नाशिकमधील माध्यमांनी दाबला शिवसेना नेत्याचा 204 एकर जमीन घोटाळा

नाशिकचे  शिवसेना महानगर प्रमुख अजय बोरस्ते यांनी मातोरी गावातील शेतकऱ्यांची,  गावातील 204 एकर जमीन खोटे कागदपत्र तयार करून लाटण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करीत काल, 23 मार्च रोजी नाशकात मोठे आंदोलन झाले. मात्र, नाशिकमधील माध्यमांनी हे महत्त्वाचे प्रकरण चक्क दडपून टाकले आहे. इलेक्ट्रॉनिक मीडियाचे सर्व प्रतिनिधी कॅमेरा व बूम घेवून नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मातोरी गावातील शेतकऱ्यांनी कुटुंबासह केलेल्या ठिय्या आंदोलनाला उपस्थित होते. त्यांनी सारे शूटिंगही केले, बाईटस घेतले. मात्र, बातमीचे 'दर्शन' काही कोणत्याच वाहिनीवर झाले नाही. एव्हढे महत्त्वाचे प्रकरण देशदूत, सकाळ, लोकसत्ता आदी स्थानिक वृत्तपत्रांनी उचलून धरले. मात्र, मुंबईच्या एका 'स्मार्ट' दैनिकाने त्याची एकही ओळ छापली नाही. या दैनिकाचे कार्यकारी संपादक पूर्वी 'सेने'चे शिलेदार असल्याने त्यांचे सर्वच सेनापतींशी अत्यंत 'सौहार्दपूर्ण' संबंध आहेत. त्यामुळे ते अनेकदा लोकहिताच्या, महत्त्वाच्या बातम्यांनाही 'जय महाराष्ट्र' करून मोकळे होतात. या 'स्मार्ट' वृत्तपत्राची बांधिलकी वाचकांशी आहे की सेनापतींशी ?? 
 
१५० शेतकऱ्यांनी आपल्या हक्कासाठी रस्त्यावर ठिय्या मांडून जमीन बळजबरीने लाटण्याच्या प्रकाराचा विरोध केला, ही टीव्हीवाल्यांसाठी बातमी होवू शकत नाही? 'सेटिंग' किती असावी याला काही मर्यादा? बरे खालची मंडळी 'सेट' होत असतील; पण 'वरची' मुंबईतील धोरण ठरविणारी आणि नियोजन करणारी मंडळी मात्र 'कोरडे' राहूनही 'बदनाम' होतात.  बाजारभावाने 200 कोटींची जमीन फक्त दोन कोटीत लाटली गेली. 2 टक्के म्हटले तरी 'सबखूष' व्यवहारांवर चार कोटी उधळणे सहज शक्य आहे!! अरे पण तुम्ही वाचकांना, दर्शकांना कधी खूष करणार? 
 
एका दिवसात 300 शेतकऱ्यांची सब-रजिस्ट्रार कार्यालयात व्यवहार नोंद शक्य आहे का? तसा चमत्कार या व्यवहारात घडलाय. एकाच दिवसात 300 शेतकरी 'रेकॉर्ड' केले गेले. एरव्ही सामान्य खरेदीसाठी कुणी सर्वसामान्य नागरिक गेला तर त्याला संपूर्ण दिवसभर ताटकळत ठेवले जाते. सब-रजिस्ट्रार कार्यालयात कसेबसे रोज 20-25 व्यवहार नोंद होतात. तिथे 300 व्यवहारांची एकाच दिवसात नोंद अशी दहा पट धडाकेबाज कामगिरी करणाऱ्या नाशिक सब-रजिस्ट्रार कार्यालयाचा तर मुख्यमंत्र्यांनी सत्कार करायला हवा. त्यांच्या कार्याक्षमतेच्या टीव्ही मीडियाने बातम्या करायला हव्यात.. 
 
शिवसेना महानगर प्रमुख अजय बोरस्ते आणि माजी खासदार प्रताप दादा सोनावणे यांची मुलगी सोनिया सोनावणे यांच्यावर जमीन बळकावण्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला तरीही टीव्हीवाल्यांसाठी बातमी होत नाही. अरेरे, या 'महाराष्ट्र'च्या पत्रकारितेचा 'टाईम्स'च खराब आलाय!!!