‘लोकमत’चा अजब प्रताप; नाना पाटेकरांच्या श्रद्धांजलीत दिवंगत कवी ना. धो. महानोरांना आणलं भूतलावर!



जळगाव (विशेष प्रतिनिधी, बेरक्या) - अरे वा रे वा ‘लोकमत’! पत्रकारितेत 'डेडलाइन' असते हे ऐकलं होतं, पण डेडलाइन सांभाळता सांभाळता थेट दिवंगत माणसांनाच जिवंत करून प्रतिक्रिया द्यायला बसवण्याचा हा अजब चमत्कार फक्त आणि फक्त आपल्या लाडक्या 'लोकमत'च्या जळगाव आवृत्तीतच घडू शकतो!

सध्या सोशल मीडिया आणि मीडिया वर्तुळात ‘लोकमत’च्या एका बातमीची तुफान खिल्ली उडवली जात आहे. झालं असं की, अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनानंतर रंगकर्मी आणि मान्यवरांच्या प्रतिक्रियांचा रतीब घालण्यात आला. जळगाव आवृत्तीच्या पान नंबर ४ वर भलीमोठी बातमी छापून आली – "पडद्यावर अभिनयाचा अंगार, समाजासाठी माणुसकीचा आधार!"

बातमी सजवण्यासाठी जुना फोटो शोधून काढला. त्यात नाना पाटेकर, उद्योगपती अशोकभाऊ जैन आणि ज्येष्ठ कवी ना. धो. महानोर एकत्र दिसत आहेत. फोटोखाली कॅप्शनही ठोकलं – "अशोक जैन यांच्यासोबत चर्चा करताना नाना पाटेकर. सोबत कविवर्य ना. धो. महानोर". इथपर्यंत ठीक होतं; पण खरी गंमत पुढेच आहे!

बातमीतल्या एका बॉक्समध्ये 'लोकमत'च्या अतिउत्साही उपसंपादकाने किंवा बातमीदाराने चक्क लिहून मारलं –

"...नाना पाटेकर यांच्या निधनाने एक संवेदनशील... शेती आणि शेतकऱ्यांशी मनापासून नाते जोडणारा जिव्हाळ्याचा माणूस हरपला, अशा शब्दांत त्यांनी शोक व्यक्त केला. यावेळी सोबत कविवर्य ना. धो. महानोर हेही होते."

बेरक्याचा सवाल :

अहो शहाण्यांनो, कविवर्य ना. धो. महानोर यांचं निधन होऊन काळ लोटला आहे! अशोकभाऊ जैन यांच्यासोबत नाना पाटेकरांच्या निधनावर शोक व्यक्त करायला कै. महानोर स्वर्गातून खाली उतरले होते की काय? बातमी बनवताना जुन्या भेटीचा मजकूर आणि आजची श्रद्धांजली यांची अशी काही खिचडी केली की, वाचणाऱ्यांना डोक्याला हात लावण्याची वेळ आली आहे!

कॉपी-पेस्ट करताना डोळे उघडे ठेवायचे असतात, हे न्यूजरूममधल्या ‘विशेष संपादकीय मंडळाला’ कधी समजणार? बातमीची प्रूफ़रीडिंग झाली होती का थेट 'प्रिंट'चं बटण दाबलं?

असो, नानांच्या निधनाचं दुःख तर आहेच, पण श्रद्धांजली वाहताना स्वर्गातून थेट महानोरांना साक्षीदार म्हणून हजर करणाऱ्या ‘लोकमत’च्या या अद्भुत चमत्काराला 'बेरक्या'चा कडकडीत सॅल्यूट! संपादक महाशय, जरा बघा तुमच्या डेस्कवर कोण बसलंय ते!

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या