने जाहीर करणे, हे महाराष्ट्राच्या वृत्तपत्र इतिहासात प्रथमच घडले आहे.

'दिव्य मराठी'चा डामडौल म्हणजे निव्वळ पोकळ वासा असल्याचेच यातून उघड झाले आहे. अर्थात जिथे इतरांना निपक्ष आणि निर्भिड पत्रकारितेतील नैतिकतेची मूलतत्त्वे शिकविणारेच राजकीय पक्षांचा प्रचार आणि चाटूगिरी; तसेच लाचारी करीत असतील; प्रवक्ते बनून राहत असतील तिथे वेगळे काय घडणार? केवळ संपादकीयच नव्हे तर सर्वच विभागात अनागोंदी असल्याचे हे द्योतक आहे. दहा दिवसांपूर्वीच वितरणाचे महाराष्ट्र प्रमुख धीरज रोमन यांना अकोल्यातील वास्तव्यात बाहेरचा रस्ता दाखविला गेला. चर्चा
शी आहे, की अकोला आणि नाशिकमधील सर्व वितरण मनुष्यबळ आता बदलले जाणार आहे.

बनावट वर्गणीदार वाचक दाखवून केलेला हा कूपन घोटाळा गमतीशीर आहे. समजा एक हजार डमी - बोगस वर्गणीदार दाखविले गेले तर त्यातून 12 ते
15 लाखाची कमाई वर्षभरात केली जाणे शक्य आहे. हजार बोगस कूपन म्हणजे वर्गणीदाराच्या नावाने 200 रुपयेप्रमाणे दोन लाख रुपये भरायचे. त्यातून एक हजार गिफ्टस मिळतील जी किमान 100 रुपयात तरी खुल्या बाजारात डिलर विकत घेतील. म्हणजे एक लाख रुपये वसूल. 750 रुपयाचे जाहिरात कूपन जाहिरात एजन्सीवाले किमान 300 रुपयाला विकत घेतात. म्हणजे एक हजार जाहिरात कूपनचे तीन लाख रुपये किमान! प्रत्यक्षात जाहिरात विभागातील माणूस हाताशी धरला तर बुकिंगच्या वेळी ग्राहकाला हे कूपन 500 रुपयालाही विकता येऊ शकते किंवा 750 चे कूपन लावून वरची रोख रक्कम भरायची, ग्राहकाकडून पूर्ण रोख रक्कम घ्यायची. याचा अर्थ पूर्ण 750 रुपये प्रती कूपन मिळवायचे. सहभागी बुकिंग क्लर्कला काही वाटा द्यायचा. आता एक अंक टाकण्याचे प्रती कूपन महिन्याला 60 रुपये म्हणजे हजारचे दरमहा 60 हजार व वर्षाला सात लाख 20 हजार! वर हजार अंकांची वर्षभराची रद्दी किंवा अधिक चलाखी करून तो रिटर्न दाखवायचा म्हणजे ते बोनस!!

मुळात आता या कूपन महाघोटाळ्यानंतर अनेक प्रश्न उपस्थित होत  आहेत

  • नाशिक, अकोला येथे असलेला हा घोटाळा औरंगाबाद, सोलापूर, जळ्गाव येथे नसेल का? कारण राज्याचे प्रमुख एकच आहेत; त्यामुळे हे मॉडेल त्याना सर्वत्र राबविणे सहज आणि सोपे आहे; सोयीचे आहे. नाशिकमध्ये मोठ्या वितरणसंख्येत घोटाळा खपून गेला मात्र, अकोल्यातील मर्यादीत सर्क्युलेशनमध्ये ते उघड झाले. आता रोमन कंपनीच्या जवळकीतील मंडळी कोण-कोण आहे, याचा शोध सुरू आहे.
  • दोन वर्षे जर हा घोटाळा लपून राहिला तर अंतर्गत लेखापरीक्षणात ते का उघड झाले नाही?
  • हे केवळ एकट्या वितरण विभागाला शक्य आहे का? त्याला पूरक विभागांचे सहयोग मिळाले नसेल कशावरून?
  • 'दिव्य मराठी'च्या सर्वच कार्यालयात रोज वितरण विभागात कट्कटी, वाद, भांडण होतात ते नेमके कशामुळे?
  • अनेक ठिकाणी वितरकांचे इन्सेन्टीव्ह मिळालेले नाहीत; पण भोपापाळहून ते आलेले आहेत. मग हे काय गौडबंगाल? 
  • अनेक ठिकाणी ग्रामीण भागात बुकिंग केले गेले; लोकांकडून पैसे जमा केले. मात्र, त्याना त्यांना ना अंक दिला जातो, ना वर्गणी परत केली जाते. ही जबाबदारी कुणाची? की हाही काही अपहार आहे?
  • 'टाईम्स' प्रमाणे वर्गणीदार वाचकांकडून त्यांच्याच नावाने वर्गणीचा चेक घेऊन बुकिंग का केली जात नाही?
आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणज़े जर असे फुगवून वर्गणीदारांचे आकडे डमी दाखविले गेले असतील आणि त्यात लूटमार, घोटाळा असेल तर मग 'दिव्य मराठी'ची नेमकी की प्रसार संख्या किती?

रविवार, १२ जानेवारी, २०१४

पत्रकारांना ' आप ' ची भुरळ ; ज्येष्ठ पत्रकार आशुतोष 'आप'मध्ये!

हिंदी वृत्तवाहिनी 'आयबीएन 7 'चे व्यवस्थापकीय संपादक पदाचा राजीनामा दिल्यानंतर ज्येष्ठ पत्रकार आशुतोष यांनी  शनिवारी आम आदमी पक्षात (आप) प्रवेश केला. 'आप'चे संयोजनक आणि दिल्लीचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आशुतोष यांच्या डोक्यात 'मै आम आदमी हु'ची टोपी परिधान केली. तसेच आशुतोष यांनी आपमध्ये प्रवेश केल्याची अधिकृत घोषणाही केली.
 आशुतोष म्हणाले, स्वातंत्र्यानंतर देशात पहिल्यांदा परिवर्तन दिसत आहे. या वेळी जर मागे राहिलो असतो तर इतिहासाला काय उत्तर दिले असते. 
आशुतोष यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी 'आयबीएन 7'च्या व्यवस्थापकीय संपादक पदाचा राजीनामा दिला होता. त्याच वेळी आशुतोष यांनी 'आप'मध्ये प्रवेश करण्याचे अप्रत्यक्ष संकेत दिले होते. परंतु, शुक्रवारी एक इंग्रजी वृत्तवाहिनीशी बोलताना आशुतोष यांनी 'आप'मध्ये प्रवेश करणार असल्याचे अधिकृत जाहीर केले होते.
 आशुतोष 'आप'च्या तिकिटावर चांदनी चौक मतदार संघातून लोकसभा निवडणूक लढण्याची शक्यता आहे. तसेच आशुतोष हे कॉंग्रेसचे ज्येष्‍ठ नेता कपिल सिब्‍बल यांना आव्हान देऊ शकतात. 

* राखी बिर्ला दिल्‍ली सरकारच्या महिला व बाल विकास कल्‍याण मंत्री आहेत. या देखील पत्रकार होत्या. जैन टीव्ही कार्यरत होत्या. मात्र त्यांनी राजीनामा देऊन आम आदमी पक्षात प्रवेश केला.

* शाझिया इल्‍मी यांनी आम आदमी पक्षाकडून आरके पुरम विधानसभा क्षेत्रातून निवडणूक लढवली होती. ज्येष्ठ समाज सेवक अण्णा हजारे यांच्यासोबत जन लोकपाल आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. त्यानंतर अरविंद केजरीवाल यांनी 'आप'ची स्थापना केल्यानंतर शाझिया इल्मी यांनी त्यात प्रवेश केला. शाझिया इल्‍मी एबीपी न्‍यूज चॅनल अँकर होत्या. 

* नवी दिल्लीतील पड़पडगंज विधान सभा मतदान क्षेत्रातून निवडून आलेले आपचे आमदार मनीष सिसोदिया हे माजी पत्रकार आहेत. त्यांनी अनेक वर्षे विविध वृत्तवाहिन्यांमध्ये काम केले आहे.

शनिवार, ४ जानेवारी, २०१४

मराठी पत्रकारितेत लवकरच 'दबंग'गिरीचे दमदार युग


 'निष्पक्ष नजर, निष्पक्ष खबर' या व्रताला जागून इंदूर, भोपाळसह संपूर्ण मध्यप्रदेशात 'भास्कर'च्या नाकी दम आणणारया वृत्तपत्राची आता मराठीत "दबंग'गिरी सुरू होणार आहे. होय, 'दबंग दुनिया' लवकरच मराठीतून सुरू होतोय! तसा मुंबईत सध्या 12 पानी हिंदी 'दबंग दुनिया' सुरूच आहे.

अत्यंत आक्रमक, बिनधास्त, सडेतोड शैलीसाठी हे वृत्तपत्र प्रसिद्ध आणि तुफान लोकप्रिय आहे. अत्यंत आकर्षक ले-आऊट व उच्च दर्जाची न्यूजप्रिंट हे या दैनिकाचे आणखी एक वैशिष्ट्य! मध्यप्रदेशातील बडे बिल्डर असलेले, 'टोबको बरोन' म्हणून ओळखल्या जाणारया 'गुटखाकिंग' किशोर वाधवानी यांच्या मालकीचे हे वृत्तपत्र! महाराष्ट्रात सध्या सरकारविरोधी बाणा फक्त 'लोकसता' जपून आहे. त्यामुळे दबलेल्या, पिचलेल्या 'पेज थ्री' माध्यमांच्या दुनियेत बाणेदार, तडफदार वृत्तपत्रे निश्चितच उठून दिसतात.

'दिव्य मराठी' महाराष्ट्रात आला तेव्हा मोठ्या अपेक्षा होत्या; मात्र आक्रमक 'भास्कर'ची ही मराठी आवृत्ती फारच मिळमिळीत, पिचपिचीत आणि लिबलिबीत होत दिवसेंदिवस रटाळ, ढिसाळ बनत चाललीय! त्यामुळे 'दबंग'ची स्पर्धा अधिकच सोपी झाली आहे. मध्यप्रदेशात या दोन्ही दैनिकात जाम खुन्नस आहे! निवडणूक काळात "दबंग"ने अभिलाष खांडेकर यांनी केलेल्या कॉंग्रेसच्या प्रचाराचा भांडाफोड करून धमाल उडवून दिली होती. [(इथे पाहा ते मूळ वृत्त; दबंग दुनिया - इंदूर आवृत्ती; पान 1; 26/11/2013)
 # (सौजन्य : मूळ वृत्त भडास)]

दबंग मराठीत 16 पानी असेल व मराठी 'महानगर'ला धक्का देण्यासाठी 16 जानेवारीपासूनच सुरू होईल, अशी शक्यता आहे. अधिकृतरित्या 'दबंग'च्या मुंबई आवृत्तीतूनच "आता बोलूया मराठीत!" हे अतिशय कल्पक आणि कलात्मक कैम्पेन सुरू करण्यात आले आहे. 'दबंग'गिरीच्या धास्तीमुळे अनेकांचे धाबे दणाणले आहे. 'महानगर'मध्ये तयारीने वेग पकडला आहे. नितीन सावंत हे आपली सारी शक्ती पणाला लावून, झोकून तयारीला लागले आहेत. मात्र, पुरेशा, अनुभवी स्टाफमुळे त्यांच्यापुढे मोठे आव्हान आहे. कमी पैशात चांगली माणसे आणायची कुठून? हा प्रश्न आहेच? तरीही आहे त्या स्थितीत 'पीआर"चा उत्तम अनुभव असलेल्या उन्मेष गुजरातींसह ते किल्ला लढवित आहेत. अर्थात टैब्लोईड 'दबंग'ची खरी स्पर्धा चौफेर व पूर्वीच्या 'वागळे महानगरशी'च आहे! 'सिंग महानगर' अजून सुरू व्हायचाय; पण 'वागळे महानगर' शेवटच्या घटका मोजीत आहे. 'चौफेर'मध्ये कुणीही नायक/संपादक नाही; उपसंपादकच गाडा ओढताहेत!

मुंबईतील लढाई 'दबंग'ला सोपी आहे. त्यांचे स्वप्न आहे ते महाराष्ट्र काबीज करण्याचे! खरेतर 'भास्कर'ने ते स्वप्न पाहिले होते; पण कमजोर मनुष्यबळ व इतर भानगडी यामुळे अग्रवाल यांनी पुरोगामी महाराष्ट्राऐवजी बिहारला प्राधान्य दिले. आता त्यांची सारी लढाई तिकडे सुरू होईल. तर त्यांच्या मध्यप्रदेश गडाला सुरुंग लावून इकडे 'दबंग'गिरीचे नवे पर्व सुरू होईल. तेव्हा महाराष्ट्रा; बी रेडी टू वेलकम "दबंग दुनिया"!

फेसबुक वर शेअर करा

Facebook