अखेर ठरलं! ज्ञानदा कदम यांची 'घरवापसी'; 'एबीपी माझा'मध्ये पुन्हा एकदा घुमणार आवाज!

 


मुंबई: माध्यम वर्तुळात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चेच्या वादळाला अखेर पूर्णविराम मिळाला आहे. प्रसिद्ध टीव्ही अँकर ज्ञानदा कदम यांनी 'न्यूज १८ लोकमत'ला रामराम ठोकला असून, त्या पुन्हा एकदा आपल्या जुन्या म्हणजेच 'एबीपी माझा'च्या घरात परतणार आहेत. 'बेरक्या'च्या अत्यंत विश्वासनीय सूत्रांनी या वृत्तावर शिक्कामोर्तब केलं आहे.

तब्बल १७ वर्षांची यशस्वी कारकीर्द 'एबीपी माझा'मध्ये गाजवल्यानंतर, ज्ञानदा कदम यांनी मोठ्या थाटामाटात 'न्यूज १८ लोकमत'मध्ये प्रवेश केला होता. त्यांच्या या निर्णयाने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला होता. मात्र, अवघ्या एका वर्षाच्या आतच ज्ञानदा यांनी पुन्हा एकदा 'घरवापसी'चा निर्णय घेतला आहे.

'न्यूज १८ लोकमत'मध्ये दाखल झाल्यानंतरही ज्ञानदा कदम यांची लोकप्रियता कायम होती. मात्र, 'एबीपी माझा'मधील त्यांची जागा आणि प्रेक्षकांच्या मनातील स्थान अढळ होतं. आता त्यांच्या पुनरागमनाच्या वृत्तामुळे 'एबीपी माझा'च्या प्रेक्षकांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे.

या 'घरवापसी'मागे नेमकी काय कारणं आहेत, यावर आता तर्कवितर्कांना उधाण आलं आहे. मात्र, एक गोष्ट नक्की की, ज्ञानदा कदम यांच्या येण्याने 'एबीपी माझा'ची अँकर फळी अधिकच मजबूत होणार आहे.

थोडक्यात काय, तर "फिरून फिरून... ज्ञानदा परत आपल्या घरीच!" आता पुन्हा एकदा 'काय सांगशील ज्ञानदा?' हे वाक्य 'एबीपी माझा'च्या स्क्रीनवर ऐकायला मिळणार, हे नक्की!



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या