डॉकयॉर्ड रोड इमारत दुर्घटनेत पत्रकार योगेश पवारचा मृत्यू

मुंबई : शुक्रवारची सकाळी पावणेसातची वेळ डॉकयार्ड रोड परिसरातील दुर्दैवी इमारतीतील 22 कुटुंबांसाठी घातवेळ ठरली.. काही कळण्याआधीच पालिकेची पाच मजली इमारत पत्त्यासारखी कोसळली.. दैनिक सकाळमध्ये अनेकांच्या दु:खाचं, अडचणींचं वार्तांकन करणारा योगेशचा या ढिगाऱ्यानं बळी घेतलाय.

एका बातमीदाराचीच बातमी झाली. योगेश पवार दैनिक सकाळमध्ये गेल्या सहा वर्षांपासून असलेला. या दुर्घटनेनं त्याचा बळी घेतला.

योगेशचे वडील अनंत पवार महापालिकेच्या मार्केट विभागात काम करायचे.. योगेश पवार त्यांच्यासोबतच एका खोलीत राहायचा.. काल इमारत कोसळल्यानंतर अनंत यांना जखमी अवस्थेत जेजे रुग्णालयात दाखल करण्यात आलं.. हॉस्पिटलमध्ये त्यांचा मृत्यू झाला.

योगेशच्या जखमी वडिलांना बाहेर काढल्यापासून योगेशचाही शोध सुरु होता, अखेर 24 तासानंतर योगेशचा मृतदेहच हाती आला.. सहकारी, मित्र आणि कुटुंबियांच्या पायाखालची जमीनच सरकली..

अवघ्या 30 वर्षाचा योगेश 2001 पासून पत्रकारितेत आहे.. आधी पुढारी आणि मग सकाळमध्ये काम करताना त्यानं अनेक मुद्दे तडीस लावले..

ट्रान्सपोर्ट आणि इन्फ्रास्ट्रक्चर या विषयांमध्ये योगेशचा हातखंडा होता.. आरटीओ कार्यालयातील घोटाळ्यांवर त्यानं लिहिलेल्या अभ्यासपूर्ण मालिकेनंतर सरकारला नवं धोरण आखावं लागलं..

योगेश मूळचा जैतापूरचा. पालिकेच्या दर्घटनाग्रस्त इमारतीत तो आणि फक्त त्याचे वडिल असे दोघेच राहायचे. त्याचं अजून लग्नही झालं नव्हतं. त्याच्या मागे आता आई, दोन भाऊ आणि लग्न झालेली बहिण असा परिवार आहे.


ABP Majha