दिव्य मराठीच्या दिवाळी अंकाचे 'दिवाळे'

मराठवाड्याची राजधानी औरंगाबादेतून मोठा गाजावाजा करून सुरू झालेल्या दिव्य मराठी या भोपाळसेठच्या दैनिकाने आपल्या दिवाळी अंकात मराठवाड्याचे दिवाळे काढले आहे ते अनुल्लेखाने. या दैनिकाने मराठवाड्याच्या सुपीक मातीत आपले बी पेरले. आमची मातीच अशी गुणाची, सर्व उपऱ्यांना सांभाळून घेणारी. अगदी यवतमाळच्या सेठपासून बारामतीच्या पवारापर्यंत सर्वांना या मातीने भरभरून दिले. काहीनी या मातीशी इमान राखले पण काही बेईमान निघाले. उदा. दिव्य मराठी.
कुमार केतकरांचा कंपू सुरुवातीपासूनच मराठवाड्याला नालायक ठरवण्याचा खटाटोप करत आहे. दिव्य मराठीच्या सुरुवातीच्या काही अंकात मराठवाड्याच्या विकासाविषयी जे चिंतन करण्यात आले, ते सर्व या बाहेरच्यानीच केले. मुंबईत उंटावर बसून यांनी मराठवाड्याच्या शेळ्या हाकलल्या. अपवाद वगळता मराठवाड्यातील खूप कमी लेखक, विचारवंत, अर्थतज्ञ, इतिहास संशोधक यांना दिव्याने संधी दिली. दिवाळी अंकात तरी ते हे पाप फेडतील, अशी आशा होती, मात्र मराठवाड्याचा अपमान करण्याचा विडा उचललेल्या केतकर, खांडेकर कंपूने त्यांना जे करायचे तेच केले. दिव्याच्या दिवाळी अंकात मराठवाडाच नाही. ज्यांचे मीठ खायचे, त्यांना विसरायचे, असाच हा प्रकार आहे.
थोर साहित्यिक दया पवार यांचा मुलगा प्रशांत पवार यांच्याकडे दिव्याच्या दिवाळी अंकाची जबाबदारी होती म्हणे. पण त्यांनीही आपल्या भगिनी प्रज्ञा दया पवार यांची कविता सर्वात वर छापून भाऊबीज साजरी केली. इतर अप्रसिद्ध कवींच्या कविता छापून उपचार पूर्ण केले. खांडेकर, केतकर, बोरकर, केरकर, देशपांडे या केतकर कंपूला हौस फेडता आली या निमित्ताने. नाही म्हणायला लांबेही आहेत त्यात तोंडी लावण्यापुरते.

मराठवाड्यात ना.धों. महानोर, नागनाथ कोत्तापल्ले, गंगाधर पानतावणे, जयदेव डोळे, रेखा बैजल,  दासू वैद्य, विजय पाडळकर, इंद्रजित भालेराव, रेणू पाचपोर, आसाराम लोमटे, बालाजी मदन इंगळे, ललित अधाने, पी. विठ्ठल, अरुण रसाळ यासारखे जुन्या-नव्या पिढीतील साहित्यपंढरीचे वारकरी असताना दिव्य मराठीने फक्त बडव्यांनाच दिवाळी अंकात स्थान दिले आहे.

दिव्याने असेच दिवे लावले तर दिव्याला मराठवाड्यातील लोक किती स्वीकारतील हे येणारा कालच सांगेल.

- दादू सेलूकर

Post a Comment

0 Comments