येत्या दोन वर्षात वेब मीडियाचा उदय होणार - ढेपे

औरंगाबाद - प्रिंट, इलेक्ट्रॉनिक मीडियानंतर येत्या दोन वर्षात थर्ड मीडिया म्हणून वेब मीडिया उदयास येईल तसेच सन २०२० पर्यंत अनेक वृत्तपत्रे बंद पडून,त्याची जागा ई - पेपर्स आणि ऑनलाईन न्यूज पेपर्स घेतील,असे मत उस्मानाबाद लाइव्हचे संपादक सुनील ढेपे यांनी येथे व्यक्त केले.
भूमिपुत्रांचा खरा मित्र म्हणून मराठवाड्यात ओळख निर्माण करणा-या दैनिक लोकपत्रच्या इंटरनेट न्यूज चॅनलचे उद्घाटन आणि औरंगाबाद गुड मॉर्निंग पुरवणीच्या प्रकाशन समारंभप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.यावेळी लोकपत्रचे संस्थापक संपादक अंकुशराव कदम, कार्यकारी संपादक सुंदर लटपटे, सहाय्यक संपादक उमाकांत टिळक, बीड लाइव्हचे संपादक प्रा.गणेश पोकळे, सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ.अजित बो-हाडे आदी उपस्थित होते
ढेपे म्हणाले की,सध्या पत्रकारितेत ज्या हालचाली सुरू आहेत, त्या प्रामुख्याने ऑनलाईन माध्यमांशी संबंधित आहेत.सध्या सर्वत्र डॉटकॉमचा बोलबोला सुरू सुरू झाला आहे.अमेरिकेतील प्रख्यात इंग्रजी साप्ताहिक न्यूजविकने सुध्दा ७९ वर्षानंतर आपली प्रिंट आवृत्ती बंद करून, इंटरनेट आवृत्ती सुरू केली आहे.
सध्या प्रिंट मीडियात गळेकापू स्पर्धा सुरू झाली आहे. कागदाचे आणि मशिनचे वाढलेले भाव,मिळणारे एकंदरीत उत्पन्न यामुळे अनेक वृत्तपत्रे अडचणीत आले आहेत.जिल्हास्तरावरील अनेक दैनिके साखळी वृत्तपत्रामुळे बंद पडण्याचा मार्गावर आहेत.त्यांच्यापुढे एकच पर्याय आहे,तो म्हणजे ऑनलाईन न्यूज पेपर.
काळाची गरज ओळखूणच आपण दोन वर्षापुर्वी उस्मानाबादसारख्या मागास ठिकाणी उस्मानाबाद लाइव्ह नावाचे ऑनलाईन पेपर सुरू केला.ऑनलाईन न्यूज पेपर जगभरात कोठेही आणि केव्हाही वाचता येत असल्यामुळे त्याकडे दिवसेंदिवस कल वाढत चालला आहे.
ऑनलाईन न्यूज पेपरमध्ये टेस्ट,ऑडिओ आणि व्हीडिओ याचा मिलाफ करता येतो, तसेच स्कोल,टेस्ट, ऑनिमिशन,ऑडिओ आणि व्हीडीओ जाहिराती टाकण्याची सुविधा असल्यामुळे जाहिरातदारांचा कलही ऑनलाईन न्यूजपेपरकडे वाढला आहे.
यावेळी ढेपे यांनी पत्रकारितेतील आपले अनुभव सांगून,  पत्रकारांनी काळाबरोबर आणि बदलत्या तंत्रज्ञानाबरोबर चालण्याचे आवाहन केले.सुंदर लटपटे यांच्या नेतृत्वाखाली लोकपत्रने यावर्षी जबरदस्त गती पकडल्याचे सांगून इंटरनेट न्यूज चॅनल आणि पुरवणीला शुभेच्छा दिल्या.
यावेळी डॉ.अजित बो-हाडे, सुंदर लटपटे,प्रा.गणेश पोकळे, यांचीही समयोचित भाषणे झाली.अध्यक्षीय भाषणात अंकुशराव कदम यांनी, वृत्तपत्राचे लक्ष केवळ शहरी भागाकडे असून,खेड्याकडे नसल्याची खंत व्यक्त केली.मराठवाड्यात विशेषत: उस्मानाबाद, बीड,जालना जिल्ह्यात भयाण दुष्काळी परिस्थिती असून, त्याकडे लक्ष केंद्रीत करण्याची सूचना केली.उपेक्षितांच्या गरजा,समस्या लक्षात घेवून वृत्तपत्राचे धोरण असले पाहिजे.याच धोरणाचा स्वीकार करून,लोकपत्रची वाटचाल चालू आहे.कार्यकारी संपादक सुंदर लटपटे यांना  लिखणाची पुर्ण मुभा देण्यात आली आहे,त्यावर आमचा अंकुश राहणार नाही,असे सांगितले.
यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते शालेय विद्याथ्र्यांसाठी नववर्षानिमित्त घेण्यात आलेल्या घेण्यात घोषवाक्य स्पर्धेतील विजेतांना पारितोषिकाचे वितरणही करण्यात आले.प्रास्ताविक प्रादेशिक विभाग प्रमुख अजित तांबोळी यांनी केले.
दैनिक लोकपत्र