पुढारीवरील हल्ल्याची बातमी पुढारीत नाही...

सोलापूर - पुढारीच्या सोलापूर आवृत्तीत बार्शीच्या माजी नगराध्यक्षाच्या निधनाच्या बातमीत चुकीचा फोटो प्रसिध्द झाल्यामुळे संतप्त जमावाने पुढारी कार्यालयावर दगडफेक करून काचा फोडल्या.यासंदर्भात सुराज्य आणि तरूण भारत वगळता एकाही दैनिकाने बातमी दिली नाही.दस्तुरखुद्द पुढारी दैनिकातही स्वत:च्या दैनिकावर झालेल्या  हल्ल्याची बातमी दिली नाही.त्यामुळे सोलापुरच्या मीडियात भुवया उंचावल्या आहेत.नंतर कळले की, पुढारीकारांनी हे प्रकरण आपसात मिटविले आहे.मात्र त्यामुळे निषेधाच्या बातम्या देणारे दैनिक तोंडावर आपटले आहेत.
 घडले असे की,बार्शीचे माजी नगराध्यक्ष श्रीकांत पिसे यांचे 4 डिसेंबर रोजी निधन झाले. त्याची बातमी 5 डिसेंबर रोजीच्या पुढारीच्या अंकात पान 5 वर छापण्यात आली. मात्र एका उपसंपादकाने श्रीकांत पिसे यांच्या निधनाच्या बातमीत सोलापुरातील कॉंग्रेसचे नेते शिवाजी(महाराज) पिसे यांचा फोटो छापला. त्यामुळे जे व्हायचे तेच झाले. सकाळी सकाळीच पिसे महाराजांच्या कार्यकर्त्यांनी पोलीस आयुक्तालयापासून हाकेच्या अंतरावर असलेले पुढारीचे कार्यालय गाठले. मात्र कार्यालय बंद असल्याने परत गेले. त्यानंतर दुपारी बाराच्या सुमारास पुन्हा काही कार्यकर्ते मोटारसायकली आणि रिक्षातून पुढारीसमोर आले. रस्त्यावर थांबूनच त्यंानी ठळ्ळ...फटाक सुरू केले. क्षणार्धात समोरच्या काचांचा चक्काचूर झाला. घाबरलेले व्यवस्थापक हेमंत चौधरी त्यांच्या टेबलाखाली लपून बसले. त्याचवेळी कार्यालयात उपस्थित असणारे महेश पांढरे, राजेंद्र कानडे, अमोल व्यवहारे आदी कर्मचाऱ्यांना टेबलाखाली लपून बसण्यास फर्मावत होते. दगडफेक करणारे कोणीही कार्यालयात आले नाहीत. त्यांनी रस्त्यावर थांबूनच आपला कार्यक्रम उरकून ते निघून गेले. काही मिनिटातच ही बातमी वाऱ्यासारखी शहरभर पसरली. इतर वृत्तपत्रांचे प्रतिनिधी, चॅनलवाले पुढारी कार्यालयासमोर जमले. पोलीसही नेहमीप्रमाणे धावत आले. सदर बझार पोलीस ठाण्याचे वरिष्ट निरीक्षक वायकर घटनास्थळी आले. पंचनामा सुरू झाला.दुसरीकडे कानडे यांना सोबत घेवून चौधरी यांनी सदर बझार पोलीस ठाणे गाठले. त्याठिकाणी त्यांनी रितसर फिर्याद दिली. वृत्तपत्राच्या कार्यालयावर झालेल्या हल्ल्याची शहरात सगळीकडेच गंभीर दखल घेण्यात आली. सोलापूरची पाने कोल्हापूरला पोहचण्यापूर्वीच चौधरींना प्रकरण मिटवून घेण्याचे संकेत कोल्हापूरच्या मुख्यालयातून देण्यात आले. त्यामुळे चौधरींनी पिसे महाराजांच्या दरबारात लोटांगणच घातले. आतल्या आत प्रकरण गुपचूपपणे मिटवून घेण्यात आले. अर्थातच दुसऱ्यादिवशी यासंदर्भात पुढारीमध्ये एका ओळीचीही बातमी आली नाही.दुसरीकडे वृत्तपत्रातील एखाद्या पत्रकारावर हल्ला झाला किंवा अन्य काही झाल्यास संबंधितांनी आपल्याकडे लेखी पत्र द्यावे, त्यांनी त्यांची बाजू मांडावी. त्यानंतर त्या प्रकरणात संबंधित पत्रकाराची बाजू घ्यायची की नाही हे ठरवले जाईल अशी मीडिया ट्रायलची भूमिका घेणारा सोलापूरचा श्रमिक पत्रकारसंघ कधी नव्हे तो यावेळी जागा झाला होता. सोमवारी दुपारी झालेल्या हल्ल्याचा निशेध करण्यासाठी मंगळवारी सकाळी कार्यकारणीची बैठक पत्रकारसंघाने बोलावली.पण पत्रकारसंघालाही पुढारीकारांनी तोंडावर पाडले. पुढारीत बातमी नसल्यामुळे पत्रकारसंघाचे पदाधिकारी साशंकतेनेच जमले. पण पुढारीचा साधा शिपायीसुध्दा बैठकीला फिरकला नाही. त्यामुळे पदाधिकारी जमलेले असतानाही बैठक झाली नाही. . इकडे सुराज्य आणि तरूण भारत वगळता पुढारी कार्यालयावरील हल्ल्याची बातमी इतर कोणत्याच दैनिकाने छापली नाही. त्यामुळे पुढारीने सुराज्य आणि तरूण भारतलाही तोंडघशी पाडले.