युट्यूब विकृतीची खाजवून खरूज ... ५०० कोटीचे नॅरेटिव्ह केवढ्याला पडणार ?

 

बरेच दिवस लिहावे..लिहावे म्हणता आज उद्या करत  राहून गेले.म्हटले जाऊद्या.आपल्याच धंद्यातला माणूस आहे.आज ना उद्या ताळ्यावर येईल.फुनशी जीरेल.पण फोड वाढतच गेला आणि त्याचे बेंड झाले.त्यात पू भरला.अन ते ठसठसायला लागले.अवघड जागेचे दुखणे.बेलाडोना लावायचा तरी कसा आणि कोणी ? बरे केस एवढी हाता बाहेर गेली की,सुशा जरा अती होतय..जरा पदर घे.म्हणायला जावं तर त्याची कमरेचं सोडून वेशीला टांगण्याची तयारी ! हो आहोत आम्ही भक्त.आहोत आम्ही खुष मस्करे भाट ! आहोत आम्ही श्वान...पण समर्था घरचे (म्हणजे भाजपचे) आहोत.तुमच्या सारखे गल्लीवाले नाही ! आता अशा मुर्खाच्या नंदनवनात लोळणार्यांपुढे गीता वाचून काय उपयोग ? ते अंधाराच्याच पखाली वहाणार ! आणि पुन्हा आपल्यालाच,येरझारा अन ओझ्याचं सोडा...पण गार किती लागतय,म्हणणार ! म्हणून आम्ही मुर्खाचे धनी होऊन शहाणपणा शिकवण्याच्या भानगडीत पडलो नाहीत.पण काल मनोज जरांगे यांनी ५०० कोटींचा ऑडीओ क्लिप स्फोट केला अन त्यात या महाभागाचं नाव पुढे आलं ! 


मारोतीच्या बेंबीत बोट घालण्याची खोड कधीतरी अंगलट येत असते,ती अशी ! शेवटी बेंबीतल्या विंचवाने नांगी मारली.आता या विंचवाला उतारा सापडेल असे  दिसत नाही.माकडीण पिलाला कुठवर डोक्यावर घेऊन वाचवणार ? माकडीणच ती ; तिच्याच नाकातोंडात पाणी जायला लागल्यावर कसली स्वधर्म जागृती..कसला विधायक बूरूज अन कसलं डोंबल्याचं अनलायझर !  स्वतःचं नाक वर ठेवण्यासाठी माकडीण पिलाला पायाखाली घेणारच.जरांगे क्लिप स्फोट प्रकरणात हेच होणार आहे ! 


    जरा इस्कटून सांगतो.गोष्ट २०२४ च्या ऑगष्ट महिन्यातली आहे.लोकसभेच्या निवडणूका होऊन गेल्या होत्या आणि महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणूका तोंडावर होत्या.आता निवडणूका म्हणजे पत्रकारांचा भादवा.त्यातले त्यात जितराब सत्ताधारी पक्षाचे पाळीव असल्यावर माज आणि मस्तीला धरबंधच उरत नाही.अशीच गळ्यात भाजपचे पट्टे मिरवणारी एक टोळी युट्यूबवर आहे.भाऊ तोरसेकर त्यातले जेष्ठ आणि अनुभवी राखणदार. वीस नखी ! दुसरे एक ते गगनभेदी भू भूत्कार करणारे रंगी बेरंगी अनील थत्ते.आणखीही काही मासलेवाईक नमुने आहेत.उदाहरणार्थ आकार डीजीवाले प्रभाकर सूर्यवंशी.अनलायझर मध्येच बटाईने अंतरपीक घेणारे श्रीकांत उमरीकर.आणि हो ;  ते कानफाट्या म्हणून बदनाम झालेले प्रकाश महाजन ! यांचे युट्यूब वरील विचारधन ऐका एकदा.मग तुम्हाला कळेल टिळक अत्रे आगरकरांची..अनंतराव भालेरावांची महाराष्ट्राची उज्वल पत्रकारीतेची परंपरा कुठे पोहचलीय ते ! उपरोल्लेखित सगळे पत्रकार हिंदू आणि ब्राम्हणच होते.हे लक्षात घ्या.(आम्ही ब्राम्हण द्वेषी नाही आहोत ! ) तरी आम्ही येथे थोरले प्रबोधनकार आणि धाकले बाळासाहेब ठाकरे,माधव गडकरी,गोविंद तळवलकर, कुमार केतकर,अरूण टिकेकर यांची नावे घेतली नाहीत ! तेही ब्राम्हणच.पण तोरसेकर गँगच्या दृष्टीने हे सगळे फुरोगामी लिब्रांडू वगैरे.त्यामुळे कशाला उगाच खाजवून अवधान ! नाही का ? तर असो ; ५०० कोटीच्या नॅरेटिव्हचा विषय सगळ्यांना माहित झाला आहे.त्यात आम्ही आणखी पाणी ओतून तडका फोडणी देऊ इच्छित नाही.स्टोरी काय आहे ? जरांगेंना मॅनेज करण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी भाजपला ५०० कोटी मागीतले असतील का ? तर नाही ! आता जीथे मागीतलेच नाही तिथे देण्याचा आणि ते पुढे पास होण्याचा प्रश्नच नाही ! हे निव्वळ पन्नास खोके सारखे नॅरेटिव्ह आहे.बाजार गप !! म्हणजे काय की बाजारात तुरी अन भट भटणीला मारी असा प्रकार घडला आहे. २०१९ च्या निवडणूकीच्या वेळी भाजपच्या मिडीया मॅनेजमेंटची जबाबदारी असणार्या श्वेता शालीनी,आणि तेव्हा प्रवक्ते असणारे अतूल भातकळकर यांना फडणवीसांनी २०२४ च्या निवडणूकीच्या कँपेन मधून तांदळातल्या खड्यासारखे दूर ठेवले होते.मुख्यमंत्री होते एकनाथ शिंदे.त्यांची आणि जरांगेंची चांगलीच गट्टी होती.


अशावेळी आपण शिंदेनी जरांगेंच्या नावाखाली भाजपकडून पैसे घेतले आणि पुढे दिलेच नाहीत असे नॅरेटिव्ह पसरवले तर शिंदे जरांगे वाद होईल आणि मराठा मतदारांच्या मर्जीतून शिंदे आणि त्यांचे उमेदवार उतरतील.त्याचा फायदा भाजप मोठा भाऊ ठरण्यात होईल आणि फडणवीसांचा मुख्यमंत्री होण्याचा मार्ग प्रशस्त होईल ! हा तिकडीचा कयास.त्यासाठी त्यांनी एक बैठक घेतली.त्यात इकडची तिकडची चर्चा करत पाचशे कोटीचे पिल्लू सोडले.आणि ती क्लीप जरांगेंकडे पोचेल याची व्यवस्थाही केली. 


   हे असे कुटाणे करायला त्यांना कोणीही..म्हणजे भाजप किंवा फडणवीसांनी सांगीतले नव्हते. अर्धवट कापलेल्या लाकडाच्या ओंडक्यातली पाचर यांनीच उपसली.या नसत्या उठाठेवीत यांचे शेपूट मात्र फटीत अडकले...ची ची ची ची ! 

-----------

- रवींद्र तहकीक

(कनिष्ठ पत्रकार)


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या