> बेरक्याला माहिती देण्यासाठी ई - मेल करा - berkya2011@gmail.com

शनिवार, २७ जुलै, २०१९

महाराष्ट्र माझाच्या नावाखाली रोहन भेंडेने पत्रकारांना गंडवलं !

प्रवीण बर्दापूरकर, शैलेंद्र शिर्के  यांच्यासह अनेकांची फसवणूक

नागपूर - दिल्लीच्या 'राव मिडीया ग्रुप'चं मराठीमध्ये 'महाराष्ट्र माझा' नावानं एक साप्ताहिक सुरु होत आहे असं सांगून रोहन भेंडे नावाच्या एका तरुणानं एका ज्येष्ठ संपादकासह राज्यातील अनेक लहान-मोठ्या पत्रकारांना गंडवलं आहे. स्वतःला राव मिडिया ग्रुपचा CEO आहे असं सांगणाऱ्या या भेंडेने चांगल्या चांगल्या लोकांना फसवलं आहे. भेंडेची 2-3 पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत. तसेच हा स्वतःला बच्चू कडूचा नातेवाईक सांगतो. या माणसाने फसवलेल्या राज्यातील पत्रकारांची यादी मोठी असण्याची शक्यता आहे.

सुरुवातीला याने The Students Express या नावाचं साप्ताहिक आपण चालवत असल्याचं सांगून लोकांशी संपर्क केला. त्यानंतर काही मोठे मासे गळाला लावले. मराठीमध्ये सुरु होणाऱ्या या साप्ताहिकाचे मुख्य संपादक म्हणून ज्येष्ठ पत्रकार प्रविण बर्दापुरकर यांनी जबाबदारी घेतली होती. पुण्याचे निवासी संपादक म्हणुन शैलेंद्र शिर्के यांनी काम पाहायचे ठरवले होते. या दोघांनी मिळून संपादकीय कामासाठी अनेक लोकही निवडली. भरघोस पगाराच्या ऑफर दिल्या. त्यांना रीतसर ऑफर लेटर देऊन जॉईन व्हायला सांगितलं. 

संपादकीय विभागातल्या या नावांचा वापर करत रोहन भेंडेने राज्यातील वेगवेगळ्या ठिकाणी जात वितरणाचं काम करणाऱ्या लोकांच्या भेटी घेतल्या. त्यांना गडगंज पगाराचं अमिष दाखवत साप्ताहिकाचं काम करण्याची विनंती केली. नंतर वर्गणीच्या नावाने या लोकांकडून लाखो रुपये जमा केले. लवकरच आपलं काम सुरू होत असल्याचंही सांगितलं. त्यापैकी कित्येक जण गेल्या २ महिन्यांपासून पगाराविना काम करत होते.

 धक्कादायक बाब म्हणजे हा प्रकल्प अचानक बंद करण्यात आला आहे. रोहन भेंडे हा फ्रॉड निघाला असून त्याने अशाच प्रकारे अनेकांचे पैसे लुटल्याचे आणखी काही प्रकार समोर आले आहेत. प्रविण बर्दापुरकर यांनी देखील आपल्या फेसबुक पोस्ट मध्ये हा प्रकल्प स्थगित करत असल्याचे म्हटले आहे पण कारण दिलेले नाही.

राज्यातील 288 मतदारसंघात प्रतिनिधी नेमुन त्यांच्याकडून वर्गणी जमा करुन फंड उभा करायचा आणि त्याद्वारे साप्ताहिक चालवायचे असा काही फंडा भेंडेच्या डोक्यात होता. मुख्य संपादक आणि संपादकाला याची कल्पना होती की नाही काय माहीत. पण अनेकांना यापासून अंधारात ठेवले गेले. दर महिन्याला 288 वार्ताहरांकडून 100 प्रती मिळवणे हे या साप्ताहिक मागचं बिजनेस मॉडल होतं.

288 वार्ताहर x 100 प्रती = 28,800 प्रती x 500 रुपये = 1,44,00,000 रुपये दरमहा x 12 महिने = 17 कोटी 28 लाख रुपये .

असा काही भेंडेचा हिशोब होता. स्वतः प्रवीण बर्दापूरकर यांनी हे काम बंद करण्याबाबत सांगितलं नंतरच्या त्यांच्या एका ईमेल मध्ये हा हिशेब सांगितला आहे.

या साप्ताहिकाला मोठी लोकं जोडलेली असल्याने अनेकांनी विश्वास ठेवत स्वतःच्या नोकरीला सोडचिठ्ठी दिली होती. त्यानंतर चांगला पगार मिळणार या विश्वासावर कित्येक जण वर्षानुवर्षे नोकरी केलेल्या जागी राजीनामे देऊन नोटीस पिरेडवर होते. दिल्लीची कंपनी असल्याने कदाचित चांगला पगार आहे असं अनेकांना वाटलं. 

पुण्यातुन या साप्ताहिकाचं काम चालेल असं सांगण्यात आलं होतं. यासाठी 2-3 बैठकाही झाल्या परंतू प्रत्येक बैठक वेगळ्या आणि तात्पुरत्या कार्यालयात घेण्यात आली. कामासाठी तयार झालेल्या प्रत्येकाला लवकरात लवकर जॉइन होण्याचा आग्रह करण्यात आला. विशेष म्हणजे जॉइन होण्यासाठी कोणतीही कागदपत्र लागत नव्हती तर 750 रुपयांची वर्गणी द्यावी लागत होती. इतकं असुनही काही ज्येष्ठ पत्रकार सोबत असल्याने आणि चांगला पगार मिळणार या आशेवर अनेकांनी चांगल्या नोकरीवर पाणी सोडलं. आता ना भेंडे समोर यायला तयार आहे ना इतर कोणी.

हाच तो भामटा  
मंगळवार, २३ जुलै, २०१९

5 G नंतर मीडियात होणार भूकंप !

येत्या दोन वर्षात संपूर्ण भारतात 5 G इंटरनेट सेवा सुरु होईल. त्यामुळे प्रिंट आणि टीव्ही मीडिया अधिक धोक्यात येईल तर डिजिटल मीडिया क्रमांक 1 वर येईल . पत्रकारांनी काळाची गरज ओळखून स्वतःला अपग्रेड करण्याची गरज आहे.

फाइव्ह-जीमुळं काय होणार ?
- निरंतर कव्हरेज, अधिक गती, व्हिडिओंची अधिक सुधारित गुणवत्ता, अधिक डेटा पाठवण्याची आणि मिळविण्याची संधी, अधिक विश्‍वसनीयता आणि संपर्काच्या विविध पैलूंमध्ये कमी विलंब अशा अनेक गोष्टी शक्य होतील.
- अभिनवतेला चालना मिळेल आणि आपल्या दैनंदिन जीवनामध्ये बदल घडू शकेल. फाइव्ह-जीमधला डेटा स्पीड तब्बल १० जीबीपीएसपर्यंत जाऊ शकतो, असा अंदाज.
- ऑनलाईन उपलब्ध असलेला कंटेट किंवा आशय यामध्ये आमूलाग्र बदल.
- फाइव्ह-जी नेटवर्क इंटरनेट ऑफ थिंग्जसह ऑटोमोटिव्ह, आरोग्यसेवा, शेतीविषयक तंत्रज्ञान, शैक्षणिक सुविधा आणि उत्पादन या उद्योगांमधलं सर्वांत पसंतीचं तंत्रज्ञान म्हणून पुढं येईल.
- हँडसेट्सच्या बॅटरीचं आयुष्य याआधी कधीच पाहिलं नव्हतं एवढा काळ टिकू शकेल
(संदर्भ - डॉ. मिलिंद पांडे यांचा सकाळमधील लेख ) 

प्रिंट आणि टीव्ही मीडियावर होणार परिणाम

प्रिंट आणि टीव्ही मीडियाला सध्या घरघर लागली आहे. 5 G सुरू झाल्यानंतर ही घरघर अधिक वाढेल . वृत्तपत्राची जागा ऑनलाइन न्यूज पोर्टल आणि ईपेपर  घेतील तर टीव्हीची जागा युट्युब, HOTSTAR , JIO सारखे अँप घेतील.ईपेपर वाचण्यासाठी आणि अँप पाहण्यासाठी लोकांना पैसे मोजावे लागतील.

> वृत्तपत्र काढण्यासाठी लागणारा खर्च आणि येणारे उन्पन्न याचा कुठेच ताळमेळ बसत नाही. त्यात कागदाचे भाव दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. कमी झालेल्या पानाची संख्या त्याचेच द्योतक आहे. घरोघरी वृत्तपत्र वाटणाऱ्याची संख्या दिवसेंदिवस कमी होत चालली आहे.त्यात स्मार्ट फोनचा वापर वाढल्याने वृत्तपत्र वाचणाऱ्यांची संख्या कमी होत आहे. त्यामुळे सर्व वृत्तपत्रांचे खप घसरले आहेत. तसेच जाहिरातदार हा वृत्तपत्रात जाहिरात देण्याऐवजी ऑनलाइन जाहिरात करत असल्याने वृत्तपत्रांतील जाहिरातीचे प्रमाण कमी होत आहे.वृत्तपत्रांत जाहिरात देण्यासाठी जेवढा खर्च येतो त्याच्या १० टक्के खर्चात जाहिरात होत असेल तर जाहिरातदार ऑनलाइन जाहिरात करेल. परिणामी येत्या काही वर्षात अनेक वृत्तपत्रे बंद पडतील.

> टीव्ही न्यूज चॅनल सुरु करण्यासाठी प्रचंड खर्च येतो. विशेष म्हणजे त्याचे प्रक्षेपण करण्यासाठी एका DTH वर एक वर्षाला किमान एक कोटी खर्च लागतो. गावोगावचे केबल चालकही आता पैसे मागत आहेत. सर्व DTH आणि केबलवर प्रक्षेपण करण्यासाठी वर्षाला किमान १० कोटी खर्च लागतो. स्टुडिओ भाडे, कर्मचाऱ्यांच्या पगारी आणि अन्य खर्च वेगळा. त्यामुळे आहे ते चॅनल बंद पडतील आणि त्याची जागा युट्युब, HOTSTAR , JIO सारखे अँप घेतील.

5 G सुरु झाल्यानंतर वेबसाइट, अँप, युट्युब आणि सोशल मीडिया अधिक गतिमान आणि वेगवान होईल.लोकांना लाइव्ह दृश्ये म्हणजे व्हिडीओ पाहण्यात अधिक इंटरेस्ट आहे. 5 G मुळे व्हिडीओ अधिक गतिमान आणि HD पाहता येतील. स्मार्ट फोनवर व्हिडिओ कॉन्फरन्स HD दिसेल. तसेच फेसबुक लाइव्ह पण HD दिसेल. आपल्या गावात जर एखादा कार्यक्रम असेल तर लोक ते सोशल मीडियावर लाइव्ह करतील. व्हाट्स अँप वर व्हिडिओ HD दिसतील. लोक आपल्या गावातील व्हाट्स अँपग्रुप वर कोणताही कार्यक्रमाचा व्हिडीओ शेयर करत असतील तर उद्या छापणाऱ्या प्रिंट मिडीयातील बातम्या कश्याला वाचतील ? आपल्या गावाची बातमी टीव्हीवर येत नसेल तर टीव्ही लोक का म्हणून पाहतील ?

आजची बातमी उद्या कश्याला ? आजची बातमी आज नव्हे आताच यामुळे लोकांचा कल डिजिटल मीडियाकडे वाढत चालला आहे. भविष्यात तो अधिक वाढेल. त्यामुळेच साखळी वृत्तपत्रे सुद्धा डिजिटल मीडियावर लक्ष केंद्रित करत आहेत.

सुनील ढेपे
उस्मानाबाद - पुणे
9420477111

रविवार, १४ जुलै, २०१९

तुळशीचे स्वप्न भंगले ! रविकांत मित्तल यांनी सूत्रे घेतली ...

मुंबई - टीव्ही ९ मराठीचे मुख्य संपादक रोहित विश्वकर्मा यांनी राजीनामा दिल्यानंतर  टीव्ही ९ ग्रुपचे व्यवस्थापकीय संपादक रविकांत मित्तल यांनी हंगामी मुख्य संपादक म्हणून सूत्रे हाती घेतली आहेत. त्यामुळे तुळशीचे मुख्य संपादक होण्याचे स्वप्न भंग पावले आहे.

जिथे तुळशी तेथे गटबाजी हे सूत्र कायम आहे. त्यामुळे सहा महिने ते एक वर्ष असा तुळशीचा सतत प्रवास सुरु आहे. प्रत्येक चॅनलमध्ये किमान दोन वेळा रिंगण पूर्ण करणारा  तुळशी  काही दिवसांपूवी टीव्ही ९ मराठी मध्ये दाखल झाला. त्यात मुख्य संपादक रोहित विश्वकर्मा यांची विकेट पडली. त्यामुळे या पदावर आरूढ होण्यासाठी तुळशी आतुर झाला, पण व्यवस्थापकांनी नवीन चांगला मुख्य संपादक मिळेपर्यंत  टीव्ही ९ ग्रुपचे व्यवस्थापकीय संपादक रविकांत मित्तल यांच्याकडे हंगामी मुख्य संपादक म्हणून सूत्रे दिली आहेत.

एका ठिकाणी स्थिर न राहणाऱ्या तुळशीकडे सर्व सूत्रे सोपवण्यास मॅनेजमेंट तयार नाही. या पदासाठी  डॉ. उदय निरगुडकर इच्छूक असून यासाठी ते नागपूरच्या गडावर चकरा मारत  आहेत. टीव्ही ९ ची नवीन कंपनी आणि नागपूरचा गड यांचे बिझनेस कनेक्शन असून  निरगुडकर यांना पुन्हा एकदा नागपुरी गड पावणार का ? याकडे लक्ष वेधले आहे.

व्हायरल बातम्या  !  रियॅलिटी चेक ...

> जय महाराष्ट्र ( मराठी ) चॅनल हिंदीच्या इंडिया न्यूज ग्रुपने तर बंद पडलेले मी मराठी चॅनल गडकरीने विकत घेतले अश्या बातम्या सध्या वेगाने पसरत आहेत.

या बातम्यांची  रियॅलिटी चेक केली असता आमच्या पडताळणीत दिसून आले की, 
> जय महाराष्ट्र चॅनल इंडिया न्यूज ग्रुपने विकत मागितले होते ही वस्तुस्थिती आहे, पण मालक सुधाकर शेट्टी यांनी विकण्यास नकार दिला.
> बंद पडलेले मी मराठी चॅनल नितीन गडकरी यांनी विकत घेतले ही निव्वळ अफवा आहे.

जाता -जाता
टीव्ही ९ मराठी मधून अनेक जणांना नारळ देण्यात येत आहे. पॉलिटिकल रिपोर्टर विलास आठवले यांना परवा नारळ देण्यात आला.


बुधवार, १० जुलै, २०१९

आदर्श गावकरीच्या राडकरचा नगरमध्ये राडा !

अहमदनगर : जेमतेम एक महिनाही झाला नाही तोच आदर्श गावकरीमध्ये राडा झाला आहे. स्वतःला कार्यकारी संपादक म्हणून घेणाऱ्या राडकरने एका बारमध्ये  धिंगाणा घातल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. दुसरीकडे वेतन मिळत नसल्याने आवृत्ती प्रमुख  मिलिंद बेंडाळे यांनी, आदर्श गावकरीला रामराम करून पुढारी जॉईन केले आहे.

डॉ. अनिल फळे यांच्यामुळे नावारूपास आलेल्या औरंगाबादच्या आदर्श गावकरीला आता घरघर लागली आहे.  फळे यांच्यानंतर दिनेश हारे यांनी आदर्श गावकरीचे नेतृत्व केले पण कर्मचाऱ्यांच्या पगारी वेळेवर  होत नसल्याने त्यांनीही आदर्श गावकरी सोडून देशोन्नती जॉईन केले आहे. हारे गेल्यानंतर व्यवस्थापक असलेल्या राडकर यांनी स्वतःकडेच कार्यकारी संपादकपद घेतले. मराठवाड्यात विशेषतः औरंगाबाद आणि जालनामध्ये घडी  नीट बसवण्याऐवजी त्यांनी नगर आवृत्ती सुरु केली.येथे आवृत्तीप्रमुख म्हणून सकाळच्या मिलिंद बेंडाळे यांना घेण्यात आले होते. त्यांनी गेल्या दोन महिन्यापासून सर्व तयारी करून नगर आवृत्ती सुरुही  केली. मात्र अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. त्यात दोन महिन्याचा पगार न मिळाल्याने  मिलिंद बेंडाळे यांनी, आदर्श गावकरीचा राजीनामा देवून पुढारी जॉईन केले आहे.

नगरमध्ये आदर्श गावकरी सुरु होण्याअगोदरच व्यवस्थापक आणि कार्यकारी संपादक म्हणून घेणाऱ्या राडकर यांनी नगरच्या एका बारमध्ये  धिंगाणा घातला, याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ बेरक्याच्या हाती लागला आहे. हा व्हिडिओ मालक अंबादास मानकापे - पाटील यांच्यापर्यंत पोहचला आहे. राडकर हे मानकापे यांचा खास माणूस म्हणून ओळखला जातो. त्यामुळे राडकरवर काय कारवाई होणार ? याकडे लक्ष वेधले आहे.

ढोलेंच्या  डोक्यावर  बेंडाळे !
नगरमध्ये पुढारीमध्ये सातत्याने बदल करण्यात येत आहेत.ब्युरो चीफ कैलास ढोले यांच्या डोक्यावर आता  निवासी संपादक म्हणून मिलिंद बेंडाळे यांना आणून ठेवण्यात आले आहे. दुसरीकडे नगरमध्ये येऊ पाहणाऱ्या पुरुषोत्तम सांगळे  ( पुढारी, सोलापूर ) यांची पुन्हा एकदा बोळवण करण्यात आली आहे.

‘डिप्लोमा इन न्यूज अँकरिंग अँड न्यूज रिपोर्टिंग’ अभ्यासक्रम सुरू

पुणे - माध्यम क्षेत्राच्या गरजा लक्षात घेऊन ‘एपीजी लर्निंग’ व ‘सकाळ माध्यम समूह’ १५ जुलैपासून पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांसाठी सहा महिन्यांचा ‘डिप्लोमा इन न्यूज अँकरिंग अँड न्यूज रिपोर्टिंग’ अभ्यासक्रम सुरू करीत आहे.

वृत्तवाहिन्या व डिजिटल मीडियाचे वाढते जाळे पाहता इंडस्ट्री रेडी वृत्त निवेदकांना व बातमीदारांना मागणी आहे. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना न्यूज अँकरिंग अँड न्यूज रिपोर्टिंगमध्ये करियर करण्यास मदत करणाऱ्या या अभ्यासक्रमात साम तसेच अन्य वृत्त वाहिन्यांमधील नामांकित निवेदक व बातमीदार मार्गदर्शनही करणार आहेत.
मूल्यमापनासाठी ६० टक्के प्रात्यक्षिके व ४० टक्के थेअरी अशी रचना असणाऱ्या या अभ्याक्रमादरम्यान विद्यार्थ्यांना दोन महिने ‘साम मराठी’ या महाराष्ट्रातील सर्वांत लोकप्रिय वृत्तवाहिनीमध्ये ऑन जॉब ट्रेनिंग देण्यात येईल. प्रतिव्यक्ती शुल्क पन्नास हजार रुपये.
संपर्क - ७३५०००१६०१


टीव्ही 9 मराठीचे मुख्य संपादक रोहित विश्वकर्मा यांचा राजीनामा

मुंबई - टीव्ही 9 मराठीचे मुख्य संपादक रोहित  विश्वकर्मा यांनी राजीनामा दिला आहे. या पदासाठी डॉ. उदय निरगुडकर इच्छुक असले तरी दुसरीकडे तुळशीपत्राने स्वतःची  मुख्य संपादक म्हणून वर्णी लागावी म्हणून जोरदार फिल्डिंग लावली आहे.  

टीव्ही ९ मराठी मध्ये तुळशीपत्र दाखल होताच मुख्य संपादक रोहित  विश्वकर्मा यांची पहिली विकेट पडली आहे. रोहित विश्वकर्मा हे  स्वतःच्या  'कर्मा'ने गेले की त्यांच्या पायात पाय घालण्यात आला ?   याची दबक्या आवाजात चर्चा सुरु आहे. दुसरीकडे टीव्ही 9 मराठीच्या मुख्य संपादक पदासाठी डॉ. उदय निरगुडकर हे गुडघ्याला बाशिंग बांधून तयार असले तरी तुळशीने ते इन होण्याअगोदरच आऊट करण्यासाठी युहरचना आखली आहे. तुळशी स्वतः मुख्य संपादक होण्यासाठी उतावीळ झाले आहेत. टीव्ही  9 प्रशासन कोणाच्या गळ्यात मुख्य संपादकपदाची माळ घालणार ? हे लवकरच कळेल.

सोमवार, ८ जुलै, २०१९

पत्रकारासह कुटुंबियांवर प्राणघातक हल्ला

वलसाद (गुजरात) -येथे एका माजी सरपंचाने आपल्या विरुद्ध छापून आलेल्या बातमीवरून एका वृत्तपत्राच्या आवृत्ती प्रमुखासह व त्याच्या कुटुंबियांवर प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली. या हल्ल्यात आवृत्ती प्रमुखाची पत्नी, दीड वर्षाची मुलगी जखमी झाली.

पोलीसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, हर्शद अहिर (वय ३४, रा. भगदावडा, ता. वलसाद, रा. गुजरात) हे गुजरात मित्र या दैनिकाचे ब्युरो चिफ प्रमुख म्हणून काम पाहतात. भगदावाडा गावातील एका तलावाच्या सुशोभीकरणाचे काम तत्कालीन उपसरपंच धर्मेश पटेल यांनी केले. नंतर ते सरपंच झाले. मात्र त्यांनी केलेले काम निकृष्ट दर्जाचे होते. यंदाच्या पावसात तलाव परिसरातील सुशोभीकरणाचे काम खराब झाले होते. याबाबतचे वृत्त दैनिक गुजरात मित्रमध्ये प्रसिद्ध करण्यात आले.

तलावाच्या सुशोभीकरणात तत्कालीन उपसरपंच धर्मेश पटेल यांनी गैरव्यवहार केल्याचा या वृत्तात आरोप करण्यात आला होता. याचा राग मनात धरून पटेल यांनी शनिवारी रात्री वलसाद येथे पत्रकार हर्षद अहिर यांच्या घरात घूसून त्यांच्यासह पत्नी केतना (३०) व सहा महिन्याच्या मुलीवर प्राणघातक हल्ला केला. या प्रकरणी वलसाद पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.मंगळवार, २ जुलै, २०१९

एबीपी माझाचे पुन्हा लोटांगण ...

नाशिक - एका तहसिलदारांच्या बदनामीकारक बातमी प्रकरणी 'उघडा डोळे बघा नीट' म्हणणाऱ्या एबीपी माझा चॅनलला जाहीर माफी मागावी लागली आहे. गेल्या १५ दिवसात एबीपी माझाला दुसऱ्यांदा जाहीर माफी मागावी लागली आहे.

तहसीलदार प्रशांत सुभाष बेडसे   सध्या चंद्रपूर येथे कार्यरत आहेत. सागर वैद्य या पत्रकाराने 2 वर्षापूर्वी त्यांची  बदनामी करणारी बातमी तयार करून  दबाव टाकण्याचा व ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला होता.
याप्रकरणी बेडसे  यांनी सागर वैद्य  विरुद्ध खंडणीचा  गुन्हा दाखल केला तर एबीपी माझा विरुद्ध कोर्टात अब्रू नुकसानीची केस दाखल केली होती. त्यामुळे एबीपी माझाने ऑन  एयर जाहीर माफीनामा प्रसिद्ध केला आहे.

सावरकर प्रकरणी  एबीपी माझाने जाहीर माफी मागितली होती. आता पुन्हा एकदा एबीपी माझा तोंडावर पडले आहे.

फेसबुक वर शेअर करा

Facebook