लोकमतच्या दर्डाविरूध्द लोकांचा संताप अनावर

गेल्या 3-4 दिवसांपासून लोकमतमध्ये एका बातमीची आतुरतेने वाट बघतोय...
“लोकमत” तेच, वाघाने गाईचा फडशा पाडल्याचा, पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतल्याच्या बातम्या छापणारे दर्डा कुटुंबाद्वारे चालविले जाणारे काँग्रेसचे खंडणीखोर मुखपत्र. तर ह्या लोकमत आणि त्याच्या मालकांची महती थोर. ह्या थोर मालकांचे अनेक उद्योग. त्यातला एक उद्योग शाळा चालविण्याचा.  दर्डा कुटुंबियांची “जवाहरलाल दर्डा शैक्षणिक संस्था” आहे. लोकमतचे देवेंद्र दर्डा, माजी शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा व माजी राज्यसभा खासदार विजय दर्डा हेसुद्धा ह्या संस्थेचे संचालक आहेत. ह्या संस्थेद्वारे यवतमाळ येथे यवतमाळ पब्लिक स्कूल चालविण्यात येते. गेल्या आठवड्याभरापासून ह्या शाळेवर यवतमाळातील हजारो पालकांचे मोर्चे निघाले, त्याच्या बातम्या काही वृत्तवाहिन्यांवर आल्या, पण लोकमत मात्र मूग गिळून गप्प आहे. त्याला कारणही तसेच आहे.
केजीतल्या चिमुकल्या 14 हून अधिक मुलींचे लैंगिक शोषण ह्याच शाळेत काम करणार्‍या यश बोरुंडिया व अमोल क्षीरसागर ह्या दोन नराधम शिक्षकांनी केल्याचा धक्कादायक प्रकार आठवड्याभरापूर्वी उघडकीस आला. एका मुलीला त्रास होऊ लागल्यानंतर जेव्हा तिच्या पालकांनी तिची वैद्यकीय तपासणी केली, तेव्हा डॉक्टरांना हा विकृत प्रकार लक्षात आला. त्यानंतर इतर पालकांशी त्या मुलीच्या पालकांनी संपर्क साधला, तेव्हा एक दोन नव्हे तर किमान 14 मुलींसोबत हा प्रकार घडल्याचे उघडकीस आले. ह्या प्रकारचा जाब विचारण्याकरिता जेव्हा पालक ह्या शाळेत गेले आणि सचिव किशोर दर्डा ह्याच्याशी भेटण्याचा प्रयत्न केला तेव्हा ह्या किशोर दर्डाने सुरूवातीला त्यांना भेट नाकारली. नंतर जेव्हा भेट झाली, तेव्हा हे प्रकरण दाबण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. मुलांना शाळेत ठेवायचे नसेल तर चुपचाप टीसी परत घेऊन जा, आम्हाला गरज नाही अशी दमबाजी पालकांना केली. ह्या किशोर दर्डाने व्यक्तिश: आणि सोबतच पोलिसांद्वारे पालकांवर दबाव आणून अनेक पालकांना तक्रार करण्यापासून परावृत्त केले.
मात्र वृत्तवाहिनीवर ही बातमी प्रसारित होताच यवतमाळ शहरात संतापाची लात उसळली. पक्षभेद बाजूला सारून सर्वपक्षीय मोर्चाचे आयोजन करण्यात आले. अक्षरश: हजारो नागरिकांचा जमाव शाळेबाहेर जमला होता. पोलिसांनी मात्र सदर मोर्चेकरांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. शेवटी लोकांचा वाढता दबाव बघून पोलिसांनी त्या दोन नराधम शिक्षकांना अटक केली. मात्र दबाव आणणार्‍या आणि एवढे गंभीर प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करणार्‍या संचालकांचे काय? ह्या प्रकारामुळे हजारो पालकांनी शाळेतून टीसी घेतल्याची बातमी आहे.
प्रश्न असा पडतो की, पिसाळलेल्या कुत्र्याच्या, गाईच्या, वाघाच्या बातम्या छापणारे लोकमत एवढ्या गंभीर आणि संवेदनशील विषयावर का चूप आहे? स्वत:च्या मुलांना अमेरिकेत शिक्षणाला पाठविणार्‍या हा दर्डाच्या एखाद्या चिमुकलीसोबत असा प्रकार घडला असतं तर हे सगळे दर्डा आणि ह्यांचे कोंग्रेसी मुखपत्र असेच गुपचुप बसले असते का? येणकेणप्रकारे सत्तेत रहायचे आणि सत्तेचा पुरेपूर वापर आपल्या स्वार्थासाठी करायचा हा या व्यापारी कुटुंबाचा प्रकार यवतमाळकरांना माहीत असल्यामुळे विजय दर्डा कधीही येथून लोकसभेची निवडणूक लढवण्याचा धोका पत्करत नाही तर पैसे खर्च करून राज्यसभेत जाऊन बसतो. राज्यसभा खासदार बनून काय करतो, तर जयस्वाल सोबत मिळून कोळसा घोटाळा करतो, खासदार निधीच्या स्थानिक विकास निधीमधून ह्या खासगी शाळेची बहुमजली इमारत बांधतो. दर्डानगर येथील भलीमोठी ओपन स्पेस ह्या शाळेसाठी बळकावतो. काही पालकांच्या म्हणण्यानुसार शाळेत असे घाणेरडे प्रकार घडण्याची ही काही पहिली वेळ नाही तर दोन वर्षापूर्वी सुद्धा असाच प्रकार उघडकीस आला होता पण संचालकांनी तो सत्तेचा, पोलिसांचा गैरवापर करून दडपून टाकला. आताही ह्या प्रकरणात संचालकांवर कारवाई करण्याएवजी मोर्चेकरांवर लाठीमार करण्याची मर्दुमकी महाराष्ट्र पोलिस गाजवत आहेत. 
इतक्या सगळ्या घडामोडी घडत असतांना मात्र शिक्षणमंत्री तावडे, मुख्यमंत्री फडणवीससुद्धा गप्प कसे हा प्रश्न यवतमाळकरांना सतावतोय. कोणताही पक्ष सत्तेत असतो, सर्वांशी पडद्याआड गोडीगुलाबीचे संबंध ठेवण्याच्या दर्डाच्या धोरणाचा तर हा परिणाम नाही? ह्या शाळेची मान्यता काढून टाकणे एवढे अवघड आहे का? मुख्यमंत्र्यांना माझे आवाहन आहे की यवतमाळमधील स्फोटक स्थितीचा कदाचित तुम्हाला अंदाज नसेल. हजारो महिला ह्या प्रकरणात आक्रमक आहेत. कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती बिघडण्याआधी तत्काळ ह्या शाळेची मान्यता रद्द करा, फक्त शिक्षकांपुरती कारवाई मर्यादित न ठेवता नराधम किशोर दर्डा आणि इतर संचालकांना त्वरित अटक करा आणि ह्यांना कठोर शिक्षा होईल अशी व्यवस्था करा.
एवढ्या गंभीर घटनेला अतिशय थिल्लरपणे हाताळनार्‍या संचालक, पोलिस आणि कारवाई न करणार्‍या सत्ताधार्‍यांचा निषेध नोंदवतो. चिमुकल्या कळ्यांना कुसकरणार्‍या नराधमांना आणि ह्या वृत्तीला खतपाणी घालणार्‍या सर्व संचालकांना खरे म्हणजे देहदंडच दिला पाहिजे. अजूनही वेळ गेलेली नाही. लोकक्षोभाचा भडका उडण्याआधी कारवाई करा अन्यथा परिणामांना तयार रहा असेच तूर्तास आमचे सांगणे आहे. 
तुमच्याही घरी लोकमत येत असेल, तर मला पडलेला प्रश्न आता तुम्हालाही पडेल. एक जागरूक नागरिक म्हणून तुम्ही खरेच तो लोकमत बंद करा.

- एक वाचक