> बेरक्याला माहिती देण्यासाठी ई - मेल करा - berkya2011@gmail.com

रविवार, २९ जुलै, २०१८

एबीपी माझा 'उघडा डोळे, बघा नीट' !

मुंबई - कोकणाला पश्चिम महाराष्ट्राशी जोडणाऱ्या पोलादपूरजवळील  आंबेनळी घाटात एक खासगी बस 800 फूट दरीत कोसळली. या बसमध्ये चालकासह 31 जण होते, त्यापैकी 30 जणांचा मृत्यू झाला. हे सर्व दापोली कोकण कृषी विद्यापीठाचे कर्मचारी होते.
या दुर्देवी घटनेची बातमी चालवताना 'उघडा डोळे, बघा नीट' तथा एबीपी माझा'ने फेसबुक वरुन फोटो घेवुन चालवले, मात्र यातले अनेक फ़ोटो चुकीचे निघाले. उदाहरणार्थ या  फोटोतला व्यक्ती कृषी विद्यापीठात कामाला नव्हता, या अपघाताशी त्याचा काही संबंध नव्हता. मात्र हा फ़ोटो टिव्हीवर पाहिल्यानंतर त्याची बायको बेशुद्ध झाली. अनेक तास तिला शुद्धच आली नव्हती.

मागे, औरंगाबादच्या एका खून प्रकरणातही या चॅनलने पुण्याच्या महिलेचा फोटो वापरला होता. त्यामुळे या महिलेने या चॅनलवर केस केली होती.

असे प्रकार वारंवार घडत असून चॅनललाच 'आता 'उघड़ा डोळे, बघा नीट' असं  त्यांना सांगण्याची गरज आहे.

शुक्रवार, २७ जुलै, २०१८

सुरमा भोपालीचा असाही 'दिव्य' दृष्टिकोन !

फक्त बातम्याच नाही जाहिरातीही नकारात्मक  शोले सिनेमात सुरमा भोपाली नावाचे एक पात्र आहे.लाकडाच्या वखारीचा धंदा करणारा हा बनेल बनिया कमिशन घेउन भुरट्या चोरांच्या जमानती घेण्याचा जोडधंदा करतो आणि त्यांचे चोरीचे पैसे देखील सांभाळतो.त्याच्या दृष्टीने हे सकारात्मकच काम असल्याने आपल्या कृत्याची त्याला खंत ना खेद असते.उलट फुशारकी मारत तो " हमारा नाम सुरमा भोपाली युंही भई नई है ! असे स्वतःच्या कौतुकाचे पालुपद आळवत असतो.असाच एक सुरमा भोपाली आमच्या मराठी वृत्तपत्र सृष्टीत आला आहे.वर्तमानपत्र  आता प्रबोधनाचे माध्यम राहिले नाही.व्यावसायिकता अपरिहार्यच आहे.आपले काम काय घडले हे सांगायचे आहे,काय घडावे किंवा घडले पाहिजे हे सांगण्याचे नाही वगैरे अंगचोर मानसिकता आता जवळपास सर्वच वृत्तपत्र मालक चालक आणि पत्रकारांनी स्वीकारली आहे.काही सन्माननीय अपवाद अशा करीता म्हणायचे की 'कडी लावा आतली म्हणणाऱ्यांना ,आम्ही नाही त्यातले' असे म्हणण्याची सोय व्हावी.
     तर विषय असा आहे की सकारात्मक बातमी ही नवीच संकल्पना आणणाऱ्या एका दिव्य दृष्टीच्या वर्तमानपत्राने २६ जुलै रोजी गुरु पौर्णिमे निमित्त आसाराम बापू या बलात्काराच्या गुन्ह्यात न्यायालयाने २० वर्षाची शिक्षा ठोठावलेल्या गुन्हेगाराचा भला मोठा फोटो असलेली पूर्ण पण जाहिरात छापली.जाहिरात कोणी दिली हा गौण मुद्दा आहे.जाहिरातदार जशी जाहिरात देईल तशी छापावी लागते हे ही खरे.व्यावसायिकता सांभाळावी लागते हेही बरोबर.परंतु मध्यम म्हणूनही काही जबाबदारी असते की नाही ? उद्या दाऊद इब्राहिमचा एखादा पंटर तुमच्या कडे आला आणि त्याने 'डॉन'ला वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायच्यात तुमचे फुलपेज केव्हढ्यात आहे बोला ? असे म्हटले तर,तुम्ही दाऊद इब्राहिमची जाहिरात देखील छापाल का ? बहुतेक होय,ज्या अर्थी आसाराम बापूची छबी असलेली,त्यात त्याला 'सदगुरु परम पूज्य संत'म्हटलेली जाहिरात तुम्ही बिनदिक्कतपणे कमर्शियल आस्पेक्ट म्हणून छापू शकता तिथे दाऊदचे काय वावडे असणार.उद्या कोणी नथुराम गोडसेंच्या फाशी दिनी त्याची अमर शाहिद म्हणून जाहिरात द्यायची म्हटले तर तुम्ही त्याला रेटकार्ड द्याल.ही केवळ कल्पना नाही असे प्रत्यक्ष घडले आहे.सुरमा भोपालीत आसाराम बापूची जाहिरात पहिल्या नंतर माध्यम जगतात काय प्रतिक्रिया उमटायच्या त्या उमटल्या.परंतु ज्या वाचकाला आपण आपले दैवत आणि अन्नदाते मानतो त्यांनी देखील या हलकट आणि तद्दन धंदेवाईक मनोवृत्तीची छी थू केली.जेष्ठ प्रौढ तरुणांनीच नाही तर शाळकरी मुला-मुलींनी सुध्दा! प्रशांत दीक्षित,यांच्या सारखे ज्येष्ठ अनुभवी,वैचारिक पृष्ठभूमी असणारे संपादक असताना असे घडत असेल तर ही बाब गंभीर आहे.आजवरचे ठीक आहे.म्हणजे एखाद्या बलात्काराच्या गुन्ह्यात आरोपीला शिक्षा झाली असेल तर ही बाब सकारात्मक असतानाही बातमीच्या मथळ्यापूर्वी 'नकारात्मक बातमी 'असा उल्लेख करण्याची कायदेशीर गफलत नजरचुक म्हणून किंवा 'दिव्य'दृष्टिकोन म्हणून खपवूनही घेतली जाऊ शकते.परंतु मीडिया पार्टनर होऊन जवळपास १० हजार विद्यार्थ्यांची शाळा बुडवून त्यांना उद्धव ठाकरेच्या वाढदिवसाच्या इव्हेंट निमित्त त्यांची चित्रे रंगवायला बसवणे यात कोणती सकारात्मक बातमीदारी आहे हे माझ्या सारख्या अल्पमती संपादकाला कळत नाही.
     कोणी म्हणेल हा कोल्ह्याला द्राक्षे आंबट असा प्रकार झाला.इतर पेपरचे काय माहिती नाही,परंतु संबंधित जाहिरातदार साधक माझ्याकडेही आले होते.पूर्ण पान जाहिरात देण्यासाठी.त्यांचा मजकूर आणि फोटो पाहून मी जाहिरात स्वीकारण्यास नकार दिला. आमच्या वृत्तपत्राचे मालक श्री अंकुशराव कदम यांनी देखील माझ्या निर्णयाला पाठिंबा दिला,वास्तविक सुरमा भोपालीच्या तुलनेत आमचा पेपर सर्कुलेशन,पानांची संख्या,बातम्यांचे कव्हरेज,आर्थिक आवक जावक आणि उलाढाल या सर्वच बाबतीत किरकोळ आहे.एक पूर्ण पान जाहिरात नाकारण्याचा तोटा आमच्या पेपरसाठी मोठा आहे.सुरमा भोपालीसाठी एखादी जाहिरात म्हणजे दर्या में खसखस आहे,असे असूनही 'हमारा नाम सुरमा भोपाली युंही भई नहीं है ' म्हणत सुरमा भोपालीने जाहिरात घेतली.प्रत्यक्ष फोन करून स्पष्टीकरण विचारल्यावर 'हा जाहिरात विभागाचा मामला आहे' असे न पटणारे उत्तर देऊन मला 'पटव'ण्याचा..स्वारी कटवण्याचा प्रयत्न झाला.चला या निमित्ताने बलात्कारासारख्या गुन्ह्यात  तुरुंगात शिक्षा भोगणाऱ्या गुन्हेगारांनाही वर्तमानपत्रात जाहिरात देऊन संत महात्मे सदगुरु सत्पुरुष ठरवण्याचा मार्ग मोकळा झाला.या अभिनव आणि दिव्य सकारात्मक दुष्टीकोणाचे स्वागत करायचे काय ?

-- रवींद्र तहकिक
कार्यकारी संपादक,दैनिक लोकपत्र

गुरुवार, २६ जुलै, २०१८

बेरक्या वाचकांसाठी खुशखबर


पत्रकारांच्या बातम्या देणारा पत्रकार बेरक्या उर्फ नारद  
आता प्ले स्टोअरवर

पत्रकारांच्या बातम्या देणारा पत्रकार  बेरक्या उर्फ नारद हा ब्लॉग गेल्या सात वर्षांपासून सुरु आहे. आता बेरक्याने अँप सुरु केलं आहे. कोणतीही बातमी पहिल्यांदा अँप वर प्रसिद्ध होईल. नंतर वेबसाईटवर प्रसिद्ध होईल. तेव्हा बेरक्या अँप डाऊनलोड करा.. नोटिफिकेशन्स ऑन ठेवा, जेणेकरून बेरक्यावर प्रसिद्ध झालेली बातमी आपणास कळेल...

तेव्हा आपल्या मोबाईलवर प्ले स्टोअरवर जाऊन
Berkya Narad किंवा  बेरक्या उर्फ नारद सर्च करा

नंतर हा अँप डाऊनलोड  करा आणि आमच्यासोबत कनेक्ट राहा

किंवा खालील लिंक वर क्लीक करा ... नंतर डाऊनलोड  करा ...
धन्यवाद

बेरक्या उर्फ नारद


शनिवार, २१ जुलै, २०१८

दै. भास्करचे समूह संपादक याग्निक आत्महत्या प्रकरणी मुंबईच्या महिला पत्रकारावर गुन्हा दाखल

इंदौर – दैनिक भास्करचे  समूह संपादक आणि वरिष्ठ पत्रकार कल्पेश याग्निक यांना खोट्या प्रकरणात फसविण्याची धमकी देऊन आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी पोलिसांनी एका महिला पत्रकाराविरोधात गुन्हा दाखल केला आहे. कल्पेश याग्निक यांनी इंदौर येथील कार्यालयाच्या तिसऱ्या मजल्यावरुन उडी मारुन आपली जीवनयात्रा संपवली होती. हृदयविकाराच्या झटक्‍याने कल्पेश याग्निक यांचा मृत्यू झाल्याचे बोलले जात होते, मात्र त्यांनी आत्महत्या केल्याचे पोलीस तपासात उघड झाले. कल्पेश याग्निक यांना आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या मुंबईतील एका महिला पत्रकाराविरोधात आयपीसी कलम 306, 386 आणि आयटी ऍक्‍ट 67 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  सलोनी अरोरा असे या महिला पत्रकराचे नाव आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून ही महिला पत्रकार कल्पेश याग्निक यांना फोन करुन छळवणुकीचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देत होती. धमकीच्या आधारे या महिलेने याग्निक यांच्याकडून कोट्यवधी रुपयांची मागणी केली होती.
ही पत्रकार महिला अनेक दिवसांपासून कल्पेश यांना ब्लॅकमेल करुन पैशांची मागणी करायची, असा आरोप कल्पेश यांचे भाऊ नीरज याग्निक यांनी केला आहे. नीरज यांनी 3 जुलै रोजी अतिरिक्त पोलीस आयुक्त अजय कुमार यांच्याकडे तक्रार दाखल केली होती.गुरुवार, १९ जुलै, २०१८

अँकर गिरीश निकम यास सिनेस्टाईल लुटलं...

मुंबई - झी २४ तासचा अँकर गिरीश निकम (४१) याला क्राईमच्या बातम्या देता देता प्रत्यक्ष थरारक अनुभव आला.पुण्याहून खारघरला परत येत चार लुटारूंनी त्यास सिनेस्टाईल लुटलं. या प्रकारामुळं  पत्रकारिता क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
खारघरमध्ये राहणारा   झी २४ तासचा  अँकर गिरीश निकम (४१) काल सायंकाळी पुण्याहून खारघर येथे परतण्यासाठी स्वारगेट बस स्थानकात गेला होता.   रात्री १० च्या सुमारास तो डेपोमध्ये बसची वाट पाहत असताना, एका व्यक्तीने त्याच्याजवळ खासगी प्रवासी वाहतुकीची गाडी असून त्यात केवळ एका प्रवाशाची जागा शिल्लक असल्याचे सांगितले. यावेळी गिरीश हेही या गाडीने अडीचशे रुपयांमध्ये खारघर येथे जाण्यास तयार झाले. यावेळी गिरीश पांढऱ्या रंगाच्या गाडीमध्ये जाऊन बसले, तेव्हा त्या गाडीत चालकासह चौघे बसले होते. त्यानंतर ही गाडी मुंबई-पुणे एक्सप्रेस मार्गाने मुंबईच्या दिशेने जात असताना, तळेगाव येथे पेट्रोल भरण्यासाठी थांबली. पुन्हा काही अंतर पुढे गेल्यानंतर चालकाने लघवीच्या निमित्ताने कार थांबविली. यावेळी चालकाच्या शेजारी बसलेला व्यक्ती गिरीशच्या बाजूला बसला आणि त्याने गिरीशच्या कमरेला बंदुक लावून त्याला मारहाण केली आणि गळ्यातील सोन्याची साखळी, मोबाइल फोन तसेच रोख रक्कम असलेले पाकीट काढून घेतले. तसेच, एटीएम कार्ड घेऊन त्याचा पासवर्डही विचारून घेतला. त्यानंतर लुटारूंनी काही किमीनंतर गाडी थांबवून गिरीशच्या खात्यातून ४१ हजारांची रक्कम काढून घेतली. नंतर पोलिसांनी गिरीशला त्याचा मोबाइल आणि एटीएम कार्ड परत देऊन त्याला कळंबोलीतील अंतर्गत रस्त्यावर टाकून पलायन केले. मात्र त्या मोबाइलमध्ये सिमकार्ड नव्हते. अखेर त्यांनी एका रिक्षाचालकाच्या मदतीने कळंबोली पोलिस ठाणे गाठून तक्रार केली.
या  घटनेमुळं एकच खळबळ उडाली आहे.


बुधवार, १८ जुलै, २०१८

त्या पत्रकाराच्या कुटूंबीयास मदत द्या- धनंजय मुंडे

नागपूर - नागपूर येथील देशोन्नतीचे ज्येष्ठ पत्रकार दिवंगत श्री. देवेंद्र वानखेडे यांच्या कुटूंबीयांना मुख्यमंत्री मदत निधीतून जाहीर केलेली एक लाख रूपयांची मदत तातडीने द्यावी, अशी मागणी विधानपरिषदेत आज विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी औचित्याच्या मुद्दाद्वारे केली.

 सन 2016 मध्ये श्री.वानखेडे यांचे निधन झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या कुटूंबीयांना एक लाख रूपये मदत देण्याचे जाहीर करूनही देान वर्षात ही मदत मिळालेली नाही.

 याबाबत श्री.वानखेडे यांच्या पत्नी श्रीमती सुनिता वानखेडे यांची मुख्यमंत्री मदत निधी एक अफवा अशी एक पोस्ट सोशय मिडीयात मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाल्याने त्याआधारे श्री.मुंडे यांनी वानखेडे कुटूंबीयास मदत देण्याची मागणी केली.

दिवंगत पत्रकार देवेंद्र वानखेडे यांच्या पत्नी सुनीता झाडे यांनी, मुख्यमंत्री निधी मिळत नसल्याबद्दलची  खंत फेसबुकवर मांडली होती. 

काय आहे पोस्ट ?
 ......


#मुख्यमंत्री_मदतनिधी_एक_अफवा

आपल्याकडे नैसर्गीक आपत्ती, अपघात, अकस्मीक संकटात मृतांना आणि जखमींना मुख्यमंत्री मदत निधी घोषीत केल्या जाते. मदतनिधी घोषीत झालेल्या मृतांच्या, जखमींच्या नातेवाईकांना त्यावेळी ही घोषणा एकूण तात्पुरता दिलासा मिळतो. पण प्रत्यक्षात मदत काही मिळत नाही. मुख्यमंत्र्यांची मदतनिधी ही केवळ अफवा ठरते. 
हे वेगळ सांगायला नको की, घरातील एक माणूस गेला किंवा आजारी पडला तर सर्वसामान्य माणसापुढे जगण्याचा पेच निर्माण होतो. नजीकचे लोक हात वर करतात. महागाई काही केल्या ऎकत नाही. अश्या परिस्थीतीत त्याच्यासोबत जगणारया माणसांची मोठी सर्कस होत असते. त्यात आपला समाज, आपली कुटूंबव्यवस्था, आपली शासनव्यवस्था त्यांची मौज घेण्यात आनंद मानतात हा भाग आपल्यातील सुशक्षित सुसंस्कारी असण्याचा, सुसंस्कृतपणाचा वैगेरे... अधोरेखीत करावा.
मध्यंतरी सगळीकडे सरकारचे लाभार्थी असण्याच्या जाहिराती प्रकाशित होत होत्या त्यावेळपासून  ही सल मनाला लागून होती वाटलं तुमच्याजवळ मोकळी करावी. 
सप्टेंबर २०१५ ला वयाच्या पंचेचाळीसाव्या वर्षी माझे यजमान देवेन्द्र वानखेडे (जेष्ठ पत्रकार, देशोन्नती) यांचे गंभीर आजाराने निधन झाले. अगदी बेताची आर्थीक परिस्थीती, उपचाराचा खर्च आणि कर्जाचा बोजा अश्या परिस्थीतीत ते आम्हाला सोडून गेले. त्यानंतरच्या सहानुभूतीच्या लाटेत मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांसाठीच्या मदत निधीतून आम्हाला एक लाख रुपये मदत निधी देण्याचे घोषीत केले. त्यादरम्यान एक आठवडा आधी सकाळचे पत्रकार प्रदीप भानसे यांचाही अकस्मात मृत्यू झाल्याने त्यांच्याही परिवारास मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांसाठीच्या मदत निधीतून एक लाख रुपये मदत निधी देण्याचे जाहीर केले. त्यानंतर अर्जाचे सोपस्कार झाले. त्यानंतर अर्ज पोहचल्याचा एक मॅसेज आला. बस. त्यानंतर काहीच नाही. या गोष्टीला आजमितीस तीन वर्ष होत आहेत. 
पत्रकार संघाच्या वरीष्ठांना याबाबत सांगीतलेले आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्री नागपूरच्या या दोन्ही पत्रकारांना वैयक्तीकरित्या ओळखत होते. 
आपल्या मेलेल्या माणसाच्या नावावर मदतीची याचना, सरकारी मदतनीधीची वारंवार चौकशी बरी दिसत नाही म्हणून सोसणारे चुप बसतात. व्यवस्था हे जाणून आहे... 
आज जे आमच्या सोबत झाले ते इतरांसोबत झाले आहे. होत आहे. होत राहील. त्यामुळे इथे यानिमित्ताने निवेदन एवढेच की, 
अकस्मीक संकटग्रस्तांनो मुख्यमंत्री मदतनिधी एक अफवा आहे. यावर विश्वास ठेवू नका. 

---------------------
सुनीता झाडे
(सुनीता झाडे या प्रसिद्ध लेखिका आणि  पत्रकार आहेत. )
 

शनिवार, १४ जुलै, २०१८

वृत्तपत्र व्यवसाय संकटात


वृत्तपत्र प्रिंट करण्यासाठी लागणारा कागद  चीनमधून येत होता, पण चीनमध्ये प्रदूषण टाळण्यासाठी वृत्तपत्र कागद  उत्पादन करण्यावर बंदी घालण्यात आली आहे, त्यामुळे 90 टक्के कारखाने बंद झाल्याचे सांगण्यात येतंय.

दुसरीकडे भारतात गुजरातमधील एखादा दुसरा कारखाना सोडला तर वृत्तपत्र  प्रिंट करण्यासाठी लागणारा कागद मिळत नाही.इतर देशातील कागद परवडत नाही. 

एकंदरीत परिस्थिती पाहिली असता, कागद टंचाई निर्माण झाली असून, कागदाचे भाव दुप्पट वाढले आहेत. त्यामुळे जिल्हा वृत्तपत्र संकटात सापडली आहेत.

मोठ्या वृत्तपत्रानी देखील दररोजच्या पानांची संख्या कमी केली आहे, तसेच पुरवण्या बंद करत आहेत.


येणारा काळ हा प्रिंट मीडियासाठी अत्यंत कठीण आहे.येणारे उत्पादन आणि होणारा खर्च याचा ताळमेळ बसत नाही, त्यामुळे अनेकांनी डिजिटल मीडियात लक्ष घातले आहे.

वृत्तपत्रांच्या दादागिरीमुळे पत्रकारांचा ऑनलाइन मिडियाकडे कल वाढला

वृत्तपत्रांच्या दादागिरीमुळे ग्रामीण भागातील अनेक पत्रकारांनी आता आपला रोख ऑनलाइन मिडियाकडे केला आहे. वृत्तपत्रांमधील घटते उत्पन्न भरून काढण्यासाठी अनेक वृत्तपत्रांनी जाहिराती मिळविण्यासाठी ग्रामीण पत्रकारांना अक्षरशा भंडावून सोडले आहे. काहीही करा पण जाहिराती द्या, जाहिराती दिल्या आता त्यांचे पेमेंट भरा, पेमेंट नाही भरले तर न्यायालयीन कारवाईला तयार रहा असा दमच सध्या वृत्तपत्रांच्या ऑफिसमधून  पत्रकारांना दिला जात आहे.
वृत्तपत्रांच्या अश्या ब्लॅकमेलिंगला कंटाळून अनेक पत्रकारांनी सध्या ऑनलाईन मीडियाचा पर्याय स्वीकारला आहे. जाहिरातींची कट कट नाही. पाठवलेली बातमी अर्ध्यातासाच्या आत लाईव्ह होते, त्यामुळे आज घडलेली घटना आजच पाहायला मिळत असल्याने वाचकवर्गही ऑनलाइन मिडियालाच पसंती देताना दिसत आहे.

कॉस्ट कटिंग सुरु
  1. दिव्य मराठीने महाराष्ट्रातील विस्तार थांबवला आहे, तसेच मोठ्या प्रमाणात कॉस्ट कटिंग केली आहे. तसेच काही ब्युरो ऑफिस बंद करणार असल्याचे वृत्त आहे. 
  2.  पुढारीही येत्या काही दिवसात कॉस्ट कटिंग होणार असल्याचे समजते..
  3.  अनेक जिल्हा वृत्तपत्र बंद
  4.  

शुक्रवार, १३ जुलै, २०१८

तुळशीपत्र नेमके कोणाच्या डोक्यावर ?


मुंबई - उघडा डोळे बघा नीट मध्ये इनपूटची भारत माता आणि आऊटपूटच्या कोल्हापुरी आणि सातारकरवर तुळशीपत्र ठेवण्यात आल्याने सर्वजण अस्वस्थ झाले आहेत. इनपुट आणि आऊटपूट समन्वयक म्हणून तुळशीपत्रची नेमणूक करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे.

कुठेही तीन, सहा किंवा फार तर एक वर्ष  न टिकणारा तुळशीपत्र उघडा डोळे बघा नीट मध्ये दाखल झाल्यानतंर सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार ही दिल्लीहून खेळी झाल्याचं सांगितलं जात आहे. चांगल्या समाजासाठी चॅनलमध्ये टीम कुमकवत करून  परत हिंदीच्या उघडा डोळे बघा नीट  मध्ये आलेल्यास संपादक कांडकर मोजत नसल्याने आणि त्याच्या बातम्या मराठीमध्ये लावत नसल्याचे त्याने दिल्लीच्या कांडकरांचे कान फुंकून मराठी कांडकरांच्या डोक्यावर हे तुळशीपत्र ठेवले आहे. त्यामुळे सर्व टीमच डिस्टर्ब झाली असून, नंबर १ असलेल्या  चॅनलने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेतली आहे.

उघडा डोळे बघा नीट  मध्ये एक विशिष्ठ लॉबी आहे. ती तुळशीपत्रला अजिबात सहकार्य करणार नाही, हे उघड आहे. त्यामुळे तुळशीपत्र आपला गट निर्माण करण्याचा प्रयत्न करणार हे उघड आहे. त्यातुन चॅनलची अधोगतीकडे वाटचाल होणार, हे निश्चित आहे.

मी सध्या तरी आहे - कांडकर

उघडा डोळे बघा नीटच्या कांडकराना स्मार्ट मित्रची ऑफर असल्याचं गेल्या एक वर्षापासून सांगितलं जात आहे. ही अफवा आहे की सत्यता हे अजून तरी स्पष्ट झाले नाही. स्वतःचे महत्व वाढवण्यासाठी ही अफवा स्वतः कांडकर सोडत असल्याचे एका सोडून गेलेल्या अँकरने सांगितलं. हा अँकर अनेक वर्ष उघडा डोळे बघा नीट मध्ये होता. आता तो नंबर पाच चॅनलमध्ये आहे.

बेरक्याची बातमी वाचून एका पक्षाचे मुखपत्र असलेल्या संपादकानी कांडकर यांना मेसेज टाकला असता, जोपर्यंत शिवसेना सत्तेतून बाहेर पडणार नाही, तोपर्यंत मी हे चॅनल सोडणार नाही, असे गंमतीदार उत्तर कांडकर यांनी दिले.

कोण झाले अस्वस्थ ?

कांडकर नंतर मीच नंबर दोनच्या पोस्टवर असल्याचे अनेकजण सांगत होते, मात्र या सर्वांच्या डोक्यावर तुळशीपत्र ठेवण्यात आल्याने टीम अस्वस्थ झाली आहे. इनपुटची भारतमाता, आऊटपुटचा कोहापुरी, सातारकर, दुसऱ्यांच्या स्टोऱ्या स्वतःच्या नावावर खपवणारा उस्मानाबादी, नेहमी प्रसन्न असणारा अँकर, क्रीडाचा काळुराम यांच्यात चुळबुळ वाढली आहे. भविष्यात येथे फार मोठ्या घडामोडी घडणार आहेत, हे मात्र नक्की. दुसरीकडे फार फार तर एका ठिकाणी सहा महिने टिकणारा तुळशीपत्र येथे किती दिवस रमणार हे कोडेच आहे.

बुधवार, ११ जुलै, २०१८

टीव्ही ९ पुन्हा हिंदीत ...

मुंबई - टीव्ही ९ ग्रुप लवकरच हिंदी न्यूज चॅनल सुरु करणार आहे. त्याचे मुख्यालय मुंबईत राहणार आहे. मराठी बंद करून ते हिंदी न्यूज चॅनल सुरु करणार की दोन्ही  भाषेत सुरु राहणार, याबाबत खुद्द टीव्ही ९ कर्मचाऱ्यात संभ्रम आहे.

टीव्ही ९ पूर्वी हिंदीत होते, पण त्याचे मराठीत झाले होते. या चॅनलवर नेहमीच हिंदी भाषिक लोकांचा पगडा राहिलेला आहे, सध्या मुख्य  संपादक असलेले विनोद कापरी हिंदी भाषिक आहेत. तसेच संपादक समीप सिन्हा , इनपुट हेड असलेले रोहित विश्वकर्मा हे देखील हिंदी भाषिक आहेत. यांना मराठीचा ओ की ठो कळत नसताना त्यांना मराठीत घेतलेच कसे हे न उलगडणारे कोडे आहे. टीव्ही ९ मध्ये मराठी पोरांची माती होत आहे.

या हिंदीवाल्यानी आता मराठी चॅनल   बंद करून हिंदी चॅनल सुरु करण्याचा घाट घातला आहे. मुंबईमध्ये आहे त्या स्टुडिओ मध्ये हिंदी चॅनल सुरु होणार आहे, ही बातमी १०० टक्के सत्य आहे, पण मराठी बंद करून हिंदी चॅनल सुरु करणार की दोन्ही भाषेत सुरु राहणार हे अजून स्पष्ट झालेले नाही. खुद्द टीव्ही ९ मराठीचे रिपोर्टर सध्या संभमावस्थेत आहेत. काहींच्या  मते हिंदी चॅनल सुरु राहणार आणि  त्यात काही  मराठी बुलेटिन राहणार असे सांगितले जात आहे. एव्हडे मात्र खरे की यापुढे  टीव्ही ९ मराठी मध्ये पूर्ण हिंदी लोकांचा पगडा राहणार, हे नक्की आहे.

टीव्ही ९ मराठीचे युट्युबचे लाखो सबक्राईब गायब

टीव्ही ९ मराठीच्या अनेक बातम्या युट्युबवर अपलोड होत होत्या. त्याचे लाखो सबक्राईबर्स होते. मात्र कॉपीराईटमुळे युट्युब  मॅनेजमेंटने त्यांचे डोमेन बॅन केले आहे. महिनाभरत ३ व्हिडिओ कॉपीराइट पडल्यास युट्युब मॅनेजमेंट डोमेन बॅन करत आहे. टीव्ही ९ मराठीला याचा मोठा  फटका बसला असून, त्यांना पुन्हा नव्याने सुरुवात करावी लागली आहे. त्यामुळे युट्युब मधून येणारे मागील  उत्पन्न बुडाले आहे.

मंगळवार, १० जुलै, २०१८

तुळशीदास भोईटे एबीपी माझा मध्ये जॉईन


मुंबई - लोकमत ऑनलाईन मधून अवघ्या तीन महिन्यात बाहेर पडलेल्या तुळशीदास भोईटे यांनी एबीपी माझा जॉईन केल्याने अनेकांच्या  भुवया उंचावल्या आहेत तर एबीपी माझाच्या प्रस्थापित टीममध्ये अस्वस्थता पसरली आहे. दुसरीकडे संपादक राजीव खांडेकर महाराष्ट्र टाइम्सच्या वाटेवर असल्याचं सांगितलं जात आहे.

एबीपी माझा नंबर १ करण्यात राजीव खांडेकर यांचा सिंहाचा वाटा आहे, मात्र खांडेकर नंतर मीच  सेंकड पोस्टवर असल्याचे अनेकजण सांगत होते. त्यात इनपुटची भारत माता, बातम्यांची खिचडी करणारा कोल्हापुरी , स्पेशल रिपोर्ट करणारा सातारकर आणि सदैव प्रसन्न असणारा अँकर आघाडीवर होते. इतकेच काय तर मराठवाड्यात दुसऱ्यांच्या स्टोऱ्या स्वतःच्या नावावर देणारा उस्मानाबादी  मीच अमुक पदावर असल्याचा दावा करीत होता. मात्र भोईटे जॉईन झाल्यामुळे या सर्वामध्ये अस्वस्थता  पसरली आहे. भोईटे यांची नेमकी पोस्ट काय आहे, हे कळू शकले नाही, मात्र ते लवकरच संपादक होणार असल्याचे कळते.

दुसरीकडे संपादक राजीव खांडेकर महाराष्ट्र टाइम्सच्या वाटेवर असल्याचं सांगितलं जात आहे. महाराष्ट्र टाइम्सचे विद्यमान संपादक अशोक पानवलकर सेवानिवृत्त होणार आहेत. त्या जागेवर खांडेकरांची वर्णी लागली असल्याचे वृत्त आहे. खांडेकर महाराष्ट्र टाइम्सला गेल्यास आणि तुळशीदास भोईटे  एबीपी माझाचे संपादक झाल्यास माझामध्ये अनेक घडामोडी घडणार आहेत.

सोमवार, २ जुलै, २०१८

टीव्ही 9 मध्ये राजीनामे सुरूच


मुंबई - मागील दिड महिन्यात कृष्णा अजगावकर, प्रसाद घाणेकर, संतोष थळे या तीन बुलेटिन प्रोड्युसरनी राजीनामे दिले आहेत. तर दोन बुलेटिन प्रोड्युसर पुढील 15 दिवसात राजीनामे देणार आहेत. तर तिसरा बुलेटिन प्रोड्युसर ऑफर लेटर आल्यानंतर राजीनामा देणार आहे.
दुस-या चॅनेलमधून कोणीही टीव्ही 9 मध्ये यायला धजावत नाही.  हॉस्पिटलमध्ये ऍडमिट असल्याच्या इमेजेस ऑफिसच्या ग्रुपवर टाकाव्या लागतात, आजारी असतानाही ऑफिसमध्ये कामाला यावं लागतं. ही सर्व किर्ती मीडियात माहित झाली आहे. त्यातच प्रशांत विधाटे हे प्रकरणही कोणी विसरलं नाही. तसंच काम करताना होणारी हरॅसमेंट नवी नाही. यामुळे टीव्ही 9च्या इनपूट आणि आऊटपूटमध्ये राजीनामे वाढले आहेत. कोणीही यायला तयार नाही. आऊटपूटची स्थिती वाईट झाली आहे.

रविवार, १ जुलै, २०१८

लोकमतमध्ये कर्मचाऱ्यांवर कात्री !

बुलढाणा जिल्ह्यातील ३ ऑपरेटर आणि एक कार्यालय प्रमुखाला नारळ !

बुलढाणा-  शेठजीच्या लोकमत मधून आज बुलढाणा जिल्ह्यातील ४ जणांना आणि अकोला जिल्ह्यातील एकाला कामावर  नारळ देण्यात आला. . १५ ते १८ वर्षांपासून काम करणाऱ्या यातील काही कर्मचाऱ्यांना अचानकपणे कामावरून कमी करण्यात आल्याने एक कर्मचाऱ्यांची प्रकृती बिघडली आहे. दुसरीकडे कंपनीच्या या हेकेखोर वृत्ती विरोधात न्यायालयाचे दार ठोठावले  जाणार असल्याचे समजते.

  वृत्तपत्र क्षेत्राला लागलेली घरघर आणि त्यात बुलढाणा जिल्ह्याला जाहिरातीच्या कमाईपेक्षा खर्च अधिक होत असल्याने लोकमत ने कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता दाखवण्यास सुरुवात केली आहे.  अकोला येथे कर्मचाऱ्यांची बैठक घेऊन एच आर मॅनेजर येवतकर यांनी बुलढाणा जिल्हा कार्यालयाचे जाहिरात व्यवस्थापक शरद गावंडे, ऑपरेटर प्रवीण थोरात, खामगाव कार्यालयातील ऑपरेटर मो.एजाज आणि आणखी एका ऑपरेटर ला आपण उद्यापासून कामावर येऊ नका असा आदेश देण्यात दिला आहे. शिवाय त्यांच्या समोर राजीनामे ठेऊन त्यांच्यावर स्वाक्षरी करण्यास भाग पाडण्यात आल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
उल्लेखनीय म्हणजे मागील १५ ते १८ वर्षांपासून यातील काही कर्मचारी कार्यरत होते. त्यांना मागील वदर्डाच्या खाजगी कंपनी च्या कामावर कंत्राटी म्हणून दाखवण्यात आले आणि यावर्षी थेट काढून टाकण्यात आले. यामुळे एकाच खळबळ उडाली आहे. बुलढाणा जिल्ह्यात देशोन्नती या वृत्तपत्राशी स्पर्धा करण्यासाठी अनेक उपाय योजना लोकमतने राबविल्या मात्र त्यात त्यांना यश आले नाही म्हणून आता उत्पन्नापेक्षा खर्च जास्त झाल्याने लोकमतने आवरते घेण्यास सुरुवात केली आहे. शुक्रवारी बैठकीत एक ऑपरेटर ला नारळ देण्याबाबत सुनावताच त्याची प्रकृती खालावली होती. कालपासून त्याच्यावर  रुग्णालयात उपचार सुरु आहे.मात्र या धोरणाविरोधात काही कर्मचारी न्यायालयाचे दार ठोठावण्यात येणार असल्याचे समजते.

पत्रकारितेला दंश

अजगर पकडल्याचे वार्तांकन करताना ‘झी २४ तास’चे वरिष्ठ पत्रकार दिनेश दुखंडे यांना अजगराने दंश केला. पण तरीही बातमीदारीचं कर्तव्य पार पाडत दिनेश यांनी बातमी कव्हर केली आणि नंतर रूग्णालयात जाऊन उपचार केले. या कामाचं राज ठाकरे यांनी एका कार्यक्रमात कौतुक केलं. पण... प्रामाणिकपणे बातमीदारी करण्याचा तोच बाणा घेऊन मनसे बैठकीची बातमी दिनेश यांनी दिली असता राज ठाकरेंकडून बहिष्कार घालण्यात आला. हा पत्रकारितेला दुसरा दंश.
.
‘कधी अजगर तर कधी राजकारण’ पत्रकारिता करताना असे दंश वाट्याला येतात. हे विष अधिक पसरू नये,

'पुढारी'चे डेप्युटी न्यूज एडिटर केदार प्रभुणे यांचे निधन

कोल्हापूर  - दैनिक 'पुढारी'चे कोल्हापुरातील डेप्युटी न्यूज एडिटर केदार प्रभुणे यांचे शनिवारी पहाटे 5 च्या सुमारास हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने रुग्णालयात उपचार सुरू असतानाच निधन झाले. पहाटे 3 च्या सुमारास अचानक घाम आल्याने प्रभुणे यांना घराजवळील रुग्णालयात नेण्यात आले. ती माईल्ड एटकची लक्षणे असल्याचे सांगून प्राथमिक उपचारांनंतर त्यांना सुपस्पेशालिटी सिटी हॉस्पिटलमध्ये हलविले. तिथे उपचार सुरू असतानाच प्रभुणे यांना तीव्र एटक आला व त्यांचे निधन झाले. त्यांच्या पाठी पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, सासू-सासरे, मामा असा परिवार आहे.
मूळचे औरंगाबादकर असलेले प्रभुणे गेल्या 6 वर्षांपासून पक्के कोल्हापूरकर झाले होते. मराठवाडा दैनिकातून सुरुवात करून लोकमत औरंगाबाद, सानपाडा (नवी मुंबई) इथे काम करून ते 'पुढारी'त स्थिरावले होते. उत्कृष्ट क्रीडापत्रकार व क्रीडाउपसंपादक असलेल्या प्रभुणे यांनी 'पुढारी'मध्ये क्रीडा मजकुराची संस्कृती रुजवत नवी ओळख निर्माण केली. याच वर्षी राजेंद्र फडके कोल्हापुरातून गेल्यानंतर मार्चमध्ये प्रभुणे यांना प्रमोशन देऊन सेंट्रल डेस्कची जबाबदारी देण्यात आली. कामाशी प्रामाणिक असलेला केदार म्हणजे एक निर्गवी व्यक्तिमत्त्व होते. त्याला वाचनाची आवड होती. त्याचा स्वतःचा साहित्य संग्रह होता. 27 जून रोजीच त्याने फेसबुकवर 4 वर्षांपूर्वीचे वर्ल्डकप फुटबॉल कव्हरेज शेअर केले होते. त्याने मुलांसाठी व्यक्तिगत युट्यूब चॅनेल करून त्यांचे अनेक व्हिडीओज केले होते. त्यातले फारच कमी पब्लिक एक्सेसला ओपन आहेत. प्लास्टिकच्या बाटलीपासून मोटारबोट हा मुलाचा व नाच रे मोरा हा लेकीचा व्हीडीओ त्यांच्यातील संवेदनशील, लेकरांसाठी धडपडणाऱ्या, कुटुंबवत्सल बापाची साक्ष देतात. मात्या-पित्याचे छत्र गमावलेल्या संवेदनशील केदारने एक अपत्य दत्तक घेतले होते. काल रात्री 1 वाजेपर्यंत रात्रपाळीच्या कामात असलेला केदार अचानक निघून गेला. कोल्हापुरात पंचगंगेच्या काठी त्याच्यावर अंत्यसंकार करण्यात आले.

केदार प्रभुणे यांचे फेसबुक पेज:
यावर अनेक सहकाऱयांनी भावना शेअर केल्या आहेत. पत्रकारितेत फार कमी लोकांना पाठी चांगले म्हणणारे मिळतात. केदार हे त्यातील एक ...

केदारच्या गोंडस लेकाचा व्हीडीओ :

केदारच्या लेकीचा व्हीडीओ :

फेसबुक वर शेअर करा

Facebook