नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघात उभी फूट

नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघात उभी फूट पडली असून, बहुसंख्य पत्रकार एकत्र येत नवीन कार्यकारिणी निवडली आहे. अध्यक्षपदी गोदातीर समाचारचे संपादक केशव घोणसे पाटील, कार्याध्यक्षपदी पुण्यनगरीचे कालिदास जहागीरदार  आणि सरचिटणीसपदी देशोन्नतीचे अनिल कसबे यांची निवड करण्यात आली आहे.
संघाचे विद्यमान अध्यक्ष प्रकाश कांबळे यांची जुलै २०१६ मध्ये मुदत संपली असताना  त्याना सहा - सहा महिन्याची  दोन वेळा मुदतवाढ देण्यात आली होती. त्यामुळे मराठी पत्रकार परिषदेच्या  कारभाराविरुद्ध पत्रकारांनी नाराजी व्यक्त करत नवीन कार्यकारिणी निवडली आहे. यात ७५ टक्के जुने सदस्य आहेत..
नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघ नोंदणीकृत नाही, त्यामुळे नव्या कार्यकारिणीने धर्मदाय आयुक्त कार्यालयात नोंदणी करण्याचा निर्णय घेतला आहे... नवीन कार्यकारिणी जाहीर होताच परिषदेचे सरचिटणीस  यशवंत पवार यांनी एक पोस्ट लिहिली, ( ही  पोस्ट कुणी लिहिली हे जगजाहीर आहे ) .. त्याला नूतन उपाध्यक्ष अमृत जाधव यांनी जोरदार प्रतिउत्तर  दिले आहे. 
..................
नवनियुक्त पत्रकार संघाच्या कार्यकारिणीचे अभिनंदन

पत्रकारांत भांडणे लावण्याचा प्रयत्न करू नका!


जिल्ह्यातील पत्रकारांनी एकत्र येऊन नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या नवीन कार्यकारिणीची निवड केल्यानंतर काही जणांच्या पोटात दुखू लागल्याचे दिसत आहे. मराठी पत्रकार परिषदेचे सरचिटणीस यशवंत पवार महाशयांनी त्यांच्या ‘साहेबांनी’ लिहून दिलेली फाॅरवर्ड केलेली पोस्ट तर अकलेचे तारे तोडणारीच आहे. मंगळवारी नांदेड जिल्ह्यातील इतक्या मोठ्या संख्येने पत्रकारांनी निवडलेली बिनविरोध कार्यकारिणी यांना चार-चौघात निवडलेली वाटू लागली आहे. या महाभागांना काय वाटायचे ते वाटत राहो! पण या महाभागांनी आमच्या जिल्ह्यात भांडणे लावण्याचा प्रयत्न करून नये.

तुमचे ‘साहेब’ एस. एम. देशमुख यांनी मराठी पत्रकार परिषद ताब्यात घेण्यासाठी स्वत:च स्वत:ची मुख्य विश्वस्त पदावर आणि नंतर अध्यक्षपदावरही कशी नियुक्ती करून घेतली आहे, ते अगोदर सगळ्या पत्रकारांना सांगा. आणि मग आम्हाला ज्ञान शिकवा. मराठी पत्रकार परिषद म्हणजे जणू यांच्या घरची प्राॅपर्टी असल्यागत यांची रडारड सुरु झाली आहे. तुम्ही म्हणाल त्यांचीच निवड करायला, तुम्ही नांदेड जिल्ह्यातील  पत्रकारांचे मालक आणि सर्व पत्रकार तुमचे गुलाम आहेत, असे समजताय् कि काय?

नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाकडे जमा असलेल्या पैशांवर डोळा ठेऊन, तुम्हाला नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघावर ताबा मिळविण्याची इच्छा आहे, हे आम्हाला चांगलेच माहित आहे. पण तुमचे हे डाव आम्ही कधीच यशस्वी होऊ देणार नाही. आणि आम्ही तुमची बाष्कळ बडबडही विनाकारण ऐकून घेणार नाही.

अमृत जाधव,

उपाध्यक्ष- नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघ
आणि नवनियुक्त कार्यकारिणी


.......................

जाता जाता
मराठी पत्रकार परिषदेच्या प्रत्येक जिल्ह्यात शाखा असल्या तरी त्या नोंदणीकृत नाहीत. काही संघानी स्वतंत्र नोंदणी करून परिषदेशी संबंध तोडून टाकला आहे. सर्व ठिकाणी गटबाजी आहे. काही लोकांनी प्रायव्हेट लिमिटेड संघटना केली आहे. कोणाचा पायपोस कोणाला नाही. अनेक संघात भ्रष्टाचार बोकाळला आहे. पुरावे देवूनहि परिषद काहीच कारवाई करीत नाही, त्यामुळे अनेकांची दुकानदारी सुरु आहे...