> बेरक्याला माहिती देण्यासाठी ई - मेल करा - berkya2011@gmail.com

मंगळवार, ३० मे, २०१७

पत्रकार संघटनेच्या नावाखाली जोरदार वसुली

मंगळवेढा तालुक्यात एका पत्रकार संघटनेच्या संस्थापक  अध्यक्षाने आपल्या चार पत्रकार साथीदारांना सोबत घेऊन पावती पुस्तक छापून आणले आहे व तालुक्यात रस्त्यावर वाहने अडवून वाळू वाहतूकदाराकडून अवैध प्रवासी वाहनाकडून  एक ते दोन हजार रुपयाने वसुली सुरु केली आहे .दोन दिवसात तीन लाखाच्या आसपास गल्ला गोळा केला असून त्या सर्वांनी वाटून घेतला असून त्यातील काही रक्कम प्रशासनातील एका प्रमुख अधिकाऱ्याला ही दिल्याने तो अधिकारीही खुश आहे त्या अधिकाऱ्याने त्या पत्रकारांच्या टोळक्याला तुम्ही काहीही करा माझ्याकडे फक्त तक्रार येऊ देऊ नका असे सांगितले असल्याचे समजते त्यामुळे सध्या जोरदार वसुली सुरु आहे त्यामुळे या चांडाळ चौकडीमुळे सध्या चांगल्या प्रामाणिक पत्रकाराना तोंड लपवून फिरावे लागत आहे .

सोमवार, २९ मे, २०१७

मानबिंदूच्या उपसंपादकाच्या डुलक्या

बाबूजींच्या मानबिंदूमध्ये पुणे आवृत्तीमध्ये पहिल्या पानावर पठाणकोट हायअलर्ट संदर्भात एक बातमी आहे.. या बातमीचा इंट्रो संपला की मधून मान्सूनची बातमी सुरु होते.. पूर्ण बातमी पान ८ वर असल्याचं बातमीत नमूद आहे. मात्र, पान ८ वर मान्सूनची डिटेल बातमी आहे. पठाणकोट हायअलर्ट संदर्भात कुठलीही डिटेल बातमी नाही
उपसंपादकाच्या डुलक्यांमुळे मानबिंदूची वाट लागत आहे... अश्या चुका वारंवार घडत आहेत.. पत्रकारांना मूर्ख समजता काय?

चमकोगिरीनंतर आता एस.एम. देशमुखांची भंपकगिरी...

एस. एम. देशमुख यांनी विविध पत्रकार संघटनांच्या नावावर सुरु केलेल्या चमकोगिरीबद्दल तसेच या संघटनांच्या माध्यमातून वर्षानुवर्षांपासून ते मिळवत असलेले आर्थिक लाभ आणि शासकीय पदांबद्दल काही दिवसांपूर्वीच बरेच काही प्रकाशित झालेले आहे.

आता, राज्यमंत्री दिलीप कांबळे यांच्या कथित वक्तव्याचा लाभ उठवत पुन्हा चमकोगिरी करण्याचे या पत्रकारांच्या नेत्याचे (?) प्रयत्न धुळीस मिळाल्याचे दिसत आहे. पत्रकारांमध्ये पितळ उघडे पडू लागल्याचा प्रकार सर्वांच्या विस्मरणात जावा यासाठी, अशा एखादं घटनेची जणू वाटच पाहत बसलेल्या या नेत्यांने (?) या मुद्दावरून चमकोगिरीचा प्रयत्न केला खरा!, पण यांची पक्की लायकी कळलेली असल्याने कोणत्याही प्रमुख वृत्तपत्राने यांची कसलीच दाखल घेतली नाही; परिणामी यांचा डाव पुरता फसला आणि ते पुन्हा तोंडावर पडले. पण, पत्रकारिता न करताही पत्रकारांचे निव्वळ नेते(?) म्हणून मिरवणारे हे एस. एम. देशमुख हे पत्रकारांना निव्वळ मूर्ख समजत आहेत की काय असा प्रश्न आता यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.

‘मराठी पत्रकार परिषद’ या संघटनेला नियमबाह्यपणे ताब्यात घेऊन त्या संघटनेच्या या स्वयंघोषित अध्यक्षांनी राज्यमंत्री दिलीप कांबळे यांच्या पत्रकारांविरोधातील वक्तव्याच्या निषेधार्थ कांबळे यांच्या मोबाईलवर निषेधाचे एसएमएस पाठविण्याचे आवाहन केले होते. पण या देशमुखांची चमकोगिरी आणि पद्लोलुपता ओळखलेल्या पत्रकारांनी आणि माध्यमांनीही त्यांना फारसे महत्व दिले नाही. पण आपणच किती शहाणे आणि मोठे नेते हे दाखवण्यासाठी या देशमुख महाशयांनी आता, अत्यंत बालिशपणा करत राज्यमंत्री कांबळे यांना सात हजारांच्यावर पत्रकारांनी एसएमएस पाठविल्याचा डांगोरा पिटण्यास सुरुवात केली आहे. अशा विविध पोस्टही त्यांनी अनेक वाटसअप ग्रुपवर टाकलेल्या आहेत. हा दावा म्हणजे हे महाशय पत्रकारांना आता किती मूर्ख समजायला लागले आहेत, हेच दर्शविणारे आहे. कशाच्या आधारावर त्यांनी हा आकडा काढला. सात हजार पत्रकारांनी एसएमएस पाठवून ते पाठवल्याचे यांना सांगितले का? की दिलीप कांबळे यांनीच त्यांना सात हजार एसएमएस आल्याचे सांगितले, असे एक ना अनेक प्रश्न यानिमिताने उपस्थित होतात. पण राज्याच्या काना-कोपऱ्यातील पत्रकारांचा आपल्याला पाठिंबा आहे, आणि आपणच सर्व पत्रकारांचे नेते आहोत, असे हिडीस प्रदर्शन करीत नेते- अधिकारी आणि काही हौशे-गवसे पत्रकार यांच्यावर प्रभाव टाकण्यासाठी हे देशमुख महाशय नेहमी असेच धंदे करत असतात.

प्रत्यक्षात यांच्यासोबत खरी पत्रकारिता करणारे बोटावर मोजण्याइतपतही पत्रकार नाहीत. ज्यांना हे पदांचे हाडूक देतात किंवा पदाचे आमिष दाखवतात तेच पत्रकार(?) यांचा उदो-उदो करताना दिसतात. अनेक ठिकाणी पत्रकारांमध्ये आपआपसात भांडणे लाऊन द्यायची आणि मग, ‘कधी या तर कधी त्या’ गटाला हाताशी धरून आपली चमकोगिरीची दुकान चालवत राहायची, ही यांची पध्दत! एखादं शहरात किंवा जिल्ह्यात पत्रकारांमध्ये असलेले वाद यांनी मिटवलेत अशी उदाहरणे शोधूनही सापडणार नाहीत. पत्रकारांना आणि विविध ठिकाणच्या सर्वच पत्रकार संघटनांना आपल्या सोयीनुसार वापरण्याचा आणि त्यांच्याकडून विविध कार्यक्रमांच्या नावाखाली पैसा काढण्याचा यांचा जुनाच धंदा आहे.

पत्रकारांमध्ये भांडणे लावणे, नेहमी स्वत:कडेच विविध पदे राहावीत यासाठी वाट्टेल त्या थराला जाणे, विविध जिल्हे आणि तालुक्यातून पैसा गोळा करणे, हे यांचे खरे धंदे आता सर्वांच्या लक्षात आले आहेत. असा हा सारा प्रकार असताना, कोणत्या सात हजार पत्रकारांनी यांच्या आवाहनाला साद घालत राज्यमंत्री कांबळे यांना एक रुपया खर्च करीत निषेधाचा एसएमएस पाठवला असेल? पण हजारो पत्रकार आपल्या मागे आहेत, असा भपका दाखवण्यासाठी ही सारी धूळफेक सुरु आहे! आमचा मुद्दा चुकीचा असेल तर कोणत्या सात हजार पत्रकारांनी हे एसएमएस पाठवले, त्यांची नावे या शेमsss शेमsss देशमुख महाशयांनी जाहीर करावीत.


-एक सच्चा पत्रकार
(प्रत्यक्षात काम करणारा)

कर्मचारी लिहितात ...एकमत मध्ये पगारी नाहीत...

लातूर एकमतमध्ये मंगेश डोंग्रजकर नावाचे पत्रकारितेतील हुशार संपादक आल्यापासून एकमतमध्ये काय काय घडत आहे. हे जणू आपणास माहितच नाही. तरी थोडीसी माहिती देतोच....कर्मचाऱ्यांचा पगार कधीच वेळेवर होत नाही. बोनस नावाचा प्रकार गेल्या अनेक वर्षांपासून दिला जात नाही. गेल्या दिवाळीला काहीजणांना तोंडे पाहून बोनस दिला.
एवढेच नाही तर आणखी एक गंभीर आणि धक्कादायक प्रकार म्हणजे १ जानेवारी ते ४ मे २०१७ म्हणजे तब्बल चार महिन्यांपासून कर्मचाऱ्यांना पगारी दिल्या नाहीत. त्यामुळे कर्मचाऱ्यांचे मोठे हाल झाले. जिल्हा परिषद व महापालिका निवडणुकीच्या काळात सगळयांच्या सुटया रद्द केल्या. देशमुखांचे दैनिक म्हणून जाहीर कोणी बोलण्यास धजत नव्हते. पण कर्मचारी संपादकांकडे ओरड करू लागल्याने मार्च महिन्यात कर्मचाऱ्यांना थोडीबहूत उचल देणे सुरु केले.
आता तर व्यवस्थापनाने वेगळेच धोरण राबविणे सुरु केले आहे.कर्मचाऱ्यांना पगार वाढीचे गाजर दाखवून, दबाव टाकून ३१ डिसेंबर २०१६ ची मागील तारीख टाकून राजीनामे घेतले जात आहेत. त्यांना सीटीसी अर्थात करार पद्धतीवर नव्याने नियुक्त्या करीत आहेत. काहीजण वैतागून नोकरी सोडून गेले आहेत.
दैनिक एकमतचे सर्क्युलेशन कमी झाल्याने लातूर आवृत्ती ब दर्जावरून क दर्जावर आली आहे. मंगेशराव आल्यापासून काहीतरी मंगल घडेल असे सर्वांनाच वाटले होते मात्र सगळे अमंगल घडत आहे.

--- एक कर्मचारी

रविवार, २८ मे, २०१७

जनशक्तीची पिंपरी चिंचवड आवृत्ती बंद

पुणे - जनशक्तीच्या पुणे आवृत्तीचे संपादक गोपाळ जोशी यांची अखेर हकालपट्टी करण्यात आली असून, वृत्तसंपादक राजेंद्र पंढरपूरे यांचीही विकेट पडण्याची शक्यता आहे. दरम्यान जनशक्तीची पिंपरी चिंचवड आवृत्ती बंद करण्यात आली असून, पुणे आणि पिंपरी चिंचवड ही एकच आवृत्ती करण्यात आली आहे. दोन्ही आवृत्तीचे निवासी संपादक म्हणून पिंपरी चिंचवडचे पुरुषोत्तम सांगळे काम पाहत आहेत,
सांगळेनी रिपोर्टरना जाहिरातीसाठी तगादा लावला असून, जे रिपोर्टर जाहिराती आणणार नाहीत त्यांना घरचा रास्ता दाखवण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे अनेक रिपोर्टेरनी दुसरीकडे जॉब शोधणे सुरु केले आहे.
दरम्यान,जनशक्तीच्या मुंबई आवृत्तीच्या कार्यकारी संपादकपदी विक्रांत पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पाटलांनी पुन्हा घरवापसी केली आहे.
जनशक्तीच्या जळगाव आवृत्तीचा खप ३ हजार, पुण्याचा दोन हजार आणि मुंबईचा २ हजार आहे. अंकाची छपाई DNA या इंगजी वृत्तपत्रात केली जाते. पुणे आणि मुंबई मध्ये जनशक्तीस कसलाही स्पेस नाही. त्यामुळे या दोन्ही आवृत्या तोट्यात सुरु आहेत.

ता. क.- युनिट हेड आबा पाटील यांनीही राजीनामा दिला आहे.

शनिवार, २७ मे, २०१७

पत्रकारांना जोड्याने मारीनः दिलीप कांबळे

हिंगोली -हिंगोलीचे पालकमंत्री आणि सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे आपल्या वक्तव्यांमुळे सतत वाद ओढवून घेतात. आज हिंगोलितल्या खंडाळा या गावात बोलताना ते पत्रकारांवरच घसरले. मी पत्रकारांना घाबरत नाही. पत्रकार हे पाकीट दिलं की कुणाबद्दलही लिहितात अशा लोकांना जोड्यानं मारलं पाहिजे असं विधान त्यांनी केलं.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यानंतर आता मंत्रिमंडळातले सामाजिक न्यायसारख्या महत्वाच्या खात्याचे राज्यमंत्री असलेले नेते दिलीप कांबळे यांनी पत्रकारांच्याविरोधात दमदाटीची भाषा वापरली. काही तक्रार असल्यास संवैधानिक पदावरच्या नेत्यानं संयमित भाषेतच उत्तर देणं अपेक्षीत आहे. मात्र जोड्यानं मारा अशी मवाली भाषा मंत्र्यांना शोभते का हाच खरा प्रश्न आहे.. या आधीही घाबरायला मी काही ब्राम्हण आहे का ? असं जातीवाचक उद्गारही त्यांनी काढलं होतं. त्यावर वादळही झालं होतं नंतर त्यांनी माफी मागत वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला होता.
काय म्हणाले दिलीप कांबळे ?
काल म्हणे काय तमाशा चालला होता स्वागतचा...अरे तुझं काय पोट दुखतंय रे...जी लोकं काम करत नाही ती दांडक्यावाल्यांना घाबरतात आणि पत्रकारांनाही घाबरतात...पण मी काही दांडक्यावाल्यांना पण घाबरत नाही ना लिहीणाऱ्यांनाही घाबरत नाही...35 वर्ष समाजकारणात आहे...लाडीलबाडी केली नाही...एक रुपया खालला नाही...एकच ड्रेस घालतो...माझ्या आई वडिलांनी आणि माझ्या पक्षांने चांगलं शिकवलं...आणि या पत्रकारांच्या जीवावर राजकारण चालतं का ?, आज हे आपले उद्या लगेच दुसऱ्याचे....पाकीट मिळालं की तुमच्या विरोधात लिहतील...त्याने पाकिट दिलं की याच्या विरोधात लिहतील....मी कुणाला नाही घाबरत...आहे कुणाची हिंमत तर बोलावं त्याने माझ्याशी...मी नाही घाबरत कुणाला....खरा जो असतो तो खरा असतो...सिंह कधी ओरडून सांगत नाही मी जंगलाचा राजा आहे...सिंह सिंह असतो..खऱ्या माणसाला कुणाची भिती नसते...मला गडकरीसाहेबांचं म्हणणं जास्त आवडतं...दांडकेवाले पुढे आले की काही बोलायचं गरज नाही...त्यांच्या प्रत्येक प्रश्नांची उत्तरं देण्याची गरज नाही...काम करत राहा...जनता आपोआप तुमच्यासोबत राहील...ज्याची लफडी असेल ते घाबरतील...माझ्यासारख्या नेत्याच्या विरोधात लिहितात कमालच झाली...उभं जोड्याने मारेल...एखाद्याला...काय लिहीयचं ते लिहा...
13 मार्च रोजी कांबळे ब्राह्मणांबद्दल काय बोलले होते ?
"राज्यात दलालाची दलाली बंद झालीये. त्यामुळे काही जण शासनाला बदनाम करण्याचं काम करताय..काल एवढा चांगला कार्यक्रम झालाय. या राज्यातल्या जिल्ह्यातल्या कार्यकर्त्यांचा सन्मान झाला. त्यानंतर आम्ही निघून गेल्यानंतर घोषणाबाजी केली. हिंमत असेल तर माझ्यासमोर करा...मुस्काटात हाणलं असतं...मी ही दलित आहे मी काय ब्राम्हण आहे का ? हे सरकार दलालांच्या विरोधात आहे म्हणून काही जणांची पोटं दुखायला लागली..."

गुरुवार, २५ मे, २०१७

बाबूजींच्या मानबिंदूमध्ये भाऊची मनमानी

बीडमध्ये भूकंप, गळतीही वाढली !
औरंगाबाद - बाबूजींच्या मानबिंदूमध्ये भाऊ आणि  त्यांनी ठेवलेल्या दिवाणची मनमानी वाढली आहे.  मानबिंदूत सुधारणा करण्याऐवजी  कर्मचाऱ्याविरुद्ध  मालकांकडे कान  भरणे आणि सुडाचे राजकारण करणे इतकेच या दोघांना जमत असल्यामुळे मानबिंदूची वाट लागत आहे. बाबुजीही या दोघांवर अंध विश्वास ठेवत असल्यामुळे कर्मचाऱ्याची गळती वाढली आहे.
भाऊ आणि त्यांनी ठेवलेल्या दिवाणच्या मनमानी आणि  छळास  कंटाळून बीडचे जिल्हा प्रतिनिधी प्रताप नलावडे आणि अन्य तीन रिपोर्टरनी बंड करत सात  महिन्यापूर्वी एकाच वेळी राजीनामे दिले होते, हे राजीनामे पाहून भाऊंची बोबडी वळाली होती. याप्रकरणी बाबूजीनी  कान उघडण्याअगोदरच भाऊंनी बीड गाठले आणि सर्वांची मनधरणी  करून दिवाणावर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आणि वेळ मारून नेली. ती सल भाऊंच्या मनात सात महिन्यापासून सलत होती. जे जिल्हा प्रतिनिधी बंड करत होते, त्याना थंड करण्यासाठी बदल्याची नामी शक्कल भाऊंनी लढवली. त्यानुसार परवा दत्ता थोरे यांची बीडला बदली करण्यात आली.मात्र  थोरेंनी बीडला जाण्यास नकार देताच त्यांना औरंगाबादमध्ये हलविण्यात आले. थोरेना आता प्रिंट ऐवजी ऑनलाईनमध्ये काम देण्यात येणार असल्याचे कळते.थोरेंना सोलापूर हवे होते, पण आजपर्यंत त्यांची बोळवण करण्यात आली. यामुळे थोरे नाराज असून ते लवकरच मानबिंदूतून बाहेर पडतील, अशी चिन्हे आहेत.
थोरेंनी बीडमध्ये जाण्यास नकार दिल्यामुळं सारेच गणित बिघडले. बीडला सतीश जोशी यांना पाठवण्यात आले. त्यानंतर मागील वचपा काढण्यासाठी बीडचे यापूर्वीचे  जिल्हा प्रतिनिधी प्रताप नलावडे यांना नारळ देण्यासाठी भाऊंनी पूर्णपणे तयारी केली होती. एकंदरीत रागरंग  पाहून नलावडे यांनी गुरुवारी औरंगाबाद गाठून  स्वतःहून राजीनामा दिला. इकडे जोशी बीडला जॉईन होताच बंड करणाऱ्या संजय तिपाले, व्यंकटेश वैष्णव व राजेश खराडे या रिपोर्टर्नीही राजीनामे दिले. बीडचा सर्व संपादकीय विभाग एकाच वेळी बाहेर पडल्यामुळं मानबिंदूमध्ये मोठा भूकंप झाला आहे.
भाऊंनी नलावडेचा राजीनामा घेतला, थोरेंचा सुंता केला आणि उस्मानाबादच्या विशाल सोनटक्के यास लातूरला बदली करून दुय्यम स्थान दिले. आता जालन्याचे जिल्हा प्रतिनिधी राजेश भिसे भाऊच्या निशाण्यावर असून त्यांचा गेम करण्याची फिल्डींग लावण्यात सध्या भाऊ व दिवाण व्यस्त आहेत. भाऊंच्या मनमानीमुळे यापूर्वी विनोद काकडे, गणेश खेडकर, यांच्यासह दहाजण आधीच बाहेर पडले आहेत.
भाऊंची डबल ढोलकी
जेव्हा सात महिन्यापूर्वी बीडच्या सर्व संपादकीय विभागाने राजीनामे दिले होते, तेव्हा भाऊ तातडीने  बीडला येवून दिवाणला बाजूला करण्याचं आश्वासन दिले होते. मालकाच्या नावानेही खडे फोडले होते, तेच भाऊ वेळ जाताच कर्मचाऱ्यावर उलटले.
दिवाळी अंकाच्या बैठकीत बोलताना भाऊ जाहीरपणे जोमाने कामाला लागा, असा बिझनेस करा तसा करा, असे सांगतात आणि बैठक संपली की संपादकीय सहकाऱ्याना म्हणतात, मी सांगितल्याशिवाय काहीही करू नका, मालक फक्त धंदा धंदा करतो, आपण काय तेच करायचे का, अशी मुक्ताफळे उधळतात. भाऊंच्या डबल ढोलकीची ऑडीयो   क्लिपच बेरक्याच्या हाती लागली आहे.
सोलापूर, जळगावात ही भाऊने कर्मचाऱ्यांना कसे छळले. तेथील भाऊच्या उद्योगाचे अनेक किस्से बेरक्याला मेलवर अनेकांनी पाठविले आहेत.
भाऊ आणि त्यांनी ठेवलेल्या दिवाणचे कारनामे बाबूजींना माहित असूनही बाबूजी गप्प  असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. बाबूजींना कर्मचाऱ्याविरुद्ध तक्रारी करणारा संपादकच हवा आहे का ? असे असेल तर मानबिंदूची वाटचाल अंधाराकडे असेल हे मात्र नक्की ...

बुधवार, २४ मे, २०१७

ब्रेकिंग न्यूज सांगताना कुत्र्याची स्टुडिओत एंट्री, अँकरला हसू अनावर!

मॉस्को : ब्रेकिंग न्यूज देताना अनेकदा अँकर आणि रिपोर्टरसोबत खूप गमतीदार किस्से घडतात. असाच किस्सा रशियन न्यूज चॅनेल वर्ल्ड 24 च्या अँकरच्या बाबतीत घडला आहे. ब्रेकिंग न्यूज देताना काळ्या रंगाचा लॅब्राडॉर कुत्रा स्टुडिओमध्ये घुसला आणि अंकरच्या मागे जाऊन उभा राहिला. झाल्या प्रकारानं अँकर सर्वात आधी दचकली आणि त्यानंतर तिनं बातमी देण्याचा प्रयत्न केला, मात्र या साऱ्या प्रकारात तिला हसू आवरलं नाही.
मॉस्कोतील चॅनेलच्या मुख्य कार्यालयात महिला अँकर एक ब्रेकिंग न्यूज देत होती. मात्र त्याचवेळी इन्वॅडर नाव्याच्या तिच्या लॅब्राडॉर कुत्र्यानं स्टुडिओमध्ये एंट्री केली आणि अँकरसमोरील डेस्कवर चढण्याचा प्रयत्न चालवला. या प्रकारानं सर्वात आधी महिला अँकर सर्वात आधी गांगरली, मात्र लगेच स्वत:ला सावरत तिनं बातमी देणं सुरुच ठेवलं. हा सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आणि असंख्य लोकांनी लाईव्ह पाहिला.
डेस्कवर चढता न आल्यानं कुत्र्यानं आपली मान डेस्कवर टेकवली. लाईव्ह गेल्यानंतर लगेच हा व्हिडिओ यूट्यूबवर व्हायरल झाला आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.

प्राची कुलकर्णीला महाराष्ट्र १ मधून नारळ

पुणे -चॅनेलच्या  रिसोर्सेसचा इतर मीडियासाठी वापर केल्याचा ठपका ठेवत प्राची कुलकर्णीची महाराष्ट्र १ मधून हकालपट्टी करण्यात आली आहे. पुणे ब्युरो चीफ प्राची कुलकर्णी हिच्या  संदर्भात अनेक तक्रारी मॅनेज मॅनेजमेंटकडे गेल्या होत्या. वारंवार तंबी देऊनही प्राची कुलकर्णी  एका इंग्रजी वेबसाईटला स्टोऱ्या पाठवत होती.  अखेर तिला काम थांबवण्याचे आदेश देण्यात आले..आता पुण्याची सर्व जबाबदारी अश्विनी डोके - सातव हिच्याकडे राहील.
प्राची कुलकर्णी ही  निखिल वागळे यांची समर्थक मानली जात होती. वागळे गेल्यावर वागळेच्या सर्व समर्थकांवर टांगती तलवार होती. एक - एक पत्ते कापत अखेर प्राची कुलकर्णी हिला नारळ देण्यात आला. आता महाराष्ट्र १ मध्ये वागळे समर्थक मोजून  ३ ते ४ उरले आहेत . वागळेसाठी अनेकजण IBN लोकमत सोडून आले होते ,त्यांची आता वाट लागली आहे.

जिल्हा प्रतिनिधींच्या बदल्यामध्ये फेरबदल

औरंगाबाद - लातूरचे जिल्हा प्रतिनिधी दत्ता थोरे यांनी बीडला जाण्यास नकार दिला, त्यामुळे थोरेंची बदली औरंगाबादच्या  मुख्य कार्यालयात करण्यात आली आहे. त्यानंतर बीडला   सतीश जोशी याची  नियुक्ती करण्यात आली आहे. जोशी यापूर्वी औरंगाबाद कार्यालयात कार्यरत होते. त्याचबरोबर बीडचे प्रताप नलावडे यांचा निर्णय पेंडींग ठेवण्यात आला आहे.
दुसरीकडे नांदेड विभाग पुन्हा औरंगाबादला जोडण्यात आला आहे. आता नांदेड जिल्हा प्रतिनिधी म्हणून शिवराज बिच्चेवार काम पाहतील.तेच नांदेडचे मुख्य राहतील. नांदेडचे हेड धर्मराज हल्लाळे यांची  लातूरला बदली करण्यात आली आहे. खास हल्लाळेसाठी लातूर आणि उस्मानाबाद हा वेगळा विभाग तयार करण्यात आला आहे. हल्लाळे हेड तर जिल्हा प्रतिनिधी विशाल सोनटक्के राहतील. सोनटक्के यांची उस्मानाबादहून लातूरला बदली करण्यात आली आहे. सोनटक्के हल्लाळेना रिपोर्टनींग करतील. उस्मानाबादला जिल्हा प्रतिनिधी म्हणून चेतन धनुरे याची नियुक्ती करण्यात आली आहे. धनुरे पूर्वी लातूरला रिपोर्टर होता. नंतर त्याची उदगीरला बदली करण्यात आली आहे. धनुरे यास पदोन्नती देण्यात आली आहे.


ताजा कलम

बीड - लोकमतचे जिल्हा प्रतिनिधी प्रताप नलावडे यांचा राजीनामा... सतीश जोशी नवे जिल्हा प्रतिनिधी ...


यापूर्वीचे वृत्त 
लोकमतमध्ये जिल्हा प्रतिनिधींच्या बदल्या
औरंगाबाद - भारतीय प्रशासनिक सेवा (Indian Administrative Services)अधिकाऱ्याच्या दोन वर्षाला जश्या बदल्या केल्या जातात, तोच फार्म्युला राबवत लोकमतने चार वर्षानंतर मराठवाड्यातील चार जिल्हा प्रतिनिधींच्या बदल्या केल्या आहेत. या बदलीच्या ऑर्डर्स बुधवारी निघाल्या असून , बदली झालेल्या सर्व जिल्हा प्रतिनिधींना नव्या ठिकाणी १ जून पासून जॉईन व्हायचे आहे.
नांदेडचे जिल्हा प्रतिनिधी धर्मराज हल्लाळे याची लातूरला, लातूरचे दत्ता थोरे यांची बीडला, बीडचे प्रताप नलावडे यांची उस्मानाबादला आणि उस्मानाबादचे विशाल सोनटक्के यांची नांदेडला बदली करण्यात आली आहे. या बदलीमुळे जिल्हा प्रतिनिधीमध्ये : कभी खुशी, कभी गम आहे...

बुधवार, १७ मे, २०१७

पत्रकारितेच्या क्षेत्रात ताण-तणावाचे प्रमाण वाढले

मुंबई - इतर कोणत्याही क्षेत्रापेक्षा पत्रकारितेच्या क्षेत्रात ताण-तणावाचे प्रमाण इतके मोठे आहे की अलिकडच्या काळात हे ताण सोसवेनासे झालेत. कामाच्या ताणापेक्षाही एकमेकांचे पाय ओढण्याच्या प्रवृत्तीमुळे नाहक वाढणारा ताण जीवघेणा ठरू लागला आहे. त्यामुळेच ग्लॅमरच्या मोहापायी या क्षेत्रात येणाऱ्या नवख्या मंडळींचा होणारा हिरमूस आणि होणारी निराशा बघवत नाही. बड्या वर्तमानपत्रात तर एकदा वरच्या हुद्यावर गेले की खालच्या मंडळीचा छळ करण्यासाठीच आपल्याला मालकाने बढती दिली आहे, असेच काही मंडळींना वाटते. खालच्या मंडळींची पार अक्कल काढायलाही ही साहेब मंडळी मागेपुढे पाहत नाहीत. शिव्या घालणे, कामाचा भार वाढवून त्रास देणे, अनावश्यक कामे सांगणे, बातम्या किल करणे, कितीही मेहनत करून एखाद्याने बातमी आणली तर त्या बातमीला न्याय देण्याऐवजी तिला किल कसे करता येईल, याच्यावरच काम करणे, काम करणारांना काम करू द्यायचे नाही आणि काम न करता केवळ हुजरेगिरीवर खूष व्हायचे, अशा अनेक तऱ्हा   सध्या न्यूजपेपर इंडस्ट्रीत रूजू लागल्या आहेत. अनेक गोष्टी मालकांना माहिती नसतात. मालकांच्या परस्परच ही साहेब मंडळीच आपणच मालक आहोत, या रूबाबात संस्थेचे आणि कर्मचाऱ्याचे नुकसान करू लागले आहेत. बड्या वर्तमानपत्राचे मालक व्यवसाय आणि खप दोन्हीही घसरू लागल्याने व्याकूळ होऊन डोक्याला हात लावून बसले आहेत तर गलेलठ्ठ पगार घेऊन संस्थेची वाट लावण्याचा विडाच या साहेब लोकांनी उचलला आहे. आता गरज आहे ती मालक मंडळींनी डोळे उघडून निट बघण्याची. आपल्या वर्तमानपत्रात नेमके काय चालले आहे, याची खडा न खडा माहिती घेऊन मालक मंडळींनी जर वेळीच उपाययोजना केली नाही तर संस्था जशी रसातळाला जाणार आहे तशीच या संस्थेत प्रामाणिकपणे काम करणारी तरूण मंडळीही निराशेच्या गर्तेत जाणार आहेत. इंङस्ट्री प्रिंट असो की इलेक्ट्रॉनिक्स, कामाचा ताण नाहक वाढताना दिसतोय. हा ताण वाढविणाऱ्यानीही वेळीच सावध व्हायला हवे. नाहीतर काळ कोणालाही माफ करणार नाही, हे लक्षात घ्यायला हवे.

सोमवार, १५ मे, २०१७

(अन) स्पॉन्सर्ड बातमीचं चीप ब्रेकिंग


#बातमी टीकरला पाहून #चितळेंनी चैनलमध्ये संबधितांना फोन केला.(?) यानंतर बातमीचं चित्रच बदललं.. रात्री उशीरा बातमी #न्यूजरुमला पडली होती. त्यामुळे बातमी फक्त टीकरला गेली. डेव्हलप न झाल्यानं डेप्युटी न्यूज एडिटरनं मॉर्निंग शिफ्ट वाल्यांना झापलं.. काही वेळात बातमी एक्सप्रेससारखी धावू लागली.. टिकर, वेब, सोशल मीडियाला सूचना गेल्या. पाहता पाहता बातमी मोठी झाली.
आपली
#तूर_खरेदीची बातमी #दानवेंच्या बरळण्यानं कधीचीच बाद झाली होती. विरोधकांचा रेटा कमी झाल्यानं याची 'साल्या'ची वॅल्यू संपण्यात जमा झाली होती. कपिल मिश्राची नौटंकी चघळून चोथा झाल्यानं न्यूज वैल्यू संपली होती. रोहतकची सामूहिक #बलात्कार आणि हत्येची बातमी राज्याच्या (राजकीय) 'इंट्रेस'ची नसल्यानं घेतलीच नव्हती. #ट्रिपल_तलाकचं न्यूज एजेंसीच्या स्पॉन्सर्डशिपकडून काहीच येत नव्हतं.. परिणामी राज्यात कडक बातमीचा अभाव होताच. त्यामुळे मॉर्निंग शिफ्टचा प्लॉन #चितळे ठरला.. सहाय्यकांना प्रोड्यूसरनं पुन्हा एकदा सूचना देऊन बाकीच्या बातम्या फक्त तयार करुन ठेवायला सांगितलं. त्यामुळे सहाय्यक बुलेटीन प्रोड्यूसर सांगकाम्या म्हणून की बोर्ड पळवत होते.
फोना-फोनी करत बातमीला फुगवणं सुरु झालं. ३० वर्षापूर्वीचं नियमीतचा रिटेलर स्डुडिओबाहेरच होता. त्या गेस्ट म्हणून सुटुडिओत आणण्यात आलं होतं. तर पुण्यातून लाईव्ह लिंक मस्ट करण्यात आली होती. स्थापनेपासूनचं #ग्राफीक, #क्रोनोलॉजी, #एक्सपर्टचे दोन-तीन फोनो प्लेट तयार होतं. पहिला अख्खा सेगमेंट बातमीवर खेळायचं होतं. प्लेन #लाईव्ह मिळत असल्यानं सातला रिपोर्टरशिवाय कुणीच मिळालं नव्हतं. तर आठला एक #दुधवाल्यानं बाईकवरुनच वन टू वन दिलं होतं. नऊसाठी मालकापैकी कुणीतरी हवंच असं प्रेशर असाईनमेंटनं रिपोर्टर नावाच्या स्ट्रिंजरवर टाकलं होतं. त्यामुळे पुण्यातला स्ट्रिंजर वैतागला होता.
अगदी धडपडत तो सकाळीच डेक्कनला पोहचला होता. संभाजी पुलावरुन तो कसा-बसा आता दुकानापर्यंत पोहचला होता. दुकान स्पष्ट दिसावं अशी ताकीद स्ट्रिंजरला देण्यात आली होती. इकडे नऊचं बुलेटीन ऑन एअरसाठी तयार होतं.. पीसीआर आणि असाईनमेंटला सूचना देऊन #बुलेटीन_प्रोड्यूसर बाह्या चढवून बसला. इकडे पुण्यात मालक अजून आलाच नसल्यानं #स्ट्रिंजरचे धाबे दणाणले होते. त्यामुळे त्यानं फोन करुन टिपीकल #पुणेकरांना कॅमेऱ्यासमोर आणलं होतं. त्यांना काय व कसं बोलायचं याच्या सूचना देऊन त्यानं पुन्हा एकदा हातातला #बूम आणि कॉलर टाईट केला होता.. अगदी रेटारेटीतही तो चेहऱ्यावर हास्य आणत कानातल्या इपीत बुलेटीनची साईन ट्यूनकडे लक्ष लावलं होतं..

#व्हायरल_post

गुरुवार, ११ मे, २०१७

हवाला दहा वर्षातला आणि खप बघा तीन वर्षातील !


मुंबई - दिनांक ९ मेच्या बहुतेक आघाडीच्या वर्तमानपत्रात एबीसीच्या पत्रकार परिषदेची एक बातमी पहिल्या पानावर ठळकपणे प्रसिध्द करण्यात आली आहे. मराठी वृत्तपत्रांचा खप वाढत असल्याची ही गुड न्यूज सगळ्यांनीच मनापासून प्रसिध्द केली आहे. दहा वर्षात सरासरी ८० टक्के वाढ झाली असल्याचे या न्यूजमध्ये म्हटले आहे, मराठी वर्तमानपत्राचा खप वाढत असेल तर त्याचा आनंद बेरक्यालाही निश्चित आहे. परंतु एबीसीच्या पत्रकार परिषदेची बातमी देताना त्यामध्ये गेल्या दहा वर्षाचा हवाला दिला आहे. खपाच्या वाढीचा हवाला देताना तो गेल्या तीन वर्षातील दिला असता तर वस्तुस्थिती नेमकी काय आहे, याचा अंदाज आला असता.
तीन वर्षात सोशल मीडियाचे आक्रमण इतक्या वेगाने झाले आहे की न्यूज ही संकल्पनाच त्यामुळे बदलून गेली आहे. दहा वर्षाचा हवाला दिला असल्याने सुरूवातीच्या पाच वर्षात वर्तमानपत्रचा खप वाढला असेलही. परंतु त्यानंतरच्या पाच वर्षात खप इतका घसरला आहे की आघाडीच्या वर्तमानपत्राच्या मालकांनी छातीवर हात ठेऊन ठाम पणे सांगावे की खप घसरला की वाढला. वस्तुस्थिती नेमकी झाकून ठेऊन संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करून आघाडीची वर्तमानपत्रे जर खप वाढल्याची आवई उठवत असतील तर त्याचा दुष्परिणामच होणार आहे, घसरणाऱ्या खपाची कारणे अनेक आहेत. त्या कारणाचा शोध घेण्याऐवजी एबीसीच्या पत्रकार परिषदेची न्यूज चालाखीने छापून समाधान मानणाऱ्या या लोकांना काय म्हणावे? आता बेरक्याचे एकच आवाहन सगळ्या आघाडीच्या वर्तमानपत्रांना आहे की त्यांनी गेल्या तीन वर्षातील खपावर आधारीत एक वस्तुनिष्ठ न्यूज द्यावी आणि नेमका खप वाढला आहे की घसरला आहे, याची माहिती वाचकांना द्यावी. दहा वर्षाचा हवाला देऊन वाचकांचा संभ्रम वाढवू नये.
खप वाढल्याची न्यूज वाचून किंवा जाहिरात पाहून वाचकांची संख्या वाढत नसते, हे लक्षात ठेवावे. वर्तमानपत्रांची संख्या एका बाजुला वाढत आहे, परंतु दुसऱ्या बाजुला वाचक काही वाढताना दिसत नाही. फक्त तो या वर्तमानपत्रावरून त्या वर्तमानपत्रावर डायव्हर्ट होत आहे. हेही लक्षात घ्यायला हवे.

बुधवार, १० मे, २०१७

महाराष्ट्र्र १ चे कर्मचारी हवालदिल

मुंबई - महाराष्ट्र १ च्या कर्मचाऱ्याच्या गेल्या तीन महिन्यापासून पगारी  नाहीत, त्यामुळे अनेक कर्मचारी रजा टाकून घरी बसले आहेत तर काहींनी दुसरीकडे जॉब शोधणे सुरु केले आहे. चॅनेल आर्थिक घाबघाईस आल्यामुळे या चॅनलच्या भवितव्याविषयी चिंता व्यक्त केली जात आहे.
निखिल वागळे  गेल्यापासून चॅनेलचा टीआरपी पार घसरलाय, त्यात पगारी वेळेवर होत नसल्यामुळे गळती सुरु आहे. अनेक बिनीचे कर्मचारी सोडून गेल्यानंतर उरले -सुरले कर्मचारीही गेले तीन महिने पगार नसल्यामुळे हवालदिल झालेत. रचना विचारे, अजय परचुरे, दर्शना तांबोळी सह अनेक कर्मचाऱ्यांनी याच कारणामुळे रजा टाकून घरी बसने पसंद केले आहे, पंकज इंगोले यांनी पुन्हा राजीनामा दिलाय. सध्या चॅनेलमध्ये व्हिडीओ एडिटरच नाहीत, नवे यायला तयार नाहीत आणि जुने सोडून जात असल्यामुळे चॅनेलला उतरती कळा  सुरु झाली आहे. चॅनेलचे तीन पार्टनर आहेत. तीन तिघाडी आणि काम बिघाडी सुरु आहे. हे तिन्ही पार्टनरनी स्वतःची आर्थिक गुंतवणूक काढने सुरु केल्यामुळं चॅनल आर्थिक डबघाईस आले आहे.

जाता -जाता
एका न्यूज एडिटरला न्यूजची काडीचीही अक्कल नसताना त्याला या पदावर बसवण्यात आले आहे. तसंच एका ज्युनिअरला सिनियरवर बॉसगिरी करण्याचे काम देण्यात आलंय . न्यूज एडिटर  नव्या प्रशिक्षणार्थीबरोबर टीपी करत बसलेला असतो. आता तर म्हणे ज्युनिअर आणि न्यूज एडिटर यांच्यात चांगलेच बंड सुरु झालंय... 

बेरक्या इफेक्ट

बेरक्याने दि. ७ मे  रोजी  बाबुजी, 'भाऊ'ला मारा धक्का ! मगच होईल 'मानबिंदू' पक्का ! हे वृत्त प्रकाशित केले होते. हे वृत्त वाचून एडिटर इन चीफ असलेल्या बाबूजींनी ८ मे पासून संपादकीय विभागातील सर्व कर्मचारी, ब्युरो मधील सर्व रिपोर्टर यांना   वन टू वन बोलावून भाऊ आणि एकंदरीत कामाविषयी म्हणने जाणून घेतले . त्यानंतर आज बुधवारी मराठवाड्यातील पाच जिल्हातील जिल्हा प्रतिनिधीस बोलावण्यात आले आहे. त्यांनाही वन टू वन बोलावून   त्यांची कैफियत जाणून घेण्यात येणार आहे.
गेले तीन दिवस वन टू वनचा  सिलसिला सुरु आहे. अनेकांनी भाऊ च्या मनमानी आणि एकंदरीत कार्यशैलीबद्दल  बाबुजींकडे  तक्रार दाखल केली. आता बाबूजी भाऊंवर काय  कारवाई करतात, याकडे लक्ष वेधलंय ..

मंगळवार, ९ मे, २०१७

निलेश खरे टीव्ही 9 मध्ये जॉईन

मुंबई - बेरक्याचे भाकीत पुन्हा एकदा तंतोतंत खरे ठरले आहे.जय महाराष्ट्र न्यूज चॅनेलला जय महाराष्ट्र करून बाहेर पडलेल्या निलेश खरे यांनी अखेर टीव्ही  9 जॉईन केले आहे.
पुर्वीचे स्टार माझा आणि आताचे एबीपी माझामध्ये अनेक वर्षे काम केल्यानंतर निलेश खरे अडीच वर्षापुर्वी बाहेर पडले.त्यानंतर  मी मराठी करून  जय महाराष्ट्रमध्ये व्यवस्थापकीय संपादक म्हणून कार्यरत होते.आता त्यांनी जय महाराष्ट्र चॅनलला जय महाराष्ट्र करून टीव्ही 9 मध्ये संपादक म्हणून जॉईन झाले आहेत.
टीव्ही मध्ये ढोकळा आणि बेदमची मनमानी सुरू होती.या दोघांमुळे अनेकजण जॉब सोडून गेले होते.यासंदर्भात बेरक्याने वारंवार बातम्या प्रकाशित केल्या होत्या.त्यानंतर संपादक असलेल्या रेड्डीची विकेट पडली.त्यानंतर सल्लागार संपादक म्हणून ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे जॉईन झाले होते.त्यांच्याकडे फक्त सडेतोड या डिबेट शोची जबाबदारी आहे.मात्र चॅनल हेड आणि संपादक म्हणून निलेश खरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.वागळे आणि खरे यांंना घेवून चॅनलची प्रतिमा सुधारण्याचा हैद्राबादी मालकाचा प्रयत्न सुरू आहे.
दुसरीकडे खरे आल्यामुळे ढोकळा आणि बेदम यांची चुळबूळ वाढली आहे.ढोकळाने दुसरीकडे जॉब शोधनेही सुरू केले आहे.ढोकळा साममध्ये जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.बेदमनेही जॉब सर्चिंग सुरू केले आहे.
खरे आल्यामुळे चॅनलमध्ये अनेक बदल होण्याची शक्यता आहे.ढोकळामुळे काही रिपोर्टरनी जोरदार वसुली सुरू केली होती.आता त्याला चाप बसण्याची शक्यता आहे.

शनिवार, ६ मे, २०१७

बाबुजी, 'भाऊ'ला मारा धक्का ! मगच होईल 'मानबिंदू' पक्का !

औरंगाबाद - महाराष्ट्राचा मानबिंदूच्या औरंगाबादच्या मुख्य कार्यालयात तीन वर्षापूर्वी धाकट्या बाबुजीनी अमुलाग्र बदल करण्यासाठी म्हणून जळगावहून भाऊला आणले. काही दिवसातच धाकटे बाबुजी राजधानीत गेले आणि इकडे भाऊनी  मराठवाडा आवृत्तीची वाट लावून टाकली. मराठवाड्यातील सगळ्या जिल्ह्यात मानबिंदुचा खप घसरलाय. संपादकीय विभागात ‘राजकारण’ करण्यातच भाऊची भाऊबंदकी सार्थकी लागली. चार-दोन चमचे हाताला धरायचे व बाकीच्या लोकांना त्रास द्यायचा ही भाऊची निती. सोलापूर काय जळगाव काय, सगळीकडे त्यांनी हेच केले.(जळगावात भाऊची बदली झाल्यावर कर्मचाऱ्यानी पेढे वाटले होते, ही यांची कर्तबगिरी) फक्त आपले कारनामे मालकाच्या कानावर जाऊ नको म्हणून काळजी घ्यायची. तसे वाटलेच तर आधीच मालकाचे कान भरून मोकळे. गलेलठ्ठ पगार घेऊन संस्थेच्या विरोधातच भाऊने कसे  काम केले,याची रसभरीत चर्चा सुरु आहे.
मालकाला खपाची चिंता लागलेली असताना भाऊ खप घसरल्याचे खापर इतर विभागाच्या डोक्यावर फोडण्यासाठी तत्पर आहेत. थोरल्या बाबुजीनी आता भाऊला हे विचारले पाहिजे की तीन वर्षे गलेलठ्ठ पगार घेऊन एसी केबिनमध्ये काय दिवे लावले. कॉम्प्युटरवर पत्ताचा गेम खेळण्यापलिकडे दुसरे आणखी काय काय केले. संपादकपदाच्या कारकिर्दीत किती माणसे तयार केली. किती माणसाचे करीअर उध्वस्त केले. कितीजणाचे बळी घेतले. मराठवाड्यात येऊन कोणते नवे प्रयोग केले. संस्थेच्या हिताचे कोणते निर्णय घेतले. संपादक म्हणून मराठवाड्यात नवे किती लेखक तयार केले. किती जणाशी संपर्क ठेवला. किती आमदाराशी त्यांची ओळख आहे. जिल्हा प्रतिनिधींना कोणते नवे विषय दिले. खप वाढावा म्हणून वेगळे लेखन काय केले.  संस्थेतल्या उमद्या लोकांना कधी लिहिण्यासाठी प्रोत्साहन दिले का? असे आणि अनेक प्रश्न आहेत.
बेरक्याला मिळालेल्या माहितीनुसार उलट खप कमी झाला तरच आपली खुर्ची टिकून राहिल असा कावेबाज विचार करून खप कमी करण्यासाठीचे उद्योग केले. (कोणते उद्योग केले, तेही बेरक्याजवळ माहिती आहे) संपादकाने करायची कामे गजाननाच्या हवाली करून मोकळे व्हायचे आणि आपला वेळ ‘राजकारण’ करण्यात घालवायचा हे भाऊचे उद्योग बाबुजी बंद करा, नाही तर संस्थेला लागलेल्या वाळवीची किड लागल्याशिवाय राहणार नाही. सगळा पंचनामा बाबुजी रोखठोक करा, मग रिजल्ट बघा. वन टू वन संस्थेतील लोकांशी बोला मग जे समोर येईल ते ऐकल्यावर तुमचे डोके गरगरल्याशिवाय राहणार नाही. नवी पिढी तुम्हाला बोलायला उत्सुक आहे. बाबुजी बोलाच एकदा. ! असे संदेश धडकत आहेत.

अर्णब गोस्वामी यांचा ‘रिपब्लिक टीव्ही’ ऑन एअर

आक्रमक आणि धारदार सूत्रसंचालनाच्या शैलीसाठी प्रसिद्ध असलेले पत्रकार अर्णब गोस्वामी यांनी शनिवारी माध्यमविश्वात पुनरागमन केले. अर्णब यांची बहुचर्चित ‘रिपब्लिक टीव्ही’ ही वृत्तवाहिनी आजपासून सुरू झाली. गेल्या वर्षभरापासून माध्यमविश्वात अर्णब यांच्या ‘रिपब्लिक टीव्ही’ची प्रचंड चर्चा सुरू होती. अर्णब गोस्वामी यांनी गेल्यावर्षी ‘टाईम्स नाऊ’च्या मुख्य संपादक पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर त्यांनी ‘रिपब्लिक टीव्ही’ ही वृत्तवाहिनी सुरू करण्याबद्दल सुतोवाच केले होते. अखेर आजपासून ही वृत्तवाहिनी सुरू झाली.
आज ही वृत्तवाहिनी सुरू होताना अर्णब गोस्वामी यांनी एका स्वगताद्वारे आपली भूमिका मांडली. यावेळी त्यांनी प्रेक्षकांनी दाखवलेल्या संयमाचे कौतूक केले. तसेच आपल्याला नवीन वृत्तवाहिनी सुरू करण्यासाठी इतका वेळ का लागला, याबद्दलचे स्पष्टीकरण दिले. मला जेव्हा विनाकारण कायेदशीर नोटीसा पाठवण्यात आल्या तेव्हा तुम्ही माझ्या पाठिशी उभे राहिलात. हा पाठिंबा मिळाल्याबद्दल मी स्वत:ला सुदैवी समजतो. हे सर्व विधिलिखितच होते, असे त्यांनी सांगितले. त्यांच्या या विधानाचा रोख अप्रत्यक्षपणे ‘टाईम्स समूहा’कडून पाठविण्यात आलेल्या कायदेशीर नोटीसकडे होता. टाईम्स समूहाने अर्णब गोस्वामी यांना ‘नेशन वॉन्ट्स टू नो’, ही टॅगलाईन वापरु नये, यासाठी कायदेशीर नोटीस पाठवली होती. अर्णब यांनी त्यांच्या नव्या वृत्तवाहिनीवर नेशन वॉन्ट्स टू नो, ही टॅगलाईन वापरु नये, असे टाईम्स समूहाने नोटीसमध्ये म्हटले होते.
अर्णब गोस्वामी यांनी गेल्यावर्षी ‘टाईम्स नाऊ’च्या मुख्य संपादक पदाचा राजीनामा दिला होता. ‘टाईम्स नाऊ’वरील त्यांचा रात्री ९ वाजता प्रसारित होणारा ‘द न्यूजअवर’ हा कार्यक्रम विशेष लोकप्रिय होता. या एका कार्यक्रमातून टाईम्स नाऊला ६०% उत्पन्न मिळत होते. याशिवाय ‘फ्रँकली स्पिकींग’ कार्यक्रमाच्या माध्यमातून अर्णब गोस्वामी राजकारणी, सेलिब्रिटी, खेळाडूंसह महत्त्वाच्या व्यक्तींच्या मुलाखती घ्यायचे. अर्णब गोस्वामी यांच्या नेतृत्त्वाखाली ‘टाईम्स नाऊ’ वृत्तवाहिनीने टिआरपी रेटिंगमध्येही दमदार कामगिरी केली. त्यामुळेच ‘टाईम्स समूहा’ने अर्णब गोस्वामींची ‘टाईम्स नाऊ’ आणि ‘ईटी नाऊ’ या वाहिन्यांच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती.
RepublicTv

मानबिंदूच्या ‘त्या’ जाहिरातीने कर्मचारी अस्वस्थ !

औरंगाबाद - महाराष्ट्राचा मानबिंदूच्या दिनांक ६ मे च्या अंकातील पान क्रमांक १२ वरील पाहिजेतच्या जाहिरातीने मराठवाड्याती कर्मचाऱ्यात मोठी खळबळ माजवून दिली आहे. बातम्यातून वाचकांमध्ये खळबळ उडवून देण्याऐवजी कर्मचाऱ्यामध्येच अस्वस्थता निर्माण करण्याच्या या जाहिरातीचे अनेक अर्थ काढले जात आहेत. ही जाहिरात कशासाठी आणि कोणाला टार्गेट करून काढली आहे, याची चर्चा आहे.
जिल्हा प्रतिनिधी, उपसंपादक व वार्तासंकलक पाहिजेत, अशी जाहिरात असली तरी किती पदे याचा उल्लेख न करता मराठवाडा आवृत्तीसाठी असे म्हटले आहे. त्यामुळे मराठवाड्यातील सगळ्याच सेंटरवर बदल होणार, हे निश्चित. मराठवाड्यात सगळ्याच सेंटरवर मानबिंदूची झपाट्याने होत असलेली पिछेहाट आणि त्या पार्श्वभूमीवर आलेली जाहिरात संपादकीय विभागातील सर्वांनाच अस्वस्थ करणारी आहे. कोणी याला भाऊंची ‘गेम’ म्हणत आहे तर कोणी याला जूनमध्ये पगारवाढ मागू नये म्हणून शेटजीनी दिलेले इंजेक्शन म्हणू लागले आहे.
दुसरीकडे ३५ वर्षाच्या प्रदीर्घ वाटचालीत मानबिंदूला स्वत:च्या कर्मचाऱ्यामधून जिल्हा प्रतिनिधी तयार करता येऊ नयेत, याची खंत अनेकांना वाटत आहे. काम करणाऱ्याच्या पायात पाय घालून त्याला काम करू द्यायचे नाही आणि गटबाजी करून संस्थेचेच नुकसान करण्याची स्टॅटीजी वरीष्ठांची असल्याने मानबिंदुची घसरण होत आहे. वरीष्ठ पातळीवरील मंडळीच संस्थेची वाट लावण्याचे काम जाणूनबुजून केले जात आहे. चाणाक्ष शेटजींच्या लक्षात ही गोष्ट कशी काय येत नाही, याचेच आश्चर्य आहे. सकाळपासून बेरक्याला अनेकांनी जाहिरातीची नाराजी कळवली असून काहीजण ‘रामराम’ ठोकण्याच्या तयारीला लागले आहेत. आधीच भाऊच्या कार्यपध्दतीला कंटाळलेल्या कर्मचाऱ्यांना भाऊच्या हातून गेम होण्यापूर्वीच आपला रस्ता शोधण्याचा पर्याय चांगला वाटू लागला आहे. तर काहीजणांनी बाबुजींना भेटून संपादकीय विभागात सुरू असलेल्या गेम शोची माहिती त्यांच्या कानावर घालून मग ‘रामराम’ ठोकण्याचा निर्णय घेतला आहे.
दुसरीकडे मुख्य कार्यालयातही फेरबदल होणार असल्याची माहिती बेरक्याला मिळाली आहे. विदर्भातून मोठ्या प्रमाणात लोक औरंगाबादला टाकले जाणार असून गणपती बप्पासह अनेकांना विदर्भाचा रस्ता दाखविण्यात येणार आहे. एकूण काय तर चांगला सेनापती देण्याच्या ऐवजी आता सेनापती संस्थाद्रोही आणि शेटजीची सैनिक बदलण्याची घाई, यामुळे मानबिंदूच्या हाती निराशाच येणार आहे.बुधवार, ३ मे, २०१७

लाईनवर मुले मिळत नसल्याचे वृत्तपत्रांचे खप घसरले !


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'मन की बात' कार्यक्रमात वृत्तपत्र विक्रेत्या मुलांना घरी पेपर टाकण्यासाठी आल्यानंतर पाणी हवे का, असे विचारा, असा संदेश जनतेला दिला आणि त्यानंतर वृत्तपत्र विक्री यंत्रणा किती गुंतागुंतीची आहे, याचा विचार बेरक्या करू लागला...
काही दिवसापूर्वी गोव्यातूनही एक बातमी समजली होती, ती अशी, गोव्यात घरोघरी जाऊन पेपर टाकण्यासाठी मुले मिळत नाहीत, त्यामुळे काही वृत्तपत्रांनी आपले डेपो चौकाचौकातून सुरू करून ज्यांना हवा असेल त्यांनी तेथून पेपर घेऊन जा, अशी विनंती वाचकांना केली आहे. महाराष्ट्रातही असा दिवस यायला फारसा वेळ लागणार नाही. सध्या वृत्तपत्र एजंटांसमोर लाईनवर अंक टाकण्यासाठी मुले मिळत नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. मिळाले तरी ते फार दिवस टिकत नाहीत. एक तर त्यांना मोबदला अत्यंत अल्प असतो. शिवाय पहाटे उठून घरोघरी जाण्याचे हे कष्टाचे आणि जिकरीचे काम करण्याची अलिकडे मुलांची तयारी नाही. यापेक्षा बस स्थानकात ज्यूस किंवा पाण्याची बाटली विकली तर त्यातून त्यांना चांगला मोबदला मिळतो. त्यामुळे पेपर टाकण्याचे काम करण्यास मुले तयार होत नाहीत. सर्वच एजंट याचा अनुभव घेत आहेत. त्यामुळे सध्या वृत्तपत्रांसमोर जसे डिजिटल आणि सोशल मीडियाचे मोठे आव्हान आहे, तसे पेपर लाईनचेही आहे. लाईनवर मुले मिळत नसल्याने एजंटांचा कल अंक वाढ करण्याऐवजी अंक कमी करण्याकडे आहे. 

याचाच परिणाम म्हणून सध्या बड्या साखळी वृत्तपत्रांनाही झपाट्याने खाली येत असलेला खपाचा आकडा रोखायचा कसा, याची चिंता आहे. चार-दोन दिवस अंक घरी आला नाही की वाचक सरळ पेपर बंद करून टाकतात. पेपर ही त्यांची आता दुय्यम गरज आहे. तो आला काय आणि नाही काय, वाचकांना फारसा फरक पडत नाही. सोशल मीडियावरून जगभरातील घडामोडी त्याच्या मोबाईवर आदळत आहेत. अगदी वर्षभरातील प्रिंटच्या खपाचा अभ्यास केला तरी आपल्याला हे सहज लक्षात येईल की आता अनेक योजना सुरू करून आणि गाड्या मोटारींच्या बक्षीसांच्या योजना देऊनही खपाचा आकडा वर सरकायलाच तयार नाही.

अंक वाढ करायला एजंटांची ना नाही. परंतु तो अंक लाईनवर टाकण्याची त्यांची समस्या मोठी आहे. आगामी काळात वृत्तपत्राच्या व्यवस्थापनालाच यावर जालीम औषध शोधून काढावे लागणार आहे. एक तर डेपो तयार करणे नाही तर एअरपोर्टवर जशा एटीएम सारख्या वृत्तपत्रांच्या मशीन्स असतात, तशा मशीन्स लावणे. मुळात नवा वाचक तयार होत नाही. वाचकाचा कल डिजिटल वृत्तपत्राकडे वाढू लागला आहे. सोशल मीडियाचे आक्रमण झपाट्याने सुरू आहे. आणि अशात आता वृत्तपत्रांच्या पारंपारिक यंत्रणा संपुष्टात येऊ लागल्या आहेत. 

सध्या एक तर अगदी स्पष्ट दिसतेय की प्रिंट मीडियाला एकाचवेळी अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. मोबाईल कंपन्यांनी अगदी अल्पदरात डाटा उपलब्ध केला असल्याने आणि काहीही बघायचे असेल, वाचायचे असेल तर मोबाईलच्या छोट्या स्क्रिनवर ही गरज लगेच भागत असल्याने वृत्तपत्र हे वाचकांसाठी दुय्यम ठरू लागले आहे. याचा विचार प्रिंट मीडियातील माध्यम धुरीनांनी केला नाही तर गेल्या दहा वर्षात अनेक गोष्टी वेगाने कालबाह्य झाल्या आहेत, हे लक्षात ठेवावे.

मंगळवार, २ मे, २०१७

मजीठिया न देना पड़े इसलिए कर्मियों पर वीआरएस का दबाव बना रहा लोकमत

महाराष्ट्र का नंबर वन अखबार कहलाने वाला लोकमत मजीठिया वेतन आयोग की पूरी राशि कर्मचारियों को न देने के लिए हर पैंतरा अपनाने की कोशिश कर रहा है. परमानेंट स्टाफ को बाहर का रास्ता दिखाने के लिए 100 से ज्यादा कर्मचारियों की सूची तैयार की गई है. बता दें कि लोकमत ने अपने कर्मचारियों को अब तक मजीठिया का आंशिक भुगतान ही किया है.
करीब साढ़े तीन साल पहले लोकमत ने नागपुर में अपने कर्मचारी यूनियन के सदस्यों को अनुशासनहीनता और गैरकानूनी तरीके से हड़ताल करने के आरोपों के साथ बाहर कर दिया गया था. कोर्ट में लंबी लड़ाई के बाद अपनी हार होती देख प्रबंधन ने अब आरोप वापस ले लिए हैं. यूनियन के सदस्यों की वापसी के मद्देनजर प्रबंधन पर कर्मचारियों को पूरा मजीठिया देने और साथ ही ग्रेडेशन से जुड़े एक और कोर्ट केस के अंतिम पड़ाव पर पहुंच जाने के बाद उसका पैसा भी कर्मचारियों को देने का दबाव बढ़ रहा है.
कर्मचारियों के हक की मोटी रकम उन्हें देने से बचने के लिए प्रबंधन ने कुछ स्थाई कर्मचारियों पर वीआरएस के लिए दबाव बनाना शुरू कर दिया है. पूरे ग्रुप में ऐसे दर्जनों कर्मचारी उनके निशाने पर हैं. नागपुर यूनिट में ऐसे करीब 10-15 कर्मचारियों (जिनमें ज्यादातर महिलाएं हैं) को यूनिट हेड नीलेश सिंह ने अपने कक्ष में बुलाकार उनपर वीआरएस लेने का दबाव डाला. उन्होंने बची हुई नौकरी का 30 से 40 फीसदी वेतन लेकर नौकरी छोड़ने को कहा. कर्मचारियों द्वारा इनकार किए जाने पर उन्हें लातूर, पूना, जलगांव आदि शहरों में ट्रांसफर करने का भी डर दिखाया.
बता दें कि ‘लोकमत’ खुद अपने नागपुर संस्करण का सर्कुलेशन 3 लाख (मराठी) और 1 लाख (हिंदी, लोकमत समाचार) बताता है. इस प्रसार संख्या के मुताबिक उसके ग्रेडेशन का काफी ज्यादा पैसा नागपुर के कर्मचारियों को मिलना है.

दुसानेला पुन्हा "सुवर्ण" दिवस !

IBN लोकमतमधून मंदार फणसे पायउतार आणि महेश म्हात्रे यांची ऑनलाईनला बदली झाल्यानंतर रात्री ९ वाजता होणाऱ्या "बेधडक" या डिबेट शोची सूत्रे सुवर्णा दुसाने यांच्याकडे गेली आहेत.
पूर्वी मंदार फणसे रजेवर असताना या शोची सूत्रे राजेंद्र हुंजे यांच्याकडे असायची, पण नव्या मॅनेजमेंटने या शोची सूत्रे सुवर्णाकडे सोपवली आहेत.
IBN -लोकमत मध्ये निखिल वागळे असताना, सुवर्णा दुसाने अधून - मधून "आजचा सवाल" करत असे. नंतर झी २४ तास मध्ये गेल्यानंतरही तिने डिबेट शो सक्षमपणे चालवला होता, परत ती स्वगृही आल्यानंतर मंदार फणसे आणि महेश म्हात्रे या जोडगोळीने तिला दूरच ठेवले होते, पण ही गोडगोळी गेल्यानंतर दुसानेला पुन्हा "सुवर्ण" दिवस आले आहेत.
मंदार फणसे आणि महेश म्हात्रे गेल्यानंतर मॅनेजमेंटने स्पष्ट केले आहे की, अजून किमान तीन महिने नवा संपादक नियुक्त होणार नाही. आहे तो कर्मचारी वर्ग काम करेल. बेरक्याला मिळालेल्या माहितीनुसार संपादकीय सूत्रे सुवर्णा दुसाने हिच्याकडे जावू शकतात, पण असे म्हणणे सध्या तरी धाडसाचे ठरेल.
मंदार फणसे आणि महेश म्हात्रे यांचे ऑ .. ऑ लोकांना रुचणारे नव्हते. त्या मानाने सुवर्णा दुसाने नक्कीच सक्षम आणि अभ्यासू आहे. तिच्या नव्या इनिंगला शुभेच्छा !

 ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,

IBN लोकमत, महाराष्ट्र 1 (व्हाया मी मराठी ) नंतर ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांची महाराष्ट्र दिनापासून टीव्ही 9 मराठीला नवीन इनिंग सुरु झाली. "आजचा सवाल " या कंटेन्टचे कॉपी राईटचे सर्वांधिकार महाराष्ट्र 1 च्या संदीप चव्हाणकडे असल्यामुळं वागळेंना टीव्ही 9 मध्ये "आजचा सवाल" ऐवजी "सडेतोड" नाव धारण करावे लागले,
या डिबेट शोची मोठी जाहिरातबाजी करण्यात आली होती. प्रोमोही झळकत होते, परंतु या कार्यक्रमाने प्रेक्षकांची मोठी निराशा केली. "सडेतोड" काही मनावर पकड घेऊ शकला नाही. वागळेचा नूर बराचसा सौम्य, शांत व थंड झाला आहे. एकंदरीत चर्चा प्रचारकी वाटतेय. वागळेनी राम शिंदे या जनसेवकाला 'साहेब' म्हणणं काही मनाला पटलं नाही!
"IBN-लोकमत"च्या वागळेंपेक्षा हे "TV9" चे वागळे फार वेगळे वाटले.
कुछ हजम नहीं हुआ !
#अपेक्षाभंग #सह्याद्रीचर्चा

....
मुळात टीव्ही चॅनेल वरील डिबेट शो किती लोक पाहतात ? डिबेट शो म्हणजे कोंबड़याची झुंज झाली आहे ...यातून आऊटपुट काय निघते ? तेच ते पाहुणे सर्व चॅनेलवर दिसतात...लोकांना या डिबेट शोचा कंटाळा आलाय ...भविष्यात सर्व चॅनेल डिबेट शो बंद करतील..वृत्तपत्राचा अग्रलेख कुणी वाचत नाही, तसे टीव्ही चॅनेल वरील डिबेट शो कुणी पाहणार नाही ..
कुणी अर्णब गोस्वामी होण्याचा प्रयत्न केला तर ती मिमिक्री ठरेल ...
सोलापुरी ओबामा असाच प्रयत्न करतोय... याची कधी कधी फार कीव येते... कधी कधी स्वतःच एकटाच बडबडत असतो...
#सोलापुरीओबामा #अर्णबमिमिक्री

फेसबुक वर शेअर करा

Facebook