मुंबई (विशेष बातमी, बेरक्या ) - स्वतःला "जनतेचा बुलंद आवाज" म्हणवून घेणाऱ्या एका मातब्बर वृत्तपत्र समूहाच्या मुंबापुरीतील कार्यालयात सध्या एकच खमंग चर्चा रंगलीय! संस्थेत एकीकडे कडक शिस्त आणि नीतिमत्तेचे डोस पाजायचे आणि दुसरीकडे एका महाशयांनी थेट मालकांच्या डोळ्यात धूळ फेकत 'दुहेरी कमाई'चा असा काही मांडव टाकलाय की विचारता सोय नाही. या वसुली "मॅचो-मॅन"च्या कारनाम्यांची भलीमोठी जंत्रीच आता थेट मालकांच्या टेबलावर आणि सहकार विभागाच्या दरबारात तक्रार पत्राच्या रूपाने थडकली आहे!
आई "मंगेशी"च्या तत्त्वांना हरताळ फासला!
तक्रारीनुसार, वृत्तपत्र संस्थेत पूर्णवेळ वसुली प्रमुख म्हणून गलेलठ्ठ पगार लाटणारा हा महाभाग २०१७ पासून २०२६ पर्यंत चक्क महाराष्ट्र शासनाच्या लेखापरीक्षण (ऑडिट) पॅनेलवरही बिनदिक्कत काम करत होता. व्यवस्थापनाची साधी परवानगी न घेता, 'ऑफिस टाईम'मध्ये स्वतःची खाजगी ऑडिटरची दुकानदारी सुरू होती. इतकंच काय, एका को-ऑप. हाऊसिंग सोसायटीच्या माजी अध्यक्षांच्या हवाल्याने असाही गंभीर आरोप करण्यात आलाय की, सोसायटींचं ऑडिट करताना 'लक्ष्मीदर्शन' घेऊन हवे तसे अहवाल दिले गेले. विरोध करणाऱ्यांना संस्थेच्या आणि वृत्तपत्राच्या नावाची दहशत दाखवून थंड केलं गेलं!
मॅचो-मॅनचे कारनामे : 'क्रेडिट नोट'पासून ते 'लाईव्ह लोकेशन'पर्यंत! तक्रार अर्जात या वसुली बहाद्दराच्या करामतींचा पाढाच वाचण्यात आला आहे:
लाईव्ह लोकेशन बंद, फिरतीचा आनंद : मुख्यालयाच्या आशीर्वादाने साहेबांचे कार्यालयीन 'लाईव्ह लोकेशन' नेहमीच गुल! संस्थेचं काम सोडून हा गडी बाहेर नेमका कुणाचा हिशोब तपासत होता?
इव्हेंटच्या बिलांवर हातसफाई : मुंबापुरीत झालेल्या चकचकीत पुरस्कार सोहळ्यांच्या बिलांमध्ये 'क्रेडिट नोट'चा खेळ करून लाखोंची अफरातफर केल्याचा संशय.
वार्ताहरांची गळचेपी : जाहिरात वसुलीत कमिशनच्या नावाखाली साधे बातमीदार आणि प्रतिनिधींना धमकावून त्यांची हक्काची पुंजी लाटणे.
'पुण्य'नगरीत जाण्याचा बनाव : २०२५ मध्ये दुसऱ्या एका नामांकित दैनिकात वरिष्ठ पदावर जाऊन "पुण्य"कर्म करण्याची ऑफर आल्याचे नाटक रचले आणि मुख्यालयातील मर्जीतील अधिकाऱ्यांना हाताशी धरून मालकांना चुना लावत स्वतःची पगारवाढ पदरात पाडून घेतली!
अंबाबाईच्या भूमीतील 'कुंभार'काम आणि मुख्यालयातील 'बाहुबली'!
आता प्रश्न असा पडतो की, एवढं सगळं उघडपणे चालू असताना हा गडी वाचला कसा? तर तक्रारीत उघडपणे नमूद करण्यात आलंय की, या खेळामागे करवीर निवासिनी अंबाबाईच्या भूमीतील काही "कुंभार"काम करणारी मंडळी सामील आहेत. इतकंच नाही, तर मुख्यालयात बसलेले काही "बाहुबली" वरिष्ठ आणि स्वतःची "पाटीलकी" चालवणारे अतिवरिष्ठ अधिकारी या 'मॅचो-मॅन'च्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. दोघांचे 'आर्थिक लागेबांधे' एवढे घट्ट आहेत की, हा पठ्ठ्या बिनधास्तपणे संस्थेचा "घूमकर" बनून फिरत राहिला.
१५ वर्षांच्या पापपुण्याची चौकशी होणार का?
तक्रारदाराने केवळ मालकांनाच नाही, तर उपसचिव, सहकार विभाग आणि जिल्हा फेडरेशनकडेही तक्रारीच्या प्रती धाडल्या आहेत. संबंधित कर्मचाऱ्याची गेल्या १५ वर्षांतील ऑडिट कामे, बँक खाती, जाहिरात वसुली आणि लाटलेले वेतन-भत्ते यांची सखोल चौकशी व्हावी, अशी जोरदार मागणी आता लावून धरण्यात आली आहे.
नेहमी इतरांच्या गैरव्यवहारांवर रकानेच्या रकाने खरडणाऱ्या या दैनिकाचे मालक आता स्वतःच्या घरात लागलेली ही वाळवी ठेचणार का? की "बाहुबली" आणि "पाटीलकी"वाल्यांच्या दबावाखाली हे प्रकरण नेहमीप्रमाणे गुंडाळून ठेवणार? याकडे आता अवघ्या माध्यम विश्वाचे डोळे लागले आहेत!
0 टिप्पण्या