> बेरक्याला माहिती देण्यासाठी ई - मेल करा - berkya2011@gmail.com

सोमवार, २९ जानेवारी, २०१८

ह-या ना-या गँग पुन्हा जोमात

मुंबई - एक पाऊल मागे वाहिनीतली ह-या (काळू मामा) आणि ना-या (शुगरे) ही गँग पुन्हा सक्रीय झाली आहे. नवे संपादक विजय कुवळेकर यांनी ह-या, ना-याला जीवनदान दिलं. तसंही या आधीच्या सगळ्याच संपादकांनी ह-या, ना-याला जवळ केलं होतं. पण डॉक्टरने ह-या, ना-याला एकदा जोरदार तडाखा दिला होता. दोघांना घरचा रस्ता दाखवला होता. पण दोन्ही गँगच्या शार्पशूटरनी डॉक्टरकडे गोळीबार करून ह-या ना-याला पुन्हा कामावर घ्यायला लावलं होतं.
आता ह-या ना-या गँग पुन्हा दहशत पसरवू लागली आहे. या गँगमध्ये नसलेल्यांना कायम नाईट शिफ्ट लावली जात आहे. तर या गँगमध्ये असणा-यांची चांदी सुरू आहे. डॉक्टरच्या जवळ असणारं तोंडपाटीलकी दाम्पत्य नेटवर्क 18 - लोकमतच्या मार्गावर आहे.  हे दाम्पत्य पुन्हा डॉक्टरचा हात पकडून  नेटवर्क 18 - लोकमतमध्ये घुसण्याची चर्चा आहे. तसंच एक पाऊल मागेचा निनादही  नेटवर्क 18 - लोकमतध्ये ऐकायला येणार आहे. डॉ़क्टरच्या जवळ असलेला भाऊही लवकरच पक्षांतर करणार असल्याची बातमी आहे.
चॅनलचे कार्यकारी संपादक म्हणून येणारे चंद्रशेखर कुलकणी जॉईन होण्यापूर्वीच आजारी पडले. त्यानंतर त्यांच्या हृदयावर बायपास सर्जरी झाल्याने ते आजारातून उठले नाहीत आणि आता तर ते जॉईन होण्याची शक्यता मावळली आहे. त्यामुळे हऱ्या - नाऱ्याला आनंद झाला असून आता आपलेच अधिराज्य आहे, असे वाटू लागले आहे. 

टीआरपी घसरला  
एक पाऊल मागे चॅनेलचा टीआरपी चांगलाच घसरला आहे. हे चॅनल एक किंवा दोन वर राहत होते पण ते चक्क तीन वर गेले आहे. याचे कारण पूर्वी हे चॅनल डीटीएच वर फ्री होते पण आता ते पेड करण्यात आले आहे. त्यामुळे टीआरपी घसरला आहे. मात्र ते डॉक्टरच्या पथ्यावर पडले आहे. सगळ्यांना वाटते डॉक्टरने चॅनल  सोडल्यामुळे टीआरपी घसरला आहे. मात्र चॅनल फ्री ऐवजी पेड झाल्यामुळे टीआरपी घसरला आहे.


अँकरच्या फेसबुक पोस्टनंतर पाठलाग करणाऱ्या तरुणांना अटक

आग्रा  - ​रात्री उशिरा काम संपवून घरी निघालेल्या एका न्यूज अँकरचा नशेत धुंद असणाऱ्या दोन तरुणांनी पाठलाग करून तिला त्रास देण्याची घटना उत्तर प्रदेशातील आग्रा शहरात घडली आहे. दामिनी माहौर असे या न्यूज अँकरचे नाव असून तिच्या सोबत घडलेल्या या भयानक घटनेचे संपूर्ण वर्णन फेसबुकवर पोस्ट केले आहे. ही पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरलही झाली आहे. महिला हेल्पलाइन क्रमांक १०९० वर फोन करून या घटनेची माहिती देऊनही कोणतीही कारवाई झाली नसल्याचा दावाही या पोस्टमधून दामिनीने केला आहे.

दामिनीने आपल्या फेसबुक पोस्टमध्ये लिहिलंय, '' २५ जानेवारीच्या रात्री ८ वाजता मी भगवान टॉकीजकडून एमजी रोडकडे निघाले होते. नशेत असलेले ते दोन तरूण भगवान टॉकीजपासूनच माझ्यासोबत चालत होते. मी सुरुवातीला त्यांच्याकडे दुर्लक्ष केले पण काही वेळाने ते माझ्याशी बोलण्याचा प्रयत्न करू लागले. आपला मार्ग बदलावा म्हणून सूरसदनपासून पुढे मी दुसऱ्या दिशेला वळले तर ते दोघे तिथेही माझ्यामागे आले. शेवटी अस्वस्थ होऊन मी त्यांच्या गाडीच्या नंबरप्लेटचा फोटो काढू लागले. तेव्हा हा नंबरच बनावट असल्याचं मागच्या सीटवर बसलेला तरूण सांगू लागला. मग जेव्हा मी त्याचा फोटो घेऊ लागले तेव्हा तो चित्रविचित्र पोझेस देऊ लागला. आपण फोटोंमध्ये पाहू शकता, त्यांच्या चेहऱ्यावर लाज आणि भीतीचा लवलेशही दिसत नाहीए.''

सोमवार, २२ जानेवारी, २०१८

माध्यमांनी स्वत:ला अपग्रेड करण्याची वेळ !

पुणे – डिजिटल मीडियाची व्याप्ती आणि आवाका लक्षात घेता, इतर माध्यमांनी स्वत:ला अपग्रेड करण्याची वेळ आली आहे, असं मत पुण्यात झालेल्या डिजिटल मीडिया कार्यशाळेत तज्ज्ञांनी व्यक्त केलं. कॅलिडस इंटरनॅशनल मीडिया अँड आर्ट्स अकॅडमीच्या वतीने या एकदिवसीय कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं. ऑनलाईनमधील कन्टेन्ट, क्रिएटिव्हिटी आणि हिट्स, वेबसाईट कशी अपलोड करावी, वेब पोर्टलचं आर्थिक गणित आणि सतत बदलणारा सोशल मीडिया आदी विषयांवर या कार्यशाळेत 'सकाळ'चे डिजिटल संपादक सम्राट फडणीस, ज्येष्ठ पत्रकार सचिन परब, ‘महाराष्ट्र लाइव्ह’चे संपादक सुनील ढेपे, सोशल मीडिया तज्ज्ञ विनायक पाचलग यांनी मार्गदर्शन केलं. 
             
प्रिंट, टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्त्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं, इतर माध्यमांनी वेळीच सावध होवून स्वत:ला अपग्रेड केलं नाही तर ती कालबाह्य ठरण्याची शक्यता सम्राट फडणीस यांनी व्यक्त केली. सध्या रोज घरी पेपर येतो, पण तो वाचला जाईलच असं नाही. बातम्याही टीव्हीऐवजी स्मार्टफोनमधून, सोशल मीडियाच्या माध्यमातून पाहण्याकडेच लोकांचा कल वाढतोय, याकडेही फडणीस यांनी लक्ष वेधलं. 
                  ऑनलाईन मीडियातील कामाचा अनेक वर्षांचा अनुभव असणारे ज्येष्ठ पत्रकार सचिन शंकर परब यांनीही डिजिटल मीडियाचं महत्त्व अधोरेखित केलं. व्हिडीओ आणि टेक्स्ट हाच डिजिटल माध्यमांचा प्रमुख भाग असेल आणि खेड्यापाड्यातील सामान्य माणूस या डिजिटल माध्यमात सामावलेला दिसेल, असं परब म्हणाले. तर वेब पोर्टल आणि यू टूयब चॅनल तयार करून तरुणांनी स्वत:च या माध्यमात उतरावं, असं मत सुनील ढेपे यांनी व्यक्त केलं. वेब पोर्टल कसं तयार करावं, बातम्या कशा अपलोड कराव्यात, डोमेन आणि  टेम्प्लेट कसं खरेदी करावं याचं प्रात्यक्षिकही ढेपे यांनी करून दाखवलं.   
              अल्पावधीत लोकप्रिय झालेल्या ‘थोडक्यात’ या वेब पोर्टलची सक्सेस स्टोरी कृष्णा वर्पे यांनी उलगडून सांगितली. रोज बदलत जाणाऱ्या माध्यमांचा अभ्यास, अचूक निरीक्षण, लोकांना हवा असणारा कन्टेन्ट योग्य पध्दतीनं देण्याची हातोटी असेल, तर या माध्यमात सहज यशस्वी होऊ शकता असं ते म्हणाले. विनायक पाचलग यांनीही सोशल मीडियाचा अचूक वापर कसा करावा, याविषयी मार्गदर्शन केलं. कार्यशाळेला आलेल्या विद्यार्थ्यांच्या तांत्रिक अडचणींचंही त्यांनी निराकरण केलं. जगात इंटरनेट वापराच्या तुलनेत भारताचा क्रमांक सर्वात वरचा असून निवडणुकांच्या काळात डिजिटल मीडियात तरुणांसाठी कशा अनेक संधी उपलब्ध होतील, यावर त्यांनी भाष्य केलं.
                   या कार्यशाळेसाठी महाराष्ट्र आणि गोव्यामधून अनेक पत्रकार आणि पत्रकारिता शिकणारे विद्यार्थी आले होते. या प्रशिक्षणार्थींना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले. कॅलिडस इंटरनॅशनल मीडिया अँड आर्टस अकॅडमीचे संचालक पंकज इंगोले यांनी स्वागत आणि प्रास्ताविक केले.

या कार्यशाळेस महाराष्ट्र तसेच गोव्यातील जवळपास 50 प्रशिक्षणार्थीनी हजेरी लावली होती....गोव्यातील चार पत्रकार या कार्यशाळेस हजेरी लावून, गोव्यात डिजिटल मीडिया कार्यशाळा घेण्याचा मनोदय व्यक्त केला ....डिजिटल मीडिया कार्यशाळेमुळे मी अपडेट झालो !

पुण्यात कॅलिड्स इंटरनॅशनल मीडिया आर्ट्स अकॅडमीच्या वतीने शनिवारी दुसरी राज्यस्तरीय डिजिटल मीडिया कार्यशाळा पार पडली, यापूर्वी 15 ऑक्टोबर  रोजी कार्यशाळा झाली होती, या दोन्ही कार्यशाळेस मी उपस्थित होतो.
प्रिंट, टीव्ही मीडियानंतर आता वेब तथा डिजिटल मीडिया अस्तित्वात आला आहे, पत्रकारांना पत्रकारितेत टिकायचे असेल तर काळाबरोबर चालावे लागेल आणि त्यासाठी डिजिटल मीडियाचे प्रशिक्षण घेणे आवश्यक आहे.
डिजिटल आणि सोशल मीडियातुन पैसे कसे कमवावेत, हेही यातून शिकायला मिळाले. या कार्यशाळेमुळे मी खूपच अपडेट झालो, खूप काही नवीन शिकायला मिळाले, विशेषतः सम्राट फडणीस, सुनील ढेपे, सचिन परब, विनायक पाचलग यांचे मार्गदर्शन खूप मोलाचे ठरले.
अशी कार्यशाळा राज्यात ठिकठिकाणी झाली पाहिजे आणि त्यासाठी पत्रकार संघांनी पुढाकार घेण्याची गरज आहे.

- चंद्रशेखर भांगे
पुणे

शनिवार, २० जानेवारी, २०१८

महाराष्ट्रात नंबर 1 कोण ?

सकाळ आणि लोकमतने महाराष्ट्रात मराठी वृत्तपत्रात आपणच नंबर 1 असल्याचा दावा केला आहे.प्रत्यक्षात असणारा खप की त्याची वाचक संख्या यावरुन नंबर 1 कोण यावरून सध्या सकाळ आणि लोकमतमध्ये चांगलीच  जुंपली आहे.

आजपर्यंत ABC (ऑडिट सर्क्युलेशन ब्युरो) ची आकडेवारी हीच वृत्तपत्राच्या  खपाची खरी आकडेवारी समजली जात होती, मात्र लोकमतने हंसा  या   खासगी संस्थेमार्फत सर्व्हे करून, आपणच नंबर असल्याचा दावा वारंवार केलेला आहे.
ABC च्या आकडेवारीनुसार सकाळ महाराष्ट्रात नंबर 1 आहे, हे कोणीही नाकारू शकत नाही.
फ्री अंक, 3 रुपयांपेक्षा कमी किंमत आणि स्कीमचे अंक ABC ग्राह्य धरत नाही, त्यामुळे लोकमत मागे पडला, ही वस्तुस्थिती आहे.
आता नुकतीच आयआरएस ( इंडियन रीडरशिप सर्व्हे ) ची आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे, त्यात वाचकसंख्या महाराष्ट्रात नंबर 1 -लोकमत ,  क्रमांक २ - सकाळ तर क्रमांक - 3 पुण्यनगरी अशी संख्या दाखवण्यात आली आहे, पण यात  मोठी गेम आहे.
ही आकडेवारी नेमकी कशी मोजण्यात आली, हे एक कोडेच आहे.

असो, बेरक्याने केलेल्या सर्व्हेनुसार कोणत्या शहरात नेमके नंबर 1 कोण ? ते पाहा ...

> मुंबई - महाराष्ट्र टाइम्स
 > पुणे - सकाळ
(सकाळच्या निम्म्या खपात बाकी सर्व वृत्तपत्रे)
> कोल्हापूर - पुढारी 
  1.  > नागपूर , औरंगाबाद , नाशिक आणि जळगाव - लोकमत

# एकंदरीत खपात लोकमत आणि सकाळमध्ये मोठी स्पर्धा ...
# पुण्यनगरी क्रमांक 3 वर


डिजिटल मीडियाचे वारे
कागदाचे वाढलेले भाव, कर्मचाऱ्यांच्या वाढलेल्या पगारी आणि इतर खर्च प्रचंड वाढलेला आहे. त्यात नोटाबंदी पासून जाहिरातीचे उत्पन्न कमी झाले आहे. त्यामुळे सर्व  वृत्तपत्रे सध्या तोट्यात सुरु आहेत. त्यात वाचक हार्डकॉपीपेक्षा ईपेपरकडे वळला आहे. त्यामुळे वृत्तपत्र चालवणे सध्या अवघड झाले आहे.
सध्या डिजिटल मीडियाचे वारे जोरात वाहत आहे. वाचक सोशल मीडियावर सक्रिय झाला आहे. वेब पोर्टल, युट्युब चॅनल वाढले आहेत. त्यामुळे वृत्तपत्रांचे भविष्य अवघड झाले आहे. त्यात खपाची आकडेवारी टिकवून ठेवणे अवघड आहे.

शुक्रवार, १९ जानेवारी, २०१८

'सकाळ'च निर्विवाद नं. 1... महाराष्ट्राचं नं. 1 दैनिक !!

जाने-जून 2017 ABC नुसार, खपामध्ये महाराष्ट्रात सकाळ पहिल्या स्थानी, पुढारी दुसऱ्या स्थानी तर लोकमत तिसऱ्या स्थानी!!
IRS 2018 नुसार, पुण्यातील वाचकसंख्येत पुण्यात 'सकाळ'च नंबर 1 (11 लाख 43 हजार)...
 लोकमत दुसऱ्या स्थानी (11 लाख 31 हजार) ...तर पुढारी तिसऱ्या स्थानी (5 लाख 65 हजार)

महाराष्ट्र १ कडून खुलासा जारी ...

मुंबई - ऑन एयर बंद पडलेल्या महाराष्ट्र १ चॅनेलने ऑफ एयर एक खुलासा तयार करून तो जारी केला आहे, काही तांत्रिक कारणामुळे ऑन एयर चॅनल बंद पडले असून लवकरच ते सुरु होईल, असा खुलासा करण्यात आला आहे. पण नेमके किती तारखेला ऑन एअर सुरु होईल, हे सांगण्यात आलेलं नाही.
 महाराष्ट्र 1 ने अखेर गाशा गुंडाळला ... ऑन एयर चॅनल बंद ... सर्व कर्मचारी रस्स्त्यावर .. अनेक कर्मचाऱ्यांचा पगार आणि पीएफ बुडाला....असे वृत्त बेरक्यावर झळकताच एकच खळबळ उडाली आहे. अनेकांनी मागील पगारासाठी ऑफिसमध्ये  गर्दी करताच प्रशासनाची भंबेरी उडाली आहे. त्यामुळे खुलासा जारी करण्यात आला आहे.
हे चॅनल  आर्थिक अडचणीत सापडले आहे. येणारे जाहिरात उत्पन्न आणि होणारा खर्च याचा ताळमेळ बसत नाही. त्यामुळे हे चॅनल सर्व डीटीएच वरून गायब झाले. केबलवाल्यानीहि चॅनल दाखवणे बंद केले. दिल्लीवरून जे प्रक्षेपण सुरु होते, त्याचे बिलही न दिल्यामुळे हे चॅनल ऑन एअर बंद पडले आहे.
महाराष्ट्र १ चॅनल लवकरच ऑन एयर सुरु होईल  असा खुलासा करण्यात आला तरी,मागील कर्मचाऱ्याच्या सर्व पगारी आणि पीएफ केव्हा देणार याचा खुलासा करण्यात आलेला नाही.

गुरुवार, १८ जानेवारी, २०१८

जय महाराष्ट्र मध्ये गळती सुरू...

मुंबई - जय महाराष्ट्र न्यूज चॅनेलमध्ये गेल्या काही दिवसांपासून गळती सुरू झाली आहे.गेल्या एक महिन्यात  दहा ते बारा जणांनी चॅनलला " जय महाराष्ट्र" केला आहे. पगार वेळेवर होत नसल्याने कर्मचारी सोडून जात असल्याची माहिती आहे.
सोडून गेलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये वेदश्री ताम्हाणे, तन्मय टिल्लू, समीर सावंत, शिवाजी शिंदे, श्रेयस सावंत, रामनाथ दवणे, राजू सोनवणे, कृतिका पाटील, गौरी शिंदे, अंकिता शिंदे, सौरभ कोरटकर यांचा समावेश आहे. 
पॉलिटिकल रिपोर्टर मंगेश चिवटे याने नागपूर अधिवेशन संपल्यानंतर ऑफिसला तोंड दाखवले नाही.
तीन - तीन महिने पगार न होणे आणि त्यात वरिष्ठांकडून होणारी मुस्कटदाबी यामुळे गळती सुरू झाली आहे. भिकार वितरण आणि कंटेंट नसल्यामुळे चॅनेलचा टीआरपी 4 च्या पुढे सरकत नाही.येणारे उत्पन्न आणि होणारा खर्च याचा ताळमेळ बसत नसल्याने मालक शेट्टी त्रस्त आहेत.

पत्रकारांची चौकशी होणार !

कल्याण : बांधकाम व्यावसायिकाकडून खंडणी स्वीकारल्याप्रकरणी अटकेत असलेली माहिती अधिकार कार्यकर्ती चारु शीला पाटील हिच्या चौकशीदरम्यान अनेक नावे बाहेर येऊ लागली आहेत. त्यात काही पत्रकारांचीही चौकशी होणार आहे.
ठाकुर्ली-चोळेगाव येथे राहणारे बांधकाम व्यावसायिक सुरेंद्र पाटील यांच्याकडून चारु शीला हिने ५० लाख रुपयांची खंडणी मागितली होती. त्यात तडजोड होऊन २५ लाख देण्याचे ठरले होते. यातील दोन लाख रुपये चारु शीला हिने आधी घेतले होते. उर्वरित तीन आणि पाच लाखांचे धनादेश स्वीकारताना ठाणे खंडणीविरोधी पथकाने तिला रविवारी अटक केली. कल्याण सत्र न्यायालयाने तिला १८ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. चौकशीदरम्यान काही महत्त्वाची माहिती पुढे आली आहे.
महापालिका मुख्यालयातील राष्ट्रवादी काँग्रेस गटनेते कार्यालयातून पाटील हिने अनेक तक्रार अर्ज केले असल्याचेही पोलीस तपासात उघड झाले आहे. तसेच तक्रारदार सुरेंद्र पाटील व चारुशीला पाटील यांच्यातील देण्याघेण्याची बातचीतही या ठिकाणीच झाल्याचेही उघड झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस गटनेते कार्यालयातील खाजगी सचिवाला तसेच तेथील शिपायालाही खंडणीविरोधी पथकाच्या कार्यालयात चौकशीसाठी बोलावल्याने खळबळ उडाली आहे.
दरम्यान, तिच्या झालेल्या चौकशीत काही पत्रकारांची नावेही उघड झाली असून त्यांचीही चौकशी होणार असल्याचे वृत्त आहे. त्या पत्रकारांचा या खंडणी प्रकरणाशी संबंध आहे का, हे देखील तपासले जाणार आहे.
हे पत्रकार नेमके कोण आहेत, याची चवीने चर्चा सुरु आहे, 

साभार - लोकमत 
https://goo.gl/igdV4i

मंगळवार, १६ जानेवारी, २०१८

सकाळला हवे आहेत, उपसंपादक ...


सकाळ मीडिया  लवकरच 'सकाळ  मनी'  नावाची वेबसाईट सुरु करतंय.
यासाठी हवे नवे आहेत,  उपसंपादक ... 

 


गडचिरोलीचे पाकीट बहाद्दर पत्रकार विदेशवारीवर ...

गडचिरोली- गडचिरोली राज्याच्या टोकावर असलेला आणि नेहमी नक्षलवाद्याच्या कारवायांनी चर्चेत असलेला जिल्हा आहे माञ या कारवायासह इथल्या घडामोडी राज्याला कळवणारे गडचिरोलीतले पञकार आता स्वतः चर्चेत  आले आहेत.  या जिल्हयातल्या सगळया विभागीय वृत्तपञासह एका चॅनेलच्या प्रतिनिधीची विदेशवारीच्या बातमीने व्यवस्थापनाला अस्वस्थ करुन टाकले आहे.
गेल्या पाच दिवसापुर्वी गडचिरोलीतले 12 जिल्हा प्रतिनिधी चक्क सिंगापुर बॅकाक आणि पटायाच्या दौ-यावर गेले आहेत.  नक्षलवाद्याच्या बातम्यासह इतर बातम्या करताना आलेला थकवा दुर करण्यासाठी हा विदेश दौरा असल्याचे बोलले जात असले तरी या जिल्हा प्रतिनिधीच्या हाताखाली काम करणा-या काहीनी थेट नागपुरच्या मुख्य कार्यालयात या दौ-यासंदर्भात सांगितल्याने व्यवस्थापन चक्रावुन गेले आहे.  हे सगळे सुटी टाकुन गेले असले तरी त्यानी नागपुर कार्यालयाला विदेश दौ-याची कल्पना दिली नव्हती. गडचिरोली कार्यालयात या जिल्हा प्रतिनीधीनी कामासाठी राबवुनही पगारासंदर्भात   योग्य भुमिका न घेतल्याने  नाराज असलेल्था सहका-यानी थेट  नागपुर कार्यालयाच माहीती दिली .अखेर वृत्तपञातल्या नागपुरातल्या वरिष्ठानी या दौ-याची माहीती घेतल्यावर एक दोन नव्हे तर अकरा पञकार सामुहीकपणे विदेशवारीवर गेले असुन त्या दौ-याचे प्रायोजक ही एटापल्ली तालुक्यात पहाडावर लोहखनिजाचे उत्खनन करणारी कंपनी असल्याची माहीती मिळाल्याने नागपुर कार्यालयाने या प्रकाराची गंभीर दखल घेतली आहे .
एटापल्ली तालुक्यात सुरजागड पहाडावर लोहखनिजाच उत्खनन वादग्रस्त विषय असुन या तालुक्यातल्या जनतेसह ग्रामसभांचा उत्खननाला विरोध असुन आदीवासी नागरीकांनी नेहमीच आंदोलनाची भुमिका घेतली आहे. अशा संवेदनशील भागातल्या घडामोडी माध्यमामधुन येऊ नये याची काळजी लोहखनिज उत्खनन करण्याची जबाबदारी असणा-यानी घेतली होती त्यातुन या पञकाराना विशेष पॅकेजमधुन हा दौरा घडवल्याचे नागपुर कार्यालयाला काही कार्यालयीन पञकारासह जाहीरातीची  जबाबदारी असलेल्या कार्यालयीन प्रमुखाने कळवले असुन यात कहर म्हणजे पुण्याच्या नगरातल्या या वृत्तपञाच्या जिल्हा प्रतिनिधी ऐवजी गडचिरोली शहराच्या वृत्तसंकलनाची जबाबदारी असलेल्या प्रतिनिधीला नेल्याने जिल्हयाची जबाबदारी असलेले प्रतिनिधी संतप्त झाले असुन त्यानीही नागपुरच्या कार्यालयाला ही बाब कळवली आहे तर ही बातमी गडचिरोली शहरासह जिल्हयातल्या पञकारासह नागपुरातल्या वृत्तपञसृष्टीत पसरली आहे. एकुणच एका कंपनीच्या गैरव्यवहाराला आणि जनतेचा विरोध असलेल्या प्रकल्पाची पाठराखण करण्याचा हा प्रकार असुन दौ-यावरुन परतल्यानंतर व्यवस्थापन यावर भुमिका घेत याकडे सगळयाचे लक्ष लागले आहे माञ या प्रतिनिधीच्या हाताखाली काम करणारे सहाय्यक पञकार सर्वाधिक नाराज झाले आहेत.

रविवार, १४ जानेवारी, २०१८

पत्रकारांचे शेवटी हेच हाल होणार का ?

दिलीप आमलेंच्या निमित्ताने...

दैनिक लोकशाही वार्ताचे वृत्तसंपादक दिलीप आमले आज सकाळी गेलेत. कॅन्सर होता. घशाचा. नुकताच त्यांच्या अंत्यविधीहून आलोय. चितेचे निखारे अजून राख झालेले नाहीत आणि केवळ पत्रकारितेच्या कायम अस्थिर क्षेत्रात असल्यामुळे आमलेंना शेवटच्या काळात ज्या आर्थिक ज्वाळांनी भाजून काढले त्यांची धगही चितेच्या आगी इतकीच तीव्र आहे. थोडी-थोडकी नाही तब्बल २३ वर्षांची पत्रकारिता अन् शेवटचा पगार फक्त ३० हजार. गडी आजारी आहे, कामावर येऊ शकणार नाही, हे कळल्यावर तोही बंद झाला. मुलगी नुकतीच बारावी झाली होती. कधीही घराबाहेर न पडलेली. बारावीत असताना उच्च शिक्षणाचे स्वप्न रंगवणारी. वडील आजाराने घरी बसलेत, होेते-नव्हते कॅन्सरने आपल्या घशात घातले. परिणामी पुरेशे जबाबदारीचे भानही न आलेल्या या मुलीला घर चालावे यासाठी नोकरी शोधावी लागली. मुलगा तर दहावतीच. काय पैसे कमावणार? आमले याही स्थितीत आजार आणि परिस्थितीशी जोरदार लढले अन् अखेर आज कोसळले.
 हे लिहिण्यामागे कुणाच्या सहानुभूतीची अपेक्षा नाही. ही रडकथाही नाही. महिन्याला २०-२५ हजार रुपये कमावणारी पत्रकार नावाची जी मध्यमवर्गीय जमात आहे तिच्या अस्थिर आयुष्याचे जळजळीत वास्तव फक्त मांडायचे आहे. आमलेंना वा त्यांच्यासारख्या अद्याप हयात असलेल्या हजारो मध्यमवर्गीय पत्रकारांना कुणी या बेभरोवशाच्या क्षेत्रात करिअर कर असे निमंत्रण दिले नाही. त्यामुळे अर्थातच कुणावर रोष वा राग नाही. पण, एका गोष्टीकडे मात्र लक्ष नक्की वेधायचे आहे. पत्रकार हाच दैनिकाचा आत्मा आहे. तो बातमीत जीव ओततो म्हणून ती वाचनीय होते आणि ती वाचनीय असते म्हणून दैनिकाचा खप वाढतो आणि दैनिकाचा खप वाढतो म्हणून जाहिराती मिळतात आणि जाहिराती मिळतात म्हणून दैनिकाचा महसूल वाढतो. पण, यातला किती वाटा प्रत्यक्ष पत्रकाराला मिळतो? वाटयाचे जाऊ द्या एखादवेळी अपघाताने असे दुर्धर आजारपण आलेच तर कुटुंबाला किमान दोेन महिने पुरेल इतक्या किराण्याची हमी तर कुणी देतो का? बोनस, एलटीए हा प्रकारही तोपर्यंतच जोपर्यंत तुमच्या पगारातून कपात होतेय. पगार थांबला की सारेच बंद. महागाई शंभर टक्क्याने वाढत असताना वेतनवाढीचे प्रमाण दोन टक्के असते. तेही ‘आले कंपनीच्या मना...’ तर नाही तर नोटाबंदी, जीएसटीसारखी कारणे दरवर्षी ठरलेलीच. नाही म्हणायला १५ हजारांपर्यंत इसआयसी आहे. पण, तिची मदत म्हणजे ‘उडते को तिनखे का सहारा’ यापेक्षा जास्त नाही. या विदारक स्थितीत जगणाºया पत्रकाराच्याच कार्यालयातील इतर विभागात मात्र बाराही महिने दिवाळी असते. कारण...ते जाहिराती आणतात, दैनिकाला सर्वदूर पोहोचवतात, भव्य आयोजन करून दैनिकाचे ब्रॅडिंग करतात. पत्रकार काय करतो...लेखनीच तर खरडतो. या कॉर्पोरेट मानसिकतेपायी इतर सर्व विभागातील लोक कारने कार्यालयात येतात आणि पत्रकार मोडक्या दुचाकीने. आमले याच कॉर्पोरेट मानसिकतेचे बळी ठरलेत आणि पुढे आमच्यासारखे अनेक ठरण्याच्या मार्गावर आहेत. कुठल्याही ुदैनिकातून संपादकीय भाग काढून टाका. आकर्षक जाहिराती द्या, तूफान गतीने पहाटे पेपर पोहोचवा, मोठमोठे लकी ड्रॉ काढा आणि केवळ याच बळावर दैनिक विकून दाखवा. घेईल का कुणी? नाहीच घेणार. का नाही घेणार? कारण बातम्यांशिवाय दैनिक निष्प्राण आहे. मग हा प्राण दैनिकात घालतो कोण? पत्रकार? आमलेंसारखाच प्रामाणिक मध्यमवर्गीय पत्रकार ज्याला मी पैशांअभावी धगधगत्या चितेत जळताना पाहून परतलोय? या आर्थिक अवहेलनेसाठीच स्वीकारली होती का त्यांनी ही वेगळी वाट? लेखनीची ताकद, सामाजिक बांधिलकी, अन्यायाला वाचा, समाजाला दिशा या सगळया खरच फालतू गोष्टी आहेत का? की हा कधीकाळी समाजाला वैचारिक नेतृत्व देणारा लोकशाहीचा चौथ्या स्तंभ कॉर्पोरेट कल्चर या मोहक शब्दाच्या मृगजळात समाज तर दूरची गोष्ट आपल्याच कुटुुुंबातील सदस्यांना परका झालाय? आज आमले गेलेत, उद्या कुणी दुसरा असेल. दैनिकाचा रहाटगाडगा थांबणार नाहीच. पण, आमलेंमागे असलेल्या निराधार चार जीवांचे काय होणार, आमलेंच्याच जातकुळीतील इतर पत्रकारांना किती दिवस अशाच अस्थिर, विदारक स्थितीत रोज नव्या संघर्षाला सामोरे जावे लागणार, याचा विचार कधी कुणीच करणार नाही का?
 
Shafi Pathan यांच्या फेसबुक वॉलवरून


पुण्यात 'डिजिटल मीडिया'वर कार्यशाळा

पुणे - कॅलिडस इंटरनॅशनल मीडिया अँड आर्ट्स अकॅडमीच्या वतीने पुण्यात शनिवार, दि. 20 जानेवारी रोजी 'डिजिटल मीडिया'वर एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेत फक्त ५० जणांना प्रवेश देण्यात येणार असून, त्याची नावनोंदणी सध्या सुरु आहे.
प्रिंट, टीव्ही मीडियानंतर आता डिजिटल तथा वेब मीडिया अस्तित्वात आला आहे. प्रिंट आणि टीव्ही मीडियाला डिजिटल मीडियाची गरज भासत आहे. येणाऱ्या काळातील या माध्यमाचे महत्व, त्याची व्याप्ती आणि आवाका, ऑनलाईनमधील क्रिएटिव्हिटी आणि हिट्स, वेबसाईट कशी अपलोड करावी, वेब मीडियासाठी रिपोर्टींग,वेब पोर्टलचे आर्थिक गणित... याविषयी या कार्यशाळेत प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
त्यात 'सकाळ'चे डिजिटल संपादक सम्राट फडणीस, साम चॅनेलचे संपादक निलेश खरे, 'महाराष्ट्र लाइव्ह'चे संपादक सुनील ढेपे आणि मुक्त पत्रकार सचिन परब हे मागर्दशन करणार आहेत.
या कार्यशाळेत प्रवेश घेण्यासाठी इच्छुकांनी कॅलिडस इंटरनॅशनल मीडिया अँड आर्ट्स अकॅडमी 020- 25445511 आणि 9766374602 यांच्याशी संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


शनिवार, १३ जानेवारी, २०१८

निरगुडकर झी २४ तास विसरू शकत नाहीत...

मुंबई - झी २४ तासमध्ये पाच वर्षे घालवल्यानंतर उदय निरगुडकर News १८ लोकमतला एक महिन्यापूर्वी जॉईन झाले, मात्र अजूनही  त्यांच्या डोक्यातून झी २४ तास पुसू शकले नाहीत. एका डिबेट शो मध्ये ब्रेक घेताना News १८ लोकमत म्हणण्याऐवजी झी २४ तास म्हणणार होते, पण चुक लक्षात येताच त्यांनी सारवासारव केली...
पाहा लाइव्ह ...


शुक्रवार, १२ जानेवारी, २०१८

निखिल वागळे लवकरच ...

मुंबई - महाराष्ट्र 1 मधून बाहेर पडल्यानंतर ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे नेमके कुठे जॉईन होणार ? असा प्रश्न अनेकांना पडला आहे, मात्र ते आता कुठेही जॉईन होणार नाहीत तर स्वतःचे वेब पोर्टल सुरु करणार आहेत... याबाबतची घोषणा वागळे यांनी स्वतः केली आहे.
IBN लोकमत मध्ये सात वर्षे  घालवल्यावर मी मराठी करून वागळे महाराष्ट्र 1 मध्ये जॉईन झाले होते, मात्र एका वर्षातच त्यांनी हे चॅनेल सोडले, त्यानंतर ते नेमके कुठे जॉईन होणार, याकडे लक्ष लागले होते, मात्र सध्या चॅनेलमध्ये स्पेस नसल्याने वागळे यांनी, स्वतःचे वेब पोर्टल सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
हे वेब पोर्टल जनतेकडून पैसे गोळा करून, सुरू करणार असल्याचे ट्विट वागळे यांनी केले आहे.वागळे म्हणतात की,
Dear all, 
I am starting a foundation to promote people’s media. It will have various activities. One of them is a web portal with the help of crowd funding. We have to use this new medium powerfully.
Please support and spread word. 
Nikhil Wagle

वागळे यांचे वेब पोर्टल कसे राहणार, नाव काय राहणार, त्याला कितपत प्रतिसाद मिळणार ? याबाबतची माहिती बेरक्यावर प्रसिद्ध होईल, तोपर्यंत बाय बाय ...

फेसबुक वर शेअर करा

Facebook