'न्यूज १८'चा नुसताच मेकओव्हर; आतून मात्र तोच 'जुना' बाजार!

नाव बदललं, लोगो बदलला, पण लक्षणं तीच! अंबानीच्या दुकानात 'जुन्याच' मालाला 'नवं' पॅकिंग!

गेला महिनाभर ज्यांनी "आम्ही बदलतोय... आम्ही बदलतोय..." अशी नुसती बोंब मारली, त्या 'न्यूज १८ लोकमत'चा अखेर बारसा झाला आणि नाव झालं 'न्यूज १८ मराठी'. पण मंडळी, "खोदा पहाड आणि निकला उंदीर" अशीच काहीशी गत या चॅनलची झाली आहे. उद्योगपती मुकेश अंबानीच्या या चॅनलने फक्त पाटी बदलली आणि लोगोला नवा रंग दिला, पण आतला 'तोच-तोच-पणा' काही जात नाहीये!

जुनेच चेहरे, तोच कंटाळवाणा प्रकार



'बदल' या शब्दाचा अर्थ या चॅनलला बहुधा कळलाच नसावा. प्रोमोमध्ये तेच जुने चेहरे पाहून प्रेक्षकांनी कपाळावर हात मारून घेतला आहे.

  • संपादक मंदार फणसे: यांचा तोच तो 'तोतरेपणा' आणि अडखळती गाडी आजही कायम आहे. संपादकीय धार सोडाच, पण बोलण्यातला फ्लो अजूनही सापडत नाहीये.

  • विशाल परदेशी: नावापुरते 'परदेशी', पण यांच्या चेहऱ्यावर किंवा स्टाईलमध्ये कधीच 'परदेश' झळकला नाही. तोच गावरान तोरा, पण त्यातही नाविन्य शून्य.

  • विलास बडे: यांच्या 'बडे मुद्दे' कार्यक्रमात आता खरंच मुद्दे शिल्लक राहिलेत का, हा संशोधनाचा विषय आहे. आणि हो, अँकर्सचा दुष्काळ पडलाय की काय? कारण संध्याकाळी ७ वाजता 'आपला महाराष्ट्र' आणि लगेच ८ वाजता 'बडे मुद्दे'... सलग दोन तास तोच चेहरा बघून प्रेक्षकांचे डोळे थकलेत, पण बडे साहेब काही थकेनात!

  • फराह खान: ज्ञानदा कदम पुन्हा 'एबीपी माझा'च्या गळाला लागल्या आणि जागा रिकामी झाली म्हणून फराह खान यांची लॉटरी लागली. पण बातम्यांतला तो 'सपकपणा' (Blandness) लपून राहत नाही. खमंग फोडणीचा अभाव स्पष्ट जाणवतोय.

चॅनलचं भाजप प्रेम?

मध्यंतरी 'बडे मुद्दे' मध्ये ठाकरे गटाच्या फायरब्रँड नेत्या सुषमा अंधारे यांनी चॅनलची चांगलीच पिसे काढली. प्रश्न विचारताना अँकरला थेट विचारले, "हे प्रश्न 'संघा'कडून येतात की काय?" चॅनलचा कल 'कमळा'कडे झुकल्याचा वास आता लपून राहिलेला नाही. प्रश्नांचा रोख आणि अजेंडा पाहता, स्क्रिप्ट नागपूरहून येते की मुंबईतून, असा प्रश्न पडल्यावाचून राहत नाही.

लँडिंग पेजचा 'जुगाड'

सध्या हे चॅनल नंबर १ असल्याचा दावा करतंय. पण हा नंबर १ प्रेक्षकांच्या प्रेमामुळे नसून, 'लँडिंग पेज'च्या जादूमुळे आहे, हे ओपन सिक्रेट आहे. अंबानीकडे पैशांची कमी नाही, त्यामुळे तंत्रज्ञान विकत घेता येईल, लँडिंग पेज मॅनेज करता येईल, पण दर्जेदार कंटेंट आणि निष्पक्ष पत्रकारिता बाजारात विकत मिळत नाही, याचं भान कोण ठेवणार?

तात्पर्य: नाव 'मराठी' केल्याने चॅनलचं 'मराठीपण' जागं होत नसतं, त्यासाठी कणा ताठ असावा लागतो. तूर्तास तरी हा नुसता 'मेकअप' करून फिरवलेला जुनाच ड्रामा वाटतोय!


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या