नकारात्मक घटनेची पहिली प्रक्रिया पत्रकारांवर

कळंब - गेल्या दोन दशकांमध्ये प्रसारमाध्यमांमध्ये मोठे बदल झाले असून तंत्रज्ञानामुळे पत्रकारांचे काम सोपे झाले आहे. असे असले तरी देश-विदेशात घडणार्‍या नकारात्मक घटनांची पहिली प्रक्रिया पत्रकारांवर होते. याचा फारसा विचार होत नाही, असे प्रतिपादन डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विजय पांढरीपांडे यांनी केले.

‘हिंदी-मराठी पत्रकारितेचे बदलते स्वरूप’ या विषयावर कळंब येथील मोहेकर महाविद्यालयात आयोजित राष्ट्रीय चर्चासत्राचे उद्घाटन शुक्रवारी कुलगुरू डॉ पांढरीपांडे यांच्या हस्ते झाले त्या वेळी ते बोलत होते.दैनिक ‘एकमत’ चे संपादक शरद कारखानीस अध्यक्षस्थानी होते. विद्यापीठातील जनसंवाद व वृत्तपत्र विद्याविभागाचे प्रा. डॉ. सुधीर गव्हाणे, राधेश्याम शुक्ला, दक्षिण भारत हिंदी प्रचार सभेचे डॉ. ऋषभदेव शर्मा, प्राचार्य डॉ. अशोकराव मोहेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.


पांढरीपांडे म्हणाले, कोणत्याही बातमीचा पहिला परिणाम पत्रकारांवर होत असतो. त्याचा बातमीकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा आहे, यावर त्या घटनेचे वार्तांकन होत असते. त्यामुळे सकारात्मक दृष्टिकोन ठेवून बातमीदारी केली तर ती समाजहिताची ठरेल. सध्या जाहीरातींना बातम्याचे व बातम्यांना जाहिरातीचे स्वरुप आले आहे. त्यामुळे बातमी कोणती व जाहिरात कोणती याची गल्लत होत आहे. हे चित्र बदलण्यासाठी पत्रकारीतेतील सर्वच घटकांनी पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे.
समाज, देश, विदेशात घडणार्‍या वाईट घटनांची माहिती पहिल्यांदा पत्रकारांना मिळते. नंतर ती माहिती आपल्यापर्यंत पोहोचते. पत्रकारांना दररोज अशा प्रसंगांना सामोरे जावे लागते. मला एका संपादकांनी वृत्तपत्रांतून लेखन करण्यासाठी प्रोत्साहन दिले होते. त्यामुळे मला लेखनाची सवय जडली. या संपादकांनी आत्महत्या केली. कदाचित दररोज सहन करावे लागणारे ताणतणाव याला कारणीभूत असतील. प्रत्येक विभागाने आता स्वतंत्र अध्यापन करण्याचे दिवस संपले आहेत. वेगवेगळ्या विभागांनी एकत्र येण्याची गरज आहे. मराठवाडा मागास आहे, असे म्हणणे निर्थक आहे. प्रत्येकात असलेल्या क्षमतेचा वापर झाला पाहिजे. येत्या २-३ वर्षात विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील उच्च शिक्षणाचा दर्जा सुधारलेला दिसेल, असा विश्वास त्यांनी दिला.

वर्तमानपत्र व्यवसायामध्ये जेवढा खर्च तंत्रज्ञानावर होतो, तेवढा खर्च बातम्या व लेखांवर होत नसल्याची खंत व्यक्त करीत वर्तमानपत्र निर्मितीचा खर्च वाढला आहे. त्यामुळेच निर्मितीमुल्यापेक्षा विक्रीमुल्य कमी असल्याने उत्पन्नाचे स्त्रोत निर्माण करण्याचा हक्क वर्तमानपत्रांना आहे. असे स्पष्ट प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार डॉ. राधेशाम शुक्ला (हैद्राबाद) यांनी केले.

डॉ. शुक्ला म्हणाले की, पेड न्यूज बाबतीत सध्या मोठी चर्चा केली जात आहे. पण पेड न्यूज मागील कारणे काय आहेत याचीही चर्चा व्हायला हवी. सध्या वर्तमानपत्रांमध्ये ‘प्राईस वॉर’ चालू आहे. त्या स्पर्धेमध्ये टिकण्यासाठी फायद्याची पत्रकारीता करण्याकडे कल वाढला असल्याचे डॉ. शुक्ला यांनी सांगितले.
डॉ. ऋषभदेव शर्मा म्हणाले की, विविध भाषांमध्ये व्यापक स्वरुपाची चर्चासत्रे व्हायला हवीत यामुळे विचारांच्या आदान प्रदानाची सुरुवात होईल. आजही काही वर्तमानपत्रे निश्‍चित ध्येय ठरवून वाटचाल करीत आहेत, हे चित्र आशादायक असल्याचे त्यांनी सांगितले.
अध्यक्षीय भाषणात ज्येष्ठ पत्रकार कारखानीस म्हणाले की, समाज सुधारणा करणे हे वृत्तपत्राचे मुख्य कार्य आहे. तंत्रज्ञानामुळे वर्तमानापत्रांचे स्वरुप बदलत असले तरी त्याचा मुख्य हेतू बदलु न देण्याची जबाबदारी मोठी आहे आणि ती सर्वांनी मिळून पेलली पाहिजे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. सुनील पवार, प्रास्ताविक प्रा. डॉ. डी.एस. साकोळे तर आभार प्रा. डी.ई. गुंडरे यांनी व्यक्त केले. यावेळी पत्रकार रवींद्र केसकर, माधवसिंग राजपूत, जगदीश जोशी, सयाजी शेळके यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

माध्यमांनी सामाजिक समतेसाठी पुढाकार घ्यावा 
 कळंब - वर्तमानपत्रे ग्रामीण भागांना केंद्रबिंदू मानून वार्तांकन करीत आहेत. ही बाब निश्‍चितपणे कौतुकास्पद असून माध्यमांनी समतेसाठी पुढाकार घ्यावा, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सूर्यनारायण रणसुभे यांनी केले.
येथील शि. म. ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालयात आयोजित विद्यापीठ अनुदान आयोग पुरस्कृत दोन दिवसीय हिंदी व मराठी पत्रकारितेचे बदलते स्वरुप या राष्ट्रीय चर्चासत्राच्या समारोप प्रसंगी अध्यक्षस्थानावरुन ते बोलत होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे मराठी विभागप्रमुख डॉ. प्रल्हाद लुलेकर, डॉ सुकुमार भंडारे, प्राचार्य अशोकराव मोहेकर, डॉ अंबादास देशमुख, प्राचार्य डॉ. भारत हांडीबाग, उपप्राचार्य शरणप्पा मानकरी, प्रा. आबासाहेब बारकूल, प्रा.डॉ. शंकर कांबळे, यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी पुढे बोलताना रणसुभे म्हणाले की, माध्यमांवर वर्गचरित्र व वर्णचरित्राचा वरचष्मा निर्माण झाला आहे. हा वर्ग व वर्णवाद दूर सारून माध्यमांनी सामाजिक समतेसाठी पुढाकार घ्यायला हवा. पुर्वीच्या काळी वर्तमानपत्रे विशेषत: मराठी पत्रकारिता ब्राम्हणी व्यवस्थेची बाजू मांडत होती. नव्वदच्या दशकानंतर वर्तमानपत्रांनी ग्रामीण भागापर्यंत पोहोचून तेथील समस्यांना वाचा फोडली.ही बाब सकारात्मक आहे.
सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचून त्यांच्या जाणिवांना आपल्या वर्तमानपत्रात स्थान देणारी पत्रकारिताच यापुढे स्पर्धेच्या युगात टिकून राहणार असल्याचेही रणसुभे यावेळी म्हणाले. यावेळी मार्गदर्शन करताना डॉ लुलेकर म्हणाले की, आज वर्तमानपत्रे जिल्ह्यात बंदिस्त झाली आहेत. त्यामुळे शेजारील जिल्ह्यात काय चालले आहे. याची माहिती मिळत नाही. हे चित्र बदलायला पाहिजे व त्यासाठी वर्तमानपत्रांनी पुढाकार घ्यावा. मराठी पत्रकारितेसाठी मराठी संस्कृती आधी समजून घ्यायला हवी. महात्मा ज्योतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता समाज सुधारणेसाठी होती. ती परंपरा आजच्या पत्रकारांनी पुढे चालू ठेवावी. याप्रसंगी डॉ. अंबादास देशमुख, प्रा. डॉ. भारत हांडीबाग, डॉ सुकुमार भंडारे, ऋषभदेव यांचीही भाषणे झाली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. सुनिल पवार तर प्रा. डॉ. मुकुंद गायकवाड यांनी आभार मानले. 

Post a Comment

0 Comments