बेरक्याचे निवेदन

हल्ली बेरक्यावर कधी तरीच अपडेट असते,बेरक्या पुर्वीप्रमाणे आक्रमक नाही,बेरक्या थंड झाला,अशी चर्चा काहीजण करत आहेत.चर्चा करणा-यांच्या तोंडावर आम्ही हात धरू शकत नाही.ही लोकशाही आहे आणि लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपली भावना व्यक्त करण्याचा अधिकार आहे.
परंतु आम्ही सांगू इच्छितो की,बेरक्याला माहिती मिळताच,त्याची एकदा नव्हे चारदा खात्री केली जाते,क्रॉस चेक झाल्यानंतर बातमी खरी असेल तर बेरक्यावर प्रकाशित केली जाते.त्यामुळे बेरक्यावर कमी प्रमाणात पण शंभर टक्के ख-या असणा-या बातम्या प्रकाशित केल्या जात आहेत.
बेरक्या ब्लॉग सुरू होवून साडेपाच वर्षे झाली.बेरक्यावर आलेली बातमी शंभर टक्के खरी असते,असा पत्रकारांचा आणि लोकांचा  विश्वास आहे,बेरक्या ब्लॉग फक्त पत्रकारच वाचत नाही तर सर्व शासकीय अधिकारी,कर्मचारी,पोलीस अधिकारी आणि कर्मचारी त्याचबरोबर महाराष्ट्रात तमाम जनता वाचते.मराठी मीडियात बेरक्याने इतिहास घडवला आहे.सर्वाधिक वाचणारा आणि लाखो हिटस् मिळवणारा बेरक्या हा ऐकमेव ब्लॉग आहे.त्यामुळे कोणाच्याही  विश्वासाला तडा जावू द्यायचा नाही.बेरक्याची लोकप्रियता अफाट आहे.त्याने मराठी मीडियाचे एव्हरेस्ट सर केले आहे.त्यामुळे या लोकप्रियतेला गालबोट लागू नये,याची काळजी घेतली जात आहे.यश मिळवणे जेवढे अवघड आहे,तेवढे यश पचवणे अवघड आहे.
यश मिळाले म्हणून कश्याही बातम्या देणे आणि त्या खपवणे हे बेरक्याच्या रक्तात नाही.भले एक बातमी देता आली नाही तरी चालेल परंतु चुकीच्या बातमीमुळे कोणाचे आयुष्य उद्ध्वस्त होत असेल तर ती बातमी टाळणे योग्य आहे.बेरक्या कोणाच्याही विरूध्द ऊठसुठ बातम्या देत नाही.ज्या बातम्या ख-या असतील किंवा माहिती खरी असेल तरच बातम्या प्रकाशित केल्या जातात.
बेरक्या म्हणजे मराठी मीडियातील पीटीआय किंवा गॅझेट झाला आहे.त्यामुळे बेरक्यावर येणा-या बातम्या या तंतोतंत ख-या असतील.कोणाची दुश्मनी काढण्यासाठी बेरक्या ब्लॉगचा आता वापर होणार नाही.त्यामुळे कोणाला काय चर्चा करायची ती करू द्या,परंतु बेरक्यावर येणारी बातमी सत्यच असेल.
बेरक्याला माहिती देण्यासाठी सोबत पुरावे जोडावे.कोणाच्याही विरूध्द खोट्या बातम्या पाठवू नये,इतकेच यानिमित्त सांगणे.

आपला
बेरक्या उर्फ नारद