अनंत भालेराव पत्रकारिता पुरस्कार जाहीर

उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने मराठवाडा पातळीवरील घेण्यात येणा-या कै. अनंत भालेराव स्मृती पत्रकारीता पुरस्कार स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. शोध वार्तागटामध्ये दै. लोकमतचे रवी गाडेकर (औरंगाबाद) तर विशेष वार्तागटामध्ये दै. लोकमतचेच बालाजी बिराजदार (लोहारा) यांनी प्रथम पुरस्कार पटकाविला आहे.
उस्मानाबाद जिल्हा मराठी पत्रकार संघाची मराठवाडा पातळीवरील ही स्पर्धा मानाची मानली जाते. दरवर्षी ही स्पर्धा घेतली जाते. उस्मानाबाद लाइव्हचे मुख्य संपादक सुनील ढेपे या संघाचे उपाध्यक्ष असताना ही स्पर्धा सुरू केली होती.त्यावेळी संघाचे अध्यक्ष भारत गजेंद्रगडकर होते.
यंदा विशेष वार्ता गट व शोध वार्ता गट या दोन गटामध्ये या स्पर्धा घेण्यात आल्या. शोध वार्ता गटात औरंगाबाद लोकमतचे उपसंपादक रवी गाडेकर  ( औरंगाबादेत तासाला एक भ्रृण हत्या ) यांना प्रथम पुरस्कार , द्वितीय पुरस्कार दै.सकाळचे भोकर बातमीदार बाबुराव पाटील ( भाकरीच्या शोधत निघालेल्या मुनीरला मिळाले घर ) यांना तर तृतीय पुरस्कार लोकमतचे लातूर प्रतिनिधी अशपाक पठाण ( महामंडळ गेले कुणीकडे ) यांना जाहीर करण्यात आला आहे. तर विशेष वार्ता गटामध्ये प्रथम पुरस्कार लोहाराचे लोकमत वार्ताहर बालाजी बिराजदार ( टेंभी प्रकल्पाला पाणी देण्याचा निर्णय) यांना , द्वितीय पुरस्कार सकाळचे भोकर बातमीदार बाबुराव पाटील ( किंगरी मोर नाचवून समाज प्रबोधन )यांना  तर तृतीय पुरस्कार चाकूरचे सकाळचे बातमीदार प्रशांत शेटे (फुल शेतीतून साधला गावाचा विकास) यांना जाहीर करण्यात आला आहे.
या स्पर्धेसाठी मराठवाड्यातून मोठ्या प्रमाणात प्रवेशिका आल्या होत्या. परिक्षक म्हणून जिल्हा माहिती अधिकारी राधाकृष्ण मुळी, व्यंकटेश महाजन कॉलेजचे उपप्राचार्य प्रशांत चौधरी, अ‍ॅड. देविदास वडगांवकर यांनी काम पाहिले. बक्षिसाचे स्वरूप रोख रक्कम, स्मृती चिन्ह व प्रमाणपत्र असे असून एका विशेष कार्यक्रमात हे पुरस्कार वितरण करणार असल्याची माहिती पत्रकार संघाचे अध्यक्ष धनंजय रणदिवे यांनी दिली. पुरस्कार प्राप्त पत्रकारांचे संघाचे सचिव संतोष जाधव, प्रांत प्रतिनिधी राजाभाऊ वैद्य, उपाध्यक्ष अविनाश गायकवाड, प्रमोद कांबळे, सुधाकर झोरी, संजय भन्साळी, श्रीकांत कदम यांनी अभिनंदन केले आहे.

'उस्मानाबाद लाइव्ह' या ई - पेपरवरून साभार

Post a Comment

0 Comments