> बेरक्याला माहिती देण्यासाठी ई - मेल करा - berkya2011@gmail.com

शनिवार, ३१ मार्च, २०१८

'वरखडे' यांना पुण्यनगरीतून 'भागा'चा आदेश !

पुणे - पुण्यात पुण्यनगरीचा खप दिवसेंदिवस घसरत चाललाय, त्यामुळे वैतागलेल्या बाबांनी काल निवासी संपादक भागा  वरखडे  आणि सहसंपादक सुनील देशपांडे यांचा राजीनामा घेतलाय. त्यांचे राजीनामे 'एप्रिल फुल' ठरणार की खरोखरच घरी पाठवणार हे लवकरच कळेल, मात्र दुसरीकडे संपादकीय वृत्तविभाग प्रमुख म्हणून श्रीकांत साबळे यांना नेमणूकपत्र देण्यात आले असून साबळे २ मे रोजी पुण्यनगरीत जॉईन होणार असल्याचे कळते.
पुण्यनगरीची सुरुवात पुण्यापासून झाली आणि बघता बघता संबंध महाराष्ट्रात पुण्यनगरीच्या आवृत्या सुरु झाल्या, मात्र जेथून सुरुवात झाली तेथेच पुण्यनगरीला उतरती कळा सुरु झाली आहे. खप ७० हजारहून १७ हजारावर आला आहे. त्यात पुण्यनगरीतील अंतर्गत राजकारण खपाला  मारक ठरत आहे.
नगरच्या कोपरगावमध्ये उदय भविष्यपत्रात 'भविष्य'  न घडल्यामुळे भागा  वरखडे   पुण्यात पुण्यनगरीत आले होते, मागे त्याना एका xx प्रकरणावरून पिंपरी चिंचवड मध्ये पाठवण्यात आले होते पण गोपाळ जोशी यांची विकेट पडताच त्यांना पुन्हा पुण्यात घेण्यात आले पण येथील राजकारणाचा वरखडे पुन्हा बळी पडले असून त्यांना पुन्हा नगरला 'भागा' म्हणून सांगण्यात आले आहे. बाबाचा स्वभाव लहरी आहे, त्यामुळे भागाला बाबा कायमचे जा म्हणतात की एप्रिल फुल होते म्हणून सांगतात हे लवकरच कळेल...
दुसरीकडे संपादकीय वृत्तविभाग प्रमुख म्हणून सोलापूरच्या पुढारीचे ब्युरो श्रीकांत साबळे यांना नेमणूकपत्र देण्यात आले आहे, साबळे यांनी पुढारीला रामराम ठोकला असून ते २ मे रोजी पुण्यनगरीत  जॉईन होणार आहेत. साबळे येताच सुनील देशपांडे किंवा भागा वरखडे यांना कायमचा घरचा रस्ता धरावा  लागेल,  हे मात्र नक्की आहे..
जाता जाता
पुण्य नगरीच्या मुख्य संपादक पदासाठी मानबिंदूच्या  एका 'राजा'चे नाव आघाडीवर आहे. त्यामुळे मॅडम सलाईनवर आहेत. राजा आल्यास अनेक 'प्रधान' घरी जाण्याची  शक्यता आहे...

बुधवार, २८ मार्च, २०१८

पुन्हा तेच ! कुठे नेवून ठेवला बाबुजीचा मानबिंदू ?

आजच्या लोकमतमधील घोडचूक पहा !

लोकमतच्या पान क्र. दोनवरील "रुग्णालयातून पळालेला दरोडेखोर १५ तासात जेरबंद" या मथळ्याखाली बीडची बातमी आहे. या बातमीत जो खरा दरोडेखोर पळून गेला, त्याचे नाव नाही. तर त्यात जालन्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाच घेतांना पकडलेल्या 'राजेंद्र तुळशीराम वेलदोडे' या पोलीस हवालदाराचे नाव घुसडविले आहे.
या दोन्ही बातम्या पहा, आजच्या लोकमतच्या अंकातील..!


परवाच बीडच्या बातमीतच जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्या ऐवजी  जिल्हा पोलीस अधिकाऱ्याला कोठडी ! असे लिहून मोठी घोडचूक केली होती... 

मंगळवार, २७ मार्च, २०१८

स्टिंग ऑपरेशन’ने फुटले बिंग, जातीयवादी वार्तांकनासाठी माध्यमांची ‘डील'

नवी दिल्ली  'कोब्रापोस्ट' या शोधपत्रकारिता करणाऱ्या समुहाच्या एका स्टिंग ऑपरेशनमुळे भारतातील प्रसारमाध्यमांमधील गैरप्रकार चव्हाट्यावर आले आहेत. जातीयवादी वार्तांकनासाठी देशातील ख्यातनाम १७ वृत्तवाहिन्या व वृत्तपत्र समुहाच्या अधिकाऱ्यांनी तयारी दर्शवली. माध्यमांमधील 'कॅश फॉर न्यूज'च्या स्टिंग ऑपरेशनमुळे देशभरात खळबळ उडाली आहे. इंडिया टीव्ही, डीएनए, दैनिक जागरण, अमर उजाला आणि स्कूपव्हूप अशा दिग्गज कंपन्याचे प्रतिनिधी या स्टिंग ऑपरेशनमध्ये कैद झाले आहेत.
कोब्रापोस्टने 'ऑपरेशन १३६' हे स्टिंग ऑपरेशन हाती घेतले होते. सोमवारी कोब्रापोस्टने हे स्टिंग ऑपरेशन प्रसारित केले. यात पत्रकार पुष्प शर्मा यांनी आचार्य अटल या नावाने विविध वृत्तवाहिन्या आणि वृत्तपत्र समुहातील अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. अटल यांनी त्यांचा संबंध उज्जैनमधील एका आश्रमाशी असल्याचे सांगितले होते.

'स्टिंग ऑपरेशनमध्ये १७ कंपन्यांच्या प्रतिनिधींनी 'मवाळ हिंदुत्वा'चा मुद्दा रेटण्याची तयारी दर्शवली. पैसे घेऊन तशा बातम्या देण्याची ऑफर त्यांनी स्वीकारली. विशेष म्हणजे या व्यवहाराची पावती मात्र दिली जाणार नव्हती. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, अखिलेश यादव, मायावती, भाजपा नेते अरुण जेटली, मनोज सिन्हा, जयंत सिन्हा, मनेका गांधी आणि वरुण गांधी यांची नकारात्मक प्रतिमा निर्माण करण्याची तयारीही या मंडळींनी दर्शवली. कोब्रापोस्टच्या स्टिंग ऑपरेशनमध्ये अडकलेले सर्व अधिकारी हे कंपनीत मोठ्या पदांवर कार्यरत आहेत. त्यामुळे या स्टिंग ऑपरेशनमुळे खळबळ उडाली.

या कंपन्या अडचणीत
डीएनए, दैनिक जागरण, अमर उजाला, इंडिया टीव्ही, स्कूपव्हूप, प्राईम, पंजाब केसरी, यूएनआय न्यूज, ९ एक्स टशन, समाचार प्लस, आज हिंदी डेली, स्वतंत्र भारत, इंडिया वॉच, एचएनएच २४ बाय ७, रेडिफ डॉटकॉम, सब टीव्ही, हिंदी खबर

सोमवार, २६ मार्च, २०१८

मध्य प्रदेशात ट्रकखाली चिरडून पत्रकाराची हत्या

भोपाळ : एका पत्रकाराची ट्रकखाली चिरडून हत्या घडवून आणण्यात आल्याची धक्कादायक घटना मध्य प्रदेशातील भिंड येथे घडली आहे. वाळूमाफिया आणि पोलीस अधिकाऱ्याचे स्टिंग ऑपरेशन केल्याच्या रागातून हे कृत्य करण्यात आल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे. दरम्यान, मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी याप्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन दिले आहे.

संदीप शर्मा 'न्यूज वर्ल्ड चॅनेल' या वृत्तवाहिनीसाठी स्ट्रिंजर म्हणून काम करत होते. मध्य प्रदेशातील भिंड शहरात झालेला हा प्रकार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे.

वाळूमाफिया आणि पोलीस अधिकाऱ्याचं स्टिंग ऑपरेशन केल्याच्या रागातून संदीप शर्मांची हत्या झाल्याचं बोललं जात आहे.

दुचाकीस्वार संदीप शर्मा यांना ट्रकने धडक देऊन चिरडलं. अपघातात गंभीर जखमी झालेल्या संदीप यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

आपल्या जीवाला धोका असल्याचं सांगत संदीप चव्हाण यांनी पोलिस सुरक्षेची मागणीही केली होती. बेकायदेशीर वाळू उत्खनन करणाऱ्या माफियांसोबत पोलिसांचं साटंलोटं असल्याचा आरोपही त्यांनी केला होता.

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल, असं आश्वासन दिले आहे.शनिवार, २४ मार्च, २०१८

मानबिंदूच्या संपादकीय मंडळींच्या डुलक्या !

म्हणे जिल्हा पोलीस अधिकाऱ्याला कोठडी !
अरे बातमी वाचून तरी हेडिंग द्या !

बीड - औरंगाबादचे शेठजी खप वाढविण्यासाठी जीवाचा आटापिटा करीत असताना संपादक मात्र निव्वळ झोपा काढण्याचे काम करीत असल्याचे दिसत आहे. बीडच्या पुरवठा अधिकाऱ्याला पोलीस कोठडी मिळाल्याची बातमी छापताना महाराष्ट्राच्या मानबिंदुत चक्क जिल्हा पोलीस अधिकाऱ्याला पोलीस कोठडी, अशी धडधडीत बातमी छापून आली आहे. त्यामुळे जिल्हा पोलीस प्रमुखांना नाहक त्रास सहन करावा लागला आहे आणि त्यांच्याविषयी गैरसमज निर्माण झाला तो वेगळाच. शिवाय याच बातमीत पोलीस कोठडी २६ मार्च पर्यंत दिलेली असताना १६ मार्च असे छापून आले आहे. हेडींगमध्येच घोडचूक झालेली असताना संपादक आणि वृत्तसंपादक झोपा काढत होते का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. शेठजी, आता झोपलेल्यांना जागे करा. या लोकांना आपल्या वृत्तपत्राचे काहीच पडलेले नाही. सगळे सरकारी बाबू झालेत.बाबुजी, या बाबूनां आता तरी वठणीवर आणा, अशी आर्त हाक बीडकर मारत आहेत..

बुधवार, २१ मार्च, २०१८

तोतया पत्रकार सुधाकर वाढवे विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल

हिंगोली - एका बियरबार मालकास दरमहा पाच हजार रुपयाची खंडणी मागणारा तोतया पत्रकार सुधाकर वाढवे याच्याविरुद्ध हिंगोली शहर पोलिस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील बंजारा बियरबार मध्ये दारू पार्टी करून बिल न देता उलट मालकास दरमहा पाच हजार रुपयाची खंडणी मागितली असता, मालक संदीप बांगर यांच्या तक्रारीवरून वाढवे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
वाढवे हा एका चॅनलचा बूम घेवून अधिकारी आणि बार मालक यांच्याविरुद्ध खंडणी उकळत होता, कोणाची तक्रार असल्यास पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

रविवार, १८ मार्च, २०१८

राहुल गडपाले ‘सकाळ’चे चीफ कन्टेंट क्‍युरेटर; फडणीस पुण्याचे कन्टेंट क्‍युरेटर

पुणे : बेरक्याने २८ फेब्रुवारी रोजी दिलेलं वृत्त तंतोतंत खरे ठरले. सकाळ माध्यम समूहाच्या संपादक संचालकपदी श्रीराम पवार आणि चीफ कन्टेंट क्‍युरेटरपदी (मुख्य संपादक) राहुल गडपाले यांची नियुक्ती झाली आहे. पुणे आवृत्तीच्या कन्टेंट क्‍युरेटरपदी (संपादक) सम्राट फडणीस आणि समूहाच्या एक्‍झिक्‍युटिव्ह कन्टेंट क्‍युरेटरपदी शीतल पवार यांची नियुक्ती झाली आहे.  आज सकाळ माध्यम समूहाने याची  अधिकृत घोषणा केली आहे.
माहितीचा वेग आणि उपलब्धता, सोशल मीडियाचा विस्तार आणि मुद्रित माध्यमाची विश्वासार्हता या घटकांचा विचार करून समूहाने संपादकपदाच्या जबाबदाऱ्यांमध्ये वाढ केली आहे. माहितीची विश्वासार्हता या प्राथमिक घटकासोबत वाचकांना विविध माध्यमांद्वारे आणि सर्वंकष माहिती पुरविणे ही ‘क्‍युरेटर’ची जबाबदारी आता संपादकीय कामकाजाचा प्रमुख भाग राहील.
श्रीराम पवार गेल्या पंधरा वर्षांहून अधिक काळ समूहात विविध संपादकीय पदांवर कार्यरत आहेत.
राहुल गडपाले सध्या ‘सकाळ’च्या मुंबई आवृत्तीचे संपादक आहेत. विविध माध्यम समूहांमध्ये संपादकीय जबाबदाऱ्या त्यांनी सांभाळल्या आहेत. राजकारण, शहरीकरण, गृहनिर्माण आणि पायाभूत सुविधा आदी त्यांचे अभ्यासाचे विषय आहेत.
सम्राट फडणीस ‘सकाळ’च्या डिजिटल माध्यमाचे निवासी संपादक आहेत. विद्यार्थी बातमीदार ते संपादक असा त्यांचा विविध माध्यम समूहांमधील प्रवास आहे.
शीतल पवार संगणक अभियंता आहेत. टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायसेन्स (टीआयएसएस) संस्थेतून त्यांनी समाजशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. शहरीकरण, माध्यमे आणि राजकारण आदी त्यांचे अभ्यासाचे विषय आहेत.
गडपाले ‘सकाळ’ समूहाच्या सर्व आवृत्त्यांच्या संपादकीय समन्वयाची, मुख्य संपादकपदाची जबाबदारी सांभाळतील. फडणीस पुणे आवृत्तीच्या संपादकीय समन्वयाची, संपादकपदाची जबाबदारी सांभाळतील.

तरुणांच्या हातात सकाळ
राहुल गडपालेचं  वय ३२.शितल पवारचं  वय २८.आणि सम्राट फडणीसचं ४२.या तरुणाच्या हातात सकाळची सूत्रे आली आहेत.
देश तरूणांचा, तरूण हेच देशाचं भविष्य वगैरे भाषणं आणि लेख असतात. सकाळनं पूर्ण संपादकीय व्यवस्थापन तरूणांच्या हाती सोपवलंय.शनिवार, १७ मार्च, २०१८

स्मार्ट मित्रमधून शेठजीची हकालपट्टी !

 उस्मानाबाद - पत्रकारितेच्या नावावर दुकानदारी करणाऱ्या शेठजीची अखेर "स्मार्ट मित्र" मधून हकालपट्टी करण्यात आली आहे.

एका काँग्रेस नेत्याकडून 1 लाख 20 हजार रुपये घेवून  स्मार्ट मित्रमध्ये जाहीरात न छापता रक्कम हडप करणारा,  लोकमंगलकडून पत्रकारासाठी आलेले तुपाचे डबे आणि साखर कारखान्याकडून आलेले साखरेचे पोते लंपास करणारा   हा शेटजी अनेकांना शेंडी लावत होता. याच गुणामुळे महाराष्ट्राचा मानबिंदू आणि पद्मश्रीच्या पेपरातून  त्याची यापूर्वीच हकालपट्टी झाली होती, आता उरले सुरले "स्मार्ट मित्र"ही हातचे गेल्याने तो आपला "समय" कसा  घालवावा या "स्वार्थी" विवंचनेत आहे.

पत्रकार संघटनेचा अध्यक्ष असताना या शेठजीने अनेक  अधिकाऱ्याकडून देणग्या उकळून स्वतः चे खिसे भरले होते, केवळ दुकानदारी करण्यासाठी पत्रकारिता करणारा हा  शेठजी आता लंगोटी पेपर काढण्याच्या तयारीत आहे, पण त्याच्या गुणांवर साधा ऑपरेटर सुद्धा त्याला  मिळत नाही, हे दुर्दैव !

येवू घातलेल्या लंगोटी पेपरला जाहिराती मिळाव्यात म्हणून तो स्मार्ट मित्रचे नाव  सांगत असून त्याचा स्मार्ट मित्रशी कसलाही संबंध नाही, हे आज उघड झाले  आहे ...

गुरुवार, १५ मार्च, २०१८

वागळेंना मुंडेंचे उत्तर ...

ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांनी काही दिवसांपूर्वी 'टबमध्ये झाला भारतीय टीव्ही पत्रकारीतेचा मृत्यू' ह्या मथळ्याखाली  लेख लिहिला होता, त्याला टीव्ही ९ चे माणिक मुंडे यांनी उत्तर लिहिले आहे.. 


टीव्ही 9 नंबर 1 आले कसे?

विजय तेंडुलकरांच्या औंदुबर नावाच्या लेखानं मला एवढं जखडून ठेवलं होतं की गुरुवारी येणाऱ्या टीआरपीच्या आकड्यांचंही भान नव्हतं. एबीपी माझातल्या माझ्या एकेकाळाच्या सहकाऱ्याचा फोन आला त्यावेळेस औंदूबरमधून बाहेर आलो. तो म्हणाला, कोणता बोकड कापला होता बे तुम्ही, एवढा टीआरपी आला? क्षणभर मला लक्षातच आलं नाही की हा काय बोलतोय. नंतर लक्षात आलं, आज गुरुवार म्हणजे टीआरपीचे आकडे आले असणार. मग त्यानंच सांगितलं, टीव्ही 9 ला 16 पॉईंटसची जंप आहे आणि अर्थातच चॅनल नंबर वन. मी म्हणालो जाता जाता श्रीदेवी घरच्यांना प्रॉपर्टी देऊन गेली आणि आम्हाला टीआरपी तोही चॅनलला नंबर वन बनवणारा. सगळं हसत खेळत बोलणं. 

 फोन ठेवता ठेवता तो म्हणाला, तुम्ही तिला पुन्हा एकदा बाथटबमध्ये मारलं, त्याच्या बोलण्यात एक मिश्किलपणा होता. थोडासा हेटाळणीचाही सुर. मी शेवटी त्याला एवढंच म्हणालो की, 'माझा' जसं बराच काळ दोन नंबरवर गेलेलं होतं, तसं आताही असतं तर तुम्ही श्रीदेवीची बिकिनी सापडली असती तर तीही दाखवली असती, एवढच नाही तर तशीच नवी बिकिनी विकत आणली असती, त्याच साईजची मॉडेलही आणून उभी केली असती. सिस्टर चॅनल एबीपी न्यूजनं मौत का बाथटब नाही केला का? अर्थातच त्याचंही मी समर्थनच केलं असतं. पोलीसांनी क्राईम सीन क्रिअट करणं गुन्हा नसेल तर पत्रकारांनी तसं करण्यात चुक कशी असू शकते? पोलीसांनी क्राईम सीन क्रिअट करण्याचा उद्देश काय असतो? गुन्हा समजून घेणं, टीव्ही चॅनल्सचा काय उद्देश असेल? प्रेक्षकांना घडलेली घटना सोप्या पद्धतीनं दाखवून देणं. यात नैतिक-अनैतिकतेचा प्रश्न येतो कुठून?
        
 निखिल वागळे सरांनी 'टबमध्ये झाला भारतीय टीव्ही पत्रकारीतेचा मृत्यू' ह्या मथळ्याखाली एक लेख लिहिलाय. अर्थात बातमी भुतकाळात सांगायची नसते हे ते मथळ्यातच विसरून गेलेले दिसतात. त्या लेखात ते लिहितात, त्या 72 तासात भारतीय पत्रकारिता बाथटबमध्ये बुडाली. मराठीतलं एखादं चॅनल सोडलं तर इतर कुणी श्रीदेवीच्या मृत्यूबाबत बीभत्सपणा केला नाही असंही ते लिहितात.  त्यांचा रोख टीव्ही 9 बद्दल आहे. टीव्ही 9 हे एकमेव चॅनल होतं ज्यानं श्रीदेवीच्या मृत्यूचं कव्हरेज सलग चार दिवस केलं. दुसरी क्वचितच बातमी गेली असेल. वागळे सरांना आक्षेप ह्या सलग कव्हरेज करण्याबद्दल आहे. पण एखाद्या बातमीचं सलग चार दिवस कव्हरेज करणं तुम्हाला एवढं सोपं वाटतं? कंटेंट काय आकाशातून पडतो? तेही टीव्ही 9 सारखं चॅनल जिथं रिपिटला फार चान्स नसतो. एखाद्याच्या मृत्यूच्या वेगवेगळ्या शक्यता धूंडाळणं म्हणजे बीभत्सपणा असतो? आताचे मराठीतले किती संपादक किंवा आभासी संपादक (संदीप रामदासी यांचा शब्द जे स्वत:ला संपादक समजत न्यूजरूममध्ये वावरत असतात) आहेत जे एखाद्या बातमीचं सलग चार दिवस कव्हरेज करण्याची क्षमता ठेवतात? श्रीदेवीच्या मृत्यूचं सोडा, ह्यांनी कुठल्या तरी बातमीचं मोठं कव्हरेज केल्याचं तुम्ही पाहिलंय का? दुसऱ्या एका चॅनलमधला सहकारी मला त्याच दिवसात भेटला होता. तो म्हणाला, आम्हाला दोन पॅकेज करायचे श्रीदेवीबद्दल तर मारामार होतेय, तुम्ही एवढं कंटेंट आणताय कुठून? नंबर 1 चॅनलनं एखादी गोष्ट न करणं त्यांना परवडतं. कारण ते नंबर वन आहेत, इतरांचं काय, नंबर वनला फॉलो करणं म्हणजे सुसाईडच ठरते ना?
             
बरं बातमीवर बळजबरी नाही चालत, मुळात त्या बातमीत तशा क्षमता लागतात. आणि त्या क्षमता ओळखणारा उत्तम भविष्यकार. एखादा म्हणाला की मी ही बातमी अशीच चार दिवस चालून दाखवतो तर शक्यच नाही. आणि एखादा म्हणाला की मी दाबून दाखवतो तर तेही शक्य नाही. उत्तम बातमी कशाचीच मोहताज नसते. बळजबरीनं चालत असलेल्या बातमीसारखं टीव्हीवर दुसरं काही विद्रुप नाही. 
        
वागळे सरांच्या लेखात त्यांनी बाजारूपणाचा उल्लेख केलाय. एवढच नाही तर चॅनल्सवाले कसे चेकाळले होते अशीही भाषा वापरलीय. त्यात स्वत:च्या शुचितेचा दाखला देताना त्यांनी आयबीएन लोकमतच्या त्यांच्या संपादकिय दिवसातला दाखला दिलाय. ते ज्या चॅनलचे सात वर्षे संपादक होते, त्याच चॅनलचा मी जवळपास 14 महिने न्यूज एडीटर होतो, त्यात 4 महिने माझ्याकडं मुख्य संपादकाची जबाबदारी होती. बीव्ही राव सर्वेसर्वा होते. आयबीएन लोकमत हे खुद्द वागळे सरांच्या काळातही कधीच महाराष्ट्राचं नंबर वन चॅनल झालं नाही. का? बरं रिलायन्सनं नंतर ते हातात घेतलं आणि  बाजारू केलं असं त्याचं म्हणनं असेल तर मग महाराष्ट्र 1 नावाच्या चॅनलचेही ते संपादक होते, त्याचं त्यांनी काय केलं? आपण सोडून गेल्यानंतर जर ते चॅनल उत्तम चाललं तर समजावं आपण काही तरी चांगलं उभं केलंय, पडझड झाली तर ते सर्वात मोठं अपयश. मग वागळे सर संपादक म्हणून यशस्वी झाले?        
        
वागळे सर पहिल्यापासून कायम टीआरपीच्या गणितातून पळ काढतात. ह्या लेखातही त्यांनी चांगले कार्यक्रम केलं की पुरेसं आहे असं म्हटलंय. आम्ही काही टीआरपीच्या मागे लागत नाही असं ते थोतांड मानतात. तुमच्या मान्य करण्या न करण्यानं काय फरक पडतो. चॅनलचं सगळं भविष्य आणि अस्तित्व तर टीआरपीवरच आहे ना? माझं असं म्हणणं आहे की, वागळे सरांची अवस्था त्या गाडी ड्रायव्हरसारखी आहे ज्याच्या गाडीचा कधी अपघातच झाला नाही. कारण त्यानं गाडी कधी फलाटातूनच काढली नाही? जो माणूस टीआरपी आणू शकत नाही, त्यानं टीआरपीवर का बोलावं? अगोदर टीआरपी आणून दाखवा ना? तोही चॅनलचा, स्वत:च्या एखाद्या कार्यक्रमाचा नाही, तुम्ही संपादक पूर्ण चॅनलचे आहात ना? बरं टीआरपी काय आहे? तुमचा कार्यक्रम किती लोकांनी बघितला हे सांगणारी व्यवस्था. बरं समजा वागळे सर म्हणतात तसा खुप चांगला कार्यक्रम बनवला पण तो कुणी पाहिलाच नाही तर त्याचा उपयोग काय? जंगल मे मोर नाचा देखा किसने? टीआरपी नाकारून त्यांनी चॅनल डबघाईला नाही आणले? महाराष्ट्र 1 नावाचं चॅनल त्यांनी टीआरपीत चालवलं असतं तर शंभर, दोनशे कुटुंबांसह महाराष्ट्राचंच भलं झालं असतं ना?
        
बरं वागळे सरांसारखे संपादक प्रेक्षकांना मुर्ख समजतात आणि सगळं शहाणपण स्वत:कडे घेतात. श्रीदेवीच्या लेखातही त्यांनी ह्याचा उल्लेख केलाय. वागळे सरांच्या अशा विचाराची खुप माणसं तुम्हाला टीव्हीत काम करताना सापडतील. खरं तर ह्या सगळ्या मंडळींच्या समजचा प्रॉब्लेम आहे. प्रेक्षकांना मुर्ख समजताना, त्यात ते स्वत:ला कधीच धरत नाहीत आणि बातमी करताना मात्र ते आवर्जून स्वकेंद्री होतात.  प्रेक्षकच काय सिनिकल माणूससुद्धा कुणाचाच सिनिकलपणा खपवून घेत नसतो. याचाच अर्थ असा की जे चॅनल्स सिनिकल होत जातात त्यांच्यापासून प्रेक्षक हळूहळू दुरावतात किंवा त्याला खपवूनच घेत नाहीत,  जे चॅनल्स स्केप्टीकल राहतात ते वाढत जातात. सिनिकल म्हणजे स्वत:कडे सगळ्या प्रश्नांची उत्तरं असल्याचा दावा करणारा आणि स्केप्टीकल म्हणजे प्रश्न घेऊन उभा राहाणारा. वागळे सर काय करतात? कदाचित एवढ्याच गोष्टीमुळे प्रश्न नाचता है प्रश्न के कंधे पे चढकर असं पाशनं लिहिलं असावं.
        
बरं टीआरपी कुणाला मिळतो? एबीपी माझा हे मधला काही वर्षभराचा काळ सोडला तर कायम नंबर वन चॅनल राहिलेलं आहे. झी चोवीस तास दुसऱ्या किंवा तिसऱ्या स्थानावर असतं. आयबीएन लोकमत हे गेल्या वर्षभरापासून चौथ्या नंबरवर आहे. टीव्ही नाईन हे चौथ्या नंबरवरून सरकत तिसऱ्या क्रमांकावर आहे. महिन्यातनं एखाद दोन आठवडे ते नंबर दोनवरही असतं. गेल्या आठवड्यात तर ते नंबर वन झालं जे अनेकांना खटकतंय. असं दिसतं की टीव्ही 9 हे एकमेव ग्रोथ होत जाणारं चॅनल आहे. मी त्याचा भाग आहे म्हणून नाही सांगत. आकडेवारी सांगतेय. अगदीच ज्याचा टीआरपी 12, 13 होता तो 36 वर जाणं ही वाटते तेवढी सोप्पी गोष्ट आहे? आयबीएन लोकमतनं, न्यूज 18 लोकमत नावानं रिलॉचिंग केलं. मुंबईसह महाराष्ट्रभर त्याची जाहिरातबाजी केली. त्यांना विचारा टीआरपी एकने तर वाढला का?  हिंदीत महत्वाच्या चॅनल्सच्या संपादकांनी पुढं काम करायचं की घरी जायचं हे दर गुरुवारी आलेल्या टीआरपीवरून ठरतं. तशीच फुटपट्टी मराठीतल्या संपादक आणि आभासी संपादकांना लावली तर? 
  मग टीव्ही 9 नं अशी काय जादू केली की एवढा टीआरपी आला?सारासार असं दिसतं की न्यूज चॅनल्समध्ये जे लोकं काम करतायत त्यांना टीव्ही 9 म्हणजे काहीही उडपटांग दाखवणारं चॅनल वाटतं. म्हणजे पृथ्वीचा सर्वनाश वगैरे. बरं कधी तरी एकदा असा कार्यक्रम केल्यानं चॅनलला कायम टीआरपी मिळतो? ज्या आठवड्यात टीव्ही 9 दोन नंबरला पोहोचला त्या आठवड्यातल्या काही घटना बघा. ज्यादिवशी टीव्ही 9 ला आग लागली, सेट अप वगैरे बंद पडलं, त्याच दिवशी कोरेगाव भीमाची दंगल उसळली. त्यानंतर मुंबई वगैरे बंद झाली. त्या आठवड्यात टीव्ही 9 टीआरपीत नंबर 2 ला पोहोचलं. ज्या चॅनल्सच्या टेलिकास्टचा प्रॉब्लेम झाला ते दोन नंबरला कसं काय पोहोचलं असेल? त्या चार एक दिवसातला टीव्ही 9 आणि इतर चॅनल्समधला फरक बघा. एबीपी माझा, झी चोवीस तास आणि आयबीएन लोकमत हे चॅनल्स ज्यादिवशी खरोखर दंगल उसळली त्यादिवशी त्यांनी बातमीच दाखवली नाही. 
         
टीव्ही 9 नं मात्र जे घडतंय ते दाखवण्याचा निर्णय़ घेतला. इतर चॅनलचं कारण असं की शांतता वगैरे बिघडेल. साफ खोटं, पत्रकारांचं काम रिपोर्ट करण्याचं आहे, शांतता निर्माण करण्याचं काम पोलीसांचं आहे. एका सर्टन स्टेजपर्यंत यात प्रशासनाला मदत करावी. पण बातमीचा बळी देऊन नाही. उलट कोरेगाव भीमाची दंगल चॅनल्सनी दाबली म्हणून तर दुसऱ्या दिवशी मुंबई पेटली ना? याचाच अर्थ टीव्ही 9 इतर चॅनल्सच्या चोवीस तास पुढं होतं. बरं नुसतं पुढं होऊन नाही चालत, अचूक वेळेला, अचूक प्रश्न निर्माण करून टेलिव्हिजनचा अफलातून टायमिंग साधता यायला लागतो. ज्यावेळेस आघाडीचे चॅनल्स संभाजी भिडेचा उदोउदो करत होते किंवा प्रकाश आंबेडकरांनाच कटघऱ्यात उभं करत सिनिकल भूमिका घेत होते त्यावेळेस टीव्ही 9 फक्त सवाल खडे करत होतं. परिणाम तुमच्यासमोर आहे. यात कुठं श्रीदेवी होती?
         
बहुतांश जणांचा समज असा आहे की लोकं चर्चा खुप पाहतात. संपादकांनी तसा पद्धतशीरपणे समज पसरवलाय. टीआरपीचे आकडे असं सांगतात की हे साफ खोटं आहे. कोणत्याच चॅनल्सचा, कोणत्याच चर्चेचा शो टॉपच्या शंभरमध्ये सुद्धा नाही. आयबीएन लोकमतचा न्यूजरूम चर्चा हा कार्यक्रम गुरूवार, शुक्रवारी कधी तरी रेकॉर्ड करून तो रविवारपर्यंत तीन चार वेळेस रिपिट करतात. तुम्हाला माहितीय टीआरपीत हा कार्यक्रम पहिल्या 1 हजार कार्यक्रमांमध्ये सुद्धा नाही. खुद्द टीव्ही 9 नं जे क्राईम फाईल आणि घरोघरी मातीच्या चुली असे कार्यक्रम सुरु केले त्यांचीही अवस्था यापेक्षा काही वेगळी नाही. आयबीएनचा न्यूजरूम चर्चा हा संपादकांचा शो आहे, क्राईम फाईल आणि घरोघरीच्या अँकर ह्या अनुक्रमे क्रांती रेडकर आणि अलका कुबल आहेत तरीही ही अवस्था. खुद्द आयबीएनच्या समुह संपादकांचा बेधडक हा टॉक शोही टॉपच्या शंभरमध्ये नसतो. असं का असेल? प्रेक्षकांना एखादी गोष्ट नाही बघायची तर ते नाहीत बघत. लोकांना तुमच्या चॅनलवर आणनं म्हणजे कॅबिनमध्ये बसून गप्पांचा फड रंगवण्याएवढं सोप्पं असतं? ज्या कार्यक्रमांना प्रेक्षक बघत नाहीत, ते तसेच चालू ठेवले तर ते अख्खं चॅनल घेऊन बुडतात. पण हे कोण सांगणार? 
         
मग टीआरपीत टॉपला काय आहे तर फक्त न्यूज. म्हणजे ज्यात बातम्या दाखवल्या जातात असे बुलेटीन्स. म्हणजे जे चॅनल बातमीवर राहिल ते टॉपला जाईल.
      
 मग बातमीवर राहाणं एवढं अवघड आहे का? तर हो. बातमीवर राहायचं असलं की, बीव्ही रावांसारखं वर्षानुवर्षे अखंडीत रोज सकाळी सहाला ऑफिसला पोहोचायला लागतं, विनोद कापरींसारखं न्यूजरूममध्ये कधीच न येताही प्रत्येक स्टोरी, तिचा अँगल ना अँगल , एवढच काय प्रोमो पण लिहून द्यायची तयारी असावी लागते. नाही तर मराठी संपादक, आभासी संपादक  म्हणजे फक्त चर्चेला बसणार, त्याचं अँकरींगच करणार, बातम्या, रन डाऊन म्हणजे काही तरी तुच्छ असं लेखणार. ज्या संपादकांना किंवा आभासी संपादकांना नाईट शिफ्ट तर सोडाच मॉर्निंग शिफ्टला पण यायचं नसतं, दुपारी बारानंतर न्यूजरूमला उगवायचं असतं, गुरूवारपासूनच ज्यांना सुट्टीवर जाण्याचे वेध लागतात, शनिवार, रविवार तर फक्त रेकॉर्डेड कार्यक्रम लावायचे असतात त्यांना टीआरपी मिळणार कसा आणि ते बातमीवर राहणार कसे? टीव्ही 9 नं जिथं बाजी मारली त्या ह्याच डेथ ओव्हर्स आहेत.
       
टीव्ही 9 नं सलग कव्हरेज फक्त श्रीदेवीचंच केलं असं नाही तर पाच दिवस अखंडीत असं मोर्चाचं कव्हरेज टीव्ही 9 शिवाय दुसरं कुणी केलं का? जस्टीस लोयांच्या मृत्यूची बातमी तुम्ही टीव्ही 9 शिवाय कुठं पाहिली का? 200 सुपरफास्ट बातम्या तुम्ही कुठल्या चॅनलवर पहाता काय? तुम्ही तगडं कंटेट निर्माण केलं तर आयबीएन लोकमतसारखं चॅनलही रावांच्या काळात चौदा-पंधरावरून 20 च्या आसपास गेलं होतं हे कसं नाकारता येईल? मंदार-म्हात्रे सरांच्या काळातही ते उठलं होतंच ना? मधात साम टीव्ही आयबीएन लोकमतला मागे टाकत चौथ्या नंबरला आलं होतं. कारण त्यांचा व्हायरल सत्यसारखा एकमेव प्रोग्राम. तुमचं कंटेट मजबुत असावं लागतं आणि प्रेक्षकांच्या इच्छा आकांक्षा तुम्हाला व्यापूनही टाकता याव्या लागतात त्यावेळेस कुठं चॅनल्सना टीआरपी मिळत जातो. वागळे सरांना हे समजत नसेल? 
      
 न्यूज चॅनल्स म्हणजे बातमीचा उद्योग.( म्हणजे संपादकांनी मार्केटींगच्या स्लॉटची काळजी करणं नाही) तो काहींना जमतो, काहींना जमत नाही. ज्यांना तो जमत नाहीय ते एक तर हळूहळू दांभिकतेच्या झुली पांघरतात, कारणांची पिसं गाळीत फिरत असतात, सामाजिक भानाचे डोस पाजत असतात, खोटेपणाच्या तुताऱ्या वाजवतात, न्यूजरूम सोडली तर ते सगळीकडे दिसतात. 
      
 मी तर पत्रकारही नाही, पत्रकारीतेचं माझं कुठलंच शिक्षण झालेलं नाही. पत्रकारीतेचं शिक्षण घेतलेले आणि संपादकीय वाचणारे चॅनल्सच्या फार काही कामाचे नसतात. मी तर मास कॉमलाही नापास झालेलो होतो. आमचे आदरणीय बापू मेघराज पाटील म्हणतात तसा मी मीडिया प्रॅक्टीशनर आहे. म्हणजे डॉक्टर जशी मेडिसिनची प्रॅक्टीस करतो तसा मी मीडियाची. माझी फी मला मिळते म्हणून मी ऑफिसला जातो. समाजाच्या भल्यासाठी तू एक दिवस फुकट काम कर म्हटलं तरी मी नाही करू शकणार. कारण समाजाचं भलं करायला निघालेले समाजाचं सर्वात मोठं नुकसान करतात. ते रँडच्या फाऊंटेन हेडमधल्या टुहीसारखे आहेत. 
        
 नवा टीआरपी यायला आणखी दोन एक दिवस आहेत. कदाचित टीव्ही 9 पुन्हा दुसऱ्या तिसऱ्या नंबरवर येईलही. पण घर बांधायचं म्हटलं तर चिऱ्यावर चिरा रचत जायला लागतं आणि जोपर्यंत विनोद कापरींसारखा संपादक आहे आणि जीव तोड मेहनत करणारी टीम आहे तोपर्यंत चिंता नाही. दोन दिवसांपुर्वी शेतकरी लाँगमार्च दरम्यान आम्ही कापरी सरांना म्हणालोत की वागळे सरांना बोलवायला पाहिजे गेस्ट म्हणून चालेल का? ते क्षणाचाही विचार न करता म्हणाले, क्यूँ नही, जरूर बुलाना चाहिए. आम्ही वागळे सरांना फोन केला अर्थातच ते नाही म्हणाले. बस्स, फरक फक्त एवढाच आहे.
        
 आज परत एक झी २४ तासमधला मित्र भेटला. म्हणाला, काय राव तुम्ही तर श्रीदेवीत ठार वेडे झाला होता. सगळी आग लावली. त्याच्याही बोलण्यात एक हेटाळणीचा सुर होताच. मी म्हणालो, बरोबर आहे, तुम्हाला वेडं होता येत नाही हाच तर तुमचा प्रॉब्लेम आहे आणि तसंही देव काही सगळ्यांच्या बुडात निखारा ठेवून खाली पाठवत नाही.
     - माणिक बालाजी मुंढे

दैनिक भास्कर समूहाचा 'व्यापमं'पेक्षा मोठा घोटाळा

दैनिक भास्कर समूहाचा 'व्यापमं'पेक्षा मोठा 7,534 कोटींचा घोटाळा;
सुधीर व गिरीश अग्रवाल यांच्याविरोधात अजामीनपात्र पकड वोरंट जारी...
बुधवार, १४ मार्च, २०१८

धों.ज. गुरव यांची "पुढारी"तून हकालपट्टी !!

जळगाव - सन २००१ मध्ये देशदूतला संपादक असताना, धों. ज. गुरव यांना एका पोलीस उपनिरीक्षकाकडून 15 हजार रुपयांची लाच घेताना एससीबीने रंगेहाथ पकडले होते, अनेक वर्ष खटला चालल्यानंतर त्यांची १ फेब्रुवारी २०१८ रोजी निर्दोष मुक्तता झाली आहे, पण या लाचखोरी प्रकरणाची माहिती दडवून निवृत्तीनंतरही "पुढारी"त चिकटलेले गुरव यांची अखेर "पुढारी"तून हकालपट्टी करण्यात आली आहे. उत्तर महाराष्ट्र दौऱ्यावर असलेले समूह कार्यकारी संपादक सुरेश पवार यांनी गुरव यांच्या हाती नारळ सोपविला. प्रशासनापासून अत्यंत महत्त्वाची माहिती दडवून ठेवल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवला गेला. त्यांची शिफारस करणाऱ्या दिवाळखोरीतील जाहिरात संस्थेवरही "पुढारी"कार कमालीचे नाराज आहेत.
गुरव हे गेले काही दिवस याच जाहिरात एजन्सीच्या दावणीला बांधले गेले होते. ते त्या एजन्सीच्या कार्यालयातच जाऊन बसत. गेले काही दिवस गुरव यांना स्वर्ग दोन बोटे उरला होता. स्वतःबाबत  फुशारक्या मारतांना ते विनाकारण काही चांगल्या लोकांची नावे घेऊन, हे जाऊन आले; पण झाले नाही वैगेरे चर्चा पसरवत होते. त्यांचा एक पंटर सरळ इतर स्थानिक दैनिकांच्या    वेबसाईट्सवरून बातम्या कॉपी करून जशाच्या तशा पाठवतो, हे सर्वश्रुत होतेच; तीही चोरी पकडली गेली आहे. गुरव यांना काही दिवसांपूर्वीच सुरेश पवार  यांनी जोरदार झापून काढले होते. खडसे यांच्या समर्थनार्थ सुपारी घेतल्यागत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बदनामी केली होती. गेले काही दिवस सातत्याने गुरव व त्यांचा पंटर ही 'पेड' लाईन चालवून "पुढारी"ला उल्लू बनवत होते. हा पंटर एकाचवेळी इतरही 2 ठिकाणी नोकऱ्या करतो, ही दोन्ही ठिकाणे खडसे यांच्या पंटर्सचीच असल्याने "पुढारी"च्या व्यासपीठाचा गैरवापर केला जात  होता. दुर्दैवाने, गुरव यांना पूर्वी लाचखोरीच्या जाळ्यात अडकवणारा व नंतर बेरोजगारीत आसरा देऊन उपकार करणारा सूत्रधार हा खडसेविरोधी म्हणजे सुरेश जैन गटाचा... त्याला "पुढारी"तील ही खडसे लाईन काही रुचत नव्हती. शेवटी त्यानेच कोल्हापुरात पिन मारून पूर्वी दडविलेले गुरव यांचे "ट्रॅप सीक्रेट" उघड करून त्यांची बदनामी केली, गेम केला!! साठीत भान हरपून आत्मप्रौढीत रमलेल्या गुरवांनाही हा दणका हवाच होता!!.शुक्रवार, ९ मार्च, २०१८

दत्तावतारी संपादकांचा बेजबाबदारपणा !

चला जग जिंकू या ! म्हणणाऱ्या IBN लोकमतचे नामकरण  न्यूज १८ लोकमत करण्यात आले, डॉ. उदय निरगुडकर येऊनही या चॅनलचा टीआरपी वाढत नाही. टीआरपी वाढवा म्हणून एक सनसनाटी बातमी  महागौप्यस्फोट या मथळ्याखाली  चालवण्यात आली, मात्र या बातमीमुळं हे चॅनल अडचणीत आले आहे. यावर चित्रलेखामध्ये एक लेख छापून आला असून, हा लेख संपादक ज्ञानेश महाराव  यांनी लिहिला आहे.
हा लेख जसाच्या तसा प्रसिद्ध करीत आहोत..

महाराष्ट विधिमंडळाच अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असताना महागौप्यस्फोट या मथळ्याखाली एक बातमी प्रसारित करण्यात आली. बरेच दिवस मराठी वृत्तवाहिन्यांवर काही सनसनाटी किंवा खळबळजनक बातमी प्रसिध्द झाली नव्हती. त्यामुळे या बातमीबाबत मोठे कुतुहल होतं. बातम्यांच्या जगात काही खळबळजनक घडल. अस वाटत होतं. परंतु प्रत्यक्षात हा महागौप्यस्फोट प्रसारित झाला आणि बघणार्‍यांनी ऐकणार्‍यांनी फुस्स म्हटल ! खुप गाजावाजा करून एखादा सिनेमा प्रदर्शित करावा आणि तो सुपरफ्लॉप व्हावा, तसे या बातमीच झालं.

 संबंधित बातमीत एक कथित बांधकाम व्यावसायिक आणि कथित मध्यस्थ, अशा दोन व्यक्तींमधील दुरध्वनी संभाषाची ती ध्वनिफित महागौप्यस्फोट म्हणुन ऐकवण्यात आली. त्यातुन विधिमंडळात प्रश्न विचारण्यासाठी आर्थिक व्यवहार होतात. असा आरोप ध्वनित होत होता. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे (राष्ट्रवादी काँग्रेस) यांचा त्यांच्याशी संबंध जोडण्यर्चीं येत होता. कारण त्यातील एक व्यक्ती धनंजय मुंडे यांच नाव घेत होती. 

ज्या वाहिनीने ही बातमी चालवली, तिथे गुरूदेव दत्त याच्यासारखी संपादक म्हणुन तीन डोकी आहेत. त्यातले एक तर डॉक्टर आहेत. पण त्यांना आणि त्यांच्या दोन कंपाउुंडर संपादकांना बातमीचे साध तत्व कळत नसण्याचा रोग जडला असावा, हे लक्षात घेऊनच तिथल्या पत्रकारितेची दुरावस्था समजुन घ्यावी लागते. या प्रकाराने एकुण इलेक्ट्रॉनिक पत्रकारितेची आब्रु चव्हाट्यावर आणलीय. धनंजय मुंडे यांची सुपारी तर घेतली नव्हती ना. अशी शंका येण्याजोगी ही बातमी होती. अन्यथा एवढी पोचट बातमी कुणी दाखवलीच नसती. आणि दाखवली असती, तर त्यात ज्यांच्यावर आरोप आहेत त्यांचे म्हणणे दाखवण्याचीही खबरदारी घेतली असती तस झाल नाही. 

आज सरकारविरोधात विधिमंडळात आणि महाराष्ट्र भरात धनंजय मुंडे हेच एकटे आक्रमकपणे बोलताना दिसतात त्यांचे चारित्र्यहनन करून सरकारविरोधात बोलणारा एक आवाज बंद करण्याचं कारस्थान म्हणुनही या बातमीकडे पहाव लागेल. परंतु संबंधिताचं हे कारस्थान यशस्वी होऊ शकले नाही. कारण बातमी म्हणुन जी ऑडिओ क्लिप ऐकवण्यात येत होती. त्यातील एक गृहस्थ म्हणत होते की, उद्या जर काही झालं आणि धनंजय मुंडेला पैसे द्यायला लागले तर माझ्या पदरचे मी देईलन. पण हा विषय (विधीमंडख सभागृहात) येऊ देणार नाही. त्याला सांग तु टेंन्शन नको घेऊ एवढ्याच संवादाची ती ध्वनिफित होती. 

या संभाव्य व्यवहाराबाबत संबंधित वाहिनी आणि तिचे संपादक ठाम नव्हते. तर त्यांनी स्वतः त्याची खात्री करून घ्यायला हवी होती. त्या विषयाचा पाठपुरावा करून त्यातील सत्य आणि तथ्य तपासुन ती बातमी पुराव्यांसह अधिक मजबुतपणे मांडायला हवी होती. परंतु तस न करता आम्ही संबंधित ध्वनिफितीची पुष्टी करत नाही. अशी टीप टाकुन जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केला. अर्थात संपादकाला अशी जबाबदारी झटकता येत नाही. केवळ दोन अनोळखी व्यक्तीमधील संपादकाच्या आधारे, संबंधित संवादाची कोणत्याही प्रकारे पुष्टी होत नसल्याची जाणीव असतानाही आरोपामधील सत्यता पडताळुन न पाहता एखाद्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप करणे, हे सुपारीला पुष्टीचा गंध लावुन पुजेचा गणपती बनवायची भटगिरी आहे. ही बातमी प्रसारित होत असतानाच विधिमंडळातील चर्चेत या बातमीला खोडसाळ ठरवुन हक्कभंगाचा इशारा दिल्यानंतर बातमीचे प्रसारण थांबवण्यात आले. परंतु ऐवढी अपरिपक्व बातमी प्रसारित होतेच कशी? हा प्रश्न महत्वाचा आहे. या प्रकरणी आता न्युज 18 लोकमत या वृत्तवाहिनीचे मालक, संपादक, वृत्तसंपादक, वृत्तनिवेदक संबंधित वार्ताहर आणि एचडीआयएल कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक प्रमोद पुरंदरे यांच्याविरूध्द विधान परिषदेत विशेषाधिकार भंगाची तक्रार दाखल करण्यात आलीय. 

या तक्रारीची विशेषाधिकार समितीमार्फत चौकशी करून एका महिन्यात अहवाल सादर करण्याचे निर्देश सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी दिलेत. या चौकशीच व्हायच ते होईल कदाचित, भविष्यातील संबंध बिघडु नयेत म्हणुन तक्रार मागेही घेतली जाईल कारण माध्यमांशी संबंध सुरळीत ठेवणे, ही राजकीय नेत्याची गरज असते. परंतु या व्यवहारात पत्रकारितेची विश्वासार्हता किती गमावायची ? झाल्या प्रकारामुळे इलेक्ट्रॉनिक पत्रकारितेच्या विश्वासर्हतेला आणखी एक तडा गेलाय.

- ज्ञानेश महाराव
  संपादक साप्ताहिक चित्रलेखागुरुवार, ८ मार्च, २०१८

पुण्याच्या पुण्यनगरीत नेमकं काय घडतंय ?

पुण्यनगरीच्या पुणे आवृत्तीचा खप घसरलाय, त्याचे खापर संपादकीय विभागावर फोडलं जातंय ..  गेली पाच वर्ष वार्ताहर म्हणून काम केलेल्या एका महिला पत्रकारासह पाच जणांना राजीनामा देण्यास सांगण्यात आलंय... याबद्दल ती महिला बेरक्यास लिहितेय ...

मी.....

दैनिक पुण्यनगरी पुणे कार्यालयात गेली 5 वर्षे वार्ताहर म्हणून काम करत आहे. इतर दैनिकांच्या कार्यालयात छोट्या मोठ्या राजकारणा प्रमाणे इथेही काही अंतर्गत वाद होते. तरीही ऑफिसमध्ये सर्वजण मिळून मिसळून काम करायचे. मात्र गेल्या 2 वर्षात पुणे कार्यालयात फारच भयानक परिस्थिती निर्माण झाली आहे.  ऑफिसमधील अंतर्गत राजकारणामुळे काम करत नाही हे कारण देत, माझ्यासह 5 जणांचा राजीनामा मागितला आहे. 
पुणे ऑफिसमध्ये संपादक म्हणून गोपाळ जोशी जेव्हा पासून जॉईन झाले होते, तेव्हापासून वादविवादला सुरुवात झाली. वरिष्ठ वृत्तसंपादक सुनील देशपांडे यांनी संपादक पदावर नजर होती. मात्र त्यांना डावलून निवासी संपादक भागा वरखडे यांनी पुण्यनगरी समूहाचे वरिष्ठ सल्लागार बोराडे, (जे त्याचे चांगले मित्र आहेत) यांना हाताशी धरून मित्र जोशी यांना खुर्चीवर बसवलं.याच डूख मनात धरून देशपांडे यांनी जोशी विरोधात राजकारण सुरू केलं. या सर्वांचा परिणाम दैनिकांच्या खपावर होऊ लागला.
दैनिकाचे मालक मुरलीधर शिंगोटे (बाबा) गेली 3 महिने ऑफिसमध्ये तळ ठोकून आहेत. अंकाचा खप कमी झाल्यामुळे ते सर्वांवर नजर ठेवून आहेत. बाबा इथे असल्याचा गैरफायदा घेत एकमेकांविरोधात बाबांचे कान भरले जात आहेत.देशपांडे यांनी indirectly 4 ते 5 वेळा ऑफिस सोडून जाण्याच्या सूचना बाबांनी दिल्या असतानाही देशपांडे अजून ही ऑफिस ला येतात. अंक वाढीसाठी संपादकीय विभागाचा काडीचा अनुभव नसलेल्या तानाजी पाटील म्हणून नव्या माणसाला 2 महिन्यांपूर्वी आयात केलं आहे. त्याने नवीन कारवाया सुरू केल्या आहेत. जबरदस्तीने १५ फेबला माझी बदली पिंपरी-चिंचवड ऑफिसला केली आहे. नोकरी सोडावी लागेल किंवा पिंपरी ऑफिसला जा अशी धमकी बाबांकरवी मला देण्यात आली. मला तिकडची काहीच माहिती नसताना संपूर्ण शहरातील उपनगराच्या बातम्या करण्याची जवाबदारी दिली आहे.  उपनगर बातमीदारी काय असते, हे या पाटलाला माहिती नाही, तो एकाच वेळी हिंजवडी ते भोसरीतील सर्व बातम्या द्यायला सांगतो. यात माझी एक महिला पत्रकार म्हणून खूप मोठी कुचंबणा होत असून या बद्दल कोणीच ऐकायला तयार नाही. गेल्या 15 तारखेपासून काहीच काम केलं नाही या मुद्द्यावर बोराडेने मला राजीनामा मागितला आहे. 
पिंपरी ऑफिसला गेल्यापासून स्पोर्ट आणि इतर जनरल बातम्या करण्यासाठी तिकडचा सर्व स्टाफ मला मदत करतो, मात्र पुणे ऑफिस मधून अद्याप वरिष्ठ पातळीवरून राजकारण सुरू आहे. अंकाचा खप वाढवा नाहीतर राजीनामा द्या, असे बाबांनी सर्व वरिष्ठांना खडसावले होते. आपली नोकरी वाचवण्याच्या नादात देशपांड्यांनी अंक वाढीची जवाबदारी घेतली. यावरून बाबांनी देशपांडे आणि वरखडे यांना स्टँप पेपर वर सह्या करायला सांगितल्या. मात्र या दोघांनी स्वतःची नोकरी वाचवण्यासाठी अगदी सफाई कामगार पासून सर्वांच्या सह्या घ्येण्याचा सल्ला दिला अन बाबांनी सह्या घेतल्यापण, अंक वाढीसाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करेन मात्र तस झाली नाहीतर तुम्ही मला कामावरून कधीही काढू शकता, तुम्हाला तसे अधिकार आहेत. आशा मायण्यावर सर्वांच्या जबरदस्तीने सह्या घेतल्या आहेत. यामध्ये सर्व वार्ताहरांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.  बोराडेने या गोष्टीचा गैरफायदा घेतला असून त्याने माझ्यासह 5 जणांना राजीनामा मागितला आहे. माझ्यावर होणाऱ्या अन्यायाबाबत कोणीच मदत करत नाही. मला कधीही कामावरून काढू शकतात. माझ्यावर सासर आणि माहेर अशा दोहोंची जवाबदारी आहे. सध्या मीडियात कुठेही जॉब नसल्याने माझ्यासह इतरांपुढे नोकरीचा प्रश्न निर्माण झाला आहे.

एक महिला पत्रकार

मनोज सांगळे यांना जोतिबा फुले पत्रगौरव पुरस्कार जाहीर

औरंगाबाद : श्री छत्रपती शिवाजी महाराज मेमोरियल राष्ट्रीय समिती, दिल्ली आणि लक्ष्मी निर्मल प्रतिष्ठानतर्फे छत्रपती शिवबा, महात्मा जोतिबा जयंती महोत्सव साजरा केला जाणार असून, या महोत्सवानिमित्ताने विविध क्षेत्रातील मान्यवरांना त्यांनी केलेल्या कार्याबद्दल पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे़ पुण्यनगरीचे उपसंपादक मनोज सांगळे यांना क्रांतीबा जोतिबा फुले पत्रगौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे़

सिडको बसस्थानकाजवळील हॉटेल विंडसर कॅसलमध्ये मंगळवारी (दि़ १३) सायंकाळी सहाला होणाऱ्या या महोत्सवाचे उद्घाटन माजीमंत्री गंगाधर गाडे यांच्या हस्ते होणार आहे़ अध्यक्षस्थानी माजी केंद्रीयमंत्री विजय नवल पाटील असतील़ श्री छत्रपती शिवाजी महाराज मेमोरियल राष्ट्रीय समितीचे उपाध्यक्ष इंजि़ मिलिंद पाटील, विचारवंत श्रीमंत कोकाटे, प्रा़ डॉ़ प्रतिभा अहिरे यांची प्रमुख उपस्थिती असेल़ या वेळी प्रसारमाध्यम विभागातून 'पुण्यनगरी'चे उपसंपादक मनोज सांगळे, जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष बालाजी सूर्यवंशी, लोकमतचे विजय सरवदे, एबीपी माझाचे कृष्णा केंडे यांना क्रांतीबा जोतिबा फुले पत्रगौरव पुरस्कार देऊन सन्मानित केले जाईल, अशी माहिती संयोजक इंजि़ मिलिंद पाटील यांनी दिली़ 
बुलडाण्यातून पत्रकारिता सुरू करणारे सांगळे गेल्या १४ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत़ आतापर्यंत त्यांनी सकाळ, लोकमत, दिव्य मराठीमध्ये विविध पदांवर जबाबदारीने काम केले आहे़ टीकात्मक पत्रकारितेपेक्षा विधायक पत्रकारितेवर त्यांचा भर राहिलेला आहे़ 

बुधवार, ७ मार्च, २०१८

महाराष्ट्र १ पुन्हा सुरु होणार ?

नवे संपादक विश्वास देवकर
मुंबई -  गेले काही दिवस बंद पडलेले महाराष्ट्र १  चॅनल पुन्हा सुरु करण्यात येणार असल्याचे वृत्त असून, संपादक पदाची सूत्रे ज्येष्ठ पत्रकार विश्वास देवकर यांनी स्वीकारली आहेत.
 मोठा गाजावाजा करून सुरु करण्यात आलेले  महाराष्ट्र १ चॅनल एक वर्षातच आर्थिक अडचणीत सापडले होते, त्यानंतर संपादक निखिल वागळे यांच्यासह अनेकजण बाहेर पडले होते, त्यानंतर आशिष जाधव यांच्याकडे संपादक पदाची सूत्रे सोपवण्यात आली होती. मात्र पगारी होत नसल्याने वैतागून जाधव यांनीही राजीनामा दिला होता, त्यानंतर सर्व जुने कर्मचारी निघून गेले होते.
बंद पडलेले हे चॅनल रिलॉन्चिंग करण्यात येणार असून, नवा बकरा सापडल्याची चर्चा सुरु आहे. त्यासाठी देवकर यांची संपादक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्याचबरोबर सोडून गेलेल्या चांगल्या कर्मचाऱ्यांना संपर्क करण्यात येत आहे.

देवकर यांनी साप्ताहिक सकाळ, गावकरी,  देशदूत  असा पत्रकारितेचा प्रवास  केलेला असून, बंद पडलेल्या महाराष्ट्र १ चॅनलला ते नवी उभारी देणार का ? याकडे लक्ष वेधले आहे.

सोमवार, ५ मार्च, २०१८

सुशील कुलकर्णी झाले पुढारी !

औरंगाबाद -  एक वर्षांपूर्वी सुरू झालेल्या पुढारीला मराठवाड्यात अजून तरी जम बसवता आलेला नाही, दुसरीकडे संपादक बदलण्याचा सिलसिला सुरूच आहे. आता सुशील कुलकर्णी   यांची  निवासी संपादक म्हणून नियुक्ती करण्यात आली असून,  कार्यकारी संपादक धनंजय लांबे यांची लवकरच कोल्हापूरला बदली होणार आहे.
औरंगाबादेत पुढारी सुरू होण्यापूर्वी भालचंद्र पिंपळवाडकर यांची निवासी संपादक म्हणून निवड करण्यात आली होती,मात्र पिंपळवाडकर पुण्यनगरीत  गेल्यानंतर मंगेश देशपांडे, सुशील कुलकर्णी यांना ऑफर लेटर देण्यात आले होते, मात्र दोघेही जॉईन झाले नव्हते, देशपांडे  एकमतमध्येच लातुरात राहणे पसंद केले होते तर सुशील कुलकर्णीही एकमतमध्ये औरंगाबाद आवृत्तीसाठी  जॉईन झाले होते, जेव्हा पुढारी प्रत्यक्षात सुरू झाला तेव्हा सुंदर लटपटे कार्यकारी संपादक तर मुकुंद फडके निवासी संपादक म्हणून जॉईन झाले होते, मात्र अवघ्या तीन महिन्यात लटपटे यांनी राजीनामा देवून समूह कार्यकारी संपादक सुरेश पवार यांच्यावर घणाघाती आरोप केला होता,  त्यांच्या जागी धनंजय लांबे यांची नियुक्ती होताच फडके यांची कोल्हापूरला बदली झाली  होती, मात्र येत्या 15 मार्च रोजी फडके पुढारीतून बाहेर पडणार असून, त्यांच्या जागेवर धनंजय लांबे कोल्हापूरला जाणार आहेत, इकडे औरंगाबादला निवासी संपादक म्हणून सुशील कुलकर्णी आज जॉईन झाले  आहेत,
 कुलकर्णी हे मूळचे बीडचे.. दैनिक गावकरीमध्ये अनेक वर्षे ते जिल्हा प्रतिनिधी म्हणून काम केल्यानंतर त्यांची औरंगाबादेत पुण्यनगरीचे निवासी संपादक म्हणून नियुक्ती झाली होती,  त्यानंतर त्यांना कार्यकारी संपादक म्हणूनही पदोन्नती मिळाली होती,दीड वर्षांपूर्वी ते पुण्यनगरीतून बाहेर पडून एकमतमध्ये गेले होते मात्र सहा महिन्यातच एकमतचे दिवाळे वाजले होते, त्यानंतर कुलकणी  सहा महिने विजनवासात होते, अखेर त्यांना पुढारीत निवासी संपादक म्हणून संधी मिळाली आहे, यापूर्वी मिळालेली संधी त्यांनी स्वतः हुन घालवली होती, आता मात्र त्यांनी पदभार स्वीकारला आहे.
 पुढारीला मराठवाड्यात जाहिरात व्यवसाय हवा आहे, आणि सुशील कुलकर्णी त्यात माहीर आहेत, पद्मश्रीने केवळ याच गुणवत्तेवर त्यांच्याकडे मराठवाड्याचे पुढारपण सोपवले आहे. 
जाता जाता
सुशील कुलकर्णी पुढारीत जॉईन झाल्यामुळे  काही कर्मचारी अस्वस्थ झाले असून, काहीजण स्वतःहून राजीनामा तर काहींची मालकाकडून विकेट पडण्याची शक्यता आहे.त्यांच्यामुळे नवा गाडी नवा राज सुरु होणार आहे, हे मात्र नक्की


फेसबुक वर शेअर करा

Facebook