पत्रकार संजय मालाणी यांच्यावर प्राणघातक हल्ला

बीड  - दै.सुराज्यचे वृत्तसंपादक संजय मालाणी यांच्यावर शुक्रवारी दि.२८ रोजी रात्री दहा वाजता अज्ञात लोकांनी सुभाष रोडवर ( सांगली बँकेजवळ ) प्राणघातक हल्ला केला.  यात मालाणी गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
दै.सुराज्यचे वृत्तसंपादक संजय मालाणी आणि हिंदजागृतीचे संपादक अभिमन्यू घरत हे दोघे जण रात्री दहाच्या सुमारास जिल्हा रूग्णालयात स्वाईन फ्लुबाबतच्या वार्ता संकलनासाठी गेले होते.तेथून ते दुचाकीवरून कार्यालयाकडे परतत असतांना सांगली बँकेजवळील रस्त्यावर पुढून आलेल्या पांढ-या रंगाच्या दुचाकीने त्याना रोखले व काही कळायच्या आत मागून आलेल्या एका दुचाकीवरील अज्ञात दोघांनी घरत यांना बाजूला केले व संजय मालाणी यांना मारहाणीस सुरूवात केली.या हल्ल्यात मालाणी यांना गंभीर मार लागला असून उपचारासाठी त्यांना रात्री जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले.
या घटनेची माहिती शहरात पसरताच पत्रकार,छायाचित्रकार,सामाजिक क्षेत्रात काम करणा-या,राजकीय पक्षांचे कार्यकर्ते यांनी रुग्णालयात धाव घेतली,दरम्यान रात्री उशीरा पोलिस अधिक्षक दत्तात्रय मंडलीक,अतिरीक्त पोलिस अधिक्षक माधव कारभारी,पोलिस उपअधीक्षक  संभाजी कदम,पोलिस उपअधीक्षक गृह विद्यानंद काळे यांनी रूग्णालयात भेट देऊन या मारहाणीबाबतची माहिती जाणून शहर पोलीस ठाण्यात अज्ञात मारेक-याविरूंध गुन्हा दाखल केला .
बीड जिल्हयाचे जिल्हाधिकारी यांच्याकडे जिल्हयातील पत्रकार संघटनानी निवेदन देवून या हल्ल्याची सखोल चौकशी करून गुन्हेगारास कठोर शिक्षा करण्याची मागणी केली आहे .या  घटनेचा बीडच्या सर्व पत्रकारांनी तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे.

 अंबाजोगाईत निषेध..

बीड येथील दैनिक सुराज्यचे उपसंपादक संजय मालाणी यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याचा अंबाजोगाईत पत्रकारांनी तीव्र शब्दात निषेध करून मारेकर्‍यांना तात्काळ अटक करण्याची व पत्रकार संरक्षण कायदा तातडीने अस्तित्वात आणण्याची मागणी उपजिल्हाधिकार्‍यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.
या संदर्भात शनिवारी नगरपालिकेत अंबाजोगाई पत्रकार संघाची बैठक होवून या बैठकीत पत्रकार मालाणी यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध केला. अशा प्रकारचे हल्ले पत्रकारांवर वारंवार होत असून शासन मात्र या बाबतीत बघ्याची भूमिका घेत आहे. परिणामी या संदर्भात शासनाने तात्काळ पाऊले उचलावीत अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल अशा तीव्र भावना पत्रकारांनी व्यक्त केल्या. यावेळी ज्येष्ठ पत्रकार अमर हबीब, संपादक प्रा.नानासाहेब गाठाळ, प्रशांत बर्दापूरकर, दत्तात्रय अंबेकर, विरेंद्र गुप्ता, जगन सरवदे आदींची भाषणे झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जगन सरवदे यांनी केले. सूत्रसंचालन विरेंद्र गुप्ता यांनी केले. त्यानंतर या मागणीचे निवेदन उपजिल्हाधिकार्‍यांना देण्यात आले. यावेळी अभिजीत गुप्ता, बालाजी खैरमोडे, अविनाश मुडेगावकर, प्रकाश लखेरा, प्रशांत बर्दापूरकर, अ.र.पटेल, परमेश्‍वर गित्ते, रवि मठपती, प्रदीप तरकसे, अशोक कदम, सुदर्शन रापतवार, रमाकांत उडाणशिव, रमाकांत पाटील, अशोक कचरे, अरुण सोमवंशी, गोविंद खरटमोल, महादेव गोरे, नागेश औताडे, ऍड.जे.बी.साबने, दादासाहेब कसबे, अशोक गुंजाळ, संतोष बोबडे,श्रावण चौधरी, दत्तात्रय दमकोंडवार, रणजित डांगे, सलीम गवळी, पोखरकर, निर्मळे, पी. एस. परदेशी आदी मान्यवर उपस्थित होते.  त्याचबरोबर  केज येथील पत्रकारांनी मुक मोर्चा काढून मालानी यांच्यावरील हल्ल्याचा निषेध केला.

तीव्र शब्दात धिक्कार
बीड येथील सुराज्य दैनिकाचे पत्रकार संजय मालानी यांच्यावर समाजकंटंकांनी केलेल्या हल्ल्याचा मराठी पत्रकार परिषदेने तीव्र शब्दात धिक्कार केला असून हल्लेखोरांना तातडीने अटक करावी अशी मागणी गृहमंत्री आर.आर.पाटील यांच्याकडे केली आहे.महाराष्ट्रात पत्रकारांवर सातत्यानं हल्ले होत असून पत्रकारांना निर्भयपणे काम करणे अशक्य झाले आहे.त्यामुळे पत्रकारांना संरक्षण देणारा कायदा तात्काळ करावा अशी मागणीही परिषदेने केली आहे.