हा कसला 'स्मार्ट मित्र'? विवाहित महिलांना दिला घरचा रस्ता; रिस्टक्चरिंगच्या नावाखाली 'स्मार्ट' गेम!


मुंबई: स्वतःला वाचकांचा 'स्मार्ट मित्र' म्हणवून घेणाऱ्या ऑनलाइन  विभाग मध्ये सध्या 'स्मार्ट' पद्धतीने कर्मचाऱ्यांची कपात सुरू असल्याची चर्चा आहे. पण ही कपात सामान्य नाही, तर ती थेट महिलांच्या कौटुंबिक हक्कांवर गदा आणणारी असल्याची खळबळजनक माहिती समोर येत आहे. 'रिस्टक्चरिंग' आणि 'कॉस्ट कटिंग'च्या गोंडस नावाखाली चक्क पाच विवाहित महिलांना कामावरून काढून टाकण्यात आले आहे.

फॅमिली प्लॅनिंग पडली महागात?

या कारवाईमागे जे तर्क दिले जात आहेत, ते ऐकून कोणाचेही डोके सळसळेल. सूत्रांच्या माहितीनुसार, ज्या महिला कर्मचारी आगामी काळात 'फॅमिली प्लॅनिंग' (मातृत्व रजा) करू शकतात किंवा ज्यांच्यावर कौटुंबिक जबाबदाऱ्या आहेत, अशांना निवडून लक्ष्य करण्यात आले आहे. म्हणजेच, उद्या जर या महिलांनी प्रसूती रजेची मागणी केली, तर व्यवस्थापनाला पगारी रजा द्यावी लागेल, हा 'खर्च' वाचवण्यासाठीच हा कुटील डाव रचला गेल्याची चर्चा कर्मचाऱ्यांमध्ये रंगली आहे.

कुठे गेली ती नैतिकता?

एकीकडे स्त्री-पुरुष समानतेच्या गप्पा मारायच्या, महिला सबलीकरणावर अग्रलेख लिहायचे आणि दुसरीकडे 'कॉस्ट कटिंग'चे कारण पुढे करून संसाराचा गाडा हाकणाऱ्या महिलांनाच कामावरून डच्चू द्यायचा? हा कुठला 'स्मार्ट'पणा आहे, असा सवाल आता विचारला जात आहे.

बेरक्याचा सवाल: > "स्मार्ट मित्र" म्हणता, मग मित्राच्या अडचणीत साथ द्यायची सोडून, त्यांच्या पोटावर पाय देऊन कसली ही मैत्री निभावताय? लग्नानंतर करिअर आणि कुटुंब सांभाळणाऱ्या महिलांना अशा प्रकारे वाऱ्यावर सोडणे, 'स्मार्ट मित्र' ची ही  नवी संस्कृती आहे का?

या धक्कादायक प्रकारामुळे माध्यम वर्तुळात संताप व्यक्त होत असून, 'कॉस्ट कटिंग'च्या नावाने महिलांचा बळी देणाऱ्या या धोरणाचा आता सर्वत्र पंचनामा होत आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या