मटणाच्या हट्टापायी ‘गृहलक्ष्मी’च्या संपादिका पुन्हा रस्त्यावर !


मुंबई - एकेकाळी बंगला, दोन फ्लॅट, कार आणि 50 लाखांचा बँक बॅलन्स असणा-या ‘गृहलक्ष्मी’ मासिकाच्या संपादिका सुनीता नाईक (वय 65) पुन्हा एकदा रस्त्यावर आल्या आहेत. महिनाभरापूर्वी त्यांना आधार देणा-या क्रिस्टिना मिस्किटा यांच्याकडून दररोज मटणाची मागणी पूर्ण होत नसल्याने त्यांच्या घरातून बाहेर पडण्याचा निर्णय नाईक यांनीच घेतला. त्यांच्या दररोजच्या मागण्या पूर्ण करता करता मिस्किटा मात्र वैतागून गेल्या होत्या.
जवळच्याच लोकांनी फसवल्यामुळे सुनीता नाईक रस्त्यावर आल्या होत्या. मुंबईतील फुटपाथवर त्या हलाखीच्या परिस्थितीत जीवन व्यतीत करत असल्याची माहिती प्रसारमाध्यमांनी प्रकाशित केली होती. त्याची दखल घेऊन विलेपार्ले येथे राहणारे ग्रेगोरी व क्रिस्टिना मिस्किटा या दांपत्याने नाईक यांचे पालकत्व स्वीकारले. 20 ऑगस्ट रोजी नाईक यांना त्यांच्या आवडत्या कुत्र्यासह आपल्या घरी राहावयास नेले. सुरुवातीला त्यांच्या पाहुणचाराने नाईकही भारावून गेल्या होत्या. मात्र नंतर त्यांनी दररोज मटणाची मागणी सुरू केली.


‘एक-दोन वेळा आम्ही नाईक यांचा हट्ट पुरवला. मात्र, दररोज मटण खाऊ घालणे आम्हालाही परवडत नव्हते. तसेच त्यांच्या शशी या कुत्र्यावरून पतीसोबत अनेकदा वाद होत होता. 17 सप्टेंबर रोजी आमचे घर सोडण्याचा निर्णयही स्वत: नाईक यांचाच होता,’ अशी प्रतिक्रिया क्रिस्टिना यांनी माध्यमांना दिली. सुनीता नाईक सध्या वर्सोवा येथील गुरुद्वाराबाहेर आश्रयास आहेत.


कुत्र्याला खाऊ घातल्या मूठभर क्रोसिन गोळ्या
नाईक यांच्यासोबत त्यांचा शशी नामक कुत्राही क्रिस्टिना कुटुंबीयांकडे होता. एके दिवशी नाईक यांनी आपल्या कुत्र्याला मूठभर क्रोसिन गोळ्या खाऊ घातल्या. त्यामुळे भोवळ येऊन शशीचा मृत्यू झाला. त्यांचे हे वागणे ग्रेगोरी यांना आवडले नाही. त्यांनी विचारणा केली, तसेच कुत्रा आजारी असल्याचे सांगितले असते तर डॉक्टरकडेही नेले असते, असे सांगितले. मात्र ‘मी नेहमीच त्याला अशा गोळ्या खाऊ घालत होते,’ असे नाईक त्या वेळी म्हणाल्या होत्या.


नाईकांचा ‘ताठर बाणा’
हलाखीच्या आर्थिक परिस्थितीमुळे रस्त्यावर आल्यानंतरही सुनीता नाईक यांचा स्वभाव मात्र ‘ताठर’च होता. मिस्किटा यांनी आधार देण्यापूर्वीही त्या जेव्हा फुटपाथवर राहत होत्या, त्या वेळीही ‘मी भीक मागत नाही. येणारे-जाणारेच मला खायला देतात,’ अशी प्रतिक्रिया त्यांनी माध्यमांना दिली होती. आणि आता रोज मटणाच्या मेजवानीचा हट्ट पूर्ण होत नसल्याने नाईक यांनी मिळालेला आश्रय सोडून पुन्हा फुटपाथचा रस्ता धरला आहे.

http://divyamarathi.bhaskar.com/article-ht/MAH-MUM-because-of-non-veg-grilaxmis-editor-again-on-road-4381299-NOR.html