> बेरक्याला माहिती देण्यासाठी ई - मेल करा - berkya2011@gmail.com

सोमवार, १४ जानेवारी, २०१३

नाशिकच्या 'गांवकरी'चे रंगरूप बदलणार ...


मंडळी विश्वास नाही ना बसत? 'गांवकरी' आणि प्रयोग हे समीकरण काही जुळत नाही. खरे तर एव्हढे विश्वार्साह दैनिक... अगदी आता-आतापर्यंत स्पर्धा वाढली नव्हती तोपर्यंत उत्तर महाराष्ट्र परिसरात लोक 'पेपर' म्हणायचे नाही. कोणत्याही 'पेपर'ला 'गांवकरी'  म्हणायचे. सकाळी स्टॉलवर गेलेल्या माणसाला सकाळ, लोकमत, देशदूत किंवा रामभूमी हवा असेल तरी तो म्हणायचा, 'गांवकरी' द्या! इतका तो सुवर्णकाळ होता. मराठीतील 'रिडर्स डायजेस्ट' असा लौकीक मिळविलेले 'अमृत' मासिक काढले जायचे. आपल्या आधीच्या दोन पिढ्यात अनेक प्रतिभावंत या मासिकाने घडविले. मराठवाड्यात दूरदृष्टीने 'अजिंठा' निघायचा. खूप काही लिहीता येईल 'गांवकरी'विषयी. वंदन पोतनीस नावाचा जबरदस्त प्रतिभाशाली माणूस अतिशय बचावात्मक रितीने कारभार हाताळतोय. वास्तविक त्यांच्याइतकी बातम्यांची समज, अफाट जनसंपर्क आणि माणसे जोडण्याची हातोटी कुणाजवळही नाही. मराठीतील एकही आघाडीच्या संपादकाला नसेल इतकी आर्थिक विषयाची त्यांची जाण उत्तम आहे. फक्त माणसांवर टाकलेला अतिविश्वास त्यांना आजवर नडला आहे. याशिवाय ज्या माणसांवर विश्वास टाकायचा त्यांच्यावर ते टाकत नाही! यावेळी मात्र त्यांनी अतिशय योग्य निर्णय घेतला आणि योग्य माणसावर विश्वासही टाकलाय.

नवी मुंबई/ठाण्यात 'गांवकरी'चे रंगरूप बदलण्यात मोलाची भूमिका बजावणारे सुनील आढाव आता नाशिकला 'गांवकरी'त दाखल झाले आहेत. सुनील आढाव हे विक्रांत पाटील यांचे फाईंड! पाटलांसह आढावांनी नवी मुंबईत अनेक भन्नाट प्रयोग केले. बातमीची उत्तम जाण आणि आर्टिस्ट हाताळायची क्षमता असलेला संपादक मिळाला की अगदी छोट्या दैनिकाने केलेल्या प्रयोगांची दखल तमाम बड्यांनाही घेणे भाग पडते हे 'गांवकरी मुंबई'त दिसले तसेच नंतर अलिबागमध्ये 'कृषीवल'मध्येही दिसले. 'गांवकरी'तून आढाव कोकणात गेले आणि तिथे संजय आवटे यांना लॉंन्चिंगचा धमाका करता आला. आता पुन्हा आढाव स्वगृही परतत आहेत.

तुम्ही म्हणाल, एखादा आर्टिस्ट दैनिकाचे रुपडे खरेच बदलू शकतो का? दोन अत्यंत यशस्वी उदाहरणे आहेत. नाशकातही ती पुनरावृत्ती होईल, यात शंकाच नाही. फार वेळ वाट पाहायला लागणार नाही. 'बेरक्या'ला मिळालेल्या माहितीनुसार, उद्यापासून 'गांवकरी'चे नाशिकमधील कामकाज इन डिझाईन, सीएस 6 मध्ये होणार आहे. आढाव यांनी जॉईन झाल्यापासून आठ जणांना तयार केले आहे. स्टाइलशीट तयार झालीय. आढाव तरुण असले तरी कल्पक आहेत.  इनडिझाईन, एडोबी आणि करोल मध्ये त्यांचा जबरदस्त हातखंडा आहे. त्यामुळेच आवटेंनी त्यांना 'कृषीवल'चे कला संपादकपद बहाल केले होते. पूर्वी 'महानगर'मध्ये  महाराष्ट्रातला एकमेव कला संपादक असण्याचा मान दिलीप पवार यांना होता. आढाव हे त्यातील दुसरे. 'महानगर'मध्ये वृत्तसंपादक म्हणून काम केलेल्या विक्रांत पाटलांनी त्याच अटीवर आढाव यांना नवी मुंबईतून अलिबागेत पाठविले होते, असे बोलले जाते.

आढाव यांनी तयार केलेला 'कृषीवल'चा दिवाळी अंक पाहिला की त्यांची सृजनशीलता, कल्पकता आणि क्षमता याची कल्पना येते. मोहोर, लाईव्ह रायगड, कलासक्त, मुक्ता, दुनिया, हेल्थ  असे भन्नाट लोगो या कलासक्ततेची साक्ष देतात. अर्थात हे सारे करताना मदतीला असलेला अमर मर्ढेकरही नाशकात असता तर सोने पे सुहागा झाले असते. एक माणूस नक्कीच सारं चित्र बदलू शकतो. हे बदललेले चित्र नाशिकमध्ये लवकरच पाहायला मिळेल. तेव्हा प्रतीक्षा करूयात तरुण, देखण्या, चकचकीत आणि मुबलक व्हाइट स्पेस असलेल्या गांवकरीची! आढाव यांनी निगुतीने केलेल्या सजावटीची!!
सुनील आढाव पूर्वी 'गांवकरी'त असले तरी तेव्हा त्यांना पूर्णत: हाताळलेय ते विक्रांत पाटील यांनीच. आता वंदन पोतनीस हेच त्यांना थेट हाताळणार आहेत. नाशिकची टकलेंची सुकन्या व अलिबागच्या शेकापवाल्या जयंत पाटलांच्या सूनबाई असलेल्या चित्रलेखा पाटील यांच्याकडील नोकरी सोडून आढाव आता नाशकात आलेत. त्यामुळे चित्रलेखाबाई नाही म्हटल्या तरी थोड्या नाराजच आहेत. मात्र, पोतनीस-टकले संबंध अतिशय स्नेहपूर्ण आहेत आणि  टकलेंना व चित्रलेखाताईंनाही बदललेला, पुन्हा बहरू पाहणारा गावकरी नक्कीच आवडेल; नव्हे दोघांनाही असा बदल होऊ शकतो, याची पूर्ण खात्रीच असणार!
बेरक्याच्या आढाव आणि वंदन पोतनीस यांनाही मन:पूर्वक शुभेच्छा... त्यांनी रिस्क घ्यावी, प्रयोग करावेत, पैसा ओतावा; पण हा उत्तर महराष्ट्रातील जिव्हाळ्याचा ब्रँड टिकवावा, अशीच अनेकांची मनोमन इच्छा आहे.

आढाव यांचे 'फ़ेसबुक'वरील स्वगत : समोरून येणार्‍या प्रचंड वादळांवर मात करून उत्तुंग ध्येयाकडे मार्गक्रमण करणे हा माझा स्वायीभाव. गरीबीवर विजय मिळवून श्रीमंतीचा पराभव करणे हे आमच्या रक्तातच आहे. उगीचच अकलेचे तारे तोडणार्‍या भ्रमिष्ट नि अहंकारी लोकांना त्यांची जागा दाखवून काही तरी सृजनात्मक घडवणे हे माझे उद्दिष्ट आहे.

फेसबुक वर शेअर करा

Facebook