न्यूज-फिचर्स एजन्सींना लागणारी घरघर आणि मिडिया प्लस

कोणतीही फिचर-न्यूज एजन्सी चालवायची म्हटली की, प्राथमिक टप्प्यात किमान सात ते आठ अनुभवी पत्रकार, तितकेच डिझायनर, एक-दोन मुद्रितशोधक एवढं मनुष्यबळ आवश्यकच ठरतं. त्यानंतर यांत्रिक दृष्ट्याही परिपूर्ण असणं गरजेचं असल्याने तो खर्चही सुरुवातीलाच करावा लागतो. साधारण लाखाच्या घरात हा संपूर्ण खर्च जातो. एवढं करूनही दैनिकं आपली सेवा घेतील, याची काही शाश्वती नसते. मग काम मिळविण्यासाठी प्रयत्न करणं आणि सुरुवातीची सहा महिने संस्था जेव्हा पैशाला भार ठरू लागते, तेव्हा तिला घरघर लागते...
कुण्याही दैनिकाच्या एका पानासाठी लागणारा खर्च हा किमान दहा हजारांच्या घरात जातो. एक उपसंपादक, एक डिझायनर, पानासाठी मजकूर लिहिणारे लेखक-रिपोर्टर, मुद्रितशोधक या सर्वांचा पगार आणि किरकोळ बाब विचारात घेता विजेचे बील...असा हा संपूर्ण खर्च किमान दहा हजारांत जातो. आजघडीला अनुभवी उपसंपादक मोठ्या दैनिकांनी काबीज केलेत. त्यामुळे मध्यम आणि छोट्या दैनिकांनी नवीन उपसंपादक घ्यायचा म्हटला तरी दहा ते बारा हजार पगार मागतो. डिझायनर तर मिळतच नाही, मिळाले तरी परवडत नाहीत म्हणून डिटीपी ऑपरेटरवर काम धकवले जाते. तोही पाच ते सहा हजार पगार मागतोच. यानंतर लेखक-वार्ताहरांचे मानधन, मुद्रितशोधकाचे मानधन हा सगळा खर्च असतो. एवढे सर्व मनुष्यबळ कामाला लावल्यानंतर त्यापासून आऊटपूट मात्र दोन qकवा फार फार झालेच तर तीन पाने मिळतात. अशा परिस्थितीत मध्यम आणि छोट्या दैनिकांच्या अत्यंत उपयोगी पडतात त्या फिचर्स संस्था. मिडिया प्लसचाच विचार केला तर अवघ्या दीड-दोनशे रुपयांपर्यंत मिडिया प्लस फिचर्स पान पुरवते. म्हणजे एक पान मिळण्याचा खर्च हा महिन्याकाठी चार-साडेचार हजारांपर्यंत जातो. अशा परिस्थितीत फिचर्स एजन्सीकडून पान घेणे कधीही मध्यम दैनिकांना परवडते.
मिडिया प्लसची सुरुवात करण्याचा विचार मी आणि माझ्या मित्रांनी केला, तेव्हा हे लक्षात घेतले की, आधीच्या फिचर्स संस्था बंद का पडल्यात? तेव्हा हे लक्षात आलं की, दहा हजार रुपये महिना खर्चून दैनिके पानं त्यांच्या कार्यालयात काढतील, पण फिचर्स एजन्सीला तीन- चार हजार रुपये देण्यालाही मागेपुढे पाहतील. काही दैनिकांनी तर महिनाभर पाने वापरून फिचर्स एजन्सीला हात दाखवला होता. वास्तविक फिचर्स एजन्सी चालवणारी मंडळी ही सुद्धा माणसेच. त्यांनाही पोट आहेच. पण तरीही काही दैनिकांनी त्यांचे पैसे बुडवणे हे जरा खटकणारेच होते. त्यानंतर मिडिया प्लस कशा पद्धतीने काम करेल, याचे एक नियोजनच आम्ही तयार केलं. आम्ही सर्व मिळून संचालक बारा जण. सर्वांनी ज्याचा त्याचा खर्च स्वतः करण्याचा निर्णय घेतला. प्रत्येकाने कामासाठी लॅपटॉप घेतला आणि कार्यालयासाठी जो खर्च होता, तो सर्वांनी मिळून केला. त्यानंतर आम्हा सगळ्यांचे संपर्क आम्ही जमा केले आणि त्यांना आधी फिचर्स सेवा द्यायला सुरुवात केली. त्यांच्या माध्यमातून आणखी काही दैनिके जोडली गेली. आता १८ दैनिकांना फिचर्स सेवा सुरू आहे. केवळ फिचर्स सेवेपुरते मर्यादित न राहता, ३२ दैनिकं वृत्तसेवा घेताहेत.  मिडिया प्लसच्या सहकार्याने अकोला, बुलडाणा आणि जालन्यात वृत्तपत्रेही सुरू झालीत. संस्था सुरू केली म्हणजे संलग्नित कामेही आपोआप मिळतात. पब्लिकेशनची कामेही मिडिया प्लसकडून सुरू असतात. कामं वाढल्याने मनुष्यबळही वाढवावं लागलं... पण हे करताना सुरुवात आम्ही शून्यापासून ठेवल्याने नुकसानीचं तितकंच टेन्शन आम्हाला आलं नाही. करणारे आम्हीच होतो, कुणी येऊन काम करेल आणि मग ते काम होईल, असं नव्हतं. त्यामुळे फायदा  झाला नाही तरी नुकसान होणार नाही, हे आम्हाला माहीत होतं. इतर फिचर्स संस्थांनी जसं केलं, आधी भलंमोठं भांडवलं जमा करून कामाची प्रतीक्षा केली, तशी गरज आम्हाला कधीच भासली नाही.
-मनोज सांगळे,
कार्यकारी संचालक, मिडिया प्लस
www.mediaplusabd.blog.com

Post a Comment

0 Comments