ज्येष्ठ संपादक मुकुंदराव किर्लोस्कर यांचं निधन

मुंबई: ज्येष्ट संपादक मुकुंदराव किर्लोस्कर यांचं आज पुण्यात वृद्धापकाळाने निधन झालं. ‘किर्लोस्कर’, ‘स्त्री’, आणि ‘मनोहर’ या तीनही मासिकांचे संपादक म्हणून त्यांनी काम केलं. त्यांच्या जाण्याने महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जडणघडणीतील एक महत्वाचा भागीदार हरपला आहे.
किर्लोस्कर प्रेसचे मॅनेजिंग डायरेक्टर म्हणूनही त्यांनी काम पाहिलं.महाराष्ट्राच्या साहित्य क्षेत्रातल्या अनेक नामवंत व्यक्ती किर्लोस्कर मासिकातून घडल्या आहेत.किर्लोस्कर यांचा जन्म तीन मार्च १९२१ मध्ये किर्लोस्करवाडी येथे झाला. किर्लोस्कर यांनी पदवी प्राप्त केल्यानंतर, किर्लोस्कर ग्रुप ऑफ पब्लिकेशनमध्ये सहाय्यक संपादक या पदावर रुजु झाले. त्यानंतर १९५९ मध्ये किर्लोस्कर प्रेसचे मुख्य संपादक आणि व्यवस्थापक या पदाची जबाबदारी स्वीकारली. १९४३ ते १९८१ या काळात त्यांनी किर्लोस्कर मासिकाबरोबरच स्त्री, मनोहर या मासिकांचे प्रकाशक आणि संपादक म्हणून जबाबदारी सांभाळली.‘मनोहर’ या मासिकाचे साप्ताहिकात रुपांतर करण्याचे श्रेय त्यांना जाते. त्यांनी लिहिलेल्या संपादकीय लेखांचा ‘पेरणी’ हा संग्रह प्रसिद्ध आहे.