भुकेसह संख्या वाढली, मग बेजबाबदार कसे?

औरंगाबाद - प्रसारमाध्यमांची संख्या सातत्याने वाढणे, दररोज नवनवीन वर्तमानपत्रे व वाहिन्यांची संख्या
वाढणे हेच प्रसारमाध्यमे बेजबाबदार नाहीत याचे संकेत आहेत, असे मत प्रा.जयदेव डोळे यांनी व्यक्त केले. माध्यमे बेजबाबदार असती तर ही संख्या वाढलीच नसती, असेही ते म्हणाले. मराठी पत्रकार परिषदेच्या 39 व्या राज्यस्तरीय अधिवेशनात 'प्रसारमाध्यमे बेजबाबदार होत आहेत का' या विषयावर आयोजित परिसंवादात प्रा. डोळे बोलत होते. या वेळी ज्येष्ठ पत्रकार सारंग दर्शने, आमदार भाई जगताप, आमदार संजय शिरसाट, शेकापचे नेते एस.व्ही.जाधव, गंगाधर गाडे यांनी या परिसंवादात सहभाग घेतला.

डोळे म्हणाले की, आज माध्यमांमुळेच घोटाळे उघडकीस येत आहेत. माहितीची भूक वाढली आहे. माहितीचा साठा वाढल्यामुळे मागणीही वाढली आहे. त्यामुळे मराठी माध्यमे तर अजिबात बेजबाबदार नाहीत. सत्तेचे विकेंद्रीकरण झाल्यामुळे पत्रकार आणि राजकारणी खूप जवळ आले आहेत. मोठमोठय़ा उद्योगपतींनी वर्तमानपत्रे काढली, मात्र ती चालली नाहीत. तसेच माध्यमांमध्ये पेड न्यूज येण्यासाठी पत्रकार जबाबदार नसून मालक जबाबदार आहेत. त्यामुळेच पत्रकारांमध्ये सातत्याने नोकर्‍या बदलण्याचे प्रमाण वाढत असल्याचे मतही डोळे यांनी व्यक्त केले.

माध्यमांनी स्वत:च नैतिकतेची आचारसंहिता घालून घेण्याची गरज असल्याचे मत आमदार भाई जगताप यांनी व्यक्त केले. ते म्हणाले की, आज पेज थ्री कल्चर वाढले आहे. पानांची संख्या वाढत आहे. नकारात्मकताच बातमीचा विषय होत आहे. आमदार संजय शिरसाट यांनी एका बातमीमुळे काय नुकसान होते, याबाबत त्यांनी स्वत:चे उदाहरण सांगितले. एका बातमीमुळे आमदारकीपर्यंतचा प्रवास 12 वष्रे कसा लांबला याची माहिती दिली. त्यामुळे जबाबदारीने बातमी लिहिण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. 



 अधिवेशनात चर्चेऐवजी वाहिन्यांवर चर्चा

या वेळी राजकारण्यांच्या मतांचा चांगलाच समाचार परिसंवादातील पत्रकारांनी घेतला. आज समाजकारण करणारे हट्टाग्रही झाले आहेत. तर राजकारणी बेपर्वा आणि संस्कार करणार्‍या संस्था असहिष्णू झाल्या आहेत. न्यायव्यवस्थेवर बोलायलाच नको, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यातच बातमीला प्रतिसाद देण्याचे प्रमाण कमी झाल्यामुळे सनसनाटी वाढत आहे, असे मत ज्येष्ठ पत्रकार र्शीमंत माने यांनी व्यक्त केले. ते म्हणाले, जी काही बेजबाबदारी दिसते त्याला राजकारणीच जबाबदार आहेत. प्रशासकीय यंत्रणा हतबल झाल्यामुळे बातमीला प्रतिसादही मिळत नाही. त्यामुळे बातमीमध्ये सनसनाटी निर्माण होते. विधिमंडळ अधिवेशनात चर्चा करण्याऐवजी ते बंद पाडून वाहिन्यावर संध्याकाळी चर्चा केली जाते. समाजातील बधिरपणा ही अत्यंत गंभीर बाब असल्याचे सांगत राजकीय पक्षांना आरटीआय लागू करण्याची गरज असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.

लिखाण काळजीपूर्वक करण्याची गरज

सभ्य माणसे बेजबाबदारपणे लिखाण करीत नाहीत. बातमी केल्यानंतर त्याचा पुरावा राहतो. तो अनेक वर्षांनी काढून पाहता येतो. त्यामुळे बातमी लिहिताना माध्यमांकडून पुरेपूर काळजी घेतली जाते, असे मत 'दिव्य मराठी'चे निवासी संपादक धनंजय लांबे यांनी व्यक्त केले. बातमी, लिखाण हे बंदुकीच्या गोळीसारखे असून मागे घेता येत नाही. त्यामुळे शब्दांनी अचूक माणसाचा वेध घेत निदरेष व्यक्तींना त्याचा फटका बसू नये याची काळजी घेण्याची गरज असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले. सारंग दर्शने म्हणाले की, तेच ते बोलून अर्थशून्य चर्चेला आता अर्थ उरला नाही. आधुनिक माध्यमांचा प्रभाव झपाट्याने वाढतोय. सामाजिक संकेतस्थळावरून लोक व्यक्त होऊ लागले आहेत. माध्यमे आधुनिक झाल्यामुळे ती बेजबाबदार नाहीत, असे मतही त्यांनी व्यक्त केले. एन.व्ही.जाधव आणि गंगाधर गाडे यांनीदेखील माध्यमे जबाबदारीने काम करत असल्याचे सांगितले. 

संपादकांपेक्षा व्यवस्थापनातील लोकांचे महत्त्व वाढले 
पादकांपेक्षा आज व्यवस्थापनातल्या लोकांना जास्त महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे संपादक केवळ ब्रॅँड मॅनेजर होत आहेत, अशी खंत ज्येष्ठ पत्रकार अब्दुल कदीर यांनी व्यक्त केली. 'संपादक नावाची प्रभावी संस्था निस्तेज होत चालली आहे का' या विषयावर मराठी पत्रकार परिषदेच्या राज्यस्तरीय अधिवेशनात परिसंवाद घेण्यात आला होता. कदीर आणि सुशील कुलकर्णी यांनी मते व्यक्त केली. सुशील कुलकर्णी यांनी आज अग्रलेखामधली जागादेखील कमी होत आहे. वाचक संपादकीय वाचत नाहीत, अशी स्थिती निर्माण झाली आहे. मात्र, ही निस्तेजता कशामुळे आली याचा विचार करण्याची गरज असल्याचे सांगत लोक वाचत नाहीत यापेक्षा लोकांनी वाचावे, असे लिखाण करण्याची गरज असल्याचे मत कुलकर्णी यांनी व्यक्त केले. व्यासपीठावर बालाजी सूर्यवंशी, संजय वरकड, बाबा गाडे, प्रमोद माने, एस.एम.देशमुख यांची उपस्थिती होती. 

39 वर्षांतले सर्वोत्कृष्ट अधिवेशन
या अधिवेशनात राज्यातल्या कानाकोपर्‍यातून 1600 पत्रकार सहभागी झाले होते. आतापर्यंत राज्यात अनेक ठिकाणी अधिवेशने झाली. मात्र, आतापर्यंतच्या अधिवेशनात हे अधिवेशन सर्वोत्कृष्ट झाले, असे कौतुक एस.एम.देशमुख यांच्यासह अनेक मान्यवरांनी केले. हे अधिवेशन यशस्वी केल्याबद्दल स्वागताध्यक्ष बालाजी सूर्यवंशी, संजय वरकड, प्रमोद माने यांचे कौतुक करण्यात आले. या वेळी किरण नाईक यांनी अध्यक्षपदाचा, चंद्रशेखर बेहरे यांनी कार्याध्यक्षपदाचा तर संतोष पवार यांनी सरचिटणीसपदाचा कार्यभार स्वीकारला. 
 दिव्य मराठी