हायकोर्टाने पोहरे यांचा जामीन अर्ज फेटाळला

नागपूर - गोंडखैरी येथील देशोन्नती पिंट्रिंग प्रेससमोर सोबत आणलेल्या बंदूकधारी सुरक्षा गार्डला जुना सुरक्षा गार्ड राजेंद्र दुपारे याच्यावर गोळी झाडण्याचा आदेश देऊन, त्याचा खून केल्याप्रकरणी उच्च न्यायालयाचे न्या. प्रसन्ना वराळे यांच्या एकलपीठाने देशोन्नतीचे एडिटर इन चीफ आरोपी प्रकाश गोपाळराव पोहरे यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला.
खुनाची ही घटना १३ ऑक्टोबर रोजी घडली होती. त्यानंतर २३ ऑक्टोबर रोजी पोहरे यांना त्यांच्या अकोला भागातील फार्महाऊसवर अटक करण्यात आली होती. सध्या ते नागपूर मध्यवर्ती कारागृहात आहेत. त्यांनी जामिनासाठी दाखल केलेला अर्ज सत्र न्यायालयाने ३ नोव्हेंबर रोजी फेटाळून लावला होता.
त्यानंतर त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने नमूद केले की, प्रत्यक्ष घटना घडल्याची तारीख १३ ऑक्टोबरपासून १४ ऑक्टोबरपर्यंत तपास यंत्रणेने अनेक प्रत्यक्षदश्री साक्षीदारांचे बयान नोंदवले. त्यांच्या बयानांवरून पोहरे यांनी कर्मचार्‍यांना अश्लील शिवीगाळ केली. बंदूकधारी सुरक्षा जवान हरेकृष्ण रामप्यारे द्विवेदी याला गोळी झाडण्याचा आदेश आणि चिथावणी दिली. त्यामुळे या सुरक्षा जवानाने जुना सुरक्षा जवान राजेंद्र दुपारे याच्या पोटावर गोळी झाडून त्याचा खून केला, असा प्रथमदर्शनी पुरावा दिसतो. कर्मचारी हे कोणत्याही घातक शस्त्राविना असतानाही आरोपी पोहरे हे घटनास्थळी सशस्त्र सुरक्षा गार्ड घेऊन आले होते. ७ नोव्हेंबर रोजी मध्यवर्ती कारागृहात आरोपींच्या ओळख परेडच्या वेळी या प्रकरणातील साक्षीदारांना धमक्या देण्यात आल्या. त्यामुळे या आरोपीकडून साक्षीदारांवर दबाव आणला जाऊ शकतो, अशी सरकार पक्षाने व्यक्त केलेली भीती रास्त आहे. या प्रकरणाचा तपास सुरूच आहे. आरोपींविरुद्ध न्यायालयात आरोपपत्र दाखल व्हायचे आहे. या पार्श्‍वभूमीवर पोहरे हे जामीन मिळण्यास पात्र नाहीत.