अकोला हादरले! पत्रकार कुंदन जाधव यांच्या आत्महत्येप्रकरणी 'त्या' त्रिमूर्तीवर खळबळजनक आरोप; पत्नीची पोलिसांत धाव...

 


पत्रकारितेतील अंतर्गत कुरघोडी आणि गटबाजीने अकोल्यात आणखी एका निष्पाप पत्रकाराचा बळी घेतलाय का? असा सुन्न करणारा सवाल आता उपस्थित होतोय. ‘न्यूज १८ लोकमत’चे (तत्कालीन आयबीएन लोकमत) अकोला जिल्हा प्रतिनिधी कुंदन जाधव यांच्या आत्महत्येने माध्यम जगतात प्रचंड खळबळ उडाली आहे. कुंदन जाधव यांच्या आत्महत्येला त्यांच्याच तीन पत्रकार सहकाऱ्यांचा छळ कारणीभूत असल्याचा थेट आणि गंभीर आरोप त्यांच्या पत्नी प्रियंका कुंदन जाधव यांनी केला असून, याप्रकरणी खदान पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

पत्नीने फेसबुकवर मांडली व्यथा; तीन बड्या नावांचा पर्दाफाश

कुंदन जाधव यांच्या पत्नी प्रियंका जाधव यांनी सोशल मीडियावर एक सविस्तर पोस्ट लिहीत अकोल्यातील पत्रकारितेला लागलेली कीड चव्हाट्यावर आणली आहे. आपल्या पतीच्या मृत्यूनंतर दोन चिमुरड्या मुलींसह उघड्यावर पडलेल्या या माऊलीने अकोल्यातील तीन पत्रकारांची नावे थेट जाहीर केली आहेत:

  • उमेश अलोने (एबीपी माझा)

  • धनंजय साबळे (आजतक)

  • वर्षा मोरे (जय महाराष्ट्र)

जिल्ह्यात वर्चस्व आणि ब्लॅकमेलिंगचा धंदा?

प्रियंका जाधव यांच्या आरोपानुसार, वरील त्रिमूर्ती अकोला जिल्ह्यात आपलेच वर्चस्व राहावे म्हणून सातत्याने इतर पत्रकारांना मानसिक त्रास देत होती. ज्यांनी यांच्या चुकीच्या कामांना विरोध केला, त्यांना ब्लॅकमेल करणे, धमकावणे आणि स्वतःच्या गटात सामील करून घेणे असा या टोळीचा कारभार सुरू होता. महत्त्वाच्या बातम्या आणि व्हिडिओ क्लिप्सच्या आधारे अनैतिक खंडणी उकळण्याचे काम ही टोळी करत असल्याचा खळबळजनक आरोपही त्यांनी केला आहे.

विशेष म्हणजे, उमेश अलोने यांच्या गैरकारभाराविरोधात अकोटचे आमदार प्रकाश भारसाकळे यांनी विधिमंडळाच्या अधिवेशनात शून्य प्रहरात लक्षवेधी उपस्थित केली होती, याची आठवणही या पोस्टमध्ये करून देण्यात आली आहे.

महिला पत्रकाराचा वापर करून छळ?

कुंदन जाधव यांनी या गैरप्रकारांना कधीही साथ दिली नाही. त्यामुळेच या तिघांनी मिळून कुंदन यांचा सतत अपमान केला, वाद घातले आणि एका महिला पत्रकाराला पुढे करून त्यांच्यावर खोटेनाटे आरोप केले. माध्यमांमध्ये खोटी बदनामी करून त्यांचा इतका मानसिक छळ करण्यात आला की, शेवटी या त्रासाला कंटाळून कुंदन जाधव यांनी गळफास लावून जीवन संपवले, असा आरोप त्यांच्या पत्नीने केला आहे.

पोलिसांत रितसर तक्रार; गृहखाते दखल घेणार का?

आपल्या पतीला आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या या तिन्ही पत्रकारांवर कठोर कारवाई व्हावी, यासाठी प्रियंका जाधव यांनी खदान पोलीस ठाण्यात रितसर तक्रार दिली असून, मुख्यमंत्री व गृहमंत्री यांच्याकडे न्यायाची मागणी केली आहे.

पत्रकारितेचा बुरखा पांघरून सहकाऱ्यांचाच जीव घेण्यापर्यंत गेलेल्या या प्रकरणाची पोलीस प्रशासन निष्पक्ष चौकशी करणार का? की नेहमीप्रमाणे बड्या वाहिन्यांच्या नावाखाली हे प्रकरण दाबले जाणार? याकडे संपूर्ण विदर्भाचे लक्ष लागले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या