> बेरक्याला माहिती देण्यासाठी ई - मेल करा - berkya2011@gmail.com

शुक्रवार, २४ फेब्रुवारी, २०१७

काळाची गरज ओळखून औरंगाबाद न्यूज 24x7 ची सुरुवात : प्रा. प्रतिभाताई अहिरे

औरंगाबाद - संगणक क्रांतीमुळे जग जवळ आले, पण शेजारी काय घडते हे आपल्याला माहीत नसते. देश-विदेश, राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी टीव्ही, वेबसाईट्समुळे सर्वांना कळतात, पण आपल्या शहरातल्या मोठ्या घटना सोडल्यानंतर बाकी गोष्टी दुसर्‍या दिवशी वृत्तपत्रातच कळतात. त्यामुळे स्थानिकची अशी न्यूज वेबसाईट ही औरंगाबादकरांसाठी काळाची गरज होती. ती ओळखून औरंगाबाद न्यूज 24x7 सुरू झाली, ही निश्‍चितच कौतुकाची बाब आहे, अशा शब्दांत ज्येष्ठ कवयित्री, सामाजिक कार्यकर्त्या व डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठातील ताराबाई शिंदे अभ्यास केंद्राच्या संचालिका प्रा. प्रतिभाताई अहिरे यांनी या नव्या उपक्रमाचे स्वागत करत शुभेच्छा दिल्या.
प्रतिभाताईंच्या हस्ते www.aurangabadnews24x7.com वेबसाईट आणि अ‍ॅपचे लोकार्पण करण्यात आले. शुक्रवारी, दि. 24 फेबु्रवारीला सकाळी महाशिवरात्रीचे निमित्त साधून हा सोहळा सिडको एन 4 स्थित औरंगाबाद न्यूजच्या कार्यालयात झाला. प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ पत्रकार श्री. भालचंद्र पिंपळवाडकर, उद्योजक लक्ष्मीरमण वाडकर उपस्थित होते. विश्‍वबातमीचे व्यवस्थापक श्याम ढगे, औरंगाबाद न्यूजचे स्थानिक प्रतिनिधी अमोल देवकर यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. या वेळी प्रतिभाताई म्हणाल्या, की डिजीटल इंडियाच्या प्रवाहात सामील होऊन औरंगाबाद न्यूजच्या टीमने स्वागतार्ह पाऊल उचलले आहे. औरंगाबाद न्यूजमुळे ताज्या बातम्या लगेचच मिळत असल्याने दुसर्‍या दिवशी वाट पाहण्याची गरज राहणार नाही. भविष्यात सर्वच गोष्टी ऑनलाइन शक्य होणार आहेत, औरंगाबाद न्यूजने योग्य वेळ साधली असे म्हणावे लागेल, असे त्या म्हणाल्या. भालचंद्र पिंपळवाडकर यांनीही वेबसाईटला शुभेच्छा देताना, औरंगाबादकरांचा या वेबसाईटला चांगला प्रतिसाद मिळेल, असे सांगितले. लक्ष्मीरमण वाडकर यांनीही सर्वोतोपरी औरंगाबाद न्यूजला सहकार्य करण्याचे आश्‍वासन देत ही वेबसाईट औरंगाबादकरांच्या कौतुकास पात्र ठरेल, असा आशावाद व्यक्त केला. औरंगाबाद न्यूज 24x7 ही वेबसाईट डेस्कटॉप आणि स्मार्टफोन या दोन्हींसाठी उपलब्ध असून, स्मार्टफोनवर गुगल प्ले स्टोअरमध्ये अ‍ॅपही उपलब्ध असेल. सर्व प्रकारच्या स्थानिक ताज्या बातम्या काही मिनिटांत वेबसाईटवर वाचायला मिळतील. औरंगाबाद न्यूजच्या व्टिटर, फेसबुक अकाऊंट आणि पेजला सध्या नेटिझन्सचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे या वेळी देवकर यांनी सांगितले. कार्यक्रमाला विश्‍वबातमी आणि औरंगाबाद न्यूज परिवारातील सर्व सदस्य आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शुक्रवार, १० फेब्रुवारी, २०१७

जय महाराष्ट्र कर्मचाऱ्यांना अच्छे दिन कधी येणार ?


मुंबई - जय महाराष्ट्र  चॅनेलच्या  मालकांचे  शेंडीफळ सुहान शेट्टी आता रोज चॅनेलमध्ये येऊन बसू लागलेय्..प्रत्येक डीपार्टमेंटसोबत मिटींग्स  सुरू झाल्यात. खरे-जोशी-भागवत यांनी व्हेंटिलेटरवर असलेल्या चॅनलला नवी दिशा मिळवून दिली. घोटाळे बाहेर काढून राजकीय वर्तुळात चॅनलची चांगलीच हवा आहे. पण जंगल मे मोर नाचा किसने देखा , अशी गत  झाली आहे.
चॅनलमध्ये दिवस सुरू होतो तोच ,ही बातमी लवकर पुढच्या बुलेटीनला ब्रेक करा, मोठी करा, बातमी चांगली खेळा, अशी जबरदस्ती केली जाते. दर तासाला प्रत्येक बातमी ब्रेकींग करता करता आधीच मेताकुटीस आलेल्या  कर्मचाऱ्यांची चांगलीच दमछाक होते. काही मर्जीतले खिलाडी सोडले तर न्यूजरूममध्ये काम करणाऱ्या प्रत्येकाच्या डोक्यावर ब्रेकींग न्यूजची तलवार असते...लेट का झाला २ लाईनमध्ये तरी उतरवा बातमी...असा सगळा माहौल असतो.
AC बंद होता म्हणून गरमीनं होरपळलेला स्टाफ दर महिन्यात उशिरा होणाऱ्या पगारामुळे त्रस्त झाला आहे .. वरिष्ठांच्या अपेक्षा तर एवढ्या पण जरा कुठे वर खाली झालं तर न्यूजरूममध्ये सगळयांसमोर पाणउतारा केला जातो. तुटपुंज्या पगारावर काम  करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पगारवाढ कधी होणार, याकडे लक्ष वेधले आहे.

मालक मालामाल,पत्रकार नाहक बदनाम !

पेड न्यूजचा धंदा किती जोरात सुरू आहे याची चिरफाड करणारी बातमी आजच्या लोकसत्ताच्या नागपूर आवृत्तीत विस्तारानं प्रसिध्द झाली आहे.बहुतेक मोठया पत्रांच्या मालकांनी निवडणूक पर्वणी समजून हा धंदा राजरोस सुरू केला आहे.त्यासाठी वार्ताहर आणि पत्रकारांना कामाला लावले आहे.पेड न्यूजचा एक पैसा देखील पत्रकारांना मिळत नसताना बदनामी मात्र पत्रकारांची होते आहे.मालक मालामाल आणि पत्रकार बदनाम असा हा धंदा आहे काय....
 लोकसत्ताची बातमी जशीच्या तशी प्रसिद्ध करीत आहोत ....

पेड न्यूज पॅकेज :
दोन लाखांत एक जाहिरात, दहा बातम्या
विविध दैनिकांच्या वृत्तविक्रीच्या योजना जोरात
नागपूर -
माध्यमांची विश्वासार्हता गहाण टाकतानाच लोकशाहीतील समान संधीच्या तत्त्वालाही तिलांजली देणाऱ्या ‘पेड न्यूज’ नामक वाळवीने अनेक वृत्तपत्रांना ग्रासले असल्याचे भीषण चित्र याही निवडणुकीत राज्याच्या सर्वच विभागांत दिसत आहे. काही आघाडीच्या वृत्तपत्रांनी उमेदवारांसाठी विकाऊवार्तेची खास पॅकेजेस तयार केली असून, आपणच माध्यम क्षेत्रातील मानबिंदू आहोत, असा टेंभा मिरविणाऱ्या एका वृत्तपत्राने तर यातही आघाडी घेतली आहे. लोकांचे मत आपल्याकडेच आहे, असे भासवून या वृत्तपत्राने सर्वाधिक दोन, तीन आणि पाच लाख रुपयांची पॅकेजेस निवडणुकीच्या बाजारात आणली आहेत.
काही वर्षांपूर्वी एक-दोन वर्तमानपत्रांतूनच हा भ्रष्ट प्रकार चालत असे. आता मात्र प्रत्येक निवडणूक ही आपली तुंबडी भरण्याची पर्वणी अशीच बहुतांश वर्तमानपत्रांच्या व्यवस्थापनाची वर्तणूक दिसते. अर्थात याला काही अपवाद आहेतच. एकदा निवडणूक घोषणा झाली की अनेक वर्तमानपत्रे वेगवेगळी पॅकेजेस तयार करून उमेदवारांच्या दारात उभी राहतात. नागपूर महापालिका निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली तशी पॅकेजेसही तयार झाली, पण उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशीपर्यंत ती बाहेर आली नव्हती. बुधवारी निवडणूक चिन्हांचे वाटप होताच अनेक वर्तमानपत्रांचे विपणन प्रतिनिधी उमेदवारांच्या दारात दिसत आहेत. हीच परिस्थिती अन्य शहरांतही आहे. व्यवस्थापनाकडूनच ‘पेड न्यूज’ घेण्याचे आदेश येत असल्याने त्या-त्या वृत्तपत्रांतील पत्रकारांनाही नाइलाजाने त्यापुढे झुकावे लागत असल्याचे सांगण्यात येते.
पेड न्यूज व्यवहाराशी संबंधित असलेल्या विविध सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आपणांसच लोकांचे मत समजते, असा समज असलेल्या एका वृत्तपत्राने कोळशाने काळे झालेल्या हातांनी बातमीच विक्रीस काढली आहे. या वृत्तपत्राच्या शहर आवृत्तीत दोन लाख रुपयात नागपूर शहराच्या पानावर ८x१२ सें.मी. आकाराची एक जाहिरात प्रसिद्ध केली जाते. मात्र हे एका जाहिरातीवर दहा बातम्या असे पॅकेज आहे. त्यात या एका जाहिरातीसोबतच २x१० सें.मी. आकाराच्या दहा बातम्या प्रकाशित केल्या जाणार आहेत. तीन लाख रुपयाच्या पॅकेजमध्ये १२x१५ सें.मी. आकाराची एक जाहिरात आणि १०x१२ सें.मी. आकाराच्या १२ बातम्या, तर पाच लाख रुपयाच्या पॅकेजमध्ये १२x१५ सें.मी. आकाराची एक जाहिरात आणि उमेदवाराच्या दोन मुलाखती, तसेच १२x१५ सें.मी.आकारच्या १५ बातम्या प्रकाशित केल्या जाणार आहेत. नागपूर महापालिकेत चार सदस्यांचा एक प्रभाग असून त्याचाही लाभ या वर्तमानपत्राने घेतला आहे. प्रभागातील चारही उमेदवारांनी एकत्रित पॅकेज घेतल्यास त्यांना सवलत देण्यात येत आहे. याशिवाय, बातमीदारांसाठीही खास पॅकेज आहे. त्यांनी ग्राहक शोधल्यास १५ टक्के अडत (कमिशन) देण्याचे आमिष दाखविण्यात आले आहे. यातील आणखी एक भ्रष्ट बाब म्हणजे, पॅकेज न घेणाऱ्या उमेदवाराचे नाव मतदान होईपर्यंत कोणत्याही बातम्यांमध्ये येता कामा नये, अशी तंबी संपादकीय विभागाला देण्यात आली आहे.
असाच प्रकार स्वत:ला देशातील अत्यंत विश्वसनीय वृत्तपत्र म्हणवून घेणाऱ्या एका दैनिकाने केला आहे. विकाऊवार्ता पॅकेजमध्ये त्यांचा क्रमांक दुसरा लागतो. त्यांनी दोन लाख रुपयांचे पॅकेज दिले आहे. यात १०x२ सें.मी.च्या सात बातम्या, तसेच उमेदवार म्हणेल त्या दिवशी तेवढय़ाच आकाराची जाहिरात छापण्यात येणार आहे. शिवाय, ज्या उमेदवाराला पॅकेज देणे जमत नसेल त्यांना २७ हजार रुपयांत १०x२ सें.मी. या आकाराची एक बातमी प्रकाशित करवून घेता येईल. नव्या भारताचा आरसा म्हणविणाऱ्या एका दैनिकाने १.७५ लाख रुपयांचे पॅकेज दिले आहे, तर लोकशाही स्वरूपाच्या बातम्या देण्याचा दावा करणारे दैनिकही यात मागे नाही. युवा भारतासाठी संघशक्तीने काम करीत असलेले दैनिकही कर्मफळाची इच्छा करू नये, असे म्हणता म्हणता या पेडन्यूजच्या बाजारात आकर्षक पॅकेज घेऊन उतरल्याचे सांगण्यात येत असून, मतदानाच्या दिवसापर्यंत दररोज ३x१० सें.मी.आकारच्या बातम्या, याशिवाय विशेष बातमीपत्र असे ते पॅकेज आहे.
रोज सकाळी सकाळी वाचकांदारी येणाऱ्या एका दैनिकाच्या पॅकेजचे स्वरूप एक लाख रुपयांत ३x१० सें.मी. आकाराच्या नऊ बातम्या आणि दोन लाख रुपयांत ३x१० से.मी. आकाराच्या १५ बातम्या असे असल्याचे समजते. तर बातम्या हे पुण्यकर्म आहे, असे भासवीत एका दैनिकाने २x१० से.मी. आकाराची जाहिरात शहर आवृत्तीच्या पहिल्या पानावर किंवा ‘मास्टहेड’च्या खाली दीड ते दोन से.मी.ची जाहिरात, तसेच पान दोन किंवा तीनवर प्रचाराची बातमी मतदानाच्या दिवसांपर्यंत प्रकाशित केली जाईल, असा विश्वासार्हतेचा बाजार भरविला आहे.
या पॅकेजमध्ये देण्यात येणाऱ्या बातम्या वाचकांच्या आणि खासकरून निवडणूक आयोगाच्या डोळ्यांवर येऊ नयेत याची खास खबरदारी यंदा घेण्यात येत असल्याचेही दिसते. तरीही काही वृत्तपत्रांतून एकाच पानावर अगदी आजूबाजूला प्रतिस्पर्धी उमेदवारांना प्रचंड प्रतिसाद अशा स्वरूपाच्या प्रचारकी थाटाच्या बातम्या आता वाचकांच्या माथी मारल्या जात आहेत.
भूमिका वृत्तपत्रांची..
या भ्रष्ट प्रकाराबद्दल नागपूरमधील विविध वृत्तपत्रांची अधिकृत भूमिका जाणून घेण्यासाठी ‘लोकसत्ता’ने त्यांच्या व्यवस्थापनाशी वा संपादकांशी संपर्क साधला असता, त्या सर्वानी पेड न्यूज प्रकारास आपल्या वृत्तपत्राचा कट्टर विरोध असल्याचे स्पष्ट केले. लोकमत समूहाचे जाहिरात विभागप्रमुख आसमान सेठ यांनी, ‘‘आमच्याकडे पॅकेज नावाची कोणतीच गोष्ट नाही. उमेदवार जाहिरात देऊ शकतो,’’ असे सांगतानाच उलट, ‘‘मला वाटते, तुमच्याकडे (‘लोकसत्ता’मध्ये) पॅकेज असतात. आमच्याकडे नाही,’’ असा आरोप केला. ‘सकाळ’चे विपणनप्रमुख सुधीर तापत, ‘नवभारत’चे महाव्यवस्थापक – जाहिरात विभाग शेखर चहांदे, ‘तरुण भारत’चे व्यवस्थापकीय संचालक व विपणनप्रमुख (प्रभारी) सुनील कुहीकर यांनीही त्यांच्या-त्यांच्या दैनिकांत पेड न्यूज घेतली जात नाही असे सांगितले. ‘पुण्यनगरी’चे संपादक रघुनाथ पांडे, दैनिक ‘भास्कर’चे संपादक प्रकाश दुबे, ‘लोकशाही वार्ता’चे कार्यकारी संपादक श्याम पेठकर यांनीही हा भ्रष्ट प्रकार आपल्या दैनिकात चालत नसल्याचे स्पष्ट करीत त्याचा निषेध केला

गुरुवार, ९ फेब्रुवारी, २०१७

वृत्तपत्रांच्या न्यूजवॉरमध्ये संपादक, पत्रकार घायाळ

औरंगाबाद : सध्या सर्वच वृत्तपत्रांमध्ये बातम्यांची स्पर्धा लागली आहे. प्रतिस्पर्धी दैनिकांत लागलेल्या किती बातम्या आपल्याकडे नाहीत, यावरून व्यवस्थापन धारेवर धरत असल्याने संपादक आणि पत्रकार पार मेटाकुटीला आले आहेत. विशेष म्हणजे बातमीचा ब माहीत नसलेल्या व्यवस्थापनाकडून दुसऱ्यांच्या शोध बातम्याही मिसिंगमध्ये पकडल्या जात आहेत, त्यामुळे तर हसावे की रडावे, अशी अवस्था अनेक संपादकांची झाली आहे. विशेष करून गुन्हेविषयक बातम्यांकडे फारच गांभीर्याने लक्ष दिले जात आहे, यातून मग किरकोळ बातम्यांनाही प्राधान्याने घेतले जात आहे.
लोकमत, पुण्यनगरी, सकाळ, दिव्य मराठी आणि पुढारी यांच्यात विशेष करून बातम्यांची स्पर्धा लागली आहे. पुढारीचे आगमन झाल्यानंतर स्थानिक बातम्यांना अग्रक्रम देण्याचे धोरण सर्वच दैनिकांनी ठरवले असून, यात रात्रीची डेडलाइनही अनेक दैनिकांनी पुढे ढकलली आहे. ज्या दैनिकाचे मालक औरंगाबादेतच राहतात, त्यांनी तर संपादकांचा पार छळ मांडल्याचे चित्र आहे. ही बातमीच का आली नाही, याचे लेखी खुलासे करावे लागत असल्याने कशा कशाचे उत्तर द्यावे आणि रोज रोज काय उत्तर द्यावे, असा प्रश्न त्यांना पडतो. किरकोळातील किरकोळ बातमी मिqसगमध्ये पकडली जात असल्याने ती आपल्याकडेच का आली नाही, हे सांगताना संपादकांना आतापर्यंतच्या अनुभवाचा कस लागताना दिसतो.
क्राईम रिपोर्ट्र्सना आले महत्त्व
दैनिकांतील न्यूज वॉरमध्ये क्राईम रिपोर्ट्र्सना विशेष महत्त्व आले आहे. या बिटमध्ये आपली छाप सोडणाèया पत्रकारांत लोकमत, सकाळ, महाराष्ट्र टाइम्स, दिव्य मराठी, सामनाच्या क्राईम रिपोर्ट्र्सचा समावेश होतो. त्यामुळे अन्य दैनिकांच्या क्राईम रिपोर्ट्र्सची दमछाक होत आहे. पुढारीच्या धोरणामुळे ते विशेष सक्रीय झाले आहेत. रात्री बारा ते एक पर्यंत सर्वच क्राईम रिपोर्ट्र्सना जागे राहू बातमी मिस होऊ नये यासाठी काळजी घ्यावी लागत आहे.

बुधवार, ८ फेब्रुवारी, २०१७

प्रहारचे बारा वाजले !

नारायण राणे यांच्या मालकीच्या प्रहारला  उतरती कळा लागली आहे..मधुकर भावे यांच्या काळात तर अधिकच अवकळा आली आहे. लॉन्चिंगच्या वेळी मुंबईत  संपादकीय विभाग आणि रिपोर्टर मिळून किमान १०० जण होते, ते आता बारावर आले आहेत. ३ रिपोर्टर, १ चीफ रिपोर्टर, २ सब  एडिटर आणि ५ डिझाइनर (यातील एकजण  राजीनामा दिला असून नोटीस वर आहे ) आणि स्वतः संपादक असे बाराजण काम करत आहेत.या सर्वांचा चार महिन्यापासून पगार थकला आहे, तसेच  मागील दोन वर्षांपासून प्रॉव्हिडंट फंडा चे पैसे देखील भरलेले नाहीत.मध्यन्तरी काही कर्मचारी नारायण राणे यांना भेटले असता आश्वासनाशिवाय काहीच हाती लागले नाही.प्रहारचा खपही दिवसेंदिवस घसरत चालला आहे. इतके मात्र खरे की,  प्रहार सध्याच्या स्पर्धेत हार पत्करला आहे...

गुरुवार, २ फेब्रुवारी, २०१७

‘लोकमत’चे सहयोगी समूह संपादक हेमंत कुलकर्णी यांचे निधन

नाशिक - अत्यंत परखड आणि तटस्थ पण तितक्याच लालित्यपूर्ण शैलीत लेखन करत पत्रकारिता क्षेत्रात स्वत:चा मानदंड निर्माण करणारे ‘लोकमत’चे सहयोगी समूह संपादक हेमंत दत्तात्रेय कुलकर्णी यांचे गुरुवारी दुपारी हृदयविकाराने निधन झाले. ते ६६ वर्षांचे होते.त्यांच्या पश्चात पत्नी कालिंदी, दोन विवाहित मुली मुग्धा शहा व प्राजक्ता जडे, जावई, तीन भाऊ असा परिवार आहे.
हेमंत कुलकर्णी यांना काही दिवसांपूर्वी प्रकृती बिघडल्याने कॉलेजरोडवरील विजन हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असतानाच गुरुवारी दुपारी २.५० वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. मूळचे अहमदनगरनिवासी असलेल्या हेमंत कुलकर्णी यांचे शालेय शिक्षण नागपूर येथे दादा चौधरी विद्यालयात झाले. नागपूर विद्यापीठातूनच त्यांनी पत्रकारितेतील पदवी संपादन केली होती. पत्रकारितेची वाट चोखाळणाऱ्या कुलकर्णी यांनी थेट मुंबई गाठली आणि लोकसत्तामधून त्यांनी पत्रकारितेचा श्रीगणेशा केला. लोकसत्ताचे माजी संपादक कै. विद्याधर गोखले यांचे बोट धरत त्यांची वाटचाल सुरू झाली आणि एक विलक्षण अशी शैली आत्मसात करत कुलकर्णी यांनी पत्रकारितेत स्वतंत्र ठसा उमटविला.
मुंबईनंतर कुलकर्णी यांनी १९८२-८३ पासून नाशिक येथे लोकसत्ताच्या जिल्हा प्रतिनिधीपदाची सूत्रे स्वीकारली. लोकसत्तामधील त्यांनी चालविलेले ‘वेध उत्तर महाराष्ट्राचा’ हे सदर विशेष लोकप्रिय ठरले होते. समाजातील विसंगतीवर नेमकेपणाने बोट ठेवणाऱ्या कुलकर्णी यांचे ‘भाष्य’ स्तंभलेखनही गाजले. डिसेंबर २००३ मध्ये त्यांनी ‘लोकमत’च्या नाशिक आवृत्तीच्या संपादकपदाची सूत्रे हाती घेतली होती. तेरा वर्षांपासून ‘लोकमत’मध्ये कार्यरत असलेल्या कुलकर्णी यांची गेल्याच वर्षी सहयोगी समूह संपादकपदी नियुक्ती झाली होती. पत्रकाराने समाजात वावरताना आणि प्रसंगी लोकांशी समरस होतानाही आपली तटस्थ भूमिका अबाधित ठेवली पाहिजे आणि कोणत्याही घटनेचे विश्लेषण त्रयस्थाच्या भूमिकेतून अत्यंत परखडपणे केले पाहिजे, अशी धारणा घेऊन पत्रकारिता करणाऱ्या कुलकर्णी यांचा लेखनसंग्रह ‘परखड’ या शीर्षकाखाली जून २००१ मध्ये प्रसिद्ध झाला होता. एक लिहिता संपादक म्हणून त्यांची ख्याती होती. ज्येष्ठ पत्रकार गोविंदराव तळवलकर, माधव गडकरी, अरुण टिकेकर या मान्यवर संपादकांचा त्यांना सहवास लाभला होता. साहित्य क्षेत्राबाबतही त्यांची विशेष रुची होती. पत्रकारितेतील त्यांच्या कर्तृत्वाचा अनेक संस्थांनी गौरव केला होता. कुलकर्णी यांच्या निधनाने पत्रकारिता क्षेत्रावर शोककळा पसरली आहे.

महाराष्ट्रनामा ...

बेरक्या इम्पॅक्ट
महाराष्ट १ च्या कर्मचाऱ्यांना अखेर एक महिन्याचा पगार मिळाला ..
आणखी दीड महिन्याचा पगार येणे बाकी ...

महाराष्ट्र १ अपडेट

महाराष्ट्र १ च्या फिचर एडिटर प्राजक्ता धुळप यांचा राजीनामा ...
वागळेंच्या पंटरच्या विकेट घेण्यासाठी व्यूहरचना सुरु ..
नव्या फ्रेशर्सना संधी देणे सुरु..
जुने सोडून जावू नये म्हणून पगार अडवणे सुरु ...
मात्र मर्जीतील कर्मचाऱ्यांना नोटबंदीच्या काळात जुन्या नोटा देवून चार महिन्याचा पगार दिल्याची चर्चा ...


मुंबई - महाराष्ट्र १ मध्ये गळती सुरु ... वृत्तसंपाद्क चंद्रकांत पाटील यांचा राजीनामा ...पुढारी अपडेट
औरंगाबाद - पुढारीच्या प्रेसलाईन मधून सुंदर लटपटे यांचे नाव तडकाफडकी काढले...
 प्रेसलाईनवर मुकुंद फडके यांचे नाव सुरु...AC बंद...
जय महाराष्ट्रच्या न्यूजरूममध्ये मागील 10-12 दिवसांपासून AC बंद.....
कर्मचाऱ्यांचे गरमीमुळे प्रचंड हाल ...
वेंटीलेशन नसल्यानं श्वास घ्यायला त्रास, कर्मचाऱ्यांची घुसमट...
AC चालू कधी होणार या प्रश्नावर समाधानकारक उत्तर नाही....

बुधवार, १ फेब्रुवारी, २०१७

सुंदर लटपटे यांचा पुढारीला रामराम

औरंगाबाद - औरंगाबादेतून पुढारी सुरू होवून अवघा एक महिनाही झाला नाही,तोच कार्यकारी संपादक सुंदर लटपटे यांनी राजीनामा दिला आहे.लटपटे यांनी जाता जाता समूह कार्यकारी संपादक सुरेश पवार यांच्यावर घणाघती आरोप केला आहे.
गेल्या दहा वर्षात दोनदा प्रयोग फसल्यानंतर अखेर पुढारी औरंगाबादेत 6 जानेवारी रोजी सुरू झाला.त्याचे रितसर प्रकाशन अद्यापही झाले नाही.भालचंद्र पिंपळवाडकर सोडून गेल्यानंतर मंगेश डोंग्रजकर आणि सुशिल कुलकर्णी यांनी नकारघंटा वाजवल्यानंतर सुंदर लटपटे यांना कार्यकारी संपादक करण्यात आले,मात्र लटपटे यांना कसलेही अधिकार देण्यात आले नाहीत.सर्व सुत्रे समूह कार्यकारी संपादक सुरेश पवार ( कोल्हापूर ) हे हालवित होते.त्यात युनिट हेड कल्याण पांडे यांचा हस्तक्षेप कमालीचा वाढला होता. यामुळे लटपटे कमालीचे नाराज झाले होते.पांडे आणि लटपटे यांच्यात अनेकवेळा खटकेही उडाले होते.सुरेश पवार यांचे गलिच्छ राजकारण आणि त्यांची डिमांड यामुळे राजीनामा दिल्याचे लटपटे यांनी म्हटले आहे.


चांगल्या समाजासाठी चॅनेलची उडाली भंबेरी

चांगल्या समाजासाठीवाल्या चॅनेलची सध्या भंबेरी उडालीय. या चॅनेलवर काही दिवसांपूर्वी मुंबईतील एका नामांकित पारशी कुटुंबाकडून चालवल्या जाणाऱ्या हॉस्पीटल विरोधात एक बातमी केली होती. ही बातमी चुकीची असल्याचा मसेज "ढोकळ्या"पर्यंत पोचवला होता. पण जे होईल ते बघू या अविर्भावात ही बातमी ऑन एअर गेली. मात्र नंतर याबाबत रुग्णालयाच्या व्यवस्थापनाकडून भोईवाडा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली.याबाबत भोईवाडा पोलिस पोचले थेट चांगल्या समाजासाठीमध्ये. आता ढोकळ्यासह सर्वांना घाम फुटला. म्हणे ही पेड न्युज असल्याचं चॅनेलनं मान्य केलयं. आणि ज्याच्या बाजूने ही बातमी केली तो म्हणे हॉस्पिटल मॅनेजमेंट आणि युनियन यांच्यातील वादातील आरोपी आहे.

फेसबुक वर शेअर करा

Facebook