सिंधुदुर्ग पत्रकार भवनासाठी शासन सर्वतोपरी सहकार्य करेल - मुख्यमंत्री

दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या द्विजन्मशताब्दी वर्षानिमित्त सिंधुदुर्गनगरी येथे उभारण्यात येणाऱ्या जिल्हा पत्रकार भवनासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी येथे दिले. सिंधुदुर्ग हा बाळशास्त्री जांभेकरांचा जन्म जिल्हा असल्यामुळे खास बाब म्हणून मुख्यमंत्री निधीतूनही आर्थिक मदत देण्याची शक्यता पडताळून पाहू, असेही ते म्हणाले.

सिंधुदुर्ग जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या शिष्टमंडळाने पत्रकार संघाचे अध्यक्ष गजानन नाईक यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्र्यांची भेट घेतली त्यावेळी ते बोलत होते. शिष्टमंडळात आमदार दिपक केसरकर, मराठी पत्रकार परिषदेचे कार्याध्यक्ष किरण नाईक, संघाचे उपाध्यक्ष चंद्रकांत सामंत, नंदकिशोर महाजन, एकनाथ पवार, किशोर जैतापकर आदींचा समावेश होता. यावेळी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे सचिव तथा महासंचालक प्रमोद नलावडे, संचालक श्रीमती श्रध्दा बेलसरे उपस्थित होते.

पत्रकार संघाच्यावतीने जिल्हा मुख्यालय सिंधुदुर्ग नगरी येथे आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचे भव्य स्मारक असलेले पत्रकार भवन बांधण्यासाठी १ कोटी ३४ लाख रुपये खर्चाचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. मात्र यासाठी मोठ्या प्रमाणात शासकीय मदतीची गरज आहे. २०१२ हे जांभेकरांचे द्विजन्मशताब्दी वर्ष असल्याने शासनाने खास बाब म्हणून जास्तीत जास्त निधी द्यावा, अशी आग्रही मागणी श्री. नाईक यांनी यावेळी केली.

मुख्यमंत्र्यांनी ज्या पत्रकार संघाकडे स्वत:ची जागा आहे, त्यांना देण्यात येणारे २० लाख रुपये नियमाप्रमाणे मंजूर करण्यात येतील, असे आश्वासन दिले. याशिवाय खासबाब म्हणून आणखी २५ लाख रुपये मुख्यमंत्री निधीतून देता येतील का हे पडताळून पाहू, असेही सांगितले.

Post a Comment

0 Comments