पुणे: - मराठी मीडिया वर्तुळात सध्या एकाच नावाची जोरदार चर्चा आहे, ती म्हणजे 'LS मराठी'. पुण्याच्या बालेवाडी परिसरात या नव्या सॅटेलाईट चॅनलने आता आपला तंबू ठोकला असून, चॅनलच्या 'ड्राय रन'चा बिगुल वाजला आहे.
डिजिटलवर 'गुलाल' उधळला, आता थेट सॅटेलाईटवर धडक!
सध्याच्या काळात जिथे प्रस्थापित चॅनल्सना डिजिटलवर टिकून राहण्यासाठी धडपड करावी लागत आहे, तिथे 'LS मराठी'ने लॉंचिंगपूर्वीच डिजिटलवर आपली चुणूक दाखवली आहे. नगरपालिका निवडणुकांसाठी त्यांचा ‘गुलाल कोणाचा?’ हा शो अक्षरशः गाजला. पश्चिम महाराष्ट्र, खानदेश आणि मराठवाड्यात या शोला मिळालेल्या प्रतिसादाने जुन्या खेळाडूंचे धाबे दणाणले आहेत.
आकडेवारीच बोलायचं तर, डिजिटल प्लॅटफॉर्मवर हे चॅनल सध्या ३ आणि ४ नंबरवर ट्रेंड करत आहे. ११ डिसेंबरला तर 'एबीपी माझा' सारख्या दादा चॅनलला त्यांनी अवघ्या २१ हजार व्ह्यूजच्या फरकाने टक्कर दिली होती. त्यामुळे हे चॅनल सॅटेलाईटवर आल्यावर काय जादू करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
बालेवाडीत हायटेक सेटअप आणि तगडी टीम
बालेवाडी येथील हेडऑफिस आता पूर्णपणे सज्ज झाले आहे. स्टुडिओ, MCR, PCR तयार असून फक्त न्यूजरूमचे फायनल टचिंग बाकी आहे. येत्या आठवडाभरात सर्व स्टाफ तिकडे शिफ्ट होत आहे. मालक स्नेहल चौधरी आणि पंकज अग्रवाल यांनी चॅनलच्या क्वालिटीमध्ये कोणतीही तडजोड न करता 'हटके' लॉंचिंगचा प्लॅन आखला आहे.
एखादं चॅनल उभं राहताना टीम कशी आहे, यावर सर्व काही अवलंबून असतं. 'LS मराठी'ने यात बाजी मारली आहे.
डिजिटल हेड: ईटीव्ही आणि एबीपी माझाचा तब्बल २ दशकांचा अनुभव असलेले मेघराज पाटील.
इनपूट हेड: टीव्ही9, न्यूज18 लोकमत, जय महाराष्ट्र आणि एबीपी माझा असा १८ वर्षांचा दांडगा अनुभव असलेल्या नयन कारेकर. सध्याची सर्व मेगा-भरती त्यांच्याच देखरेखीखाली सुरू आहे.
ब्युरो चीफ : पुण्याची जबाबदारी अनुभवी अश्विनी सातव - डोके यांच्यावर सोपवण्यात आली आहे तर मराठवाड्यासाठी दत्ता कनवटे, कोकणसाठी विशाल रेवडेकर यांना नियुक्त करण्यात आले आहे.
स्पेशल स्टोरीज: ब्रम्हा चट्टे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
मुख्य संपादक कोण?
सर्वात मोठी बातमी म्हणजे चॅनलच्या 'कॅप्टन ऑफ द शिप' म्हणजेच मुख्य संपादकपदासाठी मीडियातील दोन अत्यंत मोठ्या नावांनी नुकतीच मुलाखत दिल्याची आतली खबर आहे. त्यामुळे हे पद कोणाच्या गळ्यात पडणार, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
भरती प्रक्रिया जोरात
आगामी महानगरपालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून चॅनलने २९ महानगरपालिकांमध्ये प्रतिनिधी आणि स्ट्रिंगर्सना कामाला लावले आहे. ऑफिसचे काम पूर्ण झाल्याने भरती प्रक्रिया पुन्हा जोमाने सुरू झाली असून, मीडियात काहीतरी नवीन करू पाहणाऱ्यांसाठी ही मोठी संधी असल्याचे बोलले जात आहे.
थोडक्यात काय, तर 'LS मराठी'ने सध्यातरी आपल्या तयारीने 'हवा' केली आहे. आता ऑन एअर आल्यावर ही हवा वादळात रूपांतरित होणार का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल!



0 टिप्पण्या