> बेरक्याला माहिती देण्यासाठी ई - मेल करा - berkya2011@gmail.com

बुधवार, २९ जून, २०१६

मंत्रालायला इंटर्नशीपचा सहारा

मुंबई - माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे प्रसार माध्यमातील विद्यार्थ्यांना इंटर्नशिप करण्याची संधी उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

            महाराष्ट्र शासनाच्या विविध निर्णयांची, योजनांची, कार्यक्रमांची प्रसिद्धी विविध प्रसार माध्यमांद्वारे करण्याचे कार्य माहिती व जनसंपर्क महासंचालनालय करीत असते. यासाठी महासंचालनालयाच्या वृत्त शाखा, महान्यूज, प्रकाशने, प्रदर्शने, वृत्तचित्र, संशोधन, आस्थापना तसेच लेखा शाखा अशा विविध शाखा कार्यरत आहेत.
            या शाखांमध्ये इंटर्नशिप करण्याची संधी जनसंवाद, जनसंपर्क, जाहिरात, फाईन आर्टस्, दूरदर्शन कार्यक्रम निर्मिती, चित्रपट निर्मिती यातील पदवी/पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना उपलब्‍ध करुन देण्यात येत आहे. या इंटर्नशिप कार्यक्रमाचा कालावधी 3 महिने एवढा असेल. यशस्वीरित्या इंटर्नशिप पूर्ण करणाऱ्या उमेदवारांना महासंचालनालयातर्फे प्रमाणपत्रे देण्यात येतील.  या इंटर्नशिप उपक्रमासाठी विद्यावेतन लागू नाही. पुर्वानुभव असलेल्या व उच्च शैक्षणिक पात्रता धारण करणाऱ्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल. प्रवेश परीक्षा/मुलाखतीद्वारे उमेदवारांची निवड केली जाईल.
            तरी इच्छुकांनी स्वत:चे संपूर्ण नाव, जन्म दिनांक, शैक्षणिक पात्रता, पुर्वानुभव, कुठल्या शाखेत अनुभव घेण्याची इच्छा आहे, स्वत:चा पत्रव्यवहाराचा पत्ता, भ्रमणध्वनी क्रमांक (मोबाईल), पासपोर्ट छायाचित्र प्रमाणपत्रांच्या स्वयंसाक्षांकित प्रती आदी माहितीसह महासंचालक, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, तळमजला, मुख्य इमारत, मंत्रालय, मुंबई- 400 032       दूरध्वनी क्रमांक 022-22024961 व ई-मेल dlo2.dgipr@maharashtra.gov.in  या  पत्यावर दि. 5 जुलै 2016 पर्यंत अर्ज करावा.

शेवटची घटका मोजणा-या मी मराठीत गलिच्छ राजकारण

मुंबई - शेवटच्या घटका मोजत असलेल्या मी मराठी चॅनलच्या मुख्य संपादक पदाचा तुळशीदास भोईटे यांनी राजीनामा दिला असून,गाळात रूतत असतानाही मी मराठीमध्ये अत्यंत गलिच्छ राजकारण सुरू आहे.
महेश मोतेवार चिटफंड प्रकरणी गजाआड झाल्यानंतर मी मराठी लाइव्ह वृत्तपत्र बंद पडले तर मी मराठी चॅनल शेवटची घटका मोजत आहे.रवी आंबेकर यांनी मुख्य संपादकपदाचा राजीनामा दिल्यानंतर व्यवस्थापकीय संपादक असलेल्या तुळशीदास भोईटे यांना मुख्य संपादक करण्यात आले होते.त्यांनी प्रतिकूल परिस्थितीत एक न्यूज बुलेटीन आणि काही शो सुरू केले होते.
बुलेटीन चालू आणि काही दिवस बंद हा पोरखेळ गेल्या काही दिवसांपासून सुरू असताना,दिल्लीत बसलेल्या सीईओ शर्मांनी लाइव्ह इंडियाचे मुंबई ब्युरो विजय शेखर यांना मी मराठीचे हेड केले आणि भोईटे यांना विजय शेखर यांना रिपोर्ट करण्याचे निर्देश दिले.एका ज्युनिअरला सिनिअर केल्यामुळे नाराज भोईटे यांनी मुख्य संपादकपदाचा राजीनामा दिला आणि सल्लागार संपादक म्हणून राहणे पसंद केले.
नविन हेड विजय शेखर यांनी भोईटेंच्या समर्थकांना त्रास देणे सुरू केले आहे,तसेच मी मराठीत राहायचे असेल तर फुकट काम करा अन्यथा चालते व्हा असे फर्मान काढले आहे.त्यामुळे चालू असलेले एक न्यूज बुलेटीनही बंद पडले आहे.
मी मराठी शेवटची घटका मोजत असताना,मोतेवारची तीन पैकी एक बायको लिना मोतेवार यांनी मी मराठीत चालू असलेल्या गलिच्छ राजकारणाबाबत नापसंदी व्यक्त केली असली तरी शर्मांनी आपली बाजू भक्कमपणे मांडून विजय शेखरची तळी उचलल्याने मी मराठी आता डब्यात बंद होणे बाकी आहे.

गुरुवार, २३ जून, २०१६

बेरक्याचे वृत्त खरे ठरले,दिव्यमध्ये राजीनामा सत्र सुरू झाले !

 औरंगाबाद - बेरक्याचे वृत्त तंतोतंत खरे ठरले आहे.मराठवाड्यातील जालना,बीड आणि उस्मानाबाद कार्यालयातील प्रत्येकी पाच म्हणजे एकूण पंधरा जणांना राजीनामा देण्याचा आदेश देण्यात आला आहे.त्यात उपसंपादक,डीटीपी ऑपरेटर,प्रुफ रिडर आणि फोटोग्राफर आणि निष्क्रिय रिपोर्टर यांचा समावेश आहे.
औरंगाबादेत दिव्य मराठी सुरू होवून पाच वर्षे झाली,परंतु परभणी,हिंगोली,नांदेड आणि लातूर या चार जिल्ह्यात अंकच सुरू झाला नाही.उर्वरित जालना आणि बीड हे औरंगाबाद आवृत्तीशी तर उस्मानाबाद हे सोलापूर आवृत्तीशी जोडण्यात आले होते.
मजिठिया वेतन आयोगाची अंमलबजावणी करण्याचे निर्देश आणि वाढत चाललेला तोटा यामुळे भोपाळशेठनी कर्मचारी कपात करण्याचे धोरण राबवले आहे.दिव्य मराठीत कॉस्ट कटिंग होणार हे वृत्त बेरक्याने यापुर्वीच दिले होते.
त्यानुसार जालना,बीड आणि उस्मानाबाद कार्यालयातील प्रत्येकी पाच जणांना राजीनामा देण्याचे आदेश देण्यात आले आहेत.पुर्वी ब्युरोच्या मार्फत निरोप देण्यात आला होता,आता मात्र थेट संबंधितांना निरोप देण्यात आला आहे.त्यात उपसंपादक,डीपीटी ऑपरेटर,प्रुफ रिडर,फोटोग्राफर आणि निष्क्रिय रिपोर्टर यांचा समावेश आहे.
आता कोणत्याही जिल्हा कार्यालयात उपसंपादक,डीटीपी ऑपरेटर,प्रुफ रिडर,फोटोग्राफर राहणार नाही.रिपोर्टरनी आपल्या बातम्या स्वत: टायपिंग करून त्या मुख्य कार्यालयात पाठवायच्या आहेत.तेथे उपसंपादकांनी पेज तयार करायचे असा दंडक भोपाळशेठनी घातला आहे.मुख्य कार्यालयात मोजके आर्टीस्ट राहणार आहेत.हे आर्टीस्ट फक्त जाहिराती तयार करतील.फार तर उपसंपादकांनी तयार केलेल्या पानावर शेवटचा हात मारतील.उपसंपादकांनीच पेजीनेशन करायचे आहे.
या निर्णयामुळे प्रत्येक जिल्ह्याच्या ब्युरोची मक्तेदारी संपुष्टात येणार आहे.त्याचबरोबर त्यांचा रूबाब आता कमी होणार आहे.मराठवाड्यात काही ठिकाणी ब्युरो संस्थानिक बनले होते,त्यांना आता चाप बसणार आहे.
या निर्णयामुळे दिव्य मराठीच्या प्रत्येक जिल्हा कार्यालयात खळबळ उडाली आहे.भविष्यात काही जिल्हा कार्यालय बंद करण्याचा निर्णय होणार असल्याची चर्चा आहे.आता एक - एक पत्ते कोसळण्यास सुरूवात झाली आहे.
दिव्य मराठीच्या कॉस्ट कटिंगमुळे दिव्य मराठी अर्धा खाली होणार आहे.दुसरीकडे पुढारी येवू घातल्यामुळे दिव्य मराठीतून कमी झालेल्या कर्मचा-यांना संधी मिळू शकते.

'व्हाइस' मीडिया भारतात, 'टाइम्स'शी करार

मुंबई - जगभरातील सुमारे ३० देशांत दबदबा असलेल्या 'व्हाइस मीडिया' कंपनीनं विस्ताराच्या दृष्टीनं महत्त्वपूर्ण पाऊल टाकत भारतातील सर्वात मोठी मीडिया कंपनी असलेल्या 'टाइम्स' समूहाशी सहकार्य करार केला आहे. या भागीदारीमुळं 'व्हाइस'चा भारतासारख्या जगातील एका मोठ्या मीडिया मार्केटमध्ये उतरण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
'टाइम्स'शी झालेल्या भागीदारी करारानुसार, 'व्हाइस मीडिया' मुंबईत निर्मिती केंद्र सुरू करणार असून टेलिव्हिजन, मोबाइल, डिजिटल मीडिया क्षेत्रात संयुक्तपणे काम करणार आहे. त्याचबरोबर, 'व्हाइसलँड' हे पेड टीव्ही नेटवर्कही सुरू करणार आहे. या करारामुळं 'व्हाइस'ला मीडियातील विस्तारासाठी टाइम्स ब्रँडची मोठी मदत मिळणार आहे. भारतीय बाजाराची इत्यंभूत माहिती, प्रेक्षकवर्गही आपोआपच उपलब्ध होणार आहे. या कराराअंतर्गत व्हाइस मीडिया देशात ठिकठिकाणी स्टुडिओ उभारणार असून त्याद्वारे दैनंदिन घडामोडींसह लाइफस्टाइलशी संबंधित विविध कार्यक्रम २४ तास प्रसारित करणार आहे. अनुभवी पत्रकार व चित्रपट निर्मात्यांचीही त्यासाठी मदत घेतली जाणार आहे.
जगभरातील डिजिटल कंपन्यांना भारतीय बाजारात विस्तारासाठी सहकार्य करणाऱ्या 'टाइम्स ग्लोबल पार्टनर्स'साठी हा करार अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे. यापूर्वी, 'टाइम्स ग्लोबल पार्टनर्स'ने उबर, एअरबीएनबी यांच्यासह अन्य काही डिजिटल उद्योगांशी भागीदारी केली आहे.
टाइम्स समूहाशी भागीदारीबाबत बोलताना 'व्हाइस'चे संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी शेन स्मिथ म्हणाले, 'टाइम्स'शी हात मिळवताना आम्हाला प्रचंड आनंद होत आहे. 'टाइम्स'च्या सहकार्यामुळं आम्हाला भारतासारख्या मोठ्या देशात सर्वदूर पोहोचता येईलच, शिवाय येथील समृद्ध संस्कृती जगभरात नेता येईल.'
'व्हाइस'शी झालेल्या भागीदारीबद्दल टाइम्स समूहाचे व्यवस्थापकीय संचालक विनीत जैन यांनीही आनंद व्यक्त केला. 'धाडसी आणि थेट वार्तांकनाचा इतिहास असलेल्या 'व्हाइस'शी भागीदारी हा आमच्याबरोबरच भारतीयांसाठीही एक वेगळा अनुभव असेल. भारतीय प्रेक्षकांना प्रत्येक घटनेची सखोल माहिती देण्याचा तसंच, विविध घटनांच्या सामाजिक परिणामांचा सर्वंकष आढावा घेण्याचा आमचा प्रयत्न असेल. भारतातील अधिकाधिक प्रेक्षकवर्गाला आमच्यासोबत जोडून घेण्यात आम्हाला यश मिळेल असा विश्वास आहे.'

बुधवार, २२ जून, २०१६

पत्रकारांचा आवाज बंद करण्याचे प्रयत्न !

जालना  -  कधी पत्रकारांवर थेट हल्ले करून,कधी व्यवस्थापनाचे कान फुंकून,तर कधी पत्रकारांवर खोटे गुन्हे दाखल करून पत्रकारांचा आवाज बंद करण्याचा सातत्यानं प्रयत्न होत असतो.जालन्यात असाच प्रयत्न झाला आहे.जालन्यातील उपजिल्हाधिकारी एन.आर.शेळके यांनी  'काही पत्रकारांनी आपणास खंडणी मागितल्याची   पोलिसात तक्रार दिली आहे.त्यावरून एका दैनिकाच्या संपादकांसह,एका वाहिनीच्या प्रतिनिधी आणि संपादकांच्या विरोधात भादवि कलम 207,385,500,501,534 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान ही घटना 3 एप्रिलची 2016 ची आहे. या दिवशी शहरातील एका हॉटेलात 'रंगारंग पार्टी' झाली होती. त्यात काहींनी 'ठेकाही' धरला होता.त्यात काही वरिष्ठ अधिकार्‍यांचाही समावेश होता.ही बातमी जूनमध्ये पत्रकारांना समजली.त्यावरून स्थानिक दैनिक दुनियादारीमध्ये 20 जूनच्या अंकात ती प्रसिध्द झाली टीव्ही-9,महाराष्ट्र वन वरही चित्रफितीसह बातमी प्रसिध्द झाली आहे.या बातमीत कुणाचे नाव नसले तरी अधिकारी कोण होते ते समोर आले.बातमीमुळे आपण अडचणीत येऊ शकतो याची जाणीव होताच पोलिसात तक्रार दिली गेली आहे.त्यावरून गुन्हा दाखल झाला .
या संदर्भात आज जालना येथील पत्रकारांनी जिल्हा पोलिस प्रमुख श्री.माकणीकर यांची भेट घेऊन अगोदर संपूर्ण प्रकरणाची चौकशी करूनच कारवाई करावी अशी मागणी केली आहे.पोलिस प्रमुखांना दिलेल्या निवेदनात आपले बिंग फुटल्यामुळेच पत्रकारांना अद्दल घडविण्याच्या इराध्यानं खोटी तक्रार देण्यात आल्याचे म्हटले आहे.हा वृत्तपत्र स्वातंत्र्यावरील घाला असून पत्रकाराचा आवाज बंद करण्याचा हा प्रयत्न असल्याचेही निवेदनात नमुद करण्यात आले आहे.सत्य बातमी देणे हा गुन्हा नाही.जी बातमी दिली गेली ती पुराव्यासह आणि चित्रफितीच्या आधारे दिली आहे.त्यामुळे हा गुन्हा होत नाही.त्यामुळे या प्रकरणात हेतुतः गोवण्यात आलेल्या संपादक,पत्रक ारांना न्याय द्यावा अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. पोलिस प्रमुखांना भेटावयास गेलेल्या शिष्टमंडळात शहरातील सर्व दैनिकांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

मंगळवार, २१ जून, २०१६

जालन्यातील चार पत्रकाराविरुद्ध गुन्हा दाखल

जालना - एका बँकेच्या संगीत कार्यक्रमाची चित्रफीत तयार करून ती व्रूत्तपत्र, सोशल मीडिया व दूरचित्रवाणीला देवून बदनामी करून २ लाखाची खंडणी  मागितल्याप्रकरणी जालना येथील उपजिल्हाधिकाऱ्याच्या फिर्यादीवरून टीव्ही -९ मराठी वाहिनी, दैनिक दुनियादारी, दैनिक नामांतरच्या संपादकांसह ८ जणाविरुद्ध तालुका जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एप्रिल २०१६ मध्ये एका बँकेने आयोजित केलेल्या संगीत रजनीच्या कार्यक्रमात जालना येथील सामान्य प्रशासन विभागाचे उपजिल्हाधिकारी नरहरी शेळके हे नाच करतांनाचा व्हिडिओ तयार करण्यात आला होता. हा व्हिडिओ सोशल मीडिया, चॅनेल व वर्तमानपत्रात प्रसिद्ध करून तुझी नौकरी घालवितो, अशी धमकी देत शेळके यांना २ लाखाची खंडणी मागितली होती.
याप्रकरणी टीव्ही-९ मराठी चित्रवाहिनी, दैनिक दुनियादारीचा बातमीदार, दैनिक दुनियादारीचे संपादक-मालक, दैनिक नामांतरचे संपादक सुभाष भालेराव, साप्ताहिक खूतवाचे संपादक संजय इंचे यांच्यासह सुधाकर निकाळजे, दिनकर घेवंदे,  ज्ञानेश्वर नाडे या ८ जणाविरुद्ध भादंवि. २०७, ३८५, ५००, ५०१, ५३४ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, पत्रकारांवरील गुन्हे मागे घेण्याची मागणी जालना जिल्हा मराठी पत्रकार संघ आणि जालना जिल्हा मराठी पत्रकार परिषद, या दोन्ही संघटनाच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांची स्वतंत्रपणे भेट घेवुन निवेदनाद्वारे केली आहे.

रविवार, १९ जून, २०१६

मोबाईल बिलावरून रिपोर्टरची महिला कर्मचाऱ्यास शिविगाळ

सोलापूर - शहरातील सातरस्ता भागातील वोडाफोन स्टोअरमध्ये एका मराठी न्यूज चॅनलच्या रिपोर्टरने मोबाईल बिलावरून गोंधळ घालून महिला कर्मचाऱ्यास अश्लील शिवीगाळ केली.या प्रकरणी सदर बाजार पोलीस ठाण्यात या रिपोर्टरविरूध्द अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
'रहा एक पाऊल पुढे' या मराठी न्यूज चॅनलचा रिपोर्टर शनिवारी वोडाफोन स्टोअर्समध्ये गेला होता.माझे मोबाईल बिल इतके कसे काय आले म्हणून तो एका महिला कर्मचाऱ्याशी भांडण करू लागला.त्याला समजवण्याचा प्रयत्न केला असता,त्याने आपली पत्रकारिता या ठिकाणी चांगलीच पाजळली.
त्याच्या या कृत्याचा अनेकांनी निषेध केला आहे.

शुक्रवार, १७ जून, २०१६

सकाळ राजकीय पेपर आणि हिंदी न्यूज चॅनल सुरू करणार

पुणे - सकाळ मीडिया ग्रुप लवकरच दोन नविन प्रयोग करणार आहे.पहिला प्रयोग आहे,फक्त राजकीय बातम्या आणि वार्तापत्र देणारे नविन दैनिक आणि दुसरा प्रयोग आहे हिंदी न्यूज चॅनल.
कृषी विषयक बातम्या,वार्तापत्र,लेख देणारे अ‍ॅग्रोवन दैनिक संपूर्ण महाराष्ट्रात एकाच आवृत्तीने वितरीत केली जाते.त्याचपध्दतीले फक्त आणि फक्त राजकीय बातम्या,वार्तापत्र आणि स्तंभ असलेले दैनिक काढण्यात येणार आहे.या नव्या राजकीय पेपरचे नाव निश्चित नाही.परंतु कंटेन्ट काय असावेत,यावर सर्व संपादकांकडून मते मागवण्यात आली आहेत.
येत्या १ सप्टेबरपासून हे राजकीय दैनिक वाचकांच्या भेटीस येणार आहे.दुसरा प्रयोग आहे,हिंदी न्यूज चॅनल.२४ तास बातम्या देणा-या या हिंदी न्यूज चॅनलचे नाव टीव्ही ३६५ असे राहणार असून,त्याची जुळवाजुळव सुरू आहे.हे हिंदी न्यूज चॅनल मुुंबई आणि महाराष्ट्राच्या बातम्यांना सर्वाधिक प्राधान्य देणार आहे.
राजकीय विषयाच्या नव्या पेपरचे संपादक म्हणून कोणाची निवड होणार,याकडे लक्ष वेधले आहे.टीमही कोणती राहणार,याकडेही लक्ष वेधले आहे.

दिव्य मराठीत मोठ्या प्रमाणात कर्मचारी कमी होणार !

औरंगाबाद - एकीकडे मजिठिया वेतन आयोग लागू करण्याचे निर्देश तर दुसरीकडे वाढत जाणारा तोटा यामुळे दिव्य मराठी प्रशासनाने कर्मचारी कपात करण्याचा निर्णय घेतला असून,अनेक रिपोर्टर,डीटीपी ऑपरेटर,उपसंपादक कमी करण्यात येणार आहेत.त्याचा सर्वाधिक फटका मराठवाड्यातील जालना,बीड,उस्मानाबाद कार्यालयातील कर्मचा-यांना बसणार असून,या कॉस्ट कटींगमुळे कर्मचारी चांगलेच धास्तावले आहेत.
महाराष्ट्रात औरंगाबाद,नाशिक,जळगाव,सोलापूर आणि अकोला आवृत्त्या सुरू करण्यात आल्यानंतर अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्यामुळे दिव्य मराठीच्या डीबी कार्पोशनने महाराष्ट्रात यापुढे कोणताही आवृत्ती सुरू न करण्याचा निर्णय घेतला.दिव्य मराठीची सर्वात प्रथम आवृत्ती औरंगाबादमध्ये सुरू झाली.पाच वर्षे झाली तरी मराठवाड्यातील परभणी,हिंगोली,नांदेड आणि लातूर या चार जिल्ह्यात अंकच पोहचला नाही किंवा तसे प्रयत्न करण्यात आले नाहीत.महाराष्ट्रातील एकही आवृत्ती यशस्वी झाली नसून,वाढता तोटा दिव्य मराठी प्रशासनाला सहन करावा लागत आहे.
आता मजिठिया वेतन आयोग लागू करण्याचे निर्देश प्राप्त झाल्यानंतर दिव्य मराठीने कर्मचारी कपात करण्याचा निर्णय घेतला आहे.त्यानुसार आता कोणत्याही जिल्हा कार्यालयात डीटीपी ऑपरेटर राहणार नाही.प्रुफ रिडर आणि उपसंपादकही कमी करण्यात येणार आहेत.रिपोर्टरनी स्वत:ची बातमी टाईप करून मुख्य कार्यालयाकडे पाठवायची आणि मुख्य कार्यालयातील उपसंपादकांनी पाने लावून घ्यायची असा निर्णय घेण्यात आला आहे.
जालना आणि बीड कार्यालयातील रिपोर्टरनी औंरगाबाद आणि उस्मानाबादच्या रिपोर्टरनी सोलापूर कार्यालयाकडे बातम्या पाठवण्याचा आदेश देण्यात आला आहे.त्यामुळे आता या तिन्ही कार्यालयातील डीटीपी ऑपरेटर,उपसंपादक आणि पु्रफ रिडर कमी करण्यात येणार आहेत.त्यामुळे अनेकांच्या नोकरीवर गदा आलेली आहे.काही निष्क्रिय रिपोर्टर सुध्दा कमी करण्यात येणार आहेत.
त्याचबरोबर सर्वच मुख्य कार्यालयातील अनेक डिटीपी ऑपरेटर,प्रुफ रिडर,उपसंपादक कमी होणार आहेत.पाचही आवृत्ती कक्षेतील जिल्हा कार्यालयातील रिपोर्टरनी मराठवाड्याप्रमाणे आपल्या बातम्या संबंधित मुख्य कार्यालयाकडे पाठवण्याचा निर्णय होणार आहे.त्यामुळे प्रत्येक जिल्हा कार्यालयात ब्युरोची जी मक्तेदारी सुरू होती ती आता संपुष्टात येणार आहे.
पुढारी थंडच !
एकीकडे गांवकरीने जोरदार मुसंडी मारली असताना औरंगाबादेत पुढारी सुरू होणार की नाही,अशी शंका येण्याइतपत परिस्थिती निर्माण झाली आहे.निवासी संपादक म्हणून भालचंद्र पिंपळवाडकर जॉईन झाले असले तरी अजून स्टॉपच भरती करण्यात आलेला नाही.मार्च महिन्यात पुढारीत जाहिरात देवूनही अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्यामुळे दिव्य मराठीत पुढारीची जाहिरात देण्यात आली होती,परंतु मोठ्या वृत्तपत्रातील कर्मचारी पुढारीत येण्यास इच्छुक दिसत नाहीत.आता दिव्य मराठीची कॉस्ट कटिंग झाल्यानंतर मात्र पुढारीला कर्मचारी मिळतील,अशी शक्यता आहे.
पुढारी १५ ऑगस्ट रोजी सुरू करण्याचा पद्मश्रीचा घाट आहे,परंतु एकूण हालचाली थंडच आहेत.दुसरीकडे गांवकरी ८ जून रोजी सुरू झाला असून,सिटीसाठी १६ तर ग्रामीण भागासाठी १२ पानाचा अंक सुरू आहे.विविध मंत्री बोलावून डॉ.अनिल फळेंच्या अप्रतिम गप्पा चांगल्याच रंगल्या आहेत.

गुरुवार, १६ जून, २०१६

''जळगाव तरुण भारत”च्या अध्यक्षपदावरुन दिलीप चोपडा पायउतार !

“जळगाव तरुण भारत” ची नाशिक आवृत्ती सुरू करण्यासाठी “घिसाडघाई” केल्याच्या कारणामुळे “जळगाव तरुण भारत” चे व्यवस्थापन करणाऱ्या “माधव बहुउद्देशीय प्रतिष्ठान” या संस्थेच्या अध्यक्षपदावरुन दिलाप हस्तीमल चोपडा (रा. जळगाव) यांना पायउतार व्हावे लागले आहे. दिलीप चोपडा यांनी गेल्या सहा महिन्यांत “माबप्र” या विश्वस्त संस्थेच्या कार्यपद्धतीला व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शिस्तीला बाजुला सारुन एखाद्या “प्रायव्हेट लिमीटेड” सारखा कारभार सुरू केला होता. त्यामुळे त्यांना अध्यक्षपद सोडण्याविषयी हस्ते परहस्ते सूचना दिल्या जात होत्या. दबाव निर्माण करायला दिलीप चोपडा स्वतः म्हणाले, “मी राजीनामा देतो”. त्यावर “माबप्र” च्या संचालक मंडळाने “द्या” म्हणत तो स्वीकारून मंजुरही करून टाकला. दिलीप चोपडा हे जळगाव “तरुण भारत” चे संचालक संपादक सुद्धा आहेत. हे पदही त्यांनी त्यांच्या मर्जीने निर्माण केले आहे. “माबप्र” च्या संचालक मंडळाने अशा पद निर्मितीला मंजुरी दिलेली नाही.
दिलीप चोपडा हे जळगावमधील ट्रान्सपोर्ट, खत, बियाणे व्यावसायिक असून त्यांनी बांधकाम क्षेत्रातही एखाद दुसरा प्रकल्प केला आहे. गेल्या ऑगस्ट 2015 मध्ये दिलीप चोपडा यांची “माबप्र” च्या अध्यक्षपदी निवड झाली होती. सर्व संचालकांना सोबत घेवून काम करण्याची “माबप्र” ची परंपरा आहे. मात्र, दिलीप चोपडा यांनी या परंपरेला दूर सारून स्वतःची “प्रायव्हेट” म्हणता येईल अशी कार्यशैली निर्माण केली होती. त्यांनी स्वतःचे पद संपादक संचालक केले, “माबप्र” चा लोगो बदलून टाकला, विश्वस्त संस्थेच्या लेटरहेडवरून इतर संचालकांची नावे उडवून टाकली, दैनिकाच्या निवासी संपादकपदी “रिटारयर्ड व गात्र शिथील” व्यक्तीला आणून बसविले, निवासी संपादकाकडे प्रुप रिडींगचे काम दिले, दुसऱ्या दैनिकात जाहिरातींच्या हिशोबात घोळ करणाऱ्याला “पंटर” म्हणून आणले व त्याच्याकडे प्रांतिक बातम्यांचे संपादन काम दिले, शाळांच्या विद्यार्थ्यांसाठी परस्पर अंक सवलत योजना (200 रुपयात 6 महिने) टाकली मात्र, तिचा लाभ झाला नाही. असे अनेक प्रकार अवघ्या चार महिन्यात दिलीप चोपडा यांनी केले. दिलीप चोपडा आणि त्यांच्या “पंटर” कर्मचाऱ्यामुळे “जळगाव तरुण भारत” चे अनेक निष्ठावंत कर्मचारी सोडून गेले व ग्रामीण बातमीदारांनी बातम्या देण्याचे काम थांबविले.
दिलीप चोपडा यांच्या या कार्यशैली बाबत इतर संचालकांत नाराजी होती. मात्र, दिलीप चोपडा कोणाचेही ऐकून घेण्याच्या मनःस्थितीत नव्हते. संचालक संपादक म्हणून आपले नाव लेखांना छापून यावे म्हणून दिलीप चोपडा यांनी काही लेख इतरांकडून लिहून घेतले तर काही पुरवण्यांमध्ये दुसऱ्यांच्या लेखाला आपले नाव दिले. हे सारे प्रकार संघीय मंडळी व “माबप्र” चे इतर संचालक सहन करीत होते.
दिलीप चोपडा यांच्या कार्यपद्धतीने “तरुण भारत नाशिक” आवृत्ती सुरू करण्यासाठी मनमानीचा कळस गाठला, असे आता इतर लोक बोलतात. नाशिक येथे “जळगाव तरुण भारत” ची आवृत्ती सुरू करण्यासाठी “माबप्र” ची कोणताही संमती नसताना चोपडा यांनी नाशिकमध्ये माणसे शोधणे, परस्पर नियुक्तीपत्र देणे, प्रकाशनाची तारीख परस्पर जाहीर करणे, “चोपडा-धन्यकुमार जैन-ओसवाल- बागमार” असा गोतावळा जमा करणे असेही प्रकार केले. अखेर संघ परिवाराशी संबंधित इतर पदाधिकाऱ्यांना नाशिक येथे धाव घेवून खरी परिस्थिती समजून घ्यावी लागली. नाशिकच्या संघ परिवार व भाजपच्या मंडळींनी वास्तव मांडल्यामुळे दिलीप चोपडा यांनी केलेली घाई गुंडाळावी लागली. आपल्या मनमर्जीला सर्व बाजुंनी विरोध असल्याचे पाहून दिलीप चोपडा दबावासाठी राजीनाम्याचे अस्त्र घेवून समोर आले. मात्र, परिवाराला तो राजीनामा हवाच असल्याने न बोलता अनेक गोष्टी सहज साध्य झाल्या.
(“बेरक्या” ने या विषयावर सतत पाठपुरावा केला. “बेरक्या” कोणत्याही वृत्तपत्र किंवा त्याच्या व्यवस्थापनाच्या विरोधात नाही. मात्र, व्यवस्थापन म्हणून मनमानी करणाऱ्या प्रवृत्तीवर “प्रहार” करण्याचे काम “बेरक्या” करीत राहणार. या विषयाला “तूर्त” पूर्णविराम.)

सोमवार, १३ जून, २०१६

बेरक्यामुळे जळगाव तरुण भारतला नाशिकमध्ये लागला ब्रेक ...

तीर्थस्थळ नाशिकमध्ये येवू घातलेल्या जळगाव तरुण भारतच्या नाशिक आवृत्तीला ब्रेक लागला आहे. काल नाशिक येथे जळगाव तरुण भारतचे काही पदाधिकारी व नाशिकमधील संघ, भाजपचे पदाधिकारी यांची महत्त्वपूर्ण बैठक झाली. तीत सध्या नाशिक येथे येणाऱ्या मुंबई तरुण भारतचा अंक, त्याची स्थिती आणि अर्थकारण तसेच जळगाव तरुण भारतची संभाव्य नाशिक आवृत्ती, अंक वाढ व खर्च यावर गंभीरपणे चर्चा झाली. पहिल्या टप्प्यात किमान ५ हजार वर्गणीदार व्हावेत अशी अपेक्षा जळगावहून आलेल्या पदाधिका-यांनी व्यक्त केली. मात्र, अशा प्रकारे नोंदणीला वेळ हवा, इतर सोबत हवेत असा मुद्दा नाशिककरांनी मांडला. त्यामुळे सध्या आहे तिच स्थिती कायम ठेवून मुंबई तरुण भारतच कायम सुरु ठेवायचे ठरले.
जळगाव तरुण भारतच्या चोपडा, जैन व नाशिकमधील स्थानिक सल्लागार ओसवाल या त्रिकुटाने नाशिक तरुण भारतसाठी कर्मचारी भरतीची जाहिरात लोकमतला दिली होती. हे त्रिकुट करीत असलेली घाई जळगाव व नाशिकच्या संघ परिवाराच्या लक्षात आली आहे. चोपडा, जैन व ओसवाल त्रिकुटाने ५ जुलै या कालिदासदिनाचा मुहुर्तही नाशिक तरुण भारत प्रकाशनासाठी निश्चित केला होता. त्या अगोदर ५ जून ही सुध्दा तारीख चर्चेत होती. शिवाय, चोपडा हे स्वतःच संपादक म्हणून डिक्लरेशन देण्याच्या तयारीत होते. मात्र, जळगावहून आलेले अमळकर, कुरंभट्टी व रत्नाकर पाटील आदींनी स्थानिक लोकांशी बोलून अखेरीस नाशिक तरुण भारत प्रकल्प गुंडाळला.
जळगाव तरुण भारत अद्याप धुळे व नंदुरबार जिल्हा आवृत्ती सुरु करु शकलेले नसताना नाशिकमध्ये खर्च वाढवून कशासाठी नाशिक आवृत्तीचा घोळ घालत आहे असे नाशिक परिवाराचे म्हणणे आहे. मिळालेल्या माहितीनुसार जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक असा ४ जिल्ह्यांचा खप दाखवून नागपूर असोशिएटच्या नफ्यात टक्केवारी वाढवायचा हा प्रयत्न असल्याचे समजते.
बेरक्याने या प्रकरणी वास्तव वृत्त देवून नाशिकच्या पत्रकार व इतरांना सावध केल्याबद्दल समाधान व्यक्त होत आहे. मुंबई व नाशिकचे थेट नाते असल्यामुळे मुंबईचाच तरुण भारत नाशिकला हवा असे परिवाराचे म्हणणे आहे.
(चोपडा, जैन व ओसवाल यांनी कर्मचारी वेतन तक्ता कसा ठरविला होता याची माहिती लवकरच)

शनिवार, ११ जून, २०१६

रंगीत छपाईत ‘सकाळ' शिखरावर

पुणे - सकाळ वृत्तपत्र समूहाच्या ‘सकाळ’ या मराठी दैनिकाला रंगीत छपाईसाठीचा आंतरराष्ट्रीय पातळीवरील ‘वॅन इफ्रा पुरस्कार’ जाहीर झाला आहे. रंगीत छपाईतील गुणवत्तेसाठी जगातील पहिल्या ५० दर्जेदार वृत्तपत्रांमध्ये ‘सकाळ’चा समावेश झाला आहे. या पुरस्कारामुळे ‘सकाळ’चा समावेश ‘इंटरनॅशनल न्यूज पेपर कलर क्वाॅलिटी क्‍लब २०१६-१८’मध्ये झाला आहे.

जागतिक पातळीवर गुणवत्तेचे निर्धारण करण्यासाठी वृत्तपत्रांना सल्ला व सेवा देण्यासाठी ‘वॅन इफ्रा’ संस्थेची १९६१मध्ये स्थापना करण्यात आली. यावर्षी जानेवारी ते मार्चदरम्यान घेतलेल्या या स्पर्धेत ‘सकाळ’ने रंगीत छपाईतील गुणवत्तेसाठी हा मानाचा पुरस्कार पटकावला असून, उत्कृष्ट छपाई करणाऱ्या आंतरराष्ट्रीय वृत्तपत्रांमध्ये ‘सकाळ’चीही वर्णी लागली आहे. पुरस्काराचे वितरण २१ सप्टेंबर रोजी कोलकाता येथे होणाऱ्या ‘वॅन-इफ्रा परिषदे’त होणार आहे.
‘सकाळ’ने हा पुरस्कार दुसऱ्यांदा मिळवला आहे. या आधी २००८ मध्ये ‘सकाळ’ला हा पुरस्कार मिळाला होता. दर दोन वर्षांनी ही स्पर्धा होते.
मुद्रित माध्यमांच्या छपाईच्या गुणवत्तेचे मूल्यांकन करण्यासाठी १९९४ पासून ‘इफ्रा’च्या ‘इंटरनॅशनल न्यूजपेपर कलर क्वालिटी क्‍लब’च्या माध्यमातून जागतिक स्तरावर स्पर्धा घेण्यात येते. या पुरस्कारामुळे आता ‘सकाळ समूहा’ला क्‍लबचे दोन वर्षांचे सदस्यत्व मिळाले असून, जागतिक स्तरावर इतर वृत्तपत्रांशी स्पर्धा करण्याची संधी या निमित्ताने ‘सकाळ’ला मिळाली आहे. गुणवत्तावाढ आणि फेरमुद्रणाची गुणवत्ता वाढविणे हे कलर क्‍लबचे उद्देश आहेत. या क्‍लबचे सदस्यत्व हे एका अर्थाने वृत्तपत्रांच्या गुणवत्तेवर जागतिक स्तरावर शिक्कामोर्तबच ठरते.

या वर्षी २०१६ ते २०१८ या कालावधीसाठी घेण्यात आलेल्या स्पर्धेत जगातील १३० मुद्रित नियतकालिकांनी सहभाग नोंदविला होता. स्पर्धेसाठी ‘सकाळ’ने जानेवारी ते मार्चदरम्यानचे अंक सादर केले होते. सहभागी वृत्तपत्रांनी पाठविलेल्या अंकांची तज्ज्ञांच्या समितीमार्फत बारकाईने तपासणी होऊन जागतिक स्तरावर विजेते जाहीर केले जातात. अंकात छापल्या जाणाऱ्या संपादकीय मजकुरापासून ते डिजिटल स्वरूपातील जाहिरातीपर्यंत सर्वांचे विशिष्ट पद्धतीने मानांकन केले जाते.

‘वॅन इफ्रा’चा जागतिक पातळीवरील पुरस्कार जाहीर
अशी झाली निवड

 जानेवारी ते मार्च या कालावधीतील अंकांची तपासणी
छपाई पद्धती, छपाईचा दर्जा, रंगांचा समन्वय, छायाचित्र आणि आलेखांचा दर्जा आदी गोष्टींची पाहणी करण्यात आली
आंतरराष्ट्रीय ज्युरींकडून अंकातील इतर घटकांचीही तपासणी
 जगातील १३० वर्तमानपत्रांचा सहभाग, त्यातून पहिल्या ५०मध्ये स्थान

शुक्रवार, ३ जून, २०१६

नाशिकमध्ये येणार 3 तरुण भारत !!!

नाशिकमधील संघ परिवार, भारतीय जनता पार्टीचे वाचक फारच नशिबवान ठरणार आहेत. संघ आणि त्यांचा राष्ट्रीय विचाराचा गवगवा करण्यासाठी संघाचे मुखपत्र मानलेल्या "तरुण भारत" च्या 3 आवृत्ती नाशिककरांना मिळणार आहे. सध्या मुंबईतील करंबळेकर यांच्या "मुंबई" तरुण भारतचा नाशिक तरुण भारत नाशिकमध्ये येतोय. हा अंक शहरात रुजला असून नाशिककरांचे मुंबईशी व्यावहारिक व भावनिक नाते आहे.
दुसरीकडे जळगावच्या माधव प्रतिष्ठानच्या "जळगाव" तरुण भारतने नाशिक तरुण भारत सुरु करायला चाचपणी केली आहे. याच्याशी संबंधित चोपडा व जैन नाशिकला येवून गेले. त्यांनी मुंबई तरुण भारतच्या ओसवालांना हाताशी धरून माणसे गोळा करणे सुरु केले आहे. जळगाव तरुण भारत धुळे व नंदुरबार येथे आजही कार्यालय करु शकलेले नाही. मात्र, चोपडा, जैन व ओसवाल यांची नाशिक तरुण भारतची घाई नाशिककरांना बुचकाळ्यात टाकणारी आहे.
तिसरा तरुण भारत हा "बेळगाव" तरुण भारतचे सर्वेसर्वा किरण ठाकूर यांचा येत असल्याची चर्चा आहे. ठाकूर यांनी चाचपणी सुरु केली असून त्यांच्या तरुण भारतचे वर्चस्व कोल्हापूर परिसरात आहे. ठाकूर यांच्या तरुण भारतचा गृप आणि नागपूरचे तरुण भारत असोशिएट स्वतंत्र आहे. मात्र, व्यायसायिकदृष्ट्या ठाकूर हे आक्रमक मानले जातात. तंत्र व यंत्राबाबत बेळगाव तरुण भारत सशक्त आहे.

कर्मचाऱ्यांना होणार लाभ
नाशिकमध्ये तरुण भारतच्या या तिहेरी लढाईत पत्रकार, अॉपरेटर, जाहिरात व वितरण प्रतिनिधिंना भरघोस वेतनाचा लाभ घेता येईल. किंबहुना तो तसा घ्यावा. नाहीतर शिपाई व अॉपरेटरपेक्षा वार्ताहर व उपसंपादकाला कमी वेतन देण्याचे प्रकार आता काही व्यवस्थापन करीत आहेत. तरुण भारत मध्ये नोकरीला जाताना एक विचार प्रत्येकाला करावा लागेल. हा पेपर किती दिवस चालणार ? केवळ हजार, बाराशे अंकाचा हिशोब करून कार्यालयाचे गणित मांडणारी व्यवस्थापन मंडळी कधीही आवृत्ती गुंडाळू शकते हे संभाव्य सत्य नोकरी करण्यापूर्वी समजून घ्यावे लागेल. तरुण भारत असोशिएटमध्ये औरंगाबाद, सोलापूर, मुंबई यांचे आपापसात वाद विवादाचे विषय आहे. अंकाचा खप नसतानाही ही मंडळी नफ्याच्याच भागिदारीमुळे गळ्यात गळा घालून आहे.

बुधवार, १ जून, २०१६

महाराष्ट्र 1 मध्ये गळती सुरू,चॅनल डबघाईकडे...

मुंबई - मोठा गाजावाजा करत सुरु झालेल्या महाराष्ट्र 1 मध्ये गळती सुरु झालीय. जग बदलायला निघालेल्या चॅनलमधून राजीनामा सत्राला सुरवात झालीय. अंतर्गत राजकारणाला कंटाळून 'कलमनामा'ने राजीनामा दिला, पाठोपाठ एका अँकरने आऊटपूटची अतिरीक्त जबाबदारी दिल्याने बगळ्याच्या तोंडावर राजीनामा फेकला.त्यापाठोपाठ तुटपुंज्या रोजंदारीवर काम करणारी गुड मॉर्निंग महाराष्ट्र म्हणणारी लेडी अँकर सोडून गेली. पाठोपाठ गुड आफ्टरनून म्हणणाऱ्या अँकरनेही जय महाराष्ट्र केला. नुकतंच अल्प पगारी ट्रेनीच्या शिष्टमंडळाने पेंमट वाढवण्याचं गाऱ्हाणं मैनेजमेंटकडे मांडलं. महिनाभरात पगार वाढवला नाही तर शेवटचा बाय असेल म्हणून धमकावलंय.
चॅनल सुरु होताच सहा महिन्यात पगारवाढ देऊ असं आश्वासन मैनेजमेंटनं दिलं होतं. जॉईन होऊन ९ महिने उलटली, तरीही मैनेजमेंटनं पगारवाढ दिलेली नाही. आम्हाला पगारवाढ द्या नसता आम्ही जॉब सोडू असं एका गटाने सांगितलं आहे. व्हिडिओ जर्नालिस्ट, व्हिडिओ एडिटर संयुक्त राजीनामा देण्याच्या तयारीत आहे. एक एडिटर आणि व्हिडिओ जर्नालिस्टने राजीनामे दिलेत.  जॉईन करुन घेताना चेहरे आणि वशिला बघून पगार दिला होता.चॅनलमध्ये बगळ्याने सिनीयरच्या नावाने कचरा भरला आहे. लायकी नसतानाही केवळ जूना चेहरा म्हणून भरमसाठ पगार दिलाय. एका सिनीयरच्या पगारात ४-५ जण राबवले जात असल्याचं बेरक्याच्या सुत्राने सांगितलंय..
पगारवाढ तर नाही उलट दुपटीने काम करुन घेतलं जात असल्याचा आरोप कर्मचारी करत आहेत..अनेक स्ट्रिंजरने बातम्या पाठवणे बंद केले आहे. तर ऑफीसमधले तब्येत खराब असल्याची कारणे देत अनेकजण सुट्टीवर जात आहेत.. बरेच जुनियर चॅनल सोडून पहिल्या जॉबकडे जाण्याच्या तयारीत असल्याचं खात्रीलायक वृत्त बेरक्याकडे आहे. त्यामुळे बगळ्याने लवकर पगारवाढ द्यावी नसता, चॅनलचे दिवस फिरायला वेळ लागणार नाही. सर्व प्रकाराने बगळा मैनेजमेंटवर पुरता वैतागला आहे.
पुण्यातल्या ब्युरोमध्ये महिलामाज असल्याने धुसफुस सुरु आहे. ब्युरो म्हणून मिरवणारी चीप रिपोर्टर पदाचा माज दाखवत आहे.. पुण्यात बिल कमी दिल्याने एक स्ट्रिंजर सोडून गेला. त्याजागी चीप रिपोर्टरने एका नवख्याला पगारावर घेतलं, २ आठवडे फुकट राबवून त्याला डच्चू दिला. मुंबईतही सिनीयर चीप रिपोर्टर नुसत्या बाता मारतात. तर जुनियर रिपोर्टरला घालून-पाडून बोललं जात आहे. फेव्हरिझममुळे रिपोर्टरची असाईनमेंटशी अनेकदा खडाजंगी झाली. बातम्या दाबल्याच्या कारणाने रिपोर्टरने अनेकदा शिफ्टहेडला न्यूजरुममध्ये झापलंय. चिंदी रिपोर्टरच्या पेड बातम्या अनेकदा लावल्या जातात असंही बेरक्याला सुत्राने सांगितलं आहे..बगळ्याच्या महाराष्ट्र 1 चॅनलला फेव्हरिझमने ग्रासलं आहे.बगळ्याचं फेव्हरिझमचे राजकारण गेटकिपरपर्यंत पोहचलं आहे,त्यामुळे जग बदलणारे चॅनल डबघाईल येणार असल्याचं सुत्रांची माहिती आहे..

'पुढारी'पेक्षा 'गांवकरी' भारी !

औरंगाबाद - कोल्हापूरच्या पद्मश्रीचा पुढारी औरंगाबादेत सुरू होणार म्हणून गेल्या दहा वर्षापासून चर्चा सुरू आहे.दोन वेळा प्रयोग फसल्यानंतर तिस-यांदा पुढारीची नव्याने जुळवाजुळव सुरू आहे.२५ मार्च रोजी पुढारीमध्ये संपादकीय विभाग भरतीकरिता जाहिरात प्रकाशित झाल्यानंतर पुढारी जून महिन्यात सुरू होणार,अशी चर्चा होती.परंतु योग्य आणि लायक माणसे पुढारीला न मिळाल्यामुळे जुनीच जाहिरात आज दि.१ जून रोजी दैनिक दिव्य मराठीमध्ये नव्याने प्रकाशित करण्यात आलेली आहे.दिव्य मराठीच्या जाहिरातीनंतर तरी पुढारीला माणसे भेटणार का ? या प्रश्नाचे उत्तर अनुत्तरीय आहे.पुढारी १७ सप्टेबर म्हणजे मराठवाडा मुक्ती दिनादिवशी सुरू होणार असल्याची चर्चा आता नव्याने सुरू आहे.पुढारी औरंगाबादेत खरच सुरू होणार का ? या प्रश्नाचे उत्तर आता प्रत्यक्ष ब्रम्हदेवच देवू शकतो.
दुसरीकडे पुढारीपेक्षा गांवकरी भारी ठरला आहे.पोतनीसाचा गांवकरी आता आदर्श - अप्रतिम - गांवकरी  झाला आहे.त्यात आदर्शचे अंबादास मानकापे - पाटील,अप्रतिमचे डॉ.अनिल फळे आणि गांवकरीचे वंदन पोतनीस यांची भागिदारी राहणार आहे.गांवकरी आता नव्या रंगात आणि नव्या ढंगात येत्या ८ जूनपासून सुरू होणार आहे.डॉ.अनिल फळे यांच्यामुळे गांवकरीला अप्रतिम टीम मिळाली आहे.केवळ फळे यांच्यावर निष्ठा ठेवून त्यांचे अनेक जुने सहकारी गांवकरीमध्ये जॉईन झाले आहेत.फळे यांना टीम मिळू शकते,परंतु पुढारीच्या पद्मश्रींना टीम मिळू शकत नाही,हे कश्याचे द्योतक आहे.पद्मश्रीवरील विश्वास संपल्यामुळे की युनिट हेड कल्याण पांडे आणि चिफ रिपोर्टर अभय निकाळजे यांच्यावर असलेली नाराजी,यामुळे पुढारीला टीम मिळत नाही,याचे उत्तर शोधावे लागेल.
कल्याण पांडेंनी संपादकीय विभागात ढवळाढवळ करून,अनेक ठिकाणी पेशवाई सुरू केली आहे.काही दिवसांपुर्वी कल्याण पांडे आणि परभणीचा जिल्हा प्रतिनिधी दिलीप माने यांच्यातील व्हॉटस् गु्रपवर खंडाजंगी झाली.त्याची थेट तक्रार पद्मश्रीपर्यंत गेली आहे.पांडेची पेशवाई सुरू राहिल्यास पुढारीचे अधिकच 'कल्याण' होणार आहे.


दैनिक गांवकरी
नव्या रंगात,नव्या ढंगात !
औरंगाबाद - गेल्या चार वर्षापासून मराठवाड्यात दुष्काळाची मालिका सुरू आहे.यंदा तर अभूतपुर्व दुष्काळ पडला होता. या दुष्काळाला धैर्याने तोंड देणा-या बळीराजाला सलाम !
यंदा भरपूर पाऊस पडेल,असा अंदाज व्यक्त केला जातोय.मृग नक्षत्र ७ जून रोजी निघत आहे आणि याच दिवशी दैनिक गांवकरी हा नव्या रंगात आणि नव्या ढंगात सुरू होत आहे.
 पाचशे रूपयात सहा महिने अंक ही स्कीम सुरू करण्यात आली आहे.पाचशे रूपयात दोनशे रूपयाची एक छत्री गिफ्ट मिळणार असून,तीनशे रूपयाची जाहिरात फ्रि मिळणार आहे.हा स्कीममुळे औरंगाबाद शहर आणि जिल्ह्यात जवळपास ५० हजार वर्गणीदार झाले आहेत.संपुर्ण मराठवाड्यात ५० हजार अंकाची बुकींग झाली आहे.त्यामुळे रिलॉचिंगमध्ये दैनिक गांवकरीने १ लाखाचा टप्पा गाठला आहे.सिटीचा अंक १६ तर ग्रामीण भागात १२ पानी अंक राहणार आहे.अंकाची रोजची किंमत ३ रूपये राहणार आहे.
औरंगाबादच्या प्रिंटींग युनिटचे अत्याधुनिकरण करण्यात आले आहे.त्याचबरोबर प्रिंटीगचा कागद फॉरेन न्यूजपेपर राहणार आहे.आकर्षक लेआऊट,आकर्षक प्रिंटीग तसेच आगळ्या- वेगळ्या बातम्यामुळे दैनिक गांवकरी मानाचे स्थान पटकावेल,असा अंदाज आहे.
औरंगाबाबादेत दि.५ जून रोजी प्रचंड जलदिंडीचे आयोजनक करण्यात आले आहे.या जलदिंडीत मराठवाड्यातून अनेकजण सहभागी होणार आहे.दैनिक गांवकरीच्या रिलॉचिंगला आमच्या शुभेच्छा !

फेसबुक वर शेअर करा

Facebook