> बेरक्याला माहिती देण्यासाठी ई - मेल करा - berkya2011@gmail.com

शुक्रवार, ७ फेब्रुवारी, २०१४

नाशिकच्या पत्रकारितेत उलथापुलथ!


नाशिकच्या पत्रकारितेत लवकरच मोठी उलथापुलथ होण्याची चिन्हे आहेत. गेली अनेक वर्षे तिथल्या पूर्वीच्या सर्वाधिक खपाच्या स्थानिक दैनिकात कार्यकारी संपादक असलेले आणि राजकारणात नसूनही नाशिकचे 'राजकारण' गाजविणारे देवळालीकर लवकरच बोरीबंदरच्या 'स्मार्ट मित्र'च्या हातात-हात धरून आपली नवीन इनिंग सुरू करू शकतात. तिथे ते मेट्रो एडिटर किंवा निवासी संपादक म्हणून बहुधा फेब्रुवारीच्या अखेरच्या किंवा मार्चच्या पहिल्या आठवड्यात रुजू होवू शकतात. त्यांनी 'उत्तर महाराष्ट्रातील अग्रगण्य दैनिका'चा राजीनामा दिल्याचीही खात्रीलायक माहिती 'बेरक्या'कडे आहे. त्यांनी नोटीस दिली असून उद्या, शनिवारी बहुधा ते टिळकपथावर शेवटचेच दिसतील, असे सांगितले जात आहे. आता 'स्मार्ट मित्रा'ला नाशिकच्या पत्रकारितेतील 'सचिन' लाभला तर पूर्वी 'उत्तर महाराष्ट्राची खबरबात' घेणारा मालेगावचा खेळाडू काय करणार, याबाबत उत्सुकता आहे. 
 
'स्मार्ट मित्रा'ची नाशिकमधील आणि नंतर जळगावातील स्थिती फारशी समाधानकारक न राहिल्याने नव्या संपादकीय संचालकाने फेरबदलाचा निर्णय घेतला होता, असे समजते. आता दैनिक नाशिकच्या मातीशी कनेक्ट करतानाच जळगावातील अनागोंदी थांबविण्याचे मुख्य काम देवळालीच्या देशमुखांसमोर राहील.
 
नाशिकमधील पत्रकारितेत 'दादा' असलेल्या जुन्या नाशिकमधील 'समर्थ' ज्येष्ठ पत्रकाराचे चिरंजीव  आणि देवळालीच्या देशमुखांचे 'खास मित्र' असलेले पत्रकार मुंबईतील एका वाहिनीला 'जय महाराष्ट्र' करून 'निर्भीड जनमत'च्या संपादकपदाची सूत्रे हाती घेत आहेत. 
 
दुसरीकडे 'सीटू'ची सूत्रे सांभाळणारे नाशिकमधील ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते पत्रकारितेत समांतर 'पर्याय' उभारण्याच्या तयारीत आहेत. त्यांनी 'पर्याय'साठी मुलाखतीही सुरू केल्या आहेत. सिडकोत हॉटेल असलेल्या नगरसेवकाच्या मंगल कार्यालयात मुलाखतपर्व सुरू आहे. 

जाता - जाता 
देशदूतचे मुख्यसंपादक प्रकाश कुलकर्णी हे पुन्हा स्वगृही नवशक्तीमध्ये परतले. सारडाशेठला लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मोठा झटका. कुलकर्णी हे देशदूतचे मोठे आर्थिक आधारस्तंभ होते. बँकिंग परिषदेसह इतर छोटेमोठे उपक्रम ते राबवित. मागच्या वेळच्या अशोकपर्वचा लाभ त्यांनीच देशदूतला मिळवून दिला होता. नवशक्तीचे संपादक नंदकुमार टेणीही स्वगृही लोकमतला परतले. ते ठाण्याचे निवासी संपादक झालेत. टेणी हे पूर्वी नाशिक देशदूतचे संपादक होते. टेणींचा प्रवास लोकमत-सामना-देशदूत-नवशक्ती व पुन्हा लोकमत असा झाला. कुलकर्णींच्या जागी जळगाव देशदूतचे संपादक हेमंत अलोने यांची वर्णी लागली. ते देशदूतचे मुख्यसंपादक झालेत.

फेसबुक वर शेअर करा

Facebook