लोकमत टाइम्सची मराठवाडा 'डाक' आवृत्ती बंद; सर्व जिल्हा प्रतिनिधींना अचानक घरचा रस्ता!

 


मराठवाड्यातील इंग्रजी वृत्तपत्रसृष्टीतून एक मोठी आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे. 'लोकमत' समूहाचे इंग्रजी दैनिक असलेल्या 'लोकमत टाइम्स'ची मराठवाडा आवृत्ती (डाक एडिशन) १ सप्टेंबरपासून तडकाफडकी बंद करण्यात आली आहे. या निर्णयाचा सर्वात मोठा फटका तळागाळात काम करणाऱ्या पत्रकारांना बसला असून, सर्व जिल्हा प्रतिनिधींना कोणतीही पूर्वकल्पना न देता थेट कामावरून कमी करण्यात आले आहे.

अचानक आलेल्या फर्मानाने पत्रकार वाऱ्यावर 

१ तारखेपासून सर्व जिल्हा प्रतिनिधींना 'काम बंद करा' असे थेट आदेश देण्यात आले आहेत. वर्षानुवर्षे वर्तमानपत्राचा डोलारा सांभाळणाऱ्या आणि गावोगावच्या बातम्या इंग्रजीतून राज्यभर पोहोचवणाऱ्या या प्रतिनिधींना रातोरात नोकरीवरून काढून टाकण्यात आल्याने मराठवाड्यातील पत्रकार वर्गात तीव्र संताप आणि निराशेचे वातावरण आहे.

खर्चाला कात्री की धोरणात्मक बदल? 

डिजिटल मीडियाच्या वाढत्या प्रभावामुळे प्रिंट मीडिया सध्या आर्थिक संकटाचा सामना करत आहे, हे आता लपून राहिलेले नाही. मात्र, खर्चाला कात्री लावण्याच्या नावाखाली व्यवस्थापनाने थेट ग्राउंड लेव्हलच्या रिपोर्टर्सच्या पोटावर पाय दिल्याची चर्चा मीडिया वर्तुळात रंगू लागली आहे. मराठवाड्यासारख्या महत्त्वाच्या भागात इंग्रजी 'डाक एडिशन' गुंडाळल्याने लोकमतने ग्रामीण आणि निमशहरी भागातील आपला इंग्रजी वाचकवर्ग सोडून दिला आहे का, असाही प्रश्न उपस्थित होत आहे.

मोठ्या थाटामाटात सुरू झालेल्या या आवृत्त्या आणि विस्तार आता हळूहळू आक्रसू लागला आहे. एका बाजूला पत्रकारितेच्या मूल्यांच्या आणि विस्ताराच्या मोठ्या गप्पा मारल्या जात असताना, दुसऱ्या बाजूला मात्र स्वतःच्याच कर्मचाऱ्यांना एका झटक्यात रस्त्यावर आणण्याचे प्रकार उद्वेगजनक आहेत. या अचानक झालेल्या कारवाईमुळे बेरोजगार झालेल्या पत्रकारांच्या भवितव्याचा आणि त्यांच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या