बेरक्या दणका: १ लाख फेका, तमाशा बघा! टीआरपीत तळाला असलेल्या चॅनेलचा 'मराठवाडा गौरव'च्या नावाने बाजार

 


सध्या पत्रकारितेत एक नवाच ट्रेंड आलाय. बातम्या देऊन टीआरपी मिळत नसेल, तर सरळ 'पुरस्कारांचं दुकान' थाटायचं! टीआरपीच्या शर्यतीत एकदम तळाला (म्हणजे शेवटच्या नंबरवर) रांगणाऱ्या एका न्यूज चॅनेलने छत्रपती संभाजीनगरमध्ये असाच एक 'मराठवाडा गौरव पुरस्कार' सोहळा उरकून घेतला. या सोहळ्याचं साधं आणि सोपं सूत्र होतं – "एक लाख रुपये द्या आणि पुरस्कार खिशात घाला!"

रिपोर्टर्सना दिले सेल्समनचे 'टार्गेट'

चॅनेलने आपल्याच रिपोर्टर्सना चक्क सेल्समन बनवलं. प्रत्येक रिपोर्टरला किमान ५ 'बकरे' (जे १ लाख रुपये देतील असे लोक) शोधून आणण्याचं टार्गेट देण्यात आलं होतं. पण मार्केटमध्ये या चॅनेलची 'पत' माहिती असल्यामुळे, कुणाला एक तर कुणाला जेमतेम दोनच 'गौरवमूर्ती' सापडले. अशा एकूण २२ धनिकांना शोधून त्यांच्या गळ्यात हा विकतचा पुरस्कार मारण्यात आला.

स्वतःचीच पाठ थोपटण्याचा इव्हेंट

कार्यक्रमात गर्दी आणि ग्लॅमर दिसावं म्हणून मुंबईहून खास १५ जणांची फौज बोलावण्यात आली होती. त्यांनाही रिकाम्या हाताने कसं पाठवणार? मग त्यांनाही 'उत्कृष्ट अँकर' आणि इतर काय-काय नावाचे पुरस्कार वाटून टाकले. एवढंच नाही, तर मराठवाड्यातील स्वतःच्या प्रत्येक रिपोर्टरलाही पुरस्कार देऊन टाकला.

मग हेच महाभाग फेसबुकवर फोटो टाकून भारी कॅप्शन लिहितात, "माझ्या उत्कृष्ट कार्याची दखल घेत चॅनेलने माझा गौरव केला..." (स्वतःच्याच चॅनेलने दिलेला पुरस्कार आणि स्वतःचीच स्तुती, वा रे वा!)

ज्यांना 'ओ की ठो' समजत नाही, ते झालेत रिपोर्टर!

या चॅनेलच्या रिपोर्टर्सची बौद्धिक पातळी काढायची झाली तर हसू आवरणार नाही. ज्यांना बातमीचा 'अ' सुद्धा कळत नाही, जे कालपर्यंत कुठल्यातरी चॅनेलमध्ये फक्त कॅमेरा उचलत होते, ते आता थेट 'रिपोर्टर' म्हणून मिरवत आहेत.

याचाच एक भन्नाट नमुना नुकताच धाराशिव जिल्ह्यात पाहायला मिळाला. तिथे धो-धो पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतात गुडघाभर पाणी साचून पिकांचं अतोनात नुकसान झालं होतं. पण हा पुरस्कार विजेता 'महान' रिपोर्टर आपल्या बातमीत म्हणतोय, "पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे!" ज्यांना शेतीतील साधं दुःख आणि दिलासा यातला फरक कळत नाही, ते कसले आलेत पत्रकार?

थोडक्यात सांगायचं तर, "अर्थपूर्ण तडजोड केल्याशिवाय बातमी द्यायची नाही आणि एक लाख रुपये फेकल्याशिवाय पुरस्कार द्यायचा नाही," हेच या चॅनेलचं नवं धोरण बनलं आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या