पत्रकारांवरील त्रासावर संसदेत झाली चर्चा

नवी दिल्ली- संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या कामकाजाचे वार्तांकन करणाऱ्या पत्रकारांना त्यासाठी आवश्‍यक प्रवेश मिळण्यास प्रचंड त्रास होतो. राज्यसभेच्या "बाबूशाही'कडून तर याबाबत अडवणूकच केली जाते, असा नेहमीचा अनुभवाचा विषय राज्यसभेत आज गाजला.

प्रश्‍नोत्तराच्या तासात अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना (पीआयबी कार्डधारक) उपनगरी व मेट्रो रेल्वेतही तिकिटात सवलत मिळावी, असा प्रश्‍न होता. याला जोडून कॉंग्रेस सदस्य विजय दर्डा यांनी राज्यसभेचा प्रेस पास मिळण्यात पत्रकारांना येणाऱ्या अडचणींची व्यथा मांडली. ते म्हणाले, की लोकसभेचा पास एक वर्षात मिळतो. राज्यसभेचा तोच पास मिळण्यासाठी किमान तीन वर्षे वाट का पाहावी लागते? सभापती हमीद अन्सारी यांनी दर्डा यांचा प्रश्‍न मूळ प्रश्‍नाशी संबंधित नसल्याच्या नियमावर बोट ठेवून फेटाळला. परंतु, पत्रकार कक्षातून मात्र याच प्रश्‍नाला जोरदार पाठिंबा मिळाल्याचे चित्र होते.

उन्हातान्हात संसदेचे वार्तांकन करणाऱ्या पत्रकारांसाठी विजय चौकात एखादे निवारा शेड बांधण्यात यावे, अशी जोरदार मागणी राज्यसभेच्या माजी उपसभापती नजमा हेपतुल्ला यांनी केली. याबाबत "सकाळ न्यूज नेटवर्क'ला त्यांनी सांगितले, की संसदेत वातानुकूलित सभागृहात बसून होणाऱ्या चर्चेचे वार्तांकन करण्यासाठी राष्ट्रीय प्रसार माध्यम प्रतिनिधी, कॅमेरामन यांना मात्र विजय चौकात उन्हात काम करावे लागते. 2001 मध्ये संसदेवरील हल्ल्यावेळी अनेक कॅमेरामन यांनी जिवावर उदार होऊन चित्रीकरण केले होते. अतिरेक्‍यांना पकडण्यासाठी मदत झाली होती. तरी विजय चौकात निवारा शेड बांधून पाण्याची व्यवस्था करण्याची माझी मागणी आहे.

खासगी बाबीत हस्तक्षेप
राज्यसभेचा कायमस्वरूपी पास मिळण्यासाठी किमान 20 संसद अधिवेशनांचे (किमान सव्वातीन वर्षे) सातत्याने वार्तांकन करावे लागते. मात्र, पास मिळण्यासाठीही राज्यसभेच्या बाबूशाहीकडून पत्रकारांचा मानसिक छळ होतो. अनेक पत्रकार वैतागून राज्यसभेत वार्तांकनास जात नाही, असेही दिसून येते. राज्यसभेतही प्रसारमाध्यम सल्लागार समिती आहे; पण कागदाला पेन न लावताही संसदेत "ज्येष्ठ पत्रकार' म्हणून मिरविणारे राज्यसभा समितीचे अनेक सदस्य नवख्या पत्रकारांना मदत करीत नसल्याचे दिसून येते. प्रत्यक्ष पास देणाऱ्या लोकसभा व राज्यसभा कार्यालयातील कर्मचारी खासगी बाबींत नाक खुपसतात. राज्यसभेतील बाबूशाहीने 25 वर्षीय पत्रकाराला "तुम्ही पाच वर्षांचा कामाचा अनुभव दिला आहे. मग, तुम्ही पदवी तरी घेतली आहे की नाही? कोणत्या महाविद्यालयातून घेतली? असे प्रश्‍न विचारून भंडावून सोडल्याचा अनुभवही ताजा आहे.