संजय राऊतांचे पंख छाटणार; सुभाष देसाई व डाकेंना 'सामना'त लक्ष घालण्याचे आदेश


शिवसेनेचे मुखपत्र 'सामना' वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक व पक्षाचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी गुजराती समाजावर अग्रलेख लिहिल्यानंतर त्यांचे पंख छाटण्याचे काम सुरु झाले आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेना नेते सुभाष देसाई आणि लीलाधर डाके यांना 'सामना'च्या दैनंदिन कामात लक्ष घालण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार देसाई आणि डाके यांनी सोमवारपासूनच सामनात लक्ष देण्यास सुरुवात केली आहे.
शिवसेना सोडून गेलेल्या लोकांसमवेत राऊतांचे 'मधुर' संबंध असल्याचे बोलले जाते. शरद पवारांशी जवळीक व सेनेतील महत्त्वाच्या बातम्या 'लीक' होण्यामागे संजय राऊत असल्याचे उद्धव यांच्या लक्षात आणून दिल्यानंतर गेल्या काही दिवसापासून संजय राऊत उद्धव यांच्या रडारवर होते असे सूत्रांनी माहिती दिली आहे.
1 मे रोजी ‘सामना’च्या अग्रलेखात गुजराती समाजाच्या ‘बेपारी’ वृत्तीवर टीका करण्यात आली होती. वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी हा अग्रलेख लिहिला होता. तसेच यातील मजकूराची माहिती उद्धव यांना दिली नव्हती. उद्धव त्यावेळी पत्नी रश्मीसह युरोपच्या दौ-यावर होते. मात्र, सामनातील या अग्रलेखानंतर मुंबईतील गुजरातींत अवस्था पसरली.
भाजपनेही उघड नाराजी व्यक्त केली. मुंबईतील मोदींच्या खास दूतामार्फत ही माहिती मोदीपर्यंत गेली. त्यानंतर मोदींनी सेनेशी चर्चा केल्याचे समजते. लोकसभा निवडणुकीत युतीच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहणार्‍या गुजराती समाजाला दुखावल्यास विधानसभेला मोठा फटका बसू शकतो, याची जाणीव सुभाष देसाई यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना लक्षात आणून दिल्यानंतर उद्धव खडबडून जागे झाले व त्यांनी लागलीच युरोपमधून एक निवेदन प्रसिद्ध केले. तसेच पक्षाची ही अधिकृत भूमिका नसल्याचे जाहीर करण्याची वेळ त्यांच्यावर आली.