मराठी पत्रकार परिषदेच्या अध्यक्षांच्या चौकशीचे आदेश

मराठी पत्रकार परिषदेचे राज्याध्यक्ष किरण नाईक यांनी केलेल्या फसवणुकीबाबतच्या तक्रार अर्जाची चौकशी सातारा पोलिसांच्या स्थानिक गुन्हे विभागाने सुरू केली आहे. याबाबत 'सकाळ'ने प्रसिद्ध केलेली बातमी अशी -

सातारा जिल्हा मराठी पत्रकार संघ या नावाने नोंदणी नसलेल्या संस्थेच्या सभासदत्वासाठी दोनशे रुपये घेऊन पावती न देता, सर्व सभासदांची बैठक न घेता, स्वत:च्या मर्जीतील लोकांची परस्पर कार्यकारिणी जाहीर करून फसवणूक केल्याप्रकरणी मराठी पत्रकार परिषदेचे राज्याध्यक्ष किरण नाईक यांच्याविरुद्ध कारवाई करण्याची मागणी पोलिस अधीक्षक अभिनव देशमुख यांच्याकडे करण्यात आली आहे. या तक्रार अर्जाची चौकशी स्थानिक गुन्हे विभागाकडे देण्यात आली आहे.


सातारा शहर पत्रकार संघाचे कार्यकारिणी सदस्य गिरीश शंकरराव चव्हाण यांनी याबाबत श्री. देशमुख यांच्याकडे 10 मार्च रोजी तक्रार अर्ज दिला. त्यात म्हटले आहे, की 15 फेब्रुवारी 2014 रोजी एका वृत्तपत्रामध्ये सातारा जिल्हा मराठी पत्रकार संघासाठी सभासद नोंदणी सुरू असल्याची बातमी प्रसिद्ध झाली होती. बातमी व इतर पत्रकारांकडून मिळालेल्या माहितीनुसार मी व जिल्ह्यातील अनेक पत्रकारांनी दोनशे रुपयांची वर्गणी दिली. नोंदणीसंदर्भात किरण नाईक येथील शासकीय विश्रामगृहावर आले होते. त्यांच्याकडे पत्रकारांचे जमलेले पैसे देण्यात आले. त्या वेळी नाईक यांनी तुम्ही सभासद झाला आहात असे सांगितले. त्यानंतर तीन मार्च रोजी नाईक यांनी पत्रकार परिषदेच्या कार्यकारिणीची निवड केल्याचे वृत्तपत्रातून जाहीर केले. वास्तविक सभासदांची कोणतीही बैठक न घेता अशा प्रकारे कार्यकारिणी कशी झाली, त्याची उद्दिष्टे काय, याबाबतच्या चौकशीसाठी किरण नाईक यांच्याशी मोबाईलवर संपर्क केला. बैठक कधी झाली, सभासद नोंदणीच्या पावत्या का देत नाही याबाबत त्यांनी समाधानकारक उत्तरे दिली नाहीत. सातारा येथील सहायक धर्मादाय आयुक्त यांच्या कार्यालयात चौकशी केली असताना सातारा जिल्हा मराठी पत्रकार संघ या नावाने कोणतीही संस्था रजिस्टर नसल्याचे कळाले.

त्यामुळे फसवणूक झाल्याचे स्पष्ट होत आहे. या प्रकाराची चौकशी करून कायदेशीर कारवाई करण्याची मागणी तक्रार अर्जात करण्यात आली आहे. श्री. देशमुख यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे निर्देश स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला दिले आहेत.
http://bhadas4media.com