लोकमतचे रवी गाडेकर दिव्य मराठीत...

औरंगाबाद - स्त्री भ्रूण हत्येसारखा ज्वलंत प्रश्न ऐरणीवर आणणारे लोकमतचे उपसंपादक रवी गाडेकर हे लोकमतमधून दिव्य मराठीत जाणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. तीन वर्षाहून अधिक काळ लोकमतमध्ये रवी गाडेकर कार्यरत होते. अचानक त्यांनी राजीनामा देऊन, दिव्य मराठीत जाण्याचा निर्णय घेतल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
सध्या लोकमतमध्ये मोठ्या प्रमाणावर गटबाजी निर्माण झाली असून, या गटबाजीला कंटाळूनच गाडेकरांनी दिव्य मराठी जॉईन केल्याची सूत्रांची माहिती आहे. स्त्री भ्रूण हत्येचा प्रश्न सातत्याने मांडून प्रशासनच नव्हे तर सरकारचेही लक्ष्य त्यांनी या विषयाकडे वळवले होते. त्यानंतर मराठवाड्यात मोठ्या प्रमाणावर स्त्री भ्रूण हत्या करणा-यांवर कारवाई सत्र सुरू झाले होते. गाडेकरांच्या या बातम्यांची दखल राज्यभर घेतली गेली होती हे विशेष. याच बातम्यांमुळे त्यांना एकाच वर्षात तीन पुरस्कार मिळाले. त्यात लाडली मीडिया ग्रुपच्या राष्ट्रीय पुरस्काराचा समावेश आहे. गेल्या काही महिन्यात गाडेकरांना वाळूज कार्यालयाचे इन्चार्ज बनविण्यात आले होते. दिव्य मराठीने त्यांना चांगल्या पगाराची ऑफर दिली होती. एकीकडे लोकमतमध्ये गटबाजीमुळे होणारी कोंडी आणि दुसरीकडे एका राष्ट्रीय दैनिकात काम करण्याची संधी यामुळे गाडेकर यांनी लोकमतला राम राम ठोकला आणि दिव्य मराठीत जॉईन होण्याचा निर्णय घेतला. १ डिसेंबरपासून ते दिव्य मराठीच्या डीबी स्टारसाठी काम करणार आहेत.