> बेरक्याला माहिती देण्यासाठी ई - मेल करा - berkya2011@gmail.com

शुक्रवार, २९ जून, २०१८

डॉ. उदय निरगुडकर यांचा पाण्याचा बुडबुडा अखेर फुटला !

मुंबई - झी २४ तास केवळ माझ्यामुळे नंबर १ झाले असा दावा करणाऱ्या डॉ. उदय निरगुडकर यांचा पाण्याचा बुडबुडा अखेर फुटला आहे. न्यूज १८ लोकमत जॉईन करून सहा महिने झाले तरी हे चॅनल पाचव्या क्रमांकावरच अडकले आहे. दुसरीकडे साम चॅनलची घोडदौड सुरूच आहे.

उद्योगपती मुकेश अंबानी यांची मालकी असलेल्या न्यूज १८ लोकमतकडे पैश्याची कमी नाही. त्यात वितरण चांगले आहे. अनेक तगडे अँकर आहेत, तरीही हे चॅनल टीआरपीमध्ये खूप मागे आहे. झी २४ तास माझ्यामुळं नंबर १ झाले असा दावा करणारे डॉ. उदय निरगुडकर १२/१२/१७ रोजी जॉइन झाले. त्यांच्याकडून चॅनल व्यवस्थापनाच्या खूप अपेक्षा होत्या. मात्र त्या फोल ठरल्या आहेत.

या चॅनलचा टीआरपी १२ ते १४ मध्ये अडकला आहे आणि कधी चौथा तर कधी पाचव्या क्रमांकावर हे चॅनल रेंगाळत आहे. डॉ. निरगुडकर यांना स्वतःला टीव्हीवर चमकणे  खूप आवडते, त्यासाठी नको तो आटापिटा सुरु असतो. त्यांचा डिबेट शो अत्यंत भंगार असतो. त्यांच्या शो चा टीआरपी खूप कमी आहे. बातम्यापेक्षा त्यांच्या डिबेट शोला महत्व दिले जात असल्यामुळे चॅनलची माती होत आहे.

चॅनलमध्ये अनेक अँकर आणि काही कर्मचारी सलग १० वर्षांपासून काम करीत आहेत.त्यांच्यात एकप्रकारची सुस्ती आली आहे. आम्ही येथे सिनिअर आहोत, या घमेंडीत ते नव्या कर्मचाऱ्याना कमी लेखत आहेत.जुने काम करीत नाहीत आणि नव्यांना नवे काही करू देत नाहीत. केवळ पाट्या टाकण्याचे काम सुरु आहे. डॉ निरगुडकरकडे नवीन व्हिजन नाही. तोच तो पणामुळे चॅनल टीआरपी मध्ये मार खात आहे.

दुसरीकडे सामची घोडदौड सुरुच  आहे. सलग दोन आठवडे हे चॅनल टीआरपी मध्ये दुसरे आले आहे. नंबर १ असलेल्या एबीपी माझा आणि साममध्ये फक्त २. ४ चा फरक आहे. संपादक निलेश खरे यांनी नवी टीम उभी करून सामला उभारी दिली आहे. अपुरा कर्मचारी वर्ग आणि अपुऱ्या सुविधा असताना सामने जबरदस्त कामगिरी केली आहे. एकीकडे साममध्ये उत्साह असताना न्यूज १८ लोकमतमध्ये निरुत्साह दिसत आहे. 


शुक्रवार, २२ जून, २०१८

सानप यांना निलंबित न केल्यास आमरण उपोषण


लोकपत्रिका संपादिका शिला उंबरे यांनी 
जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप यांच्याविरुद्ध रणशिंग फुंकले 

उस्मानाबाद - उस्मानाबादचे वादग्रस्त जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप यांना निलंबित करून त्यांनी केलेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करावी, अशी मागणी लोकपत्रिकाच्या संपादिका शिला उंबरे यांनी केली आहे. सानप यांना निलंबित न केल्यास लातूरच्या माहिती उपसंचालक कार्यालयासमोर 9 जुलैपासून आमरण उपोषण करण्याचा इशाराही उंबरे यांनी दिला आहे.
सानप यांच्यावर नुकताच तुळजापूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे, वर्षभरापूर्वी सहकारी महिलेस त्रास दिल्याप्रकरणी उस्मानाबादेतील आनंदनगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल आहे.
सानप यांनी बळीराजा चेतना अभियानमध्ये लाखो रुपयांचा भ्रष्टाचार केला आहे, तसेच शासकीय खरेदी, कंत्राटी कामगार नियुक्तीमध्ये उखळ पांढरे करून घेतले आहे. सानप यांनी काय आणि कसा भ्रष्टाचार केला याचा पाढाच उंबरे यांनी मुख्यमंत्री, पालकमंत्री, माहिती महासंचालक,उपसंचालक यांना दिलेल्या निवेदनात वाचला आहे.
सानप यांच्या भ्रष्टाचाराकडे वरिष्ठ अधिकारी कानाडोळा करीत असल्याने मुख्यमंत्र्यांनी वैयक्तिक लक्ष घालावे, अशी मागणीही उंबरे यांनी केली आहे.

सावधान ! वृत्तपत्र प्रिंट करताना नियम पाळा !

अन्यथा गुन्हा दाखल होऊ शकतो...

सांगोला - एखादे वृत्तपत्र  प्रसिद्ध करताना आपण जिल्हाधिकारी यांच्याकडे डिक्लेरेशन सादर करतो, त्यात वृत्तपत्र कुठे प्रिंट करणार आणि प्रसिद्ध करणार याचे शपथपत्र देतो. पण दिलेल्या प्रिंटिंग प्रेस मध्ये सदर वृत्तपत्र प्रिंट न करता अन्यत्र प्रिंट केल्यास तो कायद्यानुसार गुन्हा असून तो बडगा सांगोला उपविभागीय अधिकरी यांनी उचलला आहे.

सांगोला येथील दैनिक किर्णोदयचे संपादक किशोर म्हमाणे यांच्यावर सांगोला पोलीस स्टेशनला उपविभागीय अधिकाऱ्याची  शासनाची फसवणूक केल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर हे कार्यालय सील केले आहे.

राज्यात अश्याप्रकारे पहिलाच गुन्हा दाखल झाल्याने लघु वृत्तपत्र काढणाऱ्या संपादक आणि  पत्रकारात खळबळ उडाली आहे. 
गुरुवार, २१ जून, २०१८

कर्जबाजारी पत्रकाराची 2 मुलांना ठार करून आत्महत्या

हैदराबाद - तेलंगाणामधील सिद्दीपेट जिल्हयात एका तेलगू वृत्तपत्रात काम करणाऱ्या पत्रकाराने कर्जाला कंटाळून आपल्याच दोन चिमुरड्यांना गळा आवळून ठार केले व त्यानंतर गळफास लावून आत्महत्या केली आहे. त्यानंतर त्याच्या पत्नीनेही विष प्राशन करून आयुष्य संपवण्याचा प्रयत्न केला. मात्र तिला वाचवण्यात आले आहे. हनुमंत राव (३५) असे या पत्रकाराचे नाव आहे. तर मीना (३०) असे त्याच्या पत्नीचे नाव आहे.
हनुमंत एका स्थानिक तेलगू वृतपत्रात काम करत होता. पत्नी व दोन मुलं असे त्याचे सुखी कुटुंब होते. पण पगार पुरत नसल्याने त्यांची आर्थिक कोंडी होत असे. यामुळे त्याने अनेकांकडून उसने पैसे घेतले होते. कर्जाचा हा आकडा १० लाखापर्यंत पोहोचला होता. दिलेली मुदत उलटून गेल्याने कर्जदारांनी हनुमंतच्या मागे पैशासाठी तगादा लावला होता. यामुळे तो निराश झाला होता. एवढे पैसे आणायचे कुठुन या विचाराने त्याची झोप उडाली होती. आपली ही अडचण त्याने पत्नीला सांगितली. त्यानंतर दोघांनी आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला. पण आपल्यामागे मुलांचे हाल होतील या विचाराने त्यांनी मुलांनाही संपवण्याचे ठरवले. बुधवारी रात्री हनुमंत व त्याच्या पत्नीने आपल्या ५ व ३ वर्षांच्या मुलांची झोपेतच गळा दाबून हत्या केली. मुलांचा मृत्यू झाल्याची खात्री पटल्यानंतर हनुमंतने घराच्या पंख्याला दोरी बांधून गळफास घेत आत्महत्या केली. त्यानंतर मीनानेही विष प्राशन केले.
गुरुवारी सकाळी शेजाऱ्यांनी त्यांचा दरवाजा ठोठावला असता आतून कसलाही प्रतिसाद मिळाला नाही. यामुळे त्यांनी दरवाजा तोडला व घरात प्रवेश केला.आतले दृश्य बघून सगळ्यांनाच धक्का बसला. बेडवर दोघा मुलांचा निष्प्राण देह पडला होता. तर पंख्याला हनुमंतचा मृतदेह लटकत असल्याचे बघून शेजाऱ्यांच्या पायाखालची जमिनच सरकली. मीनाही बेडवर अत्यवस्थ अवस्थेत पडली होती. ती जिवंत असल्याचे बघून शेजाऱ्यांनी तिला तात्काळ रुग्णालयात दाखल केले. तिची प्रकृती गंभीर असून डॉक्टर तिला वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत.

सौजन्य - सामना  

रविवार, १७ जून, २०१८

एबीपी माझा करतेय सामच्या शोची कॉपी

मुंबई - नंबर 1 चा दावा करणारा एबीपी माझा चॅनल सामच्या काही लोकप्रिय शोची कॉपी करीत असल्याने   मीडियात चर्चेचा विषय झालाय.

निलेश खरे यांनी साम चॅनलची सूत्रे हाती घेतल्यापासून या चॅनेलचा टीआरपी दिवसेंदिवस वाढत चालला आहे, तो आता 27 वर गेला आहे.  व्हायरल सत्य आणि  स्पॉट लाईट हे दोन शो  जबरदस्त लोकप्रिय झाले  असून , या दोन्ही शो चा टीआरपी नंबर 1 आहे.तसेच येथे नोकरी मिळेल हा शोही चांगलाच लोकप्रिय झाला आहे.
 साम चॅनेल स्पर्धेत येत असल्यामुळे एबीपी माझा चॅनलची पायाखालील वाळू घसरली आहे. सामवर व्हायरल सत्य आहे तर एबीपी माझा  वायरल चेक नावाचा शो सुरू करीत आहे.
 
सामवर स्पॉट लाईट शो आहे तर एबीपी माझा स्पेशल रिपोर्ट नावाचा शो सुरू केला असून त्याचे अँकरिंग अभिजित कारंडे करीत आहे.
 
येथे नोकरी मिळेलची कॉपी करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
 
एबीपी माझा चॅनेल भविष्यात कॉपी चॅनल म्हणून ओळखले जावू लागल्यास नवल वाटू नये.
 
 जाता जाता -  एबीपी माझा बरोबर झी 24 तासही व्हायरल सत्य आणि नोकरी विषयक शो ची कॉपी करण्यासाठी प्लॅनिंग करत आहे.

शनिवार, १६ जून, २०१८

जय महाराष्ट्र मध्ये पुन्हा खोगीर भरती !

टीआरपीच्या नावाने बोंबाबोंब !
मुंबई - एकेकाळी मुंबईत डान्स बार चालवणाऱ्या सुधाकर शेट्टी यांनी, डान्स बार बंद झाल्यानंतर न्यूज चॅनल काढले खरे, पण अनेक कोटी पाण्यात घालूनही हे चॅनल टीआरपीमध्ये चारच्या पुढे सरकत नाही.

या चॅनलच्या मालकाला सतत संपादक बदलण्याची सवय आहे. म्हणजे मालकाला एकाच्या डोक्यावर दुसरा ठेवण्याची सवय आहे.चॅनल सूरु झाल्यानंतर मंदार फणसे, रवींद्र आंबेकर, तुळशीदास भोईटे हे त्रिकुट आले , ते गेल्यानंतर समीरण वाळवेकर , निलेश खरे, प्रसन्न जोशी हे त्रिकुट झाले , आता आशुतोष पाटील, आशिष जाधव आणि मनोज भोयर हे त्रिकुट आले आहे. त्यात तुषार शेटे, विनोद राऊत आहेत. स्टारकास्ट घेऊन एखादा चित्रपट काढावा आणि तो फ्लॉप ठरावा तसे या चॅनेलचे आहे. 
आपल्यापेक्षा कोणी वरचढ होऊ नये, म्हणून येथे कुरघोडी केली जाते, त्यात चॅनेलची माती होत आहे.

गचाळ वितरण, कोणती बातमी कोणत्या वेळी चालवावी याचे न्यूज सेन्स नाही, व्हाईस ओव्हर खराब, स्क्रिप्ट रायटिंग बंडल यामुळे हे चॅनल सहसा कोणी बघत नाही. त्यामुळे टीआरपी काही वाढत नाही. कोणाचा कोणावर विश्वास नसल्यामुळे येथे फक्त पाट्या टाकण्याचे काम सुरू आहे.

आता निवडणूका जवळ येत असल्यामुळे खोगीर भरती सुरू आहे, निवडणूक पार पडताच पुन्हा पहिले पाडे पंचावन्न असेच होणार, हे नक्की. त्यामुळे कोणी मुंगेरीलाल के हसीन सपने पाहू नये....

शुक्रवार, १५ जून, २०१८

मनोज भोयर, विनोद राऊत जय महाराष्ट्र मध्ये ...

मुंबई - जय महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आशिष जाधव पॉलिटिकल एडिटर म्हणून जॉईन झाल्यानंतर आता  मनोज भोयर सहाय्यक संपादक तर विनोद राऊत इनपुट हेड म्हणून जॉईन झाले आहेत.

भोयर यांनी यापूर्वी न्यूज वर्ड इंडिया मध्ये महाराष्ट्र ब्युरो म्हणून काम केले आहे. त्यापूर्वी त्यांनी ई -टीव्ही , सहारा टीव्ही,  मध्ये काम केले आहे. विनोद राऊत यांनी यापूर्वी आयबीएन लोकमत, साम मध्ये काम केले आहे.मंदार फणसे जिकडे तिकडे विनोद राऊत असे गणित होते.

विनोद राऊत यांना इनपुट हेड केल्यामुळे तुषार शेटे यांना आता काय काम देण्यात येणार याकडे लक्ष वेधले आहे.शनिवार, ९ जून, २०१८

उथळ वृत्तपत्रे आणि पुण्यातील वर्तमानपत्रांची संयमी, वस्तुनिष्ठ पत्रकारिता !

मोदी हत्येच्या कटाबाबत पेरलेली उठवळ बातमी, राज्यासह देशभरातील उथळ वृत्तपत्रे आणि पुण्यातील वर्तमानपत्रांची संयमी, वस्तुनिष्ठ पत्रकारिता !

● केवळ राज्यातीलच नव्हे तर देशभरातील वृत्तपत्रांनी आज मोदी हत्येबाबत अत्यंत उथळ व थिल्लर पद्धतीने बातम्या दिल्या आहेत. तुलनेने पुण्यातील पुढारी, लोकमत व सकाळ या प्रमुख वृत्तपत्रांनी मात्र त्याबाबत संयमपूर्ण व वस्तुस्थितीदर्शक बातम्या दिल्या आहेत. अपवाद  मटा, ज्यांनी राज्यासह देशभरातील इतर वृत्तपत्राप्रमाणे पुण्यात असूनही इथल्या वास्तुस्थितीचे इनपुट्स समाविष्ट न करता म् मं म्हणत संत्रा बर्फी  स्क्रीप्ट जशीच्या तशी सर्वात टॉपला, फ्रंट पेजवर छापली आहे.

● या पकाऊ स्टोरीचे 2 भाग आणि 2 स्क्रीप्ट रायटर आहेत. पहिला भाग दिल्लीतील, स्क्रीप्ट सांबित पात्रा, दुसरा भाग मुंबईतील नागपुरी संत्रा बर्फी    स्क्रीप्ट. पात्रा हे पात्र मनोरंजक आहे. तपासी यंत्रणा असलेल्या पुणे पोलिसांनी कोर्टात पुरावे सादर करण्याअगोदर या पात्राने  दिल्लीत आदल्या दिवशी सायंकाळी एक पकाऊ ई-मेल पत्र व्हायरल केले. ते सत्य असेलच तर सर्वात आधी न्यायप्रविष्ठ बाबीतील पुरावे लीक करणाऱ्या, तपासी यंत्रणांचा भाग नसलेल्या पात्राच्या मुसक्या आवळायला हव्यात. असो, तर ही मनोरंजक डेव्हिड धवन स्टाईल स्क्रीप्ट पात्रा प्रस्तुत आहे. दुसऱ्या स्क्रीप्टरायटरने दिल्लीतील पात्राची स्टोरी कॉपी करून अजून 'काला'स्टाईल दाक्षिणात्य माल-मसाला घालून रंगवून सांगितली. (जी आज पुण्यातील एकट्या 'मटा'प्रमाणे, पुण्याबाहेर राज्यात, देशात म् मं म्हणत सर्वांनी छापली!) दुर्दैवाने, हे दुसरे स्क्रीप्ट रायटर जबाबदार पदावर आहेत. त्यांनी इतकी घाई का केली? DG ला का नाही प्रेस घ्यायला सांगितली? पुणे SP, कमिशनरला का नाही सांगितले? तपासी यंत्रणांचे मत विचारात का घेतले नाही ...? असे अनेक प्रश्न आहेत ... पण, म्हण आहेच की - निष्ठाप्रदर्शनाच्या पाण्याला खळखळाट फार ... निष्ठेऐवजी भक्तीही चालू शकेल; पण ती सहेतुक आहे!!

*आता पाहू वस्तुस्थिती अन मटा वगळता पुण्यातील पुढारी, लोकमत व सकाळ या इतर 3 प्रमुख वृत्तपत्रांनी दाखविलेली समज ...

● या सर्वांनी नागपुरी स्क्रीप्ट ला पुण्यातील प्रत्यक्ष तपासी यंत्रणांच्या वास्तुस्थितीची जोड दिलीय. त्यामुळे वाचकाला दूध का दूध, पानी का पानी कळते. 'लोकमत'ने ही बातमी मुख्य अंकात घेतलेलीच नाही. 'हॅलो' या   पुरवणीत 8 व्या पानावर स्टोरी घेतलीय. त्यांनी नागपुरी स्क्रीप्ट देताना शीर्षकात  अधिकृत यंत्रणांकडून पुष्टी नाही हे ठळकपणे नमूद केलेय. *जिल्हा सरकारी वकील उज्ज्वला पवार यांनी न्यायालयीन ऑन रेकॉर्ड युक्तिवादात फक्त राजीव गांधी यांच्या नावाचा उल्लेख असल्याचे स्पष्ट केले, ही ठळक चौकट 'लोकमत'ने या    बातमीत प्रसिद्ध केलीय. या प्रकरणाशी थेट संबंधित, ज्यांनी ही अटक कारवाई केली, ते *तपासी अधिकारी सह आयुक्त राजेंद्र कदम यांनी या विषयाबाबत माध्यम प्रतिनिधींशी बोलणे टाळले, यातच सारे काही आले. दिल्ली-मुंबईतील स्क्रीप्ट रायटर्सनी प्रत्यक्ष सहभागी, संबंधित सरकारी यंत्रणांची फार मोठी अडचण करून ठेवलीय. अल्फ्रेड हिचकॉक स्टोरी ठसविण्याच्या नादात दोन्ही स्क्रीप्ट रायटर्सनी तिची पार धवन स्टाईल लोटपोट कॉमेडी करून ठेवलीय यातील अजून एक अत्यंत लक्षात घेण्यासारखा मुद्दा म्हणजे, पोलिसांना सापडलेल्या आतापर्यंतच्या पुराव्याआधारे न्यायालयात युक्तिवाद करणाऱ्या सरकारी वकिलांनी कुठेही मोदी हे नाव घेतलेले नाही!  'पुढारी'ने मूळ बातमीला पुण्यातील तपासाची वस्तुस्थिती जोडून घेतली आहे.
'सकाळ'ने मुंबई स्क्रीप्टची छोटीशी बातमी पान 3 वर प्रसिद्ध केलीय; पण त्या शेजारीच टॉपला    व्हायरल पत्राबद्दल पुणे पोलिसांचे मौन; अधिकृत दुजोरा नाही, पत्राच्या सत्यतेबद्दल प्रश्नचिन्ह!* अशी ठळक चौकट दिली आहे. या पत्राप्रमाणेच दोन्ही स्क्रीप्टरायटर पात्रांच्या भूमिका व हेतूबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात पुण्यातील 'मटा'वगळता इतर 3 प्रमुख दैनिके यशस्वी झाली आहेत. *'लोकसत्ता'ने कालच 'मोदी यांची घटती लोकप्रियता जपण्यासाठी हा नसता उद्योग सुरू असल्याची बातमी ऑनलाईन दिली होती.

● एकूणच 2019 निवडणुकांपूर्वी गुजरातेत यापूर्वी रचले गेले तसे विनोदी प्लॉट्स रचले जातील, अशा अनेक मनोरंजक, विनोदी स्क्रिप्टस लिहिल्या जातील. *व्यथित करणारा प्रश्न एकच आहे, एरव्ही खातरजमा करणारी, पुरावे मागणारी माध्यमे म् मं म्हणत ही असली भंपक स्क्रिप्टस जशीच्या तशी छापतात,   तेव्हा त्याचा "अर्थ" काय..? आधीच प्रिंट संकटात असतांना हे असल्या उरफाट्या, हास्यास्पद उद्योगांनी माध्यमांची विश्वार्साहता व पत काय राहील..?* टीव्हीचं ठीक आहे, त्यांच्याकडे अजूनही कुणी गांभीर्याने पाहत नाही; पण छापील शब्दांना अजूनही प्रमाण मानले जाते, त्याला किंमत आहे ... ती कृपया घालवू नका ... पुण्याच्या वृत्तपत्रांचा आदर्श घ्या...  *पुण्यातील लोकमत, सकाळ, 'पुढारी'चे अभिनंदन!! आज तुम्ही वाहवत गेला नाहीत, पत्रकारिता धर्माला जागलात!!*शुक्रवार, ८ जून, २०१८

तोतया पत्रकाराला अटक

पिंपरी- तोतया पत्रकार व त्याच्या साथीदाराला सोनसाखळी चोरी प्रकरणी वाकड पोलिसांनी अटक केली आहे. दोघांकडून ८२ ग्रॅम वजनाचे दोन लाख ४५ हजार रुपये किंमतीचे आठ तोळे सोने जप्त करण्यात आले. झटपट पैसे कमविण्यासाठी चोरीसारखे गुन्हे करत असल्याची कबुली दोघांनी दिली आहे. स्वतःला पत्रकार सांगणाऱ्या या संशयिताचे पिंपरी-चिंचवड महापालिका मुख्य भवन, मंत्री-नेत्यांचे जाहीर कार्यक्रम, पोलिस ठाण्यात मुक्त वावर असल्याचेही तपासात उघड झाले. पोलिसांना 'शबनम न्यूज'चे ओळखपत्र, अन्याय भ्रष्टाचार निवारण समितीचा पिंपरी-चिंचवड शहर अध्यक्ष पदाचे नियुक्तीपत्र, तसेच एका सर्वधर्मिय संघटनेचा शहर उपाध्यक्षाच्या नियुक्तीचे पत्र आढळून आले आहे.
नसीम सादिक उस्मानी (३२, रा. जगतापनगर, लेन नंबर पाच, थेरगाव) आणि मोहम्मद शराफत हुसेन अली (२४, मूळ रा.ग्राम-पोस्ट अफजलगढ, ता. धामपूर, जि. बिजानेर, उत्तर प्रदेश, सध्या रा. थेरगाव) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिस उपआयुक्त गणेश शिंदे यांनी याबाबत पत्रकार परिषदेत माहिती दिली. या वेळी वरिष्ठ निरीक्षक सतीश माने, तपास पथकाचे फौजदार हरीष माने उपस्थित होते. सोनसाखळी चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी वाकड पोलिसांनी तपास पथक तयार केले.
तपास पथकातील विक्रम कुदळ, विजय गंभीरे, अशोक दुधवणे, प्रमोद कदम, विक्रांत गायकवाड, शाम बाबा, नितीन गेंगजे, मधुकर चव्हाण, बिभीषण कन्हेरकर, अनिल महाजन, सनी जोंधळे, महंमद नदाफ, धनराज किरनाळे, दादा पवार या पथकाने २९ मे रोजी साखळी चोरीच्या घटना घडलेल्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. त्यानुसार नसीम आणि मोहम्मद हे दोघे अॅक्टिव्हा मोपेड वरून वाकड, थेरगाव आणि काळेवाडी परिसरात पायी चालत जाणाऱ्या महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरून नेत असल्याचे निष्पन्न झाले. पथकाने त्यानुसार कारवाई करत दोघांना अटक केली.

सौजन्य - महाराष्ट्र टाइम्स 

सोमवार, ४ जून, २०१८

एबीपी माझाच्या कृष्णा केंडेविरुद्ध गंभीर तक्रार दाखल

औरंगाबाद - एम.जी.एम पत्रकारिता महाविद्यालयात शिकणाऱ्या भरत जनार्धन कोल्हे या विद्यार्थ्यास एबीपी माझाचा रिपोर्टर कृष्णा केंडे याने बेदम मारहाण केल्याची तक्रार पोलीस आयुक्ताकडे दाखल झाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी अद्याप गुन्हा दाखल केला नसला तरी सोशल मीडियावर अनेक पोस्ट सध्या फिरत आहेत. सर्व व्हॉट्स अँप आणि फेसबुकवर याची चर्चा रंगली आहे.
कोल्हे यांचा पोलीस आयुक्ताकडे जो अर्ज दाखल आहे, तो आम्ही प्रसिद्ध करीत आहोत.

......

तक्रार अर्ज

दिनांक : 31-05-2018

प्रति,

मा. पोलीस आयुक्त साहेब,

पोलीस आयुक्तालय,

औरंगाबाद.


विषय : गुन्हा नोंद करणे बाबत.


अर्जदार : भरत जनार्धन कोल्हे 


महोदय,

          वरील विषयास अनुसरून विनंतीपूर्वक तक्रार अर्ज सादर करतो. मी भरत जनार्धन कोल्हे वय 26, धंदा-शिक्षण, मूळ गाव रा.खादगाव, ता.पैठण जि. औरंगाबादचा असून सध्या शिवशंकर कॉलनी, सिडको N-6, औरंगाबाद येथे राहत वास्तव्यास आहे. मी एम.जी.एम पत्रकारिता महाविद्यालयात तृतीय वर्षात शिक्षण घेत आहे. दिनांक 16/05/2018 रोजी रात्री 9 वाजेच्या सुमारास एम.जी.एम. पत्रकारिता महाविद्यालयाचे प्रोफेसर दत्ता कानवटे यांनी मला “पार्टी दे”, असं म्हटले. त्यानुसार मग आम्ही औरंगाबाद रेल्वे स्टेशन परिसरातील ‘हॉटेल औरंगाबाद’ येथे  गेलो. हॉटेलमध्ये आमचे जेवण चालू असताना माझी नजर चुकवून दत्ता कानवटे यांनी माझ्या मोबाईलवरून व्हाट्सअपद्वारे एम.जी.एम. महाविद्यालयातील एका मुलीस मेसेज पाठवले. 

       या मेसेजचा आधार घेऊन एम.जी.एम. पत्रकारिता महाविद्यालयाच्या प्राचार्या रेखा शेळके यांनी दिनांक 17/05/2018 रोजी 1 वाजेच्या सुमारास मला एम.जी.एम. महाविद्यालय परिसरात असलेल्या त्यांच्या घरी बोलवून घेतले. आणि वर नमूद केलेल्या मेसेजविषयी मला जाब विचारला. नंतर मी मॅडमला सांगितलं की, ‘हे संदेश मी पाठवलेले नसून दत्ता कानवटे यांनी माझी नजर चुकवत माझ्या मोबाईलचा गैरवापर करून सदरील मुलीस मेसेज पाठवले आहेत.’ त्यानंतर शेळके मॅडम यांनी दत्ता कानवाटे आणि ए.बी.पी. माझा या वृत्तवाहीनीचा औरंगाबाद प्रतिनिधी पत्रकार कृष्णा केंडे यांना घरी बोलावले. दत्ता कानवटे यांना सदरील मेसेज संदर्भात शेळके मॅडम यांनी जाब विचारला असता, दत्ता यांनी ‘सदरील मेसेज मी भरत कोल्हे यांच्या मोबाईलवरून केले असून त्यात भरत कोल्हे यांची काहीही चूक नाहीये’ असं लेखी लिहून दिलं. या उपरही माझ्या मोबाईलचा गैरवापर करून हि सगळी घटना घडल्यामुळे मी सदरील मुलीची माफी मागावी असे शेळके मॅडम यांनी सुचवले. त्यामुळे मी सदरील मुलीची माफिदेखील मागितली. एवढे सगळे झाल्यानंतरहि मला तिथे उपस्थित असलेल्या ए.बी.पी. माझा चा पत्रकार कृष्णा केंडे याने लाथा बुक्यांनी बेदम मारहाण केली. सदरील पत्रकाराचा एम.जी.एम. महाविद्यालय परिसरात येऊन मला मारहाण करण्याचा काहीही संबंध नसताना त्याने मला बेदम मारहाण केली. त्याचप्रमाणे, “मी पत्रकार आहे, माझ्या ओळखी खूप मोठ्या आहेत, तू माझं काहीही वाकडं करू शकत नाहीस, परत जर औरंगाबाद मध्ये दिसलास तर तुझे पाय तोडीन. तसेच तू कुठेही गेलास तरी पोलीस तुझी तक्रार घेणार नाहीत. तुला जे करायचं ते कर”, असे म्हणत कृष्णा  केंडे याने मला परत लाथा बुक्यांनी मारले. त्याचप्रमाणे शेळके मॅडमयांनीसुद्धा मला मारहाण केली. तसेच जातीवाचक शिविगाळही केली. हे सर्व झाल्यावर मी तिथून बाहेर निघत असताना शेळके मॅडम आणि कृष्णा केंडे याने केलेल्या मारहाणीमुळे बेशुद्ध पडलो. काही मित्रांनी  मला एम.जी.एम हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. सुमारे अडीच तासानंतर मी शुद्धीवर आलो. डॉक्टरांनी मला, ‘तुझ्या डोक्यावर किंवा कानावर कुणी मारलं का’ असं विचारलं. मी कृष्णा केंडे आणि शेळके मॅडम यांनी मला मारहाण केल्याचे डॉक्टरांना सांगितलं. मला मारहाण झाल्याची MLC डॉक्टरांनी दिली. मी हॉस्पिटलमधून बाहेर आल्यावर मला पुन्हा शेळके मॅडम यांनी निरोप देऊन त्यांच्या घरी बोलावून घेतले. तिथे कृष्णा केंडेही उपस्थित होता. ‘तू आमच्या विरोधात MLC दाखल करतो काय. आमच्या ओळखी खूप मोठाल्या आहेत. तू आमचं काहीही वाकडं करू शकत नाहीस हे लक्षात ठेव.’ असं मला शेळके मॅडम यांनी धमकावलं. त्यानंतर कृष्णा केंडे यानेही, ‘पोलीस आमचं काही वाकडं करू शकत नाहीत. तुझी तक्रार पण ते दाखल करून घेणार नाहीत.’ अस म्हणत जीवे मारण्याची धमकी दिली आणि मला तिथून हाकललं. या प्रकारामुळे माझं मानसिक खच्चीकरण झाल्यामुळे मी प्रचंड तणावाखाली होतो. शेवटी मी पोलिसात तक्रार देण्यासाठी दि.१९-५-२०१८ रोजी  N-7 सिडको पोलीस ठाण्यात गेलो असता, मला तिथे दिवसभर बसून ठेवण्यात आले. तसेच तक्रार दाखल करून घेण्याविषयी उडवा उडवीची उत्तरे देण्यात आली. शेवटी कंटाळून मी घरी गेलो आणि परत दुसर्या दिवशी दि.२०-५-२०१८ रोजी सदरील पोलीस स्टेशनला गेलो असता मला आदल्या दिवशीप्रमानेच तक्रार दाखल करून घेण्यासाठी टाळाटाळ करण्यात आली. महाविद्यालयातील मारहाणीमुळे आणि पोलिसांनी दिलेल्या अश्या वागणुकीमुळे मी पूर्णतः मानसिक तणावाखाली गेलो. शेवटी मी धैर्य करून आता शेवटची आशा म्हणून मा.आयुक्त साहेब तुमच्याकडे न्याय मागत आहे. 

   महोदय, शिक्षण संस्था आणि शिक्षक विद्यार्थी घडवण्याचे काम करतात. परंतु एम.जी.एम. च्या प्राचार्य रेखा शेळके यांनी बाहेरील पत्रकार गुंड बोलावून मला मारहाण केली आणि पवित्र अश्या शिक्षण क्षेत्राला काळिमा फसला. त्याचप्रमाणे स्वतःला लोकशाहीचा चौथा खांब म्हणवणाऱ्या कृष्णा केंडे या पत्रकारानेही मला मारहाण करत जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या. मा.आयुक्त साहेब या प्रकाराला सत्तेचा गुर्मी नाही म्हणत तर आणखी काय म्हणता येईल. माझ्यासारख्या सामान्य विद्यार्थ्याला अश्या हुकुमशाही आणि सत्तेची गुर्मी असणार्या माणसांकडून अशी वागणूक भेटते हे दुर्दैवी आहे. त्याचप्रमाणे यासाठी न्याय मागायला गेल्यावर आपले पोलीस खातेही आम्हाला सोयीस्करपणे उडवून लावते हे जास्त दुर्दैवी आहे. अश्यावेळी आम्ही न्याय मागायचा तरी कुणाकडे, हा यक्षप्रश्न माझ्यापुढे आहे. 

    सध्या मी प्रचंड मानसिक तणावाखाली असून माझ्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. माझ्या जीवाचे काही बरे वाईट झाल्यास त्याला सर्वस्वी एम.जी.एम. पत्रकारिता महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. रेखा शेळके आणि ए.बी.पी. माझा या वृत्तवाहिनीचा औरंगाबादचा प्रतिनिधी कृष्णा केंडे हे दोघेजण जबाबदार असतील. मी मोठ्या अपेक्षेने आपल्याकडे तक्रार दाखल करत आहे. तरी माझ्या तक्रारीचा विचार करून रेखा शेळके आणि कृष्णा केंडे या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करून सर्वसामान्य माणसाचा पोलीस खात्यावरील विश्वास कायम ठेवावा हि विनंती. या अर्जासोबत mlc ची प्रत जोडत आहे. मला न्याय मिळावा हीच आपल्याकडून अपेक्षा. धन्यवाद.


आपला विश्वासू,

भरत जनार्धन कोल्हे.

मो.९९६०७९०६९१

जिल्हा माहिती अधिकारी सानपवर अखेर गुन्हा दाखल

तुळजापूर -  महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई  तुळजाभवानी देवीच्या गाभाऱ्यासह मंदिर परिसरात ड्रोन कॅमेऱ्याने विनापरवाना चित्रीकरण केल्याप्रकरणी जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप यांच्या सहा जणांविरोधात तुळजापूर पोलीस ठाण्यात अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तुळजाभवानी देवीचा मुख्य गाभारा, मंदिर परिसरासह राजे शहाजी महाद्वार परिसरात कोणत्याही शासकीय परवानगीशिवाय बुधवारी (दि.३०) सायंकाळी चित्रीकरण करण्यात आले. विशेष म्हणजे ड्रोन कॅमेऱ्याच्या साहाय्याने चित्रीकरण करण्यात आल्याने खळबळ माजली होती. यावेळी मंदिर परिसरातील तिघांकडून ड्रोन कॅमेऱ्यासह ऑपरेटिंग सिस्टिम, तीन मोबाइल आदी साहित्य ताब्यात घेतले होते. जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप चित्रीकरणासाठी परवानगी घेतल्याचे सांगत होते. परंतु तब्बल २४ तासांनंतरही सानप चित्रीकरणासाठी परवानगी घेतल्याचे पत्र सादर करू शकले नाहीत. त्यामुळे पोलिसांनी अखेर गुन्हा दाखल केला. तत्पूर्वी सहायक पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांनी आरोपींची पाच तास कसून चौकशी केली.

शासकीय आदेशाचे जाणीवपूर्वक उल्लंघन
दरम्यान या प्रकरणात विनोद गणपत महाडिक (४२, प्रॉडक्शन हेड, रा. काशीनगर (ई ) मुंबई), कुशल कैलास वाघळे (२९, फिल्म डायरेक्टर रा. शिवाजी पार्क, दादर मुंबई) शेख सोहिद नासीर (२९, ड्रोन ऑपरेटर रा. अमृतनगर मुंब्रा, गोपाळ गबाजी कावडे (२८, कॅमेरामन रा. हारदांडा मुंबई ५२, सचिन हरिश्चंद्र मोरे (रा. वलगुड) मनोज शिवाजी सानप यांच्या विरोधात तुळजाभवानी देवीच्या गाभाऱ्यासह मंदिर परिसरात ड्रोन कॅमेऱ्यासह विना परवाना चित्रीकरण करून शासकीय आदेशाचे जाणीवपूर्वक उल्लंघन केल्याप्रकरणी पोलिस निरीक्षक राजेंद्र बोकडे यांच्या फिर्यादी वरून १८८, ३४ भादंवि अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुरक्षा व्यवस्था चव्हाट्यावर
या प्रकाराने तुळजाभवानी मंदिराची सुरक्षा व्यवस्था चव्हाट्यावर आली आहे. तुळजाभवानी मंदिराची सुरक्षा खासगी कंपनीकडे असून तब्बल २०० सुरक्षारक्षक तैनात असतानाही तुळजाभवानी मंदिरात ड्रोन कॅमेरा गेला कसा, कुलस्वामिनी तुळजाभवानी मातेच्या गाभाऱ्यात देवीचे चित्रीकरण करताना सुरक्षारक्षक किंवा मंदिर कर्मचाऱ्यांनी का रोखले नाही, असे अनेक सवाल उपस्थित होत आहेत.


चित्रीकरणाचा हेतू काय? 
मंदिर परिसरात ड्रोन कॅमेरा सह विना परवाना चित्रीकरण केल्याप्रकरणी ताब्यात घेण्यात आलेल्यांमध्ये प्रॉडक्शन हेड, फिल्म डायरेक्टर यांच्यासह कॅमेरामन, ड्रोन ऑपरेटर आदींचा समावेश असल्याने प्रकरणाचे गांभीर्य वाढले आहे.

सानप याने बळीराजा चेतना अभियानमध्ये लाखो रुपयाचा घपला केला आहे. एका सहकारी महिला कर्मचाऱ्यांस छळलं आहे,पण वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यास आजपर्यंत पाठीशी घातले आहे.आता तरी सानप याच्यावर कडक कारवाई करावी, त्यास निलंबित करावे,अशी पत्रकरांची मागणी आहे.

जिल्हा माहिती अधिकऱ्यास निलंबित करण्याची मागणी
उस्मानाबाद - जिल्हा माहिती अधिकारी पदाचा दुरूपयोग करून सरकारी कामात गैरकृत्य करणाऱ्या मनोज सानप यास तात्काळ निलंबित करावे, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा लोकपत्रिका संपादिका सौ. शिला उंबरे यांनी दिला आहे.
सानप यांच्यासह सहा जणांविरुद्ध तुळजापूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाल्याने माहिती व जनसंपर्क विभागाला काळिमा लागली आहे. सानप यांनी यापूर्वीही अनेक प्रताप केले असून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यास पाठीशी घातले आहे.
सानप यांना तात्काळ निलंबित न केल्यास उस्मानाबादचे अनेक पत्रकार विभागीय माहिती कार्यालयासमोर आंदोलन करतील, असा इशारा उंबरे यांनी दिला आहे.
सौजन्य - उस्मानाबाद लाइव्ह  

रविवार, ३ जून, २०१८

पुढारीच्या क्राईम रिपोर्टरवर गुन्हा दाखल ...

सोलापूर - दैनिक पुढारीच्या सोलापूर आवृत्तीत दि. २२ मे रोजी पोलिसांविषयी एक बातमी प्रकाशित झाली होती. यावरून क्राईम रिपोर्टर अमोल व्यवहारे आणि कार्यकारी संपादक ( नाव नमूद नाही ) यांच्याविरुद्ध  भा दं वि ५०५ (२), ५००,५०१,५०२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आल्याने पत्रकारांमध्ये खळबळ उडाली आहे. 

फेसबुक वर शेअर करा

Facebook