पत्रकार प्रशांत कनोजिया यांचा तात्काळ सुटका करा: सर्वोच्च न्यायालय

लखनौ : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याविरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याप्रकरणी अटक करण्यात आलेले पत्रकार प्रशांत कानोजिया यांची तात्काळ सुटका करण्याचे आदेश आज (मंगळवार) सर्वोच्च न्यायालयाने दिले.
योगी आदित्यनाथ यांच्याविरोधात आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याप्र
करणी दिल्लीस्थित पत्रकार प्रशांत कनोजिया यांना अटक करण्यात आली होती. तसेच नोएडातील एका खासगी वृत्तवाहिनीच्या प्रमुखालाही अटक करण्यात आली आहे. योगी आदित्यनाथ यांची प्रतिमा मलीन केल्याप्रकरणी लखनौमध्ये गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी कारवाई करत प्रशांत यांना ताब्यात घेतले होते. एका महिलेने योगींना लग्नाचा प्रस्ताव दिल्याबद्दलचा व्हिडिओ प्रशांत यांनी ट्विटर आणि फेसबुकवर अपलोड केला होता. याविरोधात त्यांची पत्नी सर्वोच्च न्यायालयात गेली होती.
सर्वोच्च न्यायालयाने आज या प्रकरणी सुनावणी करताना त्यांना तात्काळ सोडण्याचे आदेश दिले. सोशल मीडियावर पोस्ट टाकल्याने अटक करणे चुकीचे असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. न्यायाधीश इंदिरा बॅनर्जी आणि अजय रस्तोगी यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला आहे.
उत्तर प्रदेश पोलिसांनी केलेल्या कारवाईवर सर्वोच्च न्यायालयाने प्रश्न उपस्थित केले आहेत. सर्वोच्च न्यायलयाने कनोजिया यांच्या तात्काळ सुटकेचे आदेश दिले आहेत. मात्र, हा खटला सुरु राहणार असल्याचेही सांगितले आहे. कनोजिया यांनी उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याविरुद्ध सोशल मीडियावर जे वक्तव्य केले ते चुकीचे होते. मात्र, त्यासाठी त्यांना अटक करण्याची काय आवश्यकता होती असा सवाल न्यायलयाने केला आहे.