'एनडीटीव्ही मराठी'त Input Head ची मस्ती; लेकरू ICU मध्ये असताना जालन्याच्या रिपोर्टरला सुट्टी नाकारली!

 


मुंबई / जालना : महाराष्ट्रातील टीव्ही मीडियात काम करणाऱ्या जिल्हा प्रतिनिधींचं शोषण आणि अंतर्गत राजकारण काही नवीन नाही. पण आता 'एनडीटीव्ही मराठी' (NDTV Marathi) या चॅनलमधील एक अत्यंत संतापजनक आणि माणुसकीला काळिमा फासणारा प्रकार चव्हाट्यावर आला आहे. स्वतःचं लहान मूल गंभीर आजारी असून ICU मध्ये व्हेंटिलेटर/उपचारांवर असतानाही जालन्याचे रिपोर्टर लक्ष्मण साळुंके यांना सुट्टी नाकारण्यात आली. एवढंच नाही, तर चॅनलच्या इनपुट हेडकडून त्यांचा प्रचंड मानसिक छळ सुरू असल्याचा गंभीर आरोप करत साळुंके यांनी थेट सोशल मीडियावर संतापाचा स्फोट केला आहे आणि चॅनलला रामराम ठोकला आहे.

काय आहे नेमकं प्रकरण?

जालन्याचे प्रतिनिधी लक्ष्मण साळुंके यांनी केलेल्या पोस्टनुसार, गेल्या चार दिवसांपासून त्यांच्या लहान मुलाची प्रकृती अत्यंत खालावली होती. शेजाऱ्यांनी मुलाला तातडीने ICU मध्ये दाखल केले. अशा नाजूक प्रसंगी लक्ष्मण साळुंके यांनी 'एनडीटीव्ही मराठी'चे इनपुट हेड योगेश माने यांच्याकडे सुट्टीसाठी वारंवार विनवण्या केल्या. मात्र, "माझ्या परवानगीशिवाय याला सुट्टी द्यायची नाही," असा फतवा इनपुट हेडने डेस्कवर काढला. मुलाच्या जीवावर बेतलेले असतानाही अंतरवाली सराटी सोडायची नाही म्हणून सक्ती केली आणि चार दिवस शेतात झोपायला भाग पाडले, असा खळबळजनक आरोप साळुंके यांनी केला आहे.

पोस्टमध्ये केलेले थेट आणि गंभीर आरोप :

  • मानसिक छळ आणि निर्दयीपणा : "मुलाचा जीव गेला असता तर काय केले असते?" असे विचारले असता इनपुट हेडने अत्यंत बेपर्वा उत्तर दिल्याचे साळुंके यांनी म्हटले आहे.

  • हप्तेबाजी आणि व्हॉट्सॲप कॉलिंग : इनपुट हेडकडून व्हॉट्सॲप कॉल करून पैशांची मागणी केली जात होती आणि याचे कॉल रेकॉर्डिंग व मेसेज आपल्याकडे पुरावा म्हणून उपलब्ध असल्याचा दावा साळुंके यांनी केला.

  • ८ महिन्यांचा पगार बुडवला : ८ महिन्यांचे कामाचे पैसे थकवून प्रतिनिधींचे प्रचंड आर्थिक आणि मानसिक शोषण केले जात असल्याचा घणाघात त्यांनी घातला.

  • जुन्या चॅनलची टोळी आणि पक्षपात : जुन्या चॅनलमधून आलेल्या एका विशिष्ट कंपूच्या जोरावर आणि चमचेगिरीच्या बळावर चॅनल चालवले जात असून, मराठवाड्यातील परभणी, बीडसह अनेक चांगल्या पत्रकारांना त्रास देऊन बाहेर काढण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला.

"मुलाच्या जिवाला काही झाले तर हेच जबाबदार!" 

"आज माझा मुलगा हॉस्पिटलमध्ये मृत्यूशी झुंज देतोय. अशा लाचार आणि दलाली करणाऱ्या चॅनलपेक्षा मला माझ्या लेकराचा जीव लाख पटीने महत्त्वाचा आहे," असे सांगत लक्ष्मण साळुंके यांनी चॅनल सोडण्याचा निर्णय जाहीर केला. तसेच माझ्या मुलाला काही बरे-वाईट झाले, तर योगेश माने, मोहसीन शेख आणि त्यांच्या टोळीला जबाबदार धरले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

टीव्ही पत्रकारांच्या गब्बर झालेल्या 'बॉसेस'च्या या विकृत आणि अमानुष कार्यपद्धतीमुळे संपूर्ण माध्यम वर्तुळात प्रचंड संताप व्यक्त होत असून, आता यावर NDTV मराठीचे वरिष्ठ काय पाऊल उचलतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या