अदानींच्या ‘एनडीटीव्ही मराठी’त एका म्यानात दोन तलवारी; प्रसन्न जोशींची एन्ट्री की ‘मुस्कटदाबी’ची नवी स्क्रिप्ट?


बेरक्या विशेष | मुंबई - उद्योगपती गौतम अदानी यांच्या मालकीच्या ‘एनडीटीव्ही मराठी’ चॅनेलमध्ये सध्या जोरदार हालचाली सुरू आहेत. चॅनेल सुरू होऊन दोन वर्षे होत आली, तरी टीआरपीच्या यादीत ‘एनडीटीव्ही’ अजूनही तळाशीच तळ ठोकून आहे. आजवर अनेक ‘महारथी’ आले आणि गेले, पण चॅनेलचे नशीब काही पालटले नाही. आता टीआरपीचा हा वनवास संपवण्यासाठी चॅनेलने नवा डाव टाकला असून, ‘पुढारी न्यूज’चा राजीनामा दिलेले प्रसन्न जोशी येत्या १९ नोव्हेंबर रोजी ‘कार्यकारी संपादक’ म्हणून सूत्रे हाती घेत आहेत.

मात्र, या एन्ट्रीसोबतच चॅनेलच्या अंतर्गत राजकारणात नवा ट्विस्ट आला आहे. प्रसन्न जोशी येणार म्हटल्यावर, विद्यमान कार्यकारी संपादक’ जितेंद्र दीक्षित यांना नारळ दिला जाईल आणि चॅनेलची सर्व सूत्रे जोशींच्या हातात दिली जातील, असा मीडिया वर्तुळात अंदाज बांधला जात होता. पण अदानींच्या व्यवस्थापनाने भलतीच खेळी खेळली आहे. दीक्षित यांना हटवण्याऐवजी त्यांना ‘सीनियर कार्यकारी संपादक’ पदावर कायम ठेवून, त्यांच्या हाताखाली प्रसन्न जोशींची नियुक्ती करण्यात आली आहे. म्हणजेच, आता ‘एनडीटीव्ही मराठी’च्या एकाच म्यानात दोन तलवारी नांदणार आहेत!

अधिकार वाटपातून ‘मुस्कटदाबी’चे संकेत?
या नव्या रचनेत अधिकारांचे जे वाटप झाले आहे, ते पाहता प्रसन्न जोशींची कोंडी होणार असल्याचे स्पष्ट दिसत आहे:

  • जितेंद्र दीक्षित (सीनियर कार्यकारी संपादक): यांच्याकडे 'इनपुट', मुंबई आणि संपूर्ण महाराष्ट्रातील रिपोर्टर्स, कॅमेरामन  व ब्युरोची सर्वात महत्त्वाची जबाबदारी कायम ठेवण्यात आली आहे.

  • प्रसन्न जोशी (कार्यकारी संपादक): यांच्याकडे केवळ 'आउटपुट' आणि 'अँकरिंग' हेडची जबाबदारी देण्यात आली आहे.

थोडक्यात सांगायचे तर, मैदानातली सर्व ताकद आणि बातम्यांचा पुरवठा दीक्षित यांच्या हातात राहील, तर जोशींना फक्त स्टुडिओत बसून पॅकेजिंग आणि अँकरिंग करावे लागणार आहे. ‘पुढारी न्यूज’मध्ये सर्वेसर्वा म्हणून काम पाहिलेल्या प्रसन्न जोशींसाठी ही एक प्रकारे ‘अघोषित मुस्कटदाबी’च ठरणार असल्याची चर्चा आता रंगली आहे.

प्रसन्न जोशींचा ‘चॅनेल टू चॅनेल’ प्रवास
प्रसन्न जोशी यांच्यासाठी चॅनेल बदलणे नवीन नाही. ‘एबीपी माझा’पासून सुरू झालेला त्यांचा प्रवास ‘जय महाराष्ट्र’, ‘साम टीव्ही’, पुन्हा ‘एबीपी माझा’ आणि त्यानंतर ‘पुढारी न्यूज’ असा राहिला आहे. आता त्यांनी ‘एनडीटीव्ही मराठी’चा रस्ता धरला आहे.

आता खरा प्रश्न हा आहे की, इनपुट आणि आउटपुटच्या या दोन ध्रुवांवर बसलेले दीक्षित आणि जोशी एकत्र काम करू शकतील का? की दोघांच्या संघर्षात चॅनेलचा उरलासुरला टीआरपी आणखी खाली जाणार? अदानींच्या या नव्या प्रयोगाकडे आता संपूर्ण मराठी मीडिया विश्वाचे लक्ष लागले आहे!

तळटीप: इकडे प्रसन्न जोशी यांनी ‘एनडीटीव्ही’ची वाट धरली असली, तरी तिकडे ‘पुढारी न्यूज’ला मात्र अजूनही नवा ‘पुढारी’ मिळालेला नाही! खरं तर, ‘न्यूज १८ मराठी’चे प्रसिद्ध अँकर विलास बडे हेच ‘पुढारी’ची सूत्रे हाती घेणार असल्याची जोरदार चर्चा होती. मात्र, ऐनवेळी ‘न्यूज १८’ व्यवस्थापनाने बडे यांनाच ‘मानाचे पान’ (डेप्युटी एडिटरची जबाबदारी) देऊन थांबवून धरल्याने ‘पुढारी’चा डाव फसला. आता ‘पुढारी’च्या या रिकाम्या खुर्चीवर कोणता नवा ‘पुढारी’ विराजमान होणार, याचीच उत्सुकता मीडिया वर्तुळात लागून राहिली आहे!

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या